प्रसिद्धी साठी गरिबांना मारहाण करणार?



साधारण गेल्या वर्षी २०२०च्या जानेवारीत आमदार आणि राज्यमंत्री मा. बच्चू कडू नाराज असल्याच्या बातम्या येत होत्या. खरे तर आमदार बच्चू कडू हे स्वतंत्र्य बाण्याचा माणूस. त्याचमुळे त्यांनी स्वतंत्र्यपणे स्थापन केलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या झेंड्याखाली ते निवडणूक लढवतात. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदार संघातून ते सलग चार वेळा जिंकून आले. 


मात्र ज्या वेळेस शिवसेना - राष्ट्रवादी - कॉग्रेस यांनी आपली आघाडी बनवून राज्यात सरकार स्थापन केले त्या दिवशी आमदार साहेबांना पण मंत्रिपदाची लॉटरी लागली. शिवसेनेच्या कोट्यातून जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार इतक्या साऱ्या खात्यांचे राज्यमंत्री म्हणून त्यांचा शपथविधी झाला. आता इतक्या खात्यांचा कारभार मंत्री म्हणून आल्यावर पण बच्चू कडू यांना नाराजी का ?


याचे खरे कारण बच्चू कडू यांचा स्वभाव ! आज पर्यंत विरोधकाची भूमीका बजवणारे आणि नेहमी आक्रमक राहणारे. मग सरकारी अधिकाऱ्यांवर हात उगार, तर कधी लाच मागतो म्हणून मारहाण करा, तर कधी बैठकीत व्यवस्थित उत्तर मिळाले नाही या सबबी खाली पाण्याची बाटली सरकारी कर्मचाऱ्याला फेकून मार, तर कधी पोलीस अधिकाऱ्याने मोर्चा अडवला म्हणून शिव्या घाल ! हे इथेच नाही थांबत तर २९ मार्च २०१६ ला मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिवाला मारहाण करण्याचे आणि त्या पाई मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनी ठीया आंदोलन करण्याचा प्रताप पण यांच्या नावावर आहे. या पाई बच्चू कडू यांच्यावर पोलीस कारवाई पण झाली आहे. 


इतकेच नाही तर तत्कालीन काळात मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना धमकी दे, कोणावर हात उचल असे मजेत दिवस चालले होते त्यांचे. मात्र राज्यमंत्री झाले आणि दिवस पालटले साहेबांचे. तरी तृप्ती देसाईला शिवीगाळ करण्याचे प्रकरण मंत्रीसाहेबांच्या अंगावर आलेच होते. तरी बच्चू कडू साहेब नाराज का होते? 


कारण त्याची कामाची पद्धत त्यांना वापरता येत नव्हती दिसला सरकारी अधिकारी की ठोक त्याला, जे सरकार असेल त्याच्या विरोधात ठोका-ठोकी आंदोलन करायचे आणि लोकांना आनंदी ठेवायचे हा त्यांचा खाक्या. मंत्रिपद मिळाल्या पासून त्यांच्या ह्या ठोका-ठोकीच्या अधिकारांवरच संवैधानिक गदा आली आहे. त्या मुळे त्यांचे शिवशिवणारे हात आणि बोलणारे तोंड दोन्हीही गपचूप बांधून ठेवावे लागत आहे.


तसे सरकारी अधिकारी पण बेरकी असतात, पहिले मार पडेल या भीतीने आमदार साहेबांचे काम करणारे अधिकारी आता त्यांना, हे काम केले तर सरकारवर कसे संकटात येईल आणि त्यात तुम्ही हे जबरदस्ती करायला लावले म्हणून तुमची स्वच्छ प्रतिमा विरोधक कसे धुळीला मिळवतील हे व्यवस्थित मंत्री साहेबांना समजवून स्वतः संध्याकाळी शांत पणे दोन दोन पेग लावत बसत असतील.



