हीच ती "गंगा जमुनीं" तहजीब



भारतातील तमाम तथाकथित धर्मनिरपेक्षवादी आणि उदारमतवादी बुद्धिजीवी यांचा अत्यंत आवडता शब्द आहे "गंगा जमुनीं तहजीब". भारतातील हिंदुत्ववाद्यांना शब्दाचा मार देतांना हमखास वापरला जाणारा हा शब्द त्यांच्या नुसार भारतातील हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक आहे. भारतात जी काही धार्मीक असहिष्णुता आहे ती फक्त आणि फक्त या हिंदुत्ववादामुळे आहे असा दावा यांचा असतो. मात्र आज या दाव्यातील फोलपणा मद्रास उच्च न्यायालयाने उघड केला. 


तामिळनाडू मधील पेलम्बदूर नावाच्या जिल्ह्यातील कलथूर शहर. भारतातील अनेक छोट्या शहरासारखे एक शहर. फक्त फरक इतकाच की या शहरात हिंदू अल्पसंख्य आहेत. मुस्लिमबहुल असलेले शहर आज चर्चेत आले. कारण होते मद्रास उच्च न्यायालयात आलेली याचिका. काय होती याचिका? 


तर या शहरातील एका मुस्लिम धर्मीयाने मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिके नुसार या शहरातील हिंदू सण साजरे करण्यावर, मिरवणुका काढण्यावर बंदी घालावी अशी मागणी केल्या गेली. बंदी का घालावी? तर हा मुस्लिम बहुल भाग आहे. मुस्लिम मूर्तिपूजा मानत नाही. मूर्तिपूजा करणे हे आमच्यासाठी पाप आहे. अश्या मुस्लिमबहुल भागात हिंदू मूर्तिपूजा करतात, धार्मिक मिरवणुका काढतात त्यामुळे आमच्या श्रध्येला धक्का लागतो, म्हणून ही बंदी आणली जावी. 


मद्रास उच्च न्यायालयाच्या न्या. एन. किरुबाकरन्‌ आणि न्यायाधीश पी. वेलमुरुगन्‌ यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली. या याचिका फेटाळून लावतांना न्यायालयाने काही निरीक्षणे मांडली आणि मुस्लिम समुदायाला कानपिचक्या पण दिल्या. न्यायालय म्हणाले, भारत एक धर्मनिरपेक्ष देश आहे. मुस्लिमांचा गट अन्य समाजाच्या धार्मिक मिरवणुका, उत्सवांच्या मूलभूत अधिकाराला विरोध करू शकत नाही. याच सोबत न्यायालयाने हिंदूंविरुद्धच्या या असहिष्णुते विरोधात टीका तर केलीच, सोबतच देश स्वातंत्र्य झाल्यानंतर देशातील हिंदूंनी पण मुस्लिमांवर असेच निर्बंध लावले असते तर चालले असते का? असा प्रश्न पण याचिकाकर्त्याला विचारला. २०१२ पर्यंत गावात हिंदूंच्या धार्मिक मिरवणुका आणि इतर धार्मिक अधिष्ठाने व्यवस्थित सुरू होती याचा दाखला पण दिला. सोबतच देशातील प्रत्येक ठिकाणी या पद्धतीने बहुसंख्याकांनी इतर धर्माच्या धार्मिक कार्यक्रमांना बंदी घातली तर काय परिस्थिती येऊ शकेल याची जाणीव पण करून दिली.



जर धार्मिक असहिष्णुतेस थारा दिला जात असेल तर ते धर्मनिरपेक्ष देशासाठी चांगले नाही. कोणत्याही धार्मिक समुदायाच्या कोणत्याही प्रकारच्या असहिष्णुतेला प्रतिबंधित केले जावे, असेही न्यायालयाने म्हटले. अशा मागण्या करून मुस्लिम आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही मद्रास उच्च न्यायालयाने आपल्या निरीक्षणात नोंदवले आहे.


या वरून तरी उत्तर प्रदेशातील कैराना, मुजफराबाद सारख्या मुस्लिम बहुल भागात राहात असलेल्या हिंदूंच्या वाट्याला काय भोग येत असतील याची जाणीव होते. काश्मीर मधील विस्थापितांना काय भोगावे लागले असेल याची कल्पना येते. इथे निदान प्रकरण न्यायालयात नेल्या गेले. आता हा न्याय प्रत्यक्षात आला म्हणजे मिळवली, नाही तर सामाजिक सलोखा जपायला म्हणून स्थानीय पोलीस पुन्हा हिंदूंना मिरवणुकीला परवानगी नाकारतील आणि हिंदू पुन्हा न्यायालयात संघर्ष करत राहतील.

टिप्पण्या