स्टालिनपण बदनामी पासून थोडोक्यात बचावला



 आपल्याला हिटलरने ज्यू धर्मीयांवर केलेला अत्याचार माहीत आहे. पण ज्यू धर्मीयांवर फक्त जर्मनीतच अत्याचार झालेत किंवा त्या आधी आणि नंतर झालेच नाही असे नाहीये. जगातील जवळपास सगळ्या देशात ज्यू धर्मीयांवर अत्याचार झालेत. त्याचे स्वरूप भलेही वेगवेगळे होते, मात्र अत्याचार झालेत हे सत्य आहे. या अत्याचारांचे कारण जसे धार्मिक होते, तसेच ज्यू धर्मीय व्यापारात जास्त असल्यामुळे त्या त्या देशातील आर्थिक नाड्या पण त्यांच्या हातात असणे आणि त्या नुसार देशाच्या कित्येक धोरणावर स्वतःचा प्रभाव पडण्याची त्यांची ताकद हे मुख्य कारण होते.


धर्माला अफूची गोळी मानणाऱ्या आणि आपल्या देशात सगळे समान आहे असे जाहीर करणाऱ्या तत्कालीन सोवियत रशिया सुद्धा याला अपवाद नाहीये. झारशाहीवाला रशिया तर बोलून चालून धर्मीकच, त्या मुळे तेव्हा रशियात ज्यू धर्मियांना दुय्यम वागणूक मिळाली यात नवल नाही. मात्र साम्यवादी क्रांती झाल्यावर सोवियत रशियात पण त्यांच्या अत्याचारात काहीही कमी झाली नाही.



अशीच एक घटना आहे "डॉक्टर्स प्लॉट" ची ! १३ जानेवारी १९५३ साली सोवियत रशियाच्या सरकारी वृत्तपत्र प्रवादा मध्ये एका ज्यू धर्मियांनी सोवियत सरकार विरोधात केलेल्या षडयंत्राची बातमी आली. जे एका ज्यू धर्मीय डॉक्टरने रचलेले होते असा दावा केला होता. रशियातील ज्यू धर्मीय या डॉक्टरला साथ देत आहेत वगैरे सोबतच अमेरिका आणि ब्रिटन सारखे सोवियत विरोधी भांडवलशाही देश या सगळ्याला मदत करत आहेत असा दावा केला गेला होता. मात्र त्याच बरोबर काही लोकांनी दावा केला की सोवियत रशिया मधील ज्यू धर्मीयांविरोधात हे कुभांड खुद्द स्टालिननेच रचले आहे आणि अनेक सोवियत नेते या कुभांडच्या विरोधात आहेत. मात्र स्टालिनच्या भीतीमुळे कोणी तोंड उघडत नाहीये.

अर्थात स्टालिनवर झालेल्या या आरोपांना पण चांगलाच ऐतिहासिक आणि राजकीय आधार होता. जेव्हा रशियात मार्क्स आणि लेनिन यांच्या विचारांवर क्रांती झाली, त्या विचारात धर्माला अजिबात स्थान नव्हते. तरीही त्या क्रांती मध्ये रशियातील अनेक ज्यू धर्मियांनी भाग घेतला. रशियन ज्यू धर्मीय मोठ्या प्रमाणात रशियन साम्यवादी पक्षात सामील झालेत आणि पक्षाचे काम पण केले. दुसरे महायुद्ध सुरू झाले आणि हिटलर-मुसोलिनी युरोप मधील ज्यू धर्मीयांवर करत असलेल्या अत्याचाराच्या बातम्या मोठ्या प्रमाणावर प्रसारित व्हायला लागल्या. त्यातच हिटलरने सोवियत रशियावर हल्ला केल्यानंतर तर रशियन साम्यवादी ज्यू तर स्टॅलिनच्यापाठी उभे राहिले. १९४२ साली सोवियत रशियात "अँटी फॅसिस्ट कमिटी" तयार केल्या गेली. या संघटनेचे अध्यक्ष होते रशियन ज्यू मिखोलस ! या कमिटीत मोठ्या प्रमाणावर सोवियत रशियातील ते ज्यु धर्मीय सहभागी झालेत. साहजिकच या कमिटीचा सगळा भर सोवियत रशिया आणि स्टालिनच्या समर्थनावर आणि हिटलरने चालवलेल्या ज्यू अत्याचाराच्या बातम्या प्रसारित करण्यावर होता.



