चिनी चिमण्या आणि अस्ट्रेलियन मांजरी



चीन आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांमध्ये सध्या राजनैतिक संबंध चांगलेच ताणल्या गेले आहे. दक्षिण चीन समुद्रा वरील वाढती चिनी पकड, ऑस्ट्रेलियामध्ये व्यापार करण्यासाठी चीन करत असलेली कारस्थाने, त्यातच ऑस्ट्रेलियाने चिनी कोरोना विषाणू संदर्भात उघडपणे घेतलेली चीन विरोधी भूमिका आणि महत्वाचे म्हणजे अमेरिकेच्या पुढाकाराने दक्षिण आशियातील चिनी कारवाया रोखण्यासाठी तयार केलेल्या क्वांड समूहात भारत-जपान सोबत ऑस्ट्रेलिया देत असलेले सक्रिय सहभाग हा या संबंध ताणल्या जाण्याचे कारणे आहेत. तरी पण ऑस्ट्रेलिया आणि चीन मध्ये एक साम्य आहे, ते म्हणजे निसर्गाचा समतोल बिघडेल असे निर्णय घेण्याचा आणि नंतर घेतलेल्या त्या निर्णयामुळे नवीन संकटात सापडायचा.


आता चीन सध्या गाजत आहे तो कोविड विषाणूचा जगभरात संसर्ग झाल्यामुळे, कारण हा विषाणू चीन मधील वुहान येथील प्रयोगशाळेत तयार झाला असा आरोप होत आहे. मात्र चीन सरकारचे म्हणणे आहे की हा विषाणू वुहान मधील पशु बाजारातून आला आहे. या पशु बाजारात खाण्यासाठी पकडून आणलेल्या वटावागुळातून या विषाणूचा संसर्ग मानवाला झाला. आता विषाणूचा संसर्ग कसा झाला? हा या लेखाचा विषय नाही म्हणून आता या वर लिहीत नाही. मात्र जरी आपण चीन सरकारचा दावा खरा आहे असे मानले तरी या विषाणू संसर्गा करता पण चीनचे साम्यवादी सरकारची आताताई धोरणे कारणीभूत आहे असे आपल्याला म्हणावे लागेल.



चीन मध्ये माओ यांच्या नेतृत्वात साम्यवादी क्रांती झाल्यानंतर चीनला अधिक सामर्थ्यशाली बनवण्याच्या वेगवेगळ्या योजना आणण्यात आल्या. अमेरिका आणि ब्रिटनच्या पंक्तीत एकदम जाऊन बसायची चीनच्या नेतृत्वाला घाई झाली होती. या म्हत्वाकांक्षेतून योजना निघाली "द ग्रेट लीप फॉरवर्ड" एका उडीत, म्हणजे फक्त १५ वर्षात या महासत्ता देशांच्या बरोबरीत चीनला आणायची ! १९५० साली चीन हा कृषिप्रधान देश होता. चीन मधील बहुतांश मनुष्यबळ हे शेतीवर अवलंबून होते. मग माओनी सामुदायिक शेती करत अन्न धान्याचे विक्रमी उत्पन्न घेण्याची योजना आखली. त्या काळात चीन मध्ये एकर मागे २५० किलो तांदूळ पिकत असे. मात्र मग माओला खुश करण्यासाठी म्हणा किंवा घोषित केलेल्या योजनेत आपला जास्त सहभाग नोंदवण्यासाठी म्हणा काही ठिकाणी एकरामध्ये १० हजार किलो तांदूळ पिकवण्याचे उद्दिष्ट्य समोर ठेवले. अर्थात हे उद्दिष्ट्यच अतिशोयक्तीचे होते म्हणून ते गाठल्या गेले नाही. मात्र हे उद्दिष्ट्य साकार का झाले नाही याचा अभ्यास केला गेला आणि खापर फोडले चिमण्यावर !



