बांगलादेश मुक्ती - वाद कशाला?



पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात इतिहासातील एखाद्या अज्ञात घडामोडी वरून पडदा बाजूला करतात आणि मग देशातील त्यांचे तमाम विरोधक त्या घटनेचा आणि पंतप्रधान मोदी यांचा काय संबंध या बाबतीत किस पाडत राहतात. त्या मागे तत्कालीन विरोधक कसे निष्पभ्र होते हे दाखवण्यासोबतच, देश आम्ही चालवत होतो आणि त्या काळात झालेल्या चांगल्या गोष्टी फक्त आमच्यामुळेच होऊ शकल्या असा दंभ असतो. 



पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगला देश दौऱ्यावर गेले, कशाला? तर बांगलादेश स्वातंत्र्य युद्धाचा आणि भारत बांगलादेश राजनैतिक संबंधांचा  सुवर्ण मोहत्सव साजरा करण्यासाठी म्हणून, हा काही फक्त नरेंद्र मोदी यांच्या सन्मानासाठी कार्यक्रम नव्हता, तर देशाच्या सन्मानासाठी हा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात भाषण करतांना नरेंद्र मोदी यांनी सांगितले की बांगलादेश स्वातंत्र्य करण्यासाठी म्हणून मी पण आंदोलन केले आणि तुरुंगात गेलो होतो. यांच्या या वक्तव्यावरून देशात चांगलाच गदारोळ सुरू झाला. अर्थात बांगलादेश स्वातंत्र्य करण्याला इंदिरा गांधी यांचे योगदान, त्यांचा कणखरपणा, त्यांना दिलेली दुर्गादेवीची उपमा यावर इतके वर्षे गाजावाजा केलेल्या काँग्रेसी आणि त्या काँग्रेसीना साथ देणाऱ्या विरोधकांचा तिळपापड झाला नसता तर नवल ! 



यातच राजकारण म्हणजे काय? त्यातही आंतराष्ट्रीय राजकारण म्हणजे काय? हे माहीत नसलेल्या नवपुरोगामी शिवसेना नेत्यांना तर अजूनच चेव आला. अख्खी हयात गुंडागर्दी आणि खंडणीखोरी करत त्याला राजकारण म्हणणाऱ्या शिवसेनेचे आयातीत खासदार प्रियांका चतुर्वेदी यांना प्रश्न असा पडला की, "सर्व भारतीय बांगलादेश स्वातंत्र्याच्या बाजूने असतांना हे आंदोलन करायची गरज का पडली?" अर्थात खासदार असून असे प्रश्न पडतात याचाच अर्थ यांची आंतराष्ट्रीय राजकारणाची समज किती तोकडी आहे हे लक्षात येते. 



मुळातच तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी बांगलादेश युद्ध सुरू व्हायच्या आधी जगभर भ्रमण करत पूर्व पाकिस्थान बाबत भारताचे धोरण नक्की काय आहे हे आंतराष्ट्रीय राजकारण्यांना समजवून देत देशाच्या बाजूने त्याचे मत फिरवीत होत्या. मात्र एखाद्या देशातील सत्ताधाऱ्याला वाटते म्हणून कोणताही देश युद्धाला समर्थन कसे देईन? त्याच बरोबर तो काळ शितयुद्धाचा होता, पाकिस्थान अमेरिकेच्या मांडीवर बसायच्या तयारीत होता, पूर्व पाकिस्थान म्हणजेच आजच्या बांगलादेशात पाकिस्थानी राजवट करत असलेल्या मुस्कटदाबीकडे आणि जुलूमांकडे अमेरिकेने दुर्लक्ष केले होते. पाकिस्थान विरोधात युद्ध सुरू करणे म्हणजे प्रत्यक्ष अमेरिकेला अंगावर घेणे आणि अश्या युद्धाकरता आंतराष्ट्रीय समुदाय कसा पाठींबा देणार? तेव्हा या युद्धाला फक्त भारतातील सत्ताधारीच नाही तर विरोधक पण पाठींबा देत आहेत, त्या करता सरकारवर दबाव टाकत आहे हे आंतराष्ट्रीय समुदायाला दाखवणे गरजेचे झाले असेल असे पण होऊ शकते किंवा विरोधकांना आयत्यावेळी सरकार पाय मागे घेत आता पूर्व पाकिस्थानचा विषय सोडते की काय अशी शंका येऊन पण विरोधक आंदोलन करायला बाध्य होऊ शकतात. याचे पण कारण असे की जेव्हा इंदिरा गांधी यांनी भारतीय सेनेला पूर्व पाकिस्थानात हल्ला करावा असा आदेश दिला तेव्हा तत्कालीन जनरल सॅम माणेकशा यांनी पूर्व पाकिस्थान मधील नैसर्गिक परिस्थिती आणि सेनेची तयारी यावरून तत्काळ आदेश आमलात आणायला असमर्थता जाहीर केली होती आणि वेळ मागून घेतला होता. हाच काळ कदाचित विरोधकांना जाचक वाटला असेल, आज आपण सॅम माणिकशा यांच्या त्या निर्णयाचे आणि इंदिरा गांधी यांना तोंडावर खरे बोलण्याच्या त्यांच्या निर्भीडतेचे आपण कौतुक करतो, मात्र तत्कालीन काळात सरकारला जाहीरपणे ही बैठकीत झालेल्या गोष्टी सांगता पण येत नसेल. 



कारण जे काही असो मात्र याचा परिणाम अटल बिहारी वाजपेयी यांनी १ ते ११ ऑगस्ट १९७१ या काळात दिल्ली येथे संसदेसमोर बांगलादेश स्वातंत्र्य करण्यास भारत सरकारने पाठींबा द्यावा म्हणून आंदोलन केले. आता सरकार युद्धाच्या बाजूने असून खुले पणाने आपण ही कारवाई केव्हा करणार हे सांगता येत नसल्यामुळे किंवा भारतीय जनमत या बाबतीत किती क्षुद्ध आहे हे दाखवण्यासाठी म्हणून या आंदोलनावर कारवाई तर करणार होतेच, याच कारवाईत मोदी तुरुंगात गेले असतील. 


तत्कालीन जनसंघ असो की आताचा भाजपा या पक्षांना कायकर्त्यांचे बळ संघ पुरवतो हे काही गुपित नाहीये, त्या मुळे संघात असलेले मोदींनी जनसंघ कार्यकर्ता म्हणून त्या आंदोलनात भाग घेतला असेलच. अर्थात मोदी यांनी १९७८ साली लिहलेल्या ऐका पुस्तकात या आंदोलनाची आणि झालेल्या कारागृह वारीची आठवण लिहून ठेवली आहे. बांगलादेशाने पण अटलबिहारी वाजपेयी यांना या आंदोलना करता सन्मानपत्र देत यथोचित सत्कार पण केला आहेच. अर्थात तत्कालीन पूर्व पाकिस्थान मधील उठावात संघाचा हात असल्याचा आरोप पाकिस्थानच्या राज्यकर्त्यांनी केलाच होता हे लक्षात ठेवा.


जाता जाता एक किस्सा देत आहे, पंतप्रधान लालबहादूर शास्त्री होते तेव्हाचा, या अगोदर पण सांगितला आहे पण पुन्हा, कारण काही ठिकाणी सत्ताधारी आणि विरोधकांना आंतरराष्ट्रीय दबाव झुगारत देशासाठी कशी नाटके करावी लागतात त्याचा नमुना म्हणून. 


१९६५ मध्ये चीन सैनिकांनी भारतीय सैनिकांवर आरोप केला की, भारतीयांनी आमच्या ८०० शेळ्या आणि ५९ याक (हिमालयातील गाय) अनधिकृत पणे ताब्यात घेतल्या आणि फक्त या एका आरोपावरून भारतीयांवर दबाव बनवायला सुरवात केली. पण या घटनेत रंग भरला तो तत्कालीन जनसंघाचे नेते आणि संसद सदस्य अटलबिहारी वाजपेयी यांनी! चीन या घटनेला अवास्तव रंग देत आहे ते बघत २४ सप्टेंनबर १९६५ ला अटलबिहारी वाजपेयी यांनी दिल्ली स्थित चिनी दूतावासा समोर एक मोर्चा नेला. बरे ते फक्त मोर्चा नेला नाही, तर सोबत जवळपास ८०० शेळ्या पण जमवून त्या मोर्चासोबत नेल्या आणि सोबत जी बॅनर लिहली त्यात "८०० शेळ्यांसाठी शक्तिशाली चीन तिसऱ्या महायुद्धाच्या तयारीत" असे लिहले. त्यातील एक बॅनर चिनी सरकारला खूप अपमानजनक वाटला त्यात लिहले होते, "वाटले तर मला खा, पण जगाला वाचवा" ! चीन चांगलाच चवताळला. त्याने भारत सरकारला या मोर्चा विरोधात आणि आपल्या जप्त केलेल्या तथाकथित शेळ्या आणि याक संदर्भात खरमरीत पत्र दिले. यात दिल्लीतील या मोर्चा विरोधात नाराजी व्यक्त करत, आपला उपहास करायला भारत सरकारने मुद्दाम हा मोर्चा आयोजित केला असा आरोप केला. तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी हे आरोप धुडकावून लावले. भारत सरकारने या पत्राला उत्तर देतांना सांगितले की, "दिल्लीतील मोर्चा हा भारतीय लोकशाहीत जगणाऱ्या भारतीय जनतेची अभिव्यक्ती होती, या मोर्चा मागे भारत सरकारचा कोणताही हात नव्हता. सोबतच सीमे वर जी जनावर भारतीय सेनेने जप्त केली आहे, त्या बाबत आम्ही तपास केला आम्हाला असे आढळून आले की, ही जनावरे चिनी सेनेची नसून भारतीय हद्दीत अनधिकृतपणे घुसखोरी करणाऱ्या किंवा शरणार्थी म्हणून येणाऱ्या दोन तिब्बेती नागरिकांची आहेत. भारतीय सेनेच्या अहवाला वरून असे लक्षात येत आहे की जनावरे भारतीय सीमा ओलांडू शकले पण तिब्बेती नागरिक गायब आहेत. ते एक तर भारतीय हद्दीत असतील किंवा तुमच्या ताब्यात. तेव्हा ही जनावरे ज्यांची आहे त्यांना वापस करण्यास कटीबद्ध आहे. या नागरिकांचा आमच्या हद्दीत तपास सुरू आहे, जर ते तुमच्या ताब्यात असतील तर त्यांना भारतीयांच्या ताब्यात द्या. हे तिब्बेती नागरिक जेव्हा समोर येतील तेव्हा जनावरे वापस होतील." आता चीन यात फसला, मान्य करावे तरी पंचाईत आणि नाही म्हणावे तरी पंचाईत. चीनने आपला दावा सोडून दिला, मात्र राग कायम ठेवला. अर्थात दिल्लीतील हा मोर्चा जरी अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात निघाला असला, त्यातील कल्पकता जरी त्यांची असली तरी या मोर्चात मोठ्या प्रमाणात तत्कालीन कॉंग्रेस कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते हे उघड सत्य आहे. आता यातून तुम्ही काय विचार करायचा ते करा!

टिप्पण्या