पण आज मंत्री साहेब बनलेल्या बच्चू कडू यांच्या तळहातावर होणारी खाज बंद झाली असेल. आज अकोल्यातील सर्वोपचार कोविड रुग्णालयात निकृष्ठ जेवण मिळण्याच्या तक्रारीची जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून दखल घ्यायला दौरा केला. तिथे धान्य पुरवठ्याची नोंदच नसल्याचा प्रकार समोर आला. मुख्य म्हणजे उपस्थित अधिकारी आणि स्वयंपाकी यांच्या रोज लागणाऱ्या अन्नधान्याच्या मापाच्या आकड्यात फरक लक्षात आल्यावर मात्र साहेब चिडले आणि त्यांनी स्वयंपाक करणाऱ्याच्या कानशिलात मारली. खरे तर अन्नधान्याचा साठ्याचा हिशोब ठेवणारा कर्मचारी दुसरा आणि अश्या ठिकाणी अफरातफर कोण करू शकतो याची जाणीव इतके वर्षे आमदार राहिलेल्या आणि आता मंत्री असलेल्या साहेबांना नसेल असे नाही. मात्र मागच्या वेळेस मंत्रालयाचा अनुभव लक्षात घेता सरकारी कर्मचारी आणि आपण ज्या सरकार मध्ये मंत्री आहोत त्या सरकार मधील कर्त्याधर्त्यांचे सरकारी कॉन्ट्रॅक्टर लोकांशी असलेले संबंध बघता त्यांनी आपला हात कदाचित गरीब स्वयंपाक करणार्यांवर उचलला असेल. बाकी या सगळ्या प्रकरणामुळे आज मंत्री साहेबांना शांत झोप लागेल. कारण इतके दिवस बांधल्या गेलेले हात आज सुटले. 


असे मारझोड करणाऱ्या माणसाला उगाच डोक्यावर चढवून मोठेपणा द्यायचा हा परिणाम आहे इतकेच तुम्ही लक्षात घ्यायचे. सरकारी अधिकाऱ्यांकडे अधिकार आहेत, त्याच मुळे त्यांच्यावर हात उचलता येत नाही. तर कॉन्ट्रॅक्टर कडे पैशाची ताकद आहे त्या मुळे त्याच्यावर हात उचलता येत नाही. मग हात उचलायला उरतो सामान्य माणूस ! मारझोड करायची वृत्ती असलेला सत्तेत आल्यावर सामान्य गरीब माणसावर हात उचलत असेल, "चोर सोडून सन्यासाला शिक्षा" देत असेल तर तो सत्ताभ्रष्ट झाला आहे हे समजून घ्यावे.

टिप्पण्या

  1. अत्यंत खरे ,पण हा आचारी ही फक्त सहन करणारं,तो बरोबर असला तरी तो ह्याची दाद कुठेही मागणार नाही आणि परत माननीय मंत्री महोदयांच्या फावणार

    उत्तर द्याहटवा
  2. हप्ता सोडा भ्रष्टाचार कुठल्या थरापर्यंत करायचा?वाजे प्रकरण वाटते तेवढं साधं नाही? खंडणी पायी कित्येक उद्योग महाराष्ट्रातून हद्दपार होऊन दुसऱ्या राज्यात स्थलांतरित झालेत? भिवंडी ते बोईसर दरम्यान १९८०-२००० दरम्यान स्थापीत अंदाजे छोटे मोठे १००० उद्योगांपैकी अंदाजे ८५० उद्योग स्थलांतरित झालेत व इतरही त्याच मार्गावर आहेत.विदर्भातील अंदाजे १५० उद्योग स्थलांतरित झालेत खंडणी प्रथेपाई यथार्थ "राजकारणी आपल्या आर्थिक खंडणी वसुली साठी आपल्या पदाचा व पोलीस यंत्रणेचा उपयोग करून एखाद्या मोठ्या उद्योगांपतीचा खात्मा करण्यासाठी स्फोट घडवण्याचं कट-कारस्थान रचत असेल ? तर कशावरून भुतकाळात यांनी देशात बाम्बस्फोट 💥घडविण्यासाठी किंवा अतिरेक्यांना👹👿💩👺 देशात प्रवेश देण्यासाठी परदेशातकडून रग्गड रकमांची लाच 💯स्विकारली नसेल व पोलीस👨‍✈️ यंत्रणेचा दुरूपयोग केला नसेल? प्रश्र्न थोडा कडवट 😡आहे पण विचार करण्याजोगा🤔 नक्कीच आहे ? देशवासीयांनो👴🏻👳‍♂️🧕👨‍⚖️👩‍🎤🧑‍🦰जरा विचार करा? व आम्ही यासाठी यांना निवडून देतो काय? यावरही प्रामाणिक पणाने चिंतन करा?

    उत्तर द्याहटवा
  3. कायदा हातात घेऊनये ! मंत्री झाले म्हणून काय झाले?

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा