असल्या स्त्रीवादाचा उपयोग काय?




बीबीसी हिंदी मध्ये ४ फेब्रुवारी २०२१ तारखेला एक बातमी आली होती, बातमी चीन मधील होती. पण त्या बातमीच्या शीर्षकाने आकर्षित केले. तेथील सरकारने चिनी मुलांमध्ये पौरुषत्व वाढवण्या करता विशेष प्रयत्न करण्याचे आदेश दिले असे शीर्षक होते. नाही हे पौरुषत्व शारीरिक नाही, म्हणजे शीर्षक वाचून जरी गैरसमज होत असला तरी त्या बतमीचा गाभा शारीरिक पौरुषत्वाचा नसून मानसिक पौरुषत्वाचा आहे. 


एकूण या बतमीचा गाभा हा की गेले अनेक वर्षे चीन मध्ये स्त्री-पुरुष समानतेच्या नावाखाली जे शिक्षण दिल्या गेले आणि जे संस्कार केल्या गेले त्या मुळे चिनी पुरुष हळूहळू मानसिकरित्या स्त्रीत्वाकडे सरकत आहेत. त्याचे हावभाव, फॅशन, शारीरिक संकेत हे स्त्रीत्वाकडे झुकणारे झाले आहेत. त्या मुळे चिनी पुरुष "कमकुवत, घाबरणारे आणि हीन भावनेने ग्रस्त" अशी मल्लिनाथीपण केल्या गेली. गंमतीची गोष्ट म्हणजे या सगळ्या समस्येसाठी सरकारने अधिक स्वातंत्र्य उपभोगत असलेल्या फॅशन उद्योग, पॉप संगीत उद्योग, मनोरंजन उद्योग आणि त्यात काम करत असलेल्या अतिआधुनिक विचारांच्या पुरुषांना जवाबदार धरले आहे. कारण त्या उद्योगातून जे विचार प्रसारित केले जात आहेत आणि जे सेलिब्रेटी रोल मॉडेल म्हणून समोर आणले जात आहेत त्या मुळे स्त्री-पुरुष समानतेसाठी काही मदत होते का हे माहीत नाही, पण परंपरेने येणारा, सांस्कृतिक पौरुषत्वाचा पगडा कमी होत मानसिक पौरुषत्वाची मात्र हानी होत आहे. याचे गंभीर परिणाम चीन मध्ये मैदानी खेळा करता आणि विशेष म्हणजे चिनी सैन्याला योग्य तरुण मिळण्यात झाला आहे.


या समस्येवर उपाय म्हणून चीन सरकार आता सैन्य अधिकारी, फुटबॉल खेळाडू आणि अश्या खेळातील खेळाडू ज्या खेळात पौरुषत्व बाहेर दिसून पडते यांनाच जास्तीजास्त प्रसिद्धी माध्यमात दाखवणार आहे. सोबतच पौरुषत्वाचा आविष्कार असलेले पारंपरिक खेळ आणि त्यायोगे येणाऱ्या परंपरांचे पण!  जेणे करून इतर चिनी तरुणांवर अश्या पौरुषत्त्वाचे आकर्षण तयार होईल आणि त्याचे "बायलेपण" जाईल. चिनी सरकारचे हे निरीक्षण आणि हा आदेश भरतासोबत झालेल्या सैन्य विवाद आणि त्या नंतर चिनी सैनिकांचे रडणारे व्हिडीओ, सोबत लडाख मध्ये चिनी सैन्याचे मानसिक दुबळेपणाच्या बातम्या आल्यानंतर आले आहेत हे लक्षात घेणे आवश्यक आहे. 