मात्र हे चित्र बदलले ते दुसरे महायुद्ध संपल्यावर ! दुसरे महायुद्ध संपल्यावर या "अँटी फॅसिस्ट कमिटीची" गरज सोवियत रशिया आणि स्टॅलिनसाठी संपली होती. मात्र सोवियत ज्यूं धर्मीय लोकांनी ही कमिटी बरखास्त केली नाही. मात्र या उद्देश बदलला. हे साहजिक होते, कारण महायुद्ध काळात आणि नंतर युरोपातील अनेक ज्यू धर्मीय संघटना या कमिटी सोबत जुळल्या होत्या. आता या कमिटीला पण सोवियत रशियाचे गुणगान गाण्यात स्वारस्य उरले नव्हते. या कमिटीने मग महायुद्ध काळात झालेल्या ज्यू अत्याचारांवर आपले लक्ष केंद्रित केले. त्या बाबतची कागदपत्रे जमवणे, त्याचे दस्तावेज तयार करणे अश्या कामात या कमिटीने स्वतःला झोकून दिले. मात्र स्टालिन कमिटीच्या या नवीन कामा विषयी नाराज होता. त्याच्या मते देश मोठ्या युद्धातून विजयी होऊन बाहेर आला असला तरी देशाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे, त्या मुळे या कमिटीने देशाच्या नवनिर्माणात आपले योगदान द्यायचे सोडून फक्त "ज्यू" धर्मियांना समोर ठेवत काम कशी करत आहे? सोबतच या सगळ्यात स्टालिनला "ज्यू राष्ट्रवादाचा" पण वास यायला लागला होता.

यातच आंतराष्ट्रीय राजकारणात स्टॅलिनचा अजून एक डाव चुकला. सोवियत रशियाने हिटलरच्या ज्यू अत्याचाराच्या कथांना चांगलीच प्रसिद्धी दिली होती. सोबतच पूर्व युरोपातील ज्या ज्या देशांना ओलांडत सोवियत सैन्य जर्मनिकडे कूच करत होते, तेथील ज्यू धर्मियांची विशेष काळजी घेण्याची आणि त्यांच्या अत्याचारांच्या कथांना प्रसिद्धी देणे आणि त्यातूनच सोवियत रशिया फॅसिस्ट शक्तीविरोधात किती प्रखरपणे काम करत आहे हे जगावर ठसवायचा प्रयत्न करत होते. जेव्हा इस्रायलच्या स्वातंत्र्याचे वारे वाहायला लागले तेव्हा स्टालिनने आपले मत स्वातंत्र्य इस्रायलच्या पक्षात दिले. दुसऱ्या महायुद्धानंतर जग अमेरिकेच्या भांडवली आणि सोवियत रशियाच्या साम्यवादी विचारात विभागल्या जात होते. स्तलिनचा होरा हा की स्वातंत्र्य इस्रायलचा पक्ष उचलून धरला तर नवीन इस्रायलपण सोवियत रशियाच्या पंखाखाली येईल. मात्र या ठिकाणी स्टालिन चुकला. १४ मे १९४८ साली जेव्हा इस्रायलच्या स्वातंत्र्याची घोषणा झाली त्याच वेळेस इस्रायल हा अमेरिके सोबत राहील याचे स्पष्ट संकेत देण्यात आले. इटकेच नाही तर इस्रायली एजन्सीचे मुख्य बेन गार्लोन यांनी स्पष्टपणे आपल्याला सोवियत बॉंबगोळ्यांची गरज नाही अश्या प्रकारचे वक्तव्य केले.



