इतिहास की जातीय द्वेष !



डावे इतिहासकार आणि पत्रकार कोणत्याही ऐतिहासिक घटनेचा कसा विपर्यास करतात आणि त्या घटनेला कसा जातीय आणि धार्मिक रंग देतात ते आपण बघतोच. या लोकांचा मूळ उद्देश लोकांच्या मनात हिंदू धर्मा विषयी, हिंदुत्वा विषयी चुकीचे संदेश देणे हाच असतो. मग औरंगजेब हा मंदिरांना दान देणारा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यू बद्दल कळल्यावर कळवळणारा आणि त्यांच्या आत्म्याला मुक्ती मिळावी म्हणून नमाज पढणारा कनवाळू राजा होतो. तर छत्रपती संभाजी महाराज यांचा मृत्यू औरंगजेबाच्या छळाने झाला असला तरी, त्यांच्या खून औरंजेबाने ब्राम्हणांच्या सांगण्यावरून केला असतो. असले खोट्या इतिहासाच्या कथा नेहमीच यांच्या कडून प्रसारित होत असतात.




आता आपल्या राज्याचे ऊर्जामंत्री नागपूरचे नितीन राऊत यांनी फिल्मइंडिया या नियतकालिका मधील एक व्यंगचित्र समाज माध्यमावर टाकले. त्यात भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद हे ब्राम्हणांचे पाय धुताना दिसत आहेत आणि तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि शिक्षणमंत्री मौलाना अब्दुल कलाम आझाद आश्चर्य चकित होऊन बघत आहे. वर व्यंगचित्रांचे शीर्षक आहे "शेवटी रामराज्य आले" आणि खाली बातमी दिसत आहे ज्यात लिहले आहे की डॉ राजेंद्र प्रसाद यांनी २०० ब्राम्हणांचे पाय धुतले आणि त्यांना मिठाई सोबत ११/- रूपये दक्षिणा वाटली. वाराणसी, १४ नोव्हेंबर १९५२ !



यातील बातमी म्हणून असलेला मजकूर मंत्रीमोहदयांनी जसाचा तसा उचलून आपल्या लेखात घेतला आहे आणि वर त्याला जातीयवादाची फोडणी देत हिंदू, हिंदुत्व आणि ब्राम्हण यांच्यावर नेहमी प्रमाणे तोंडसुख घेतले आहे.

आता हा प्रसंग काही घडला होता हे आजपर्यंत कधी वाचण्यात आले नव्हते. हे जरूर आहे की डॉ राजेंद्र प्रसाद हे तत्कालीन परिस्थितीत हिंदुत्वाकडे झुकलेले व्यक्तिमत्व होते. या बाबतीत त्यांचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या सोबत अनेकदा खटके पण उडाले. मात्र तरी डॉ राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रपती असतांना इतका मोठा कार्यक्रम करत ब्राम्हणांचे पाय धुतल्याचा उल्लेख कुठेपन आला नाहीये. मग हा वाद आहे तरी काय?

३ डिसेंबर १८८४ साली बिहार मधील जीरादेई गावात जन्मलेले व्यक्तित्व. पटना आणि कलकत्ता येथे आपले शिक्षण पूर्ण करत वकील बनले. पटना येथे आपली वकिली सुरू केली, लवकरच पटना मधील नावाजलेले वकील म्हणून मान्यता मिळाली. लवकरच महात्मा गांधी यांच्या प्रेरणेने राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील होत भारतीय राजकारणात आपले पाऊल टाकले. काँग्रेसच्या मुंबई अधिवेशनाचे अध्यक्ष राहिले. १९३९ मध्ये जेव्हा महात्मा गांधी आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यात बेबनाव झाला, तेव्हा नेताजींनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तेव्हा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले राजेंद्र प्रसाद ! नेहरूंच्या पहिल्या मंत्रिमंडळात कृषी आणि खाद्यापूर्ती मंत्री म्हणून स्थान मिळाले. मात्र फक्त एका आठवड्यात त्यांना राजीनामा द्यावा लागला, कारण त्याच्या कडे या पेक्षा मोठे काम सोपवण्यात आले. ते काम म्हणजे संविधान सभेचे अध्यक्षपद !

