स्मशानभूमीतला वाढदिवस..........



बघा कशी गंमत असते, श्रद्धा आणि अंधश्रद्धा ही काही एका धर्माची मक्तेदारी नाही. जगातील कोणताही धर्म असा नाही ज्या धर्मात श्रद्धा आणि अंधश्रद्धा नाहीत. मात्र आपल्या मंडळींना देशातील एकाच धर्मातील अंधश्रद्धा दिसतात. मग त्या तथाकथित अंधश्रद्धा दूर करण्यासाठी काहीही आचरट प्रयोग केल्या जातात. 



"स्मशाण" ही हिंदू धर्मातील एक महत्वाचे ठिकाण ! मानवाचा मृत्यू झाल्यावर त्याच्यावर अग्निसंस्कार करत त्या मृत व्यक्तीच्या आत्म्याला मोक्ष मिळण्याची जागा. स्मशाणाबाबत त्या मुळे काही रूढी आणि परंपरा आलेल्या आहेत. तिथे खाऊ नये, स्मशाणातून आल्याबर आंघोळ करावी असे याचे कारण मृत व्यक्ती संसर्गजन्य रोगाने गेला असेल तर तो संसर्ग वस्ती पर्यंत येऊ नये हाच या मागील हेतू. बाकी भूत प्रेत सारख्या अंधश्रद्धा सगळ्याच धर्मात कमी अधिक प्रमाणात सारख्या आहेत. मात्र आपल्या लोकांची तर्हा वेगळी, मग स्मशाणात काही मंगलकार्य करायचे नाही म्हंटल्यावर हटकून तिथे जाऊन आपले वाढदिवस साजरा करणार, जल्लोष करणार असली थिल्लर काम अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली केल्या जातात आणि स्वतःला पुरोगामी म्हणवून घेतले जाते. 



मात्र जेव्हा खरेच स्मशाणात काम करायची वेळ येते तेव्हा? या पैकी कोणीच कसे दिसत नाही? हे एक आश्चर्य आहे, तेव्हा मात्र प्रतिगामी म्हणून बदनाम केला गेलेल्या संघटनेचा कार्यकर्ता आपला वाढदिवस मात्र स्मशाणात करतो, समज उपयोगी कामाकरता ! कसा? 



अविनाश धायरकर, वय अवघ २१-२२ वर्षांचं, "स्व"-रूपवर्धिनी संस्थेचा कार्यकर्ता, आज त्याचा वाढदिवस, आणि तो आज कुठे आहे, तर तो मित्रांसोबत घरी केक कापत नाहीये, केक एकमेकांच्या तोंडाला फासत आधुनिक मॉडर्न युगात विचित्र पद्धतीने जन्मदिवस साजरा करत नाहीये, घरात आई - बाबांसोबत आमरस पुरी खात नाहीये, वाढदिवसाचे फोन, स्टेटस ठेवून स्वतःच्या अनोख्या दुनियेत तो रमत नाहीये, तर तो आहे पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत !



अविनाश गेले आठवडाभर पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत करोना संसर्गाने मृत पावलेल्या व्यक्तींना अग्नी देणे, सरण रचणे, नावनोंदणी करणे, व्यवस्थेला, सरकारला आलेला ताण लक्षात घेता मृताच्या नातेवाईकांना तासन तास प्रतीक्षा करावी लागू नये व मृतदेहांचे अंत्यसंस्कार लवकर होण्यासाठी दिवसरात्र झटतोय ! तो त्याच्या आई वडिलांना एकुलता एक पोरगा आहे बर, घरातली परिस्थिती बेताची आहे, अविनाश चहाच दुकान चालवतो आणि आता लॉकडाउन मध्ये व्यवसाय बंद आहे म्हणून सरकार आणि व्यवस्थेला शिव्या, दोष देण्यापेक्षा सहकार्य करतोय, व्यवस्थेला सुरळीत चालण्यासाठी मदत करतोय.... धन्य आहेस तू अविनाश, साष्टांग नमस्कार तुझ्या आई - वडिलांना, ते समाजाच्या दृष्टीने सुशिक्षित नाहीत पण सुजाण व संवेदनशील जरूर आहेत, छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावेत ते शेजारच्या घरात ही उक्ती त्यांनी आज खोटी ठरवली..



बाकी इतर वेळेस स्मशाणात जाऊन मर्दुमकी दाखवल्याचा देखावा करणारेआणि पुन्हा अंधश्रध्येच्या नावाखाली धर्माला बदनाम करण्याचा नाद करणारे आज मात्र घरात बसून आहेत. त्यांच्या समोर उत्तम उदाहरण म्हणजे अविनाश धायरकर !


मित्रा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

टिप्पण्या