परिणामी स्टॅलिनचे ज्यू धर्मीयांविषयी मत बदलले, सोबतच सोवियत रशियाच्या फॅसिस्ट विरोधी ज्यू कमिटीच्या बदललेल्या कामाविषयी पण संशय तयार झाला. परिणामी जानेवारी १९४८ साली या कमिटीचे माजी अध्यक्ष राहिलेले मिखोलस यांची हत्या स्टालिनच्या इशाऱ्यावर केल्या गेली. राजधानी मॉस्को मधील कमिटीचे कार्यालये बंद केल्या गेली, या कमिटीच्या सदस्यांची धरपकड केल्या गेली, आरोप ठेवला गेला भडवशाही शक्तींना मदत करण्याचा !

या सगळ्यांवर आरोप ठेवण्यात आला बुर्जवा भांडवलशाहीला मदत करण्याचा आणि त्या करता सोवियत रशियात "रुटलेस कॉस्मोपॉलिटन" रुजवण्याचा. हे "रुटलेस कॉस्मोपॉलिटन" म्हणजे ज्यांचे मूळ सोवियत रशियासोबत नाहीत असे बुद्धिवादी. कारण या सगळ्या ज्यू सदस्यांची जवळीक भांडवलशाहीचे समर्थक असल्याचा आरोप करत या कमिटी सोबत जुळलेल्या तेरा ज्यू लेखकांना जे १९४८ ते १९४९ दरम्यान पकडल्या गेले होते, त्यांना १२ ऑगस्ट १९५२ या दिवशी मॉस्कोच्या ल्युबांक कारागृहात फाशी दिल्या गेली. त्यातून सोवियत रशियात ज्यू विरोधी अत्याचाराची सुरवात झाली. सोवियत सरकारच्या या ज्यू विरोधी कारवाईचा विरोध करण्यासाठीच "डॉक्टर प्लॉट" ची रचना करण्यात आल्याचे स्टालिन कडून सांगण्यात आले. काय होता हा डॉक्टर प्लॉट?



या अँटी फॅसिस्ट कमिटीच्या अटक झालेल्या सदस्यांपैकी एक होते डॉक्टर याकोवो आइटींगर. नोव्हेंबर १९५० मध्ये यांचा कारागृहात संशयित पध्द्तीने मृत्यू झाला. मात्र या मृत्यूची माहिती देणाऱ्या एका गुप्त पत्रात या डॉक्टर यकोवो आइटिंगरवर "वैद्यकीय हत्या" केली असल्याचा आरोप लावण्यात आला. विशेष म्हणजे या प्रकरणात एकटे आइटींगर नाही तर एक संपूर्ण ज्यू धर्मीय डॉक्टर लोकांचा समूह सहभागी असल्याचा आरोप केला. या करता घटना घेतली गेली १९४५ ची.

कम्युनिस्ट केंद्रीय समितीचे सचिव अलेक्सांद्र शाब्राकोव यांचा १९४५ मध्ये झालेल्या मृत्यूला "वैद्यकीय हत्या" म्हणून डॉक्टर यकोवो आइटिंगर यांनी मान्य करत त्याची जवाबदारी घेतल्याचा दावा करण्यात आला. या सोबतच स्टालिन यांचे अत्यंत निकटचे सहयोगी आंद्रेई जदानोव यांचा मृत्यूपण ऑगस्ट १९४८ मध्ये हृदय गती थांबून झाला होता. यांचा इलाज पण डॉक्टर यकोवो आइटिंगर करत होते. हा मृत्यू पण "वैद्यकीय हत्या" असल्याचा आरोप स्टालिनकडून लावल्या गेला.