मात्र त्यांचे आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचे अनेक बाबतीत मतभेद होते. डॉ राजेंद्र प्रसाद हे हिंदुधर्मा अभिमानी होते. अर्थात काही हिंदू आस्था आणि परंपरा ते मान्य करायचे. ते सुधारणावादी आणि सर्वधर्मसमभाव मानणारे असले तरी त्यांच्या आणि नेहरूनच्या या कडे बघण्याच्या दृष्टिकोनात जमीन आस्मानचे अंतर होते आणि हेच अंतर त्यांच्यात मतभेद निर्माण करत होते.

नेहरूंच्या राज्यात नेहरूंना विरोध करणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मागे डॉ राजेंद्र प्रसाद सदैव भक्कमपणे उभे राहिले. इतिहास असा की भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून पंडित नेहरूंची आवड डॉ राजेंद्र प्रसाद नाही तर सी राजगोपालाचारी होते. कारण सरळ होते की भारतीय राजनीती आणि भारताच्या सेक्युरिझमकडे बघण्याचा जो दृष्टिकोन नेहरुंचा होता तोच सी राजगोपचारी यांचा पण होता. पण तत्कालीन राजकारणात सरदार वल्लभभाई पटेल आणि डॉ राजेंद्र प्रसाद यांनी पंडित जवाहरलाल नेहरूनवर मात केली आणि डॉ राजेंद्र प्रसाद भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवडल्या गेले.

खरेतर डॉ राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष झाल्याबरोबर त्यांच्यात आणि पंडित नेहरूंमध्ये पहिली ठिणगी पडली होती, कारण होते "हिंदू कोड बिल" ! अर्थात डॉ राजेंद्र प्रसाद यांचा हिंदूंकरता आधुनिक कायदा आणायला काहीच हरकत नव्हती. मात्र ज्या पद्धतीने सरकार कायदा जनतेवर थोपवायचा प्रयत्न करत होते तो त्यांना मान्य नव्हता. त्याचे मत होते की, "धार्मिक कायदे न घेता आधुनिक कायदे फक्त हिंदू धर्मीयांसाठीच का आणायचे? मग भारतातील सगळे धर्म आधुनिक कायद्याच्या अंतर्गत का आणू नये? प्रत्येक भारतीयाला मग तो कोणत्याही धर्माचा असो त्याच्या करता समान नागरिक कायदा हवा. हे न करता सरकार फक्त हिंदूंनाच आधुनिक कायद्याच्या कक्षेत आणत असेल तर निदान त्या करता जबरदस्ती आणि घाई न करता प्रथम देशातील हिंदूंचे आणि त्यांच्या प्रतिनिधींचे, धार्मिक नेत्यांचे म्हणणे ऐकून घ्या." मात्र तेव्हा हिंदू कोड बिल हा कायदा लगेच पारित करणे हा प्रश्न नेहरूंनी आपल्यासाठी प्रतिष्ठेचा केला होता. नेहरू काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. हिंदू कोड बिल पारित करूनच नेहरू थांबले. १९५१ साली सोरटी सोमनाथ मंदिराच्या उदघाटना करता डॉ राजेंद्र प्रसाद यांना निमंत्रण दिल्या गेले आणि त्यांनी ते स्वीकारले. सोमनाथ मंदिराचा इतिहास आपल्याला माहीतच आहे. मुस्लिम आक्रमकांनी तोडलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार करावा असे काही हिंदूंच्या मनात आले, सरदार वल्लभभाई पटेल यांनी पुण्य कामात भरीव योगदान दिले. मात्र दुर्दैवाने सरदार वल्लभभाई पटेल यांचा मृत्यू मंदिर पुनर्निर्माण होण्याच्या अगोदरच झाला. सरदार पटेल यांचे परममित्र म्हणून साहजिकच डॉ राजेंद्र प्रसाद यांना निमंत्रण दिले गेले. मात्र तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना हे रुचले नाही. त्यांनी डॉ राजेंद्र प्रसाद यांनी सोमनाथ मंदिराच्या उदघाटन प्रसंगाला उपस्थित राहू नये म्हणून मन वळवायचा खूप प्रयत्न केला. मात्र डॉ राजेंद्र प्रसाद यांनी काहीही ऐकले नाही आणि ते पुनर्निर्मित सोमनाथ मंदिरात उपस्थित राहिले.

या सगळ्या घडामोडीत भारतातील तत्कालिन तथाकथित डावे, सेक्युलर, नेहरुवादी यांना किती त्रास झाला असेल त्याची कल्पना आपल्याला यायला हवी. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सद्भावना कार्यक्रमात नाकारलेली गोल टोपी, केदारनाथच्या गुफेत केलेली आराधना आणि महत्वाचे म्हणजे राम जन्मभूमी मंदिराच्या पायाभरणी कार्यक्रमाला उपस्थित राहून केलेली पूजा किंवा आपल्या कार्यक्रमात करत असलेले मंदिर दर्शन हे या लोकांना किती खुपते ते आपण बघतो, मग त्या विरोधात वक्तव्य करतांना ही लोक किती कल्पनाविलास करतात हे पण आपण वाचतो आणि ऐकतो. नेमके डॉ राजेंद्र प्रसाद यांच्या बद्दल पण हेच झाले.

आपण वरती वाचलेच की पंडित नेहरूंच्या इच्छे विरुद्ध डॉ राजेंद्र प्रसाद २६ जानेवारी १९५० रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवडल्या गेले. मात्र त्या नंतर हिंदू धर्माविषयीचे त्यांचे वर्तन आणि विचार डोक्यात खुपलेले डॉ राजेंद्र प्रसाद यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती करण्याच्या तयारीत नव्हते. त्यातच डॉ राजेंद्र प्रसाद यांना भक्कम पाठींबा देणारे नेहरूंच्या बरोबरीत राजकारण करू शकणारे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मृत्यू मुळे डॉ राजेंद्र प्रसाद दुसऱ्यांदा राष्ट्रपती बनणार नाही अशी नेहरुवादयांचा कयास होता.

अश्यातच १९५२ ला राष्ट्रपती निवडणूक जाहीर झाली. राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत डॉ राजेंद्र प्रसाद यांच्या विरोधात लक्ष्मण गणेश थत्ते, कृष्ण कुमार चॅटर्जी आणि चौधरी हरी राम हे स्वातंत्र्य उमेदवार उभे होते. मात्र राजेंद्र प्रसाद यांना कडवी टक्कर द्यायला डाव्या पक्षाच्या पाठींब्यावर उभे राहिले के टी शाह. पंडित नेहरू पण के टी शहा यांच्या पाठीशी होतेच. कारण पुन्हा नेहरू आणि के टी शहा यांचा भारताविषयी आणि तथाकथित सेक्युरिझम बद्दलचा एकच दृष्टिकोन ! मात्र १ मे १९५२ ला झालेल्या निवडणुकीत अनपेक्षीयपणे डॉ राजेंद्र प्रसाद निवडून आले.

आता लक्षात घ्या की आपले ऊर्जा मंत्री दावा करतात त्या पद्धतीने १९५२ साली डॉ राजेंद्र प्रसाद राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकले असले, ती पहिली संविधानिक राष्ट्रपदीपदाची निवडणूक असली तरी ती देशाच्या पहिल्या राष्ट्रपतीची निवडणूक नव्हती. देशाचे पहिले राष्ट्रपती म्हणून राजेंद्र प्रसाद २६ जानेवारी १९५० रोजी झाली होती आणि संविधान सभेने त्यांना एकमताने निवडले पण होते. मग ही दोनशे ब्राम्हणांचे पाय धुतल्याची बातमी आली कुठून?

एकंदरच आपण पाहिले की डॉ राजेंद्र प्रसाद हे धार्मिक वृत्तीचे आणि धार्मिक आस्था असणारे नेते होते. नोव्हेंबर १९५२ साली राष्ट्रपती निवडणूक जिंकल्यावर ते पहिल्यांदाच वाराणसी येथे आपल्या अधिकृत दौऱ्यावर गेले. या दौऱ्यात त्यांनी काशी विश्वनाथ मंदिरात दर्शन आणि पूजाअर्चा केली. परंपरे प्रमाणे पूजा संपन्न झाल्यावर मंदिराच्या पुजारीच्या पाया पडले आणि दक्षिणा दिली. नेमके हेच राष्ट्रपतींचे वर्तन डाव्यांना आणि देशातील तथाकथित सेक्युलर लोकांना खटकले. आधीच सोमनाथ मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याची उपस्थिती आणि आता मंदिरातील पूजा हा या लोकांकरिता भयानक असा प्रकार होता. त्यातच डाव्या पक्षांच्या पाठींब्यावर उभ्या असलेल्या के टी शहा यांचा झालेला पराभव पण या डाव्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. त्यातच वरणसीचा हा प्रकार म्हणजे डॉ राजेंद्र प्रसाद यांची बदनामी करायला एक चांगला प्रसंग म्हणून उभा राहिला.
आर के नारायण



गंमत म्हणजे आपले ऊर्जा मंत्री पण या प्रपोगंडा व्यंगचित्राला भुलले आणि त्याला खरे मानत आहेत. वरतून हे व्यंगचित्र आर के नारायणन यांनी काढल्याची मखलाशी त्यांनी केली. आता आर के नारायण हे आहे प्रसिद्ध लेखक १० ऑक्टोबर १९०६ रोजी जन्मलेल्या आर के नारायण यांचा मृत्यू १३ मे २००१ मध्ये झाला. साहित्य अकादमी पुरस्कार, फिल्म फेअर पुरस्कार आणि पद्म भूषण पण त्यांना मिळाले. इतकेच नाही तर साहित्याच्या नोबेल करता अनेक वेळा त्यांचे नाव नामांकनात आले. मात्र दुर्दैवाने नोबल पुरस्काराने मात्र त्यांना हुलकावणी दिली. मात्र आर के नारायण यांनी कधी व्यंगचित्र काढल्याची आणि ते प्रकाशित झाल्याची कुठेही नोंद नाही. व्यंगचित्र काढणारे आहेत आर के लक्ष्मण ! ज्यांची व्यंगचित्रे आपण आजही आवडीने बघतो, त्यांच्या राजकीय व्यंगचित्राचा आजही अभ्यास होतो. मात्र हे व्यंगचित्र त्यांचे नाही, कारण त्यांच्या व्यंगचित्रात नेहमी दिसणारा "कॉमन मॅन" मात्र यात दिसत नाही.
बाबुराव पटेल



तत्कालीन काळात अतिशय वादग्रस्त व्यक्तित्व असलेले बाबुराव पटेल यांच्या चित्रपट विषयक नियकालिकेत छापल्या गेलेल्या व्यंगचित्राला ऊर्जा मंत्री आपल्याला हवा तसा अर्थ घेत समाज माध्यमांवर टाकत आहेत आणि जातीयता वाढवत आहेत हेच यांचे खरे रूप.

बाकी ऊर्जा मंत्र्यांनी एक लक्षात घ्यावे की तुम्ही मांडत असलेली घटना तशी नाही जी व्यंगचित्रात दाखवली, व्यंगचित्रात त्या घटनेला अतिशोयक्ती प्रकारात दाखवले, ती तत्कालीन राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद यांची बदनामी करत त्यांचा राजकीय पाया कमकुवत करण्यासाठी ! पण एकवेळ मान्य केले की राजेंद्र प्रसाद यांच्या वर त्या काळात दबाव आला आणि त्यांनी ब्राम्हणांचे पाय धुतले, तर मग आता पंतप्रधान मोदी यांनी जे तथाकथित दलितांचे पाय धुतले त्यांच्यावर पण दबाव होता का? निदान आता तरी मान्य करा की मोदींनी त्यांच्या इच्छेने हे काम केले.

बाकी या साऱ्या डाव्या प्रपोगंडयाचा डॉ राजेंद्र प्रसाद यांच्या राजकीय कार्दकिदीवर अजिबात परिणाम झाला नाही. कारण १९५७ साली पुन्हा झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ते पुन्हा जिंकून आले. १९६३ पर्यंत राष्ट्रपती पदावर डॉ राजेंद्र प्रसादच विराजमान होते.




टिप्पण्या