जग करोना विषाणूच्या संकटात असतांना काही देश मात्र आपले वेगळे राजकारण करत जगावर युद्धाचे ढग जमा करत आहेत. याचा प्रत्यय आपल्याला भारत आणि चीन दरम्यान लडाख सीमेवर डोकलाम आणि पेंगांग लेक या भागात आला. या काळात भारत आणि चीन या दोन देशांवरच युद्धाचे संकट घोंगावत नव्हते तर हे युद्ध जागतिक युद्ध बनायचा धोका पण उत्पन्न झाला होता. जागतिक स्तरावर चीनच्या आक्रमक कारवाया हे मुख्य कारण या मागे होते. याच काळात आर्मेनिया आणि अझरबैजाण या दोन देशातील जुना वाद पुन्हा उफाळून आला आणि त्यांच्यात युद्ध सुरू झाले. हे पण युद्ध जागतिक बनते का? यावर दावे प्रतिदावे होत होते. मात्र या दोन्ही विवादात सगळ्याच पक्षांनी संयम दाखवला आणि जगात शांतता कायम राहिली. खरे तर कोरोना संकटामुळे जागतिक आर्थिकमंदी सुरू आहे. याचे वेगवेगळे परिणाम आता जगातील सगळ्याच देशांवर होत आहे. त्यातून जगात एक अस्वस्थता निर्माण झाली आहे हे कोणी नाकारू शकत नाही. त्यातच पडणाऱ्या एखादी ठिणगीने मोठी आग लागू शकते.
आता आशियातील आणि युरोप आशिया सीमेवरील हा ताण युरोप मध्ये पुन्हा तयार होत आहे. या वेळेस कारण आहे रशिया आणि युक्रेन मधील विवाद. क्रिमिया बेट किंवा क्रिमिया पेनुसीला हा या दोन देशातील विवादित मुद्दा आहे. १९५४ साली जेव्हा सोवियत रशिया अस्तित्वात होता, तेव्हा युक्रेन या देशाचा भाग होता. तत्कालीन सोवियत अध्यक्ष निकिता खरुश्चेव्ह यांनी रशियाचा क्रेमिया या भाग युक्रेनला जोडला. मात्र जेव्हा सोवियत रशिया तुटला तेव्हा साहजिकच युक्रेन स्वतंत्र देश म्हणून उदयास आला. तेव्हा या क्रिमिया भागातील रशियन वंशाच्या लोकांनी क्रिमिया पुन्हा रशियात सामील करावा म्हणून सशस्त्र लढा सुरू केला. अर्थात युरोपियन युनियन आणि युक्रेनच्या आरोपा नुसार या बंडाला रशिया संपूर्ण सहकार्य करत होता. मात्र रशियाने हे सगळे आरोप फेटाळले. मात्र २०१४ साली रशियाने लष्करी हस्तक्षेप करत क्रिमिया रशियाला जोडून घेतला. तेव्हा पासूनच रशिया आणि युक्रेन मधील तणाव वाढला.
क्रिमिया वरील आपल्या हक्कासाठी रशिया इतका आग्रही का आहे? याचे कारण आहे क्रिमियाचे भौगोलिक स्थान आणि त्याचे लष्करी महत्व ! रशियाला सोवियत काळातील जागतिक नेतृत्वाचे स्वप्न पुन्हा पडले आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याला क्रिमिया आपल्या ताब्यात राहावे असे प्रकर्षाने वाटते, त्या नुसार त्याने क्रिमिया आपल्या ताब्यात घेतला. क्रमियाच्या उत्तर भागात आहे आजोव समुद्र जो सगळीकडून जमिनीने वेढला आहे, तर दक्षिण भागात आहे काळा समुद्र या दोन समुद्रांना जोडते ती क्रचची सामुद्रधुनी. जेव्हा क्रिमिया युक्रेनच्या ताब्यात होता तेव्हा या समुद्रधुनीवर युक्रेनचे वर्चस्व होते. मात्र रशियाला त्या मुळे काळा समुद्रावर नियंत्रण ठेवणे आणि त्यायोगे युरोप आणि मध्य पूर्व आशियावर नियंत्रण करणे कठीण झाले होते. अशातच सीरिया हा देश जगातील महासत्ताचे शक्ती प्रदर्शनाचे स्थान झाले होते. महत्वाकांक्षी रशियाला त्या मुळे क्रिमिया अधिक महत्वाचा झाला.
