"महाराष्ट्रावर अन्याय" ची ओरड कशाला?



महाराष्ट्रात विदर्भावर अन्याय होतो ही एकदम खरी गोष्ट आहे, याची अनेक उदाहरणे सांगता येतील. मात्र पूर्वी विदर्भातील आमदार - खासदार मोठ्या प्रमाणावर ही ओरड विदर्भात येऊन करायचे. मात्र या ओरड्याचा उपयोग शून्य ! मात्र विदर्भातील आमदार खासदार स्वतःची अकार्यक्षमता लपवण्यासाठी विदर्भावर अन्यायचे तुणतुणे अधिक जोरात वाजवायचे. यातून झाले काय की वैदर्भीय जनता तशीच उपाशी राहिली आणि या आमदार खासदारांची शैक्षणिक संस्थाने आणि मोठे दवाखाने उभे राहत हे कार्य सम्राट म्हणून उभे राहिले, त्यांच्या सात पिढ्यांची सोय झाली. तसलाच प्रकार आज "महाराष्ट्रावर अन्याय" च्या नावाखाली आघाडी सरकार करत आहे.



गेल्यावर्षी कोरोना काळात महाराष्ट्रातील मोठ्या शहरात प्राणवायूची कमतरता झाली होती. डॉक्टरांची जवळपास एक आठवडा चाललेली धावपळ पण जवळून अनुभवली होती. आता जेव्हा कोरोनाची दुसरी आणि भयानक लाट आली तेव्हा प्राणवायूचा पुरवठा हा कळीचा मुद्दा झाला आहे. 



राज्याच्या आघाडी सरकारने तर "महाराष्ट्रावर अन्यान" या सबबीखाली या प्राणवायू पुरवठ्याच्या मुद्यावर राजकारण सुरू पण केले. विमानाने, रेल्वेने प्राणवायू पुरवठा करा अशी विनंतीवजा आदेशच आपल्या मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारला दिला. आरोग्यमंत्री टोपे साहेब तर केंद्र सरकारचे जाहीरपणे पाय पकडायला तयार आहे असे वक्तव्य करत आहे. त्यातच शरद पवार सारखे आधारवड यांनी एक नवीन योजना पण समोर ठेवली त्या प्रमाणे, "राज्यातील १५ साखर कारखाने त्वरित प्राणवायू तयार करण्याचे युनिट लावून उत्पादन सुरू करण्यास सक्षम आहेत. मात्र त्या करता निधीची आवश्यकता आहे. वित्तीयसंस्था मात्र या साठी कर्ज देण्यास अनुकूल नाहीये, या प्लांट करता कर्ज दिल्यावर परताव्याची हामी त्यांना हवी आहे. मात्र संकट काळात आता प्राणवायू आवश्यक असल्यामुळे या कर्जाच्या प्रक्रियेत शिथिलता द्यावी." अशी मागणी केली आहे. 



केंद्र सरकारने प्राणवायू रेल्वेमार्गाने आणायची योजना आखून त्याची पहिली खेप राज्यात पोहचवली. प्राणवायू भरलेला टँकर जरी विमानाने आणता येत नसला तरी रिकामा टँकर विमानाने पाठवत प्रचंड पैसा खर्च करत वेळ वाचविण्याची कवायत पण करत आहे. 



मात्र आज प्राणवायू प्लांट उभारण्याची तयारी दाखवणारे राज्य सरकार, साखर कारखान्याच्या प्राणवायू प्लांट उभारण्यासाठी वित्तीय साहाय्याची मागणी करणारे आधारवड शरद पवार हे एका प्रश्नाचे उत्तर देतील का? केंद्र सरकारने जानेवारी २०२१ मध्येच महाराष्ट्राला १० प्राणवायू प्लांट बनवायला पी एम केअर मधून निधी पाठवला होता, त्या निधीचे नक्की काय झाले? 


पी एम केअर्स मधून भारतातील सगळ्या राज्य आणि केंद्र शासित प्रदेश मिळून एकूण १६२ प्राणवायू प्लांट उभारण्यासाठी २०१.५८ करोड रुपये पाठवले. त्यात वर सांगितल्याप्रमाणे राज्याला १० प्लांट करता निधी वितरित करण्यात आला. मग राज्य सरकारने त्यावर काय पाऊल उचलले? एक तर प्लांट दाखवा, नाही तर निधी दाखवा !


मात्र हीच उत्तर द्यायला नको म्हणून "महाराष्ट्रावर अन्याय" ची ओरड केली जाते.

टिप्पण्या