आता या सगळ्या चीन मधील चर्चेविषयी ऐकल्यावर चीन मधील स्त्रियांची परिस्थिती नक्की काय? हा प्रश्न पण नक्कीच पडू शकतो. अर्थात चीन सारख्या साम्यवादी देशातील स्त्री अत्याचार, स्त्री वर होत असलेल्या घरगुती हिंसचारावर जास्त काही लिहल्या जात असेल आणि त्यावर जास्त चर्चा होऊ देण्यात सरकारला स्वारस्य नाही. चीन मध्ये पण स्त्री लोकसंख्या पुरुष लोकसंख्ये पेक्षा सात कोटीने कमी आहे. त्यातच चीन मधील प्रत्येक क्रांतीचा, समाजीक बदलाचा सगळ्यात जास्त असर चिनी महिलांच्या जीवनावर पडला आहे, तो जसा सकारात्मक आहे, तसा नकारात्मक पण आहे. सोबतच पारंपरिक पगडा, मान्यता याचा प्रभाव पण स्त्रियांवर पडत आहेच. पण या सगळ्यात लक्षात घेण्या सारखे हे आहे की अजूनही चिनी महिला स्त्रिया या महत्वाच्या पदा पासून दूरच आहे, चिनी राजकारणात महिलांचे स्थान काय? किंवा चीन मध्ये किती उच्चपदस्थ चिनी महिला समाजावर प्रभाव टाकू शकतील अश्या आहेत. आजही चिनी महिला मोठ्या प्रमाणावर बाहेर पडून काम करत असल्या तरी त्या पारंपरिक चौकटीच्या बाहेर का येऊ शकल्या नाहीत? या सगळ्या प्रश्नांवर कोणीही बोलत नाही. 


मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्या देशात काय हाल आहेत? आपल्या देशात जेव्हा पासून साम्यवादी विचार आला तेव्हा पासून भारतातील परंपरा, स्त्री हक्क, स्त्री पुरुष समानता यावर साम्यवादी विचारवंत भरभरून बोलतात, आसूड ओढतात. यात त्यांचा रोख देशातील संस्कृती आणि धार्मिक परंपरांकडे असतो. मग त्या मोडून काढायला हव्या म्हणून मंगळसूत्र घालणे, कुंकू लावणे हे स्त्री गुलामगिरीचे प्रतीक म्हणून सांगितल्या जाते. या सांस्कृतिक बेड्या तोडायचे आव्हान करतांना मात्र ह्या डाव्या विदुषी ठसठशीत कुंकू लावून उभ्या असतात. मग मंगळसूत्र आणि कुंकवा पासून सुरू झालेला हा विरोध अनेक पारंपरिक, सांस्कृतिक आणि धार्मिक प्रथांवर येतो. देशात कुठेपन होणारा बलात्कार, स्त्री अत्याचार, घरगुती हिंसाचार हा याच धार्मिक, पारंपरिक आणि सांस्कृतिक मानसिकतेचा आविष्कार म्हणून संगितले जाते. जुन्या चालीरितीत भारतीय स्त्रीची झालेली कथित कुचंबणा वेगवेगळ्या पद्धतीने दाखविली जाते. उदाहरणच द्यायचे झाले तर एकीकडे रजस्वला स्त्रीला धार्मिक कार्ये करायला बंधन करणे, तिला घरातील काम करण्यास मज्जाव करत वेगळे बसवणे या प्रथेला विरोध करायचा, याला धार्मिक बुरसटले पणा म्हणायचा आणि दुसरी कडे स्त्री रजस्वला असलेल्या काळात स्त्रीची शारीरिक आणि मानसिक स्थिती लक्षात घेत तिला कामातून सूट मिळावी असे आवाहन केल्या जाते. म्हणजे ज्या परंपरा किंवा धार्मिक प्रथा कश्या करता होत्या मग? असा प्रश्न विचारणे प्रतिगामी पणाचे लक्षण असते. 



तरी बरे आपल्या देशाच्या इतिहासात स्त्री असूनही कर्तृत्व गाजवलेल्या अनेक आहेत. अगदी पुराणा पासून तर आधुनिक इतिहासा पर्यंत, राणी लक्ष्मीबाई, अहिल्यादेवी होळकर, राणी चेनम्मा, जिजाबाई, ओबाक ओन्नामा असो की आधुनिक राजकारणातील विजयालक्ष्मी पंडितांपासून इंदिरा गांधी, ममता बॅनर्जी, मायावती, सुषमा स्वराज, जयललिता अश्या अनेक स्त्रिया देशाला नेतृत्व देऊन गेल्या, काही देत आहेत, तर अनेक तयार होत आहेत. भारतात तरी असे कोणतेही क्षेत्र नाही जिथे स्त्रिया वेगवेगळ्या फळीत नेतृत्व देत नाहीये, करत नाहीये. 


तरीही आपल्या संस्कृतीवर, परंपरांवर आणि मुख्य म्हणजे धर्माला बदनाम करणे हाच या मागील मुख्य उद्देश ! कारण भारतीय समाज मोठ्या प्रमाणावर धार्मिक आस्थावर बांधल्या गेला आहे. हे बांधलेपणच साम्यवादी पोपटांना त्यांचे राज्य यायच्या मध्ये मोठा अडसर वाटतो. मग त्या करता मंगळसूत्र घालण्याला विरोध करायचा, इतकेच नाही तर मंगळसूत्र पुरुषाने घालण्याची टूम काढायची, तर कधी पुरुषांनी स्त्रियांचे कपडे घालून फिरायची टूम सुरू करायची, तर कधी पुरुषाने आपल्या पॅन्टवर लाल डाग लावून फिरण्याचा किळसवाणा प्रकार करत तथाकथित स्त्री पुरुष समानता आणायची असले रद्दी प्रकार करण्यात येतात. 


यातून नक्की काय हातात येते? पण हे सगळे करत असतांना महत्वाचे म्हणजे स्त्रीत्व आणि पौरुषत्व यांच्या काही स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक मर्यादा आहेत हे सत्य समजून घेणे आवश्यक आहे हे विसरले जाते. खरे तर लक्षात घेतले तर तत्कालीन सोवियत रशिया किंवा आताचा रशिया, क्युबा, लाओस, व्हिएतनाम, चीन या कोणत्याही देशात क्रांती झाल्यापासून एकही राजकीय स्त्री नेतृत्व समोर आले नाही हे लक्षात घेण्या सारखे आहे. त्या मानाने पारंपरिक असलेल्या ब्रिटनमध्ये मार्गारेट थचर, भारतात इंदिरा गांधी, श्रीलंकेत चंद्रिका कुमारतूंग, पाकिस्थान मध्ये बेनझीर भुट्टो, तर बांगला देश मध्ये शेख हसीना आणि खालीदा जिया यांना कसे विसरू शकतो. होय, काही देशात डाव्या विचारवरील महिला नेतृत्व आहे, मात्र त्या लोकशाही मार्गाने तिथे पोहचल्या, निव्वळ साम्यवादी व्यवस्था असती तर त्या उच्च स्थानावर पोहचल्या असत्या का ? हा प्रश्नच आहे. 



तुम्हाला आठवत असेल तर आपल्या देशात साधारण ८०-९० च्या दशकात एक साम्यवादी मासिक सगळीकडे दिसायचे "सोवियत नारी" नावाचे. चकचकीत पानावर, हिंदी आणि इंग्रजीत सोवियत रशियात स्त्रियांची कशी चांगली स्थिती आहे हे दर्शवणारे प्रपोगंडा मासिक होते ते ! काय असायचे त्याच्यात, पारंपरिक कपड्यात स्त्रियांचे फोटो, हस्तकला करतांनाचे फोटो आणि शेतात काम करणाऱ्या, कारखान्यात काम करणाऱ्या स्त्रिया. मग आपल्या देशात तरी नक्की काय होते तेव्हा....अर्थात तेव्हा जिथे पुरुषांना नोकऱ्या मिळत नव्हत्या तिथे स्त्रियांना कितपत मिळणार होत्या, हा विचार केला होता का कोणी तेव्हा?


आता वर दिलेली चीन मधील परिस्थिती आणि भारतातील साम्यवादी विचार यांची सांगड घालून बघा.

टिप्पण्या