क्रिमियावर वर्चस्व स्थापन केल्या बरोबर रशियाने क्रिमियाला रशिया सोबत जोडून घ्यायला क्रचच्या समुद्रधुनीवर पूल बांधला. रशिया आता या पुलावरून युक्रेनच्या बंदरावर येणाऱ्या जहाजांवर नजर ठेवतो, ज्याचा युक्रेन विरोध करत आहे. सोबतच युक्रेनच्या पाठीराख्या कडून या पुलाला धोका उत्पन्न होईल ही भीती पण रशियाला आहे. आजोव समुद्र क्रिमियाच्या पूर्वेस आणि युक्रेनच्या दक्षिणेस आहे. युक्रेनच्या उत्तरेकडील किनाऱ्यांवर दोन बंदरे आहेत - बर्डियान्स्क आणि मारिओपोल. युक्रेनच्या अर्थव्यवस्थेसाठी हे बंदर अतिशय महत्वाचे आहे. वास्तविक, क्रच सामुद्रधुनीच्या पुलाखालून समुद्री वाहतुकीवर नियंत्रण ठेवून रशिया युक्रेनच्या अर्थव्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. या महिन्याच्या सुरवातीलाच युरोपियन महासंघाने रशियाच्या या वागणुकी विरोधात युक्रेनच्या बाजूने आपले मत दिले होते. रशिया करत असलेला प्रयत्न हा स्वतंत्र नौ परिवहनाचा युक्रेनच्या हक्काचे हनन करणारा आहे असे युरोपियन महासंघाचा आरोप होता. हाच विवाद आता मोठे रूप घेत आहे.
युक्रेनने रशियन सीमेवरील भागात आणीबाणी जाहीर केली. रशियाने या भागात आपल्या सैन्याची जमवाजमव सुरू केली. हे पाहताच युक्रेन आणि युरोपियन महासंघाने पण आपले सैन्य त्या भागात आणायला सुरवात केली. त्यातच रशियाने युक्रेनच्या नौसेनेच्या तीन जहाजांना आणि त्या वरील चोवीस नौसैनिकांना ताब्यात घेत तणाव अजून वाढवला. आता फ्रांसने पण युद्धाची जोरदार तयारी सुरू केली आहे. अमेरिकेने पण या विवादात उडी घेत आपले बॉंबर विमाने नॉर्वे मध्ये दाखल केले आहेत. अमेरिकेच्या या तयारीने रशियन नौदलाचे उत्तरी कमांड सक्रिय झाले आहे. फ्रांसच्या वायुदलाने आण्विक युद्ध सुरू झाल्यास कारावयाच्या कारवाईचा अभ्यास सुरू केला आहे. नाटो आणि युरोपियन महासंघाच्या आण्विक अस्त्राने संपन्न नौसेना आधीच काळ्या समुद्रात तैनात झाले आहेत. रशियातील लष्करी अभ्यासकांनी पुढील काही आठवड्यात युद्ध होण्याची शक्यता वर्तवत खळबळ माजवली आहे.
एकूण काय तर जग पुन्हा एकदा तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे. गेल्या वर्षांपासून दोन वेळेला टळलेला युद्धाचा मुहूर्त पुन्हा टळेल का हाच महत्वाचा मुद्दा आहे. चीन आणि तुर्की ही दोन अतिमहत्वाकांक्षी देश या युद्धक परिस्थितीचा फायदा घेतात की शांत राहतात या वरून या युद्धाची व्याप्ती ठरेल. पण युद्ध सुरू झाले तरी जगावर संकट येणारच हे लक्ष्यात घेऊन तयारी ठेवा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा