गेल्या काही दिवसांपासून पाकिस्थान मधील जनजीवन अतिशय विस्कळीत झाले आहे. आधीच कोरोनाच्या काळातील आंशिक लॉक डाऊन, सोबत जागतिक पटलावर बदलल्या राजकीय परिस्थितीमुळे डबघाईस आलेली आर्थिक परिस्थिती या सगळ्यांशी झुंज देणारा पाकिस्थान सध्या गृहयुध्दात अडकतो की काय अशी परिस्थिती पाकिस्थानमध्ये तयार होत आहे. पाकिस्थानमध्ये होणारे गृहयुद्ध भारतासाठी पण मोठी डोकेदुखी राहणार आहे. त्यातच अमेरिकेने अफगाण मधून सैन्य वापस घेण्याचा निर्णय आणि अफगाण मधील तालिबानचे वाढते वर्चस्व ही आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे.
पाकिस्थान मधील सध्याची स्थिती तयार झाली आहे तहरिक ए लब्बेक पाकिस्थान या धार्मिक संघटन आणि राजकीय पक्षामुळे. या पक्षाची पाळेमुळे शोधायला थोडे मागे जावे लागेल.
साल २०११ साली पाकिस्थानातील पंजाब राज्याचे गव्हर्नर होते सलमान तासिर. पाकिस्थान मधील प्रसिद्ध व्यक्तिमत्व श्रीमंत उद्योजक आणि राजकारणी ! मात्र त्या सोबत त्याच्यात अजून एक गुण होता तो म्हणजे धार्मिक सुधारणेकडे त्यांचा कल होता. पाकिस्थान मध्ये अनेक वर्षा पासून आजही गैर इस्लामी लोकांकरीता एक कायदा मोठा धोकादायक ठरला आहे. तो म्हणजे "ईश निंदा कायदा" ! पाकिस्थान मधील कट्टरपंथीयांच्या फायद्याचा असलेला हा कायदा त्या देशातील अल्पसंख्यांक आणि सुधारकांसाठी गळ्याचा फास बनला आहे. सलमान तासिर हे या कायद्याचे कट्टर विरोधक होते. तत्कालीन काळात जगभर प्रसिद्ध झालेल्या आसिया बीबी प्रकरणात सलमान तासिर यांनी आसिया बीबीचा पक्ष उचलून धरला होता. तिला त्या काळात कारागृहात जाऊन भेटलेले एकमेव राजकारणी होते. सलमान तासिर यांनी असिया बीबीला ईश निंदा कायद्या अंतर्गत सूनवलेल्या फाशीच्या शिक्षेला जोरदार विरोध केला होता. पाकिस्थान मधील इस्लामी कट्टरपंथी त्या मुळे सलमान तासिर यांच्या विरोधात होते. याच वादाच्या पार्श्वभूमीवर सलमान तासिर यांच्या सुरक्षा रक्षकाने त्यांची हत्या केली. मुमताज कादरी असे त्या सुरक्षा रक्षकाने नाव. या मुमताज कादरी याला २०१६मध्ये फाशी दिल्या गेली.
मात्र या अगोदर हे प्रकरण न्यायालयात गेल्यावर या मुमताज कादरी वरून पाकिस्थानमध्ये बराच वाद झाला. कट्टरपंथी मुमताज कादरीच्या समर्थनात होते आणि सलमान तासिर स्वतः ईश निंदेचे गुन्हेगार असल्यामुळे मुमताज कादरी याने त्यांना शिक्षा देत धार्मिक काम केले असे त्यांचे म्हणणे होते. यात सगळ्यात समोर होते खादिम हुसेन रिझवी. कोण होते खादिम रिझवी?
तर पंजाब प्रांताच्या धार्मिक विभागात नोकरी करणारे आणि लाहोर मधील पीर मक्की मस्जितचे मौलाना आणि स्वतःला भारतातील बरेलवी मुस्लिम पंथाचे अभ्यासक म्हणवून घेत. पाकिस्थान मधील ईश निंदा कायद्याचे पक्के समर्थक होते. त्याच मुळे आसिया बीबी आणि मुमताज कादरी प्रकरणात बरेच सक्रिय होते. त्याची ही सक्रियता तेही सरकारी कर्मचारी असतांना पाकिस्थानला परवडणारी नव्हती, परिणामी त्यांना आपली पंजाब प्रांताच्या धार्मिक विभागातील नोकरीतून काढून टाकण्यात आले.
अर्थात त्या मुळे हे खादीम रिझवी अधिक सक्रिय झाले. त्यांनी आपले संपर्क आणि संघटन वाढवले. २०१६ साली त्यांनी याच सक्रियतेतून कादरी यांच्या समर्थनार्थ सरकारची परवानगी नसतांना अलम्मा इकबाल (तेच ज्यांनी सारे जहा से अच्छा लिहले) यांच्या समाधीवर आंदोलन केले. हे आंदोलन कादरी याला फाशी दिल्या गेली त्याच्या विरोधात होते. शेवटी चार दिवसानंतर सरकार सोबत वाटाघाटी करत आंदोलन मागे घेतल्या गेले. याच आंदोलनात त्यांनी आपल्या संघटने विषयी आणि नवीन राजकीय पक्ष काढण्याचा विचार समोर ठेवला. शेवटी २०१७ साली या संघटनेला नाव तर दिलेच सोबत त्याला राजकारणातील एक पक्ष म्हणून पण सक्रिय केले. तो पक्ष म्हणजे तहरिक ए लब्बेक पाकिस्थान. अत्यंत कडवा मुस्लिमांचा पक्ष म्हणून लवकरच स्वतःची जागा निर्माण केली.
२०१७ साली जेव्हा खादीम रिझवी यांनी पक्ष स्थापन केला तेव्हा तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांनी या पक्षाला संसदेत अयोग्य घोषित करत या पक्षाची नोंदणी होऊ दिली नाही. पण या प्रकारा नंतर नॅशनल असेंब्लीच्या १२० जगाकरता पोटनिवडनुका झाल्या. या निवडणुकीत तहरिक ए लब्बेक पक्षाचे शेख इझहार हुसेन रिझवी स्वातंत्र्य उमेदवार म्हणून उभे राहिले आणि त्यांनी जमात ए इस्लामी आणि पाकिस्थान पीपल पार्टी पेक्षा जास्त मते घेतली.
या नंतर मौलाना खादीम रिझवी यांनी तत्कालीन कायदा मंत्री जाहिद हमीद आणि निवडणूक कायदा २०१७ मध्ये केलेल्या बदला विरोधात आंदोलन सुरू केले. पाकिस्थान मधील रावळपिंडी आणि इस्लामाबाद शहरात या आंदोलनाने चांगलाच जोर धरला. परिणामी सरकारला खादीम रिझवी सोबत करार करावा लागला आणि कायदा मंत्री जाहिद हमीद यांना राजीनामा द्यावा लागला सोबतच कायद्यातील बदल पण मागे घ्यावे लागले. या मुळे खादीम रिझवी आणि त्याच्या पक्षाची पाकिस्थानमध्ये लोकप्रियता वाढली. या लोकप्रियतेचा फायदा घेत २०१८ साली खादीम रिझवी याने पाकिस्थानच्या चारही प्रांतात आपले उमेदवार उभे केले. त्यातील काही निवडून आले आणि तहरिक ए लब्बेक पाकिस्थानला जनतेतून सक्रिय पाठींबा मिळायला लागला. पैसा जमला की पाकिस्थान मधील कट्टरपंथी मौलाना जे करतात तेच खादीम रिझवी यांनी केले, लाहोर मध्ये धार्मिक शिक्षण देणारा मदरसा सुरू केला.
तत्कालीन काळात नवाज शरीफ सरकार विरोधात इम्रानखानने मोठे आंदोलन केले होते. या आंदोलनात तहरिक ए लब्बेक आणि मौलाना खादीम रिझवी सक्रिय सहभागी होते. यातूनच तहरिक ए लब्बेक आपली जनतेत अजून लोकप्रिय व्हायला लागली. आपले इस्लाम संबंधी कट्टर विचार, या विचारांनी भरवलेल्या जनतेचा समूह याच्या जोरावर आता तहरिक ए लब्बेक पाकिस्थानच्या सरकारला इस्लामी कायदे कायम करण्यासाठी वाकवू लागली आणि सरकार पण वाकु लागले. तत्कालीन काळात नवाज शरीफ यांनी तहरिक ए तब्बेकवर अंकुश ठेवायचा प्रयत्न केला तेव्हा आता इम्रान खान यांच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री असलेले शेख रशीद मुहम्मद यांनी तहरिक ए लब्बेकची बाजू उचलून धरली होती आणि त्यांच्यावरील कारवाई रोखायला लावली होती.
खादीम हुसैन रिझवी यांचा मृत्यू २०२० साली झाला. मात्र पक्ष या मुळे थांबला नाही. पक्षाची धुरा आता खादीम रिझवी यांचा मुलगा साद रिझवी यांच्या खांद्यावर आली. या पक्षाचे पाकिस्थान राज्याच्या गटा नुसार फूट पडल्याचे म्हंटले जाते. मात्र तरीही सगळ्या गटांवर साद रिजवींनी पकड मिळवली असल्याचे सध्याच्या परिस्थितीत दिसते. इम्रान खान सरकारनेही तहरिक ए लब्बेक वर काहीही कारवाई न करता नेहमीच पाठीशी घातले, त्याचेच फळ आता इम्रान सरकार भोगत आहे.
आता फ्रांस येथे मोहम्मद पैगंबर यांचे व्यंगचित्र छापणे आणि त्यावर फ्रांस सरकारने घेतलेली भूमिका या विरोधात तहरिक ए लब्बेक ने कडक भूमिका घेत, पाकिस्थान सरकारने फ्रांसच्या राजदूताला वापस पाठवत राजकीय संबंध तोडायची मागणी केली. ही मागणी पूर्ण करण्यासाठी २० एप्रिल पर्यंतची वेळ सरकारला दिली होती. मात्र सध्या पाकिस्थान सरकारची आतंकवाद आणि कट्टरतावादा वरून मलिन झालेली इमेज, त्या पाई लागलेले आर्थिक निर्बंध आणि कोरोना मुळे खालावलेली अर्थव्यवस्था अश्या कठीण प्रसंगात फ्रांसच्या राजदूताला वापस पाठवणे धोक्याचे आहे असे सरकारला वाटत होते. यावर उपाय म्हणून पाकिस्थान सरकार संसदेत फ्रांस सरकार विरोधात निंदा प्रस्ताव पारित करेल, सोबतच कडक शब्दात फ्रांस सरकारला पत्र देऊन आपली भावना कळवेल अश्या प्रकारचे वचन इम्रान खान याने साद रिझवी यांना दिले.
त्या नुसार पाकिस्थान सरकारने आपल्या संसदेत फ्रांस सरकारच्या विरोधात निंदा प्रस्ताव आणला आणि पारित केला. मात्र तहरिक ए तब्बेकने देशात फ्रांसच्या वस्तूंवर टाकलेला बहिष्कार आणि संसदेतील फ्रांस विरोधी प्रस्तावावर फ्रांस सरकार कडून कडक शब्दांचा मार इम्रान सरकारला झेलवा लागला. याचा परिणाम इम्रान सरकारने फ्रांसला पत्र पाठवलेच नाही. इकडे तहरिक ए लब्बेक पक्षाने पण २० एप्रिल पर्यंत वाट न पाहता देशात हिंसक आंदोलनाला सुरवात केली. हे पाहताच इम्रान सरकारने साद रिझवी याला अटक केली. या अटकेमुळे आंदोलक अधिक बिथरले आणि संपूर्ण पाकिस्थांमध्ये जोरदार हिंसक आंदोलन सुरू झाले.