एक चिमणी सरासरी ४.५ किलो दाणे खाते किंवा वाया घालवते, तर देशातील कोट्यवधी चिमण्या किती धान्य वाया घालवत असेल असा हिशोब मांडण्यात आला. मग "चिमण्या मारा" असा नवा आदेश निघाला. मग वेगवेगळ्या पद्धतीने चिमण्या आणि वाटेत येणाऱ्या वेगवेगळे पक्षी मारायचा सपाटा सुरू झाला. मात्र तरी धान्याचे उत्पन्न काही वाढले नाही उलट कमी झाले. साहजिकच होते पिकातील कृमी कीटक खात चिमण्या शेतीला मदत करत असतात हे त्या अभ्यासात नव्हते आणि भरमसाठ चिमण्या मारल्या गेल्यामुळे या कीटकांना शेतात मोकळे रान मिळाले. अश्यातच १९६० साली चीन मध्ये टोळधाड आली. आता चिमण्या आणि पक्षी असते तर ही धाड काहीशी आटोक्यात आली असती. मात्र चिमण्या नसल्यामुळे या टोळधाडीने शेतीच्या शेत नष्ट केली. चीन मधील ६०% टक्के शेती नष्ट झाली. भयानक दुष्काळ पडला, खायला अन्न न मिळाल्याने जवळपास ४.५ कोटी जनता मृत्युमुखी पडली. त्याहून मुख्य फरक पडला जिवंत राहण्यासाठी चिनी जनतेच्या बदललेल्या आहार सवयींमध्ये. मग चिनी वटवागुळा पासून कुत्र्या - मांजरी पर्यंत कोणताही प्राणी आवडीने खाऊ लागले. आता चीन बदलला तरी आहाराच्या सवयी त्याच राहिल्या आणि वुहान पशु बाजारात वटवाघूळे विकायला आली. बघा कसा संबंध असतो ते !



आता या सगळ्या कहाणीत ऑस्ट्रेलियाचे काय काम? तर मनुष्य आपल्या जुन्या अनुभवांवरून काहीच शिकत नाही हे ! चीन आणि चिमण्यांची ही कहाणी सगळ्या जगाला माहीत आहे. निर्दयपणे आणि कोणत्याही नियंत्रणा शिवाय चिमण्या मारायच्या या चिनी नेतृत्वाच्या निर्णयावर जवळपास सगळेच पश्चिमी आणि प्रगत देश आजही दोष देतात. साम्यवादी कसे बिनडोक असतात हे या निर्णयाचे उदाहरण देत ठसवत असतात. मात्र स्वतः काय करतात?



ऑस्ट्रेलियामध्ये असाच एक अहवाल प्रकाशित झाला, "ऑस्ट्रेलियन फेरल कॅट्स" म्हणजे देशातील मांजर किंवा भटक्या मांजरांवर. त्यात असे सांगितल्या गेले की या मांजरांच्या आक्रमकपणामुळे देशातील मूळ प्राण्यांच्या जीवनाला धोका उत्पन्न झाला आहे, त्याचे नष्ट होण्याचे प्रमाण वाढले आहे. मग यावर उपाय काय? तर मांजरांची संख्या कमी करणे. मग ऑस्ट्रेलियाच्या केंद्रीय सरकारने २०२० साली जवळपास २० लाख मांजरांना मारायचे उद्दिष्ट समोर ठेवले, तसे आदेश निघाले. संपूर्ण ऑस्ट्रेलियात मोठ्या प्रमाणावर मारल्या गेले. ऑस्ट्रेलियन सरकारने आपण असे करून मोठ्या प्रमाणावर मूळ निवासी प्राण्यांची होणारी प्राणहानी थांबवली अश्या आनंदात काही दिवस घालवले. मात्र या वर्षी ऑस्ट्रेलिया एका वेगळ्याच संकटात सापडला.



एकाएकी ऑस्ट्रेलियात मोठ्या प्रमाणावर उंदीर दिसू लागले. आता पर्यंत न दिसणारे उंदीर आता झुंडीने शेतात, घरात, रस्त्यावर, बगिच्यात, कारमध्ये, शाळेत दिसू लागले. इतकेच नाही तर या उंदरांमुळे अनेक ठिकाणी शॉर्ट सर्किट होणे, विद्युत प्रवाहात अडचणी येणे, घरांना आगी लागणे, माणसांना चावा घेणे, अन्नधान्याची नासधूस होणे असे अनेक प्रकार व्हायला लागले. आता तर ऑस्ट्रेलियात उंदरांमुळे प्लेगची साथ आली आहे. आता या उंदरांच्या प्रकोपापासून वाचण्यासाठी ऑस्ट्रेलियन सरकार भारताकडे ब्रोमेडीआलोन सारख्या विषाची मागणी मोठ्या प्रमाणावर नोंदवत आहे.



एखाद्या भागातील प्राणी स्थलांतरित असले तरी तेथील निसर्गात ते एकरूप झालेले असतात, त्या भागातील नैसर्गिक अन्नसाखळीचा भाग झाले असतात, तेव्हाच ते टिकतात. मग कोणत्याही कारणाने आपण हे चक्र थांबवण्याचा प्रयत्न केला तर त्याचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागतात. चीन आणि अस्ट्रेलियाच्या या उदाहरणावरून तरी आता आपण लक्षात घ्यायला हवे.

टिप्पण्या