म्हणजे १९४५ ते १९४८ साली झालेल्या काही मोठ्या लोकांच्या मृत्यूचे खापर या ज्यू धर्मीय डॉक्टर लोकांच्या समूहावर लावण्यात आला तो १९५२ मध्ये ! याची माहिती स्टालिनने १९५२ मध्ये पोलीट ब्युरो समोर ठेवली. सोबतच पोलीट ब्युरोवर अक्षम्य निष्काळजीपणाचा आरोप केला. स्टालिनने पोलीट ब्युरोला म्हंटले, "तुम्ही सगळे एका मांजरीच्या अंधळ्या पिल्ला सारखे आहात. माझ्या शिवाय या देशाचे काय होईल कुणास ठाऊक. देश संपून जाईल. कारण तुम्हाला देशाच्या शत्रुंचा शोध पण घेता येत नाही."

या नंतर या तथाकथित "डॉक्टर प्लॉट" मध्ये सामील असलेल्या लोकांवर कारवाई करण्याचा वेग वाढवण्यात आला. १९५१ ते १९५३ या काळात ३७ डॉक्टर आणि त्यांच्या बायकांना अटक करण्यात आली. यातील १७ ज्यू धर्मीय होते. जनवरी १९५३ ते मार्च १९५३ या काळात अजून २० अध्यापक आणि डॉक्टरांना अटक करण्यात आली. त्यातील १२ ज्यू धर्मीय होते. या शिवाय काही सोवियत कम्युनिस्ट पक्षाचे नेते पण सामील होते. या सगळ्याचा ठपका ज्यू राष्ट्रवाद आणि अमेरिकन सरकारवर पण ठेवण्यात आला. या सगळ्या प्रकरणातून सोवियत रशियात ज्यू धर्मियांविरोधात वातावरण तयार करण्याचा पूर्ण प्रयत्न केला गेला. आरोप असा होता की या प्रकरणाचा आधार घेत सोवियत रशियात ज्यू विरोधी दंगली सुरू करण्याचे प्रयत्न होत होते.

मात्र ५ मार्च १९५३ ला स्टालिनचा मृत्यू झाला आणि या सगळ्या प्रकरणाला कलाटणी मिळाली. ३ एप्रिल १९५३ मध्ये म्हणजेच स्टालिनच्या मृत्यूला एक महिना व्हायच्या आधीच "डॉक्टर प्लॉट"च्या आरोपाखाली कारागृहात असलेल्या सगळ्यांची सुटका करण्यात आली. ४ एप्रिलला सोवियत सरकारने घोषित केले की ज्या डॉक्टरांनी आपला कबुली जबाब दिला होता त्याला काहीही महत्व नाही कारण तो जुलमाने घेतला होता.

सोबतच ज्या आंद्रेई जदानोव यांच्या मृत्यूला डॉक्टर याकोवो आइटींगर यांना जवाबदार धरले होते. त्या घटनेला पण वेगळे वळण मिळाले. सांगितल्या गेले की आंद्रेई जदानोव यांच्यावर होणारे उपचार हे व्यवस्थित होत नसून त्यांना अजून जास्त प्रगत वैद्यकीय उपचारांची गरज आहे आणि डॉक्टर याकोवो आइटींगर यांचाही या अहवालाला दुजोरा होता. हा अहवाल योग्य वेळी स्टॅलिन समोर ठेवण्यात आला होता. मात्र स्टालिनने त्यावर कोणतीही कारवाई केली नाही किंवा निर्देश दिले नाहीत.

या सगळ्या प्रकरणातून समोर येणारे सत्य हेच की ज्यू धर्मीयांवर अत्याचार करणारा एकटा हिटलर होता असे नाही. ज्यू धर्मियांचे सुदैव समजा किंवा स्टॅलिनला असणारी नियतीची साथ समजा की स्टॅलिनचा मृत्यू झाला. नाहीतर ज्यू धर्मीयांवर अत्याचार करणाऱ्या राजकारण्यामध्ये त्याचेही नाव हिटलर पाठोपाठ घ्यावे लागले असते. मात्र स्टॅलिनचा मृत्यूपण या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर संशयाच्या धुक्यात होता आणि आहे. पण ते नंतर कधी तरी...

टिप्पण्या