लाहोर, रावळपिंडी, कराची, इस्लामाबाद सारखी पाकिस्थान मधील महत्वाची आणि मोठी शहरे पेटायला लागली. पोलीस बळ आणि लष्कराला पण या जमावाने भीक घातली नाही. काही शहरात तर पोलीस आणि लष्करातील जवान पण या आंदोलकांना प्रोत्साहन देतांना दिसत होते, जे सुरक्षा रक्षक आंदोलकांना जुमानत नव्हते त्यांना मार खावा लागला. यात दोन मोठे पोलीस अधिकारी मारल्या गेले, अनेक पोलीस जवान, सेनेचे जवान आणि सामान्य जनता पण जखमी झाली. मात्र सरकारसाठी काळजीचा विषय हा होता की पोलीस आणि सेने मधील जवान तहरिक ए लब्बेकच्या आंदोलकांसोबत उभे दिसत होते. आपण आंदोलकांसोबत असल्याचे व्हिडीओ समाज माध्यमांवर प्रसारित करत होते. लक्षात घ्या तहरिक ए लब्बेक पंजाब आणि सिंध प्रांतात जास्त प्रभावी आहे आणि पाकिस्थान सेनेत आणि पोलिसात पण याच पंजाब आणि सिंध प्रांताचे वर्चस्व आहे.
या सगळ्या घटनाक्रमा मुळे इम्रान सरकारच नाही तर पाक लष्कर पण कमालीचे सतर्क झाले आणि तहरिक ए लब्बेक विरोधात मोठी कारवाई करण्यास उद्युक्त झाले. जवळपास २५०० लोकांना अटक केल्या गेली. केंद्रीय गृहमंत्री शेख रशीद यांनी तहरिक ए लब्बेकवर दहशतवादी कृत्य केल्याचा ठपका ठेवत १९९७ च्या दहशतवाद विरोधी कायद्याच्या नियम ११ बी नुसार कारवाई करत बंदी घालण्यात आली. तरी अजून आंदोलन शांत झाले नाहीये.
अर्थात या बंदीमुळे नक्की काय फरक पडेल हे सांगता येत नाहीये. उलट या बंदीचा तहरिक ए लब्बेकला फायदाच मिळेल अशी शंका देशात सर्वत्र बोलल्या जात आहे. कारण आज पर्यंत पाकिस्थान सरकारने अश्या ७८ संघटनावर कारवाई केली आहे. मात्र यातील अनेक संघटना अजून नावानिशी सक्रिय आहेत आणि काही नाव बदलून ! तहरिक ए लब्बेकच्या आंदोलनावर अजून तरी या बंदीचा असर दिसला नाहीये आणि रमाजानचा पवित्र महिना असून सुद्धा या आंदोलकांनी हिंसक मार्ग सोडला नाहीये.
या सगळ्या घडामोडीमुळेच पाकिस्थान गृहयुद्धाच्या उंबरठ्यावर उभा असल्याची भीती अनेक आंतराष्ट्रीय अभ्यासक व्यक्त करत आहे. ही भीती खरी ठरली तर आपल्यासाठी परिस्थिती खरेच आव्हानात्मक राहील. तहरिक ए लब्बेक जितकी कट्टरतावादी आहे तितकीच भारत विरोधी पण! आज पर्यंत या पक्षाचे संस्थापक खादीम रिझवी आणि त्याचा मुलगा साद रिझवी यांनी भारत विरोधी विचार नेहमीच बोलून दाखवले आहे. काश्मीर प्रश्न तर आहेच मात्र भारत काफिर बहुल आहे हा यातील मुख्य मुद्दा आहे.
तेव्हा अमेरिका अफगाण मधून सैन्य हटवणार आणि पुन्हा तालिबान तिथे प्रभावी होणार ही भारतीय उपमहाखंडासाठी जितकी भीतीदायक गोष्ट आहे तितकीच काळजी करण्यासारखी गोष्ट पाकिस्थानमध्ये सध्या सुरू असलेल्या घडामोडी आहेत हे लक्षात घ्या. पाकिस्थान मधील घटनांमध्ये आनंद मानू नका, काळजी करा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा