समाजाची बदमनी नक्की कुणामुळे?

 


मराठा क्रांती मोर्चाने एक निवेदन दिले आहे की की अ‍ॅड. जयश्री पाटील यांनी मराठा समाजाची बदनामी केली. कारण काय? तर सध्या राज्यातील सगळ्यात चर्चित आणि राजकीय भूकंप करणाऱ्या परमवीर - अनिल देशमुख प्रकरणात, अ‍ॅड. जयश्री पाटील न्यायालयात गेल्या, प्रकरण लावून धरले आणि या प्रकरणात अनिल देशमुख यांच्या विरोधात सी बी आय चौकशी करावी असे आदेश प्राप्त केले. अर्थात या मुळे गृहमंत्रीपदाचा राजीनामा अनिल देशमुख यांना द्यावा लागला. सत्ताधारी आघाडी सरकारची नाचक्की झाली आणि महत्वाचे म्हणजे या आघाडी सरकारचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या राजकीय ओळखीत अजून एका घोटाळ्याची, भ्रष्टाचाराची भर पडली. ही आणि इतकीच घडामोड मराठा समाजाच्या बदनामीसाठी कारणीभूत आहे असे मराठा क्रांती मोर्चाच्या कर्त्याधर्त्यांचे मत आहे.


मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनामुळे तत्कालीन भाजपा सरकारने दिलेले आरक्षणा विरोधात लढा देत गोत्यात आणणारे अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते हे अ‍ॅड. जयश्री पाटील यांचे पती. त्या मुळे अ‍ॅड. जयश्री पाटील यांच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चाला राग असणे साहजिक आहे. मात्र म्हणून असे हास्यास्पद निवेदन देणे कसे काय चालेल?

निवडणुकीत कमी जागा मिळूनही शरद पवार सत्तेत कसे बसले या बद्दल काही बोलायचे नाही, शेवटी ते राजकारण आहे नैतिक-अनैतिक असे काही नाही. त्या बद्दल शरद पवार यांना बोलायचे नाही, त्यांना तत्कालीन परिस्थितीत शिवसेने बरोबर आघाडी करण्यात संधी दिसली आणि ती त्यांनी मिळवली. मात्र त्या नंतर तरी राज्य कारभार करतांना नैतिकता दाखवली का?

ज्या पावसाच्या सभेमुळे शरद पवार यांनी मराठा समाजाकडून सहानुभूती मिळवत आपली मते वाढवून घेतली, त्या शरद पवार यांनी मराठा समाज आपल्या मागे अडचणीच्या वेळेस उभा राहिला त्याचा आदर केला का? तर उत्तर नाही असेच येईल, कारण शरद पवार यांनी जाहीरपणे आपल्याला अल्पसंख्यांक म्हणजे मुख्यत्वे मुस्लिमांनी मते दिल्या मुळे आपले जास्त आमदार निवडून आले आणि आपण सरकार बनवण्यात निर्णायक भूमिका घेऊ शकलो असे वक्तव्य केले. मग तेव्हा मराठा समाजाचा अपमान झालाच नाही काय?



सरकार स्थापन झाल्यावर "भूखंडाचे श्रीखंड" खाणारे असा नावलौकिक असलेल्या शरद पवार यांनी जालना जिल्ह्यातील १२५ एकर जमीन आपल्याच संबंधित संस्थेला देण्यात करता सरकारच्या महसूल, विधी आणि न्याय विभागाने आक्षेप घेऊन सुद्धा मिळवून दिली, हा भ्रष्टाचार होत असतांना पण मराठा समाजाची बदनामी झाली नाही काय?

अनिल देशमुख गृहमंत्री असतांना त्याच्या हाताखाली असलेले अधिकारी मानवतेच्या नावाखाली एका गुन्हेगाराला वाधवान कुटुंबाला बंदीच्या काळात मौजमजा करायला प्रवास करण्याची परवानगी देतात आणि शरद पवार असल्या गुन्ह्याकडे कानाडोळा करतात, तेव्हा मराठा समाजाची बदनामी होत नाही काय?

सचिन वाझे प्रकरणात पण अनिल देशमुख यांनी घेतलेली भूमिका, शरद पवार यांच्या मूक संमती शिवाय शक्य आहे का? कारण राज्य सरकारमध्ये काहीही भूमिका नसतांना शरद पवार मंत्रिमंडळाच्या बैठकीना हजर राहतात, राज्यातील अनेक पोलीस अधिकारी त्यांना त्यांच्या घरी जाऊन भेटतात, राज्याच्या परिस्थिती बाबत अहवाल देतात, तेव्हा वाझे काय धंदे करत आहे आणि गृहमंत्री काय करीत आहे हे शरद पवार यांना माहीत नव्हते हे म्हणणे धाडसाचे ठरणार नाही काय? मग या सगळ्या उलाढाली मुळे मराठा समाजाची बदनामी होत नाही काय?

राहिला प्रश्न परमविरसिह प्रकरणाचा ! तर मुंबई पोलिसांचा सर्वोच्च अधिकारी राहिलेला माणूस, खुल्लमखुल्ला पत्र लिहून आरोप करतो की गृहमंत्र्यांनी १०० कोटी खंडणी जमा करण्याचे लक्ष आपल्या अधिकाऱ्यांना दिले होते, तेव्हा मराठा समाजाची बदनामी होत नाही ! इतकेच नाही तर, शरद पवार यावर स्वरासावर करतांना दिल्लीत पत्रकार परिषद घेतात आणि खोटी माहिती द्यायचा प्रयत्न करत भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या गृमंत्र्यांची पाठराखण करतात तेव्हा मराठा समाजाची बदनामी होत नाही ! खरे तर परमवीर सिंग यांनी आरोप केल्यावर अनिल देशमुख आणि शरद पवार यांची नैतिकता जागी व्हायला हवी होती, मात्र न्यायालय जो पर्यंत चौकशीचे आदेश देत नाही तो पर्यंत ती नैतिकता झोपलेली होती तेव्हा मराठा समाजाची बदनामी झाली नव्हती?

मात्र एका जागृत वकिलाने, तेही डॉ. एल के पाटील सारख्या स्वातंत्र्य सेनानीची मुलगी असलेल्या, स्वतंत्र विचार अंगी बनवलेल्या, मानवी हक्कावर, मानवाधिकारावर अभ्यास असलेल्या, या बाबतीत सात वर्षे संशोधनाला वेळ देणाऱ्या, या वर पुस्तके लिहणाऱ्या आणि जिद्दीने त्या करता काम करणाऱ्या अ‍ॅड. जयश्री पाटील यांच्या मुळे मात्र मराठा समाजाची बदनामी होते हे म्हणणे हास्यास्पद नाही काय?

तरी इथे शरद पवार यांचे फक्त राज्यातील सत्ता हस्तगत केल्यावर केलेल्या काहीच कामाचे दाखले दिले आहेत, करमुसे प्रकरण असो किंवा पालघर प्रकरण असो, या बाबतीत घेतलेली भूमिका, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी यांच्या विरोधात ते सत्तेत असल्यापासून आजतागायत वापरण्यात येणारी घाणेरडी वक्तव्ये, त्यातील काही वक्तव्ये तर मराठा क्रांती मोर्चाच्या मंचावरून केल्या गेलीत, या मुळे मराठा समाजाची बदनामी झाली नाही काय? मराठा क्रांती मोर्चाच्या संवेदनशील पदाधिकाऱ्यांनी या बाबतीत पण संवेदनशील पद्धतीने विचार करावा आणि मग बदनामी झाल्याचा आरोप करावा.

बाकी मराठा आरक्षण मिळाले पाहिजे आणि तो आपला हक्क आहे हे जसे खरे आहे तसेच अ‍ॅड. जयश्री पाटील याचे पती गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणा विरोधात घेतलेली भूमिका हा पण त्यांचा संविधानिक हक्क आहे. महत्वाचे म्हणजे ते तो हक्क संवैधानिक पद्धतीने न्यायालयात जाऊन बजावत आहे, मोर्चे काढत शक्तिप्रदर्शन करत, अर्वाच्य भाषा वापरत करत नाही याची चाड मराठा क्रांती मोर्चाने ठेवावी.

टिप्पण्या