गृहमंत्री तुमहारा च्युक्याच...!




जून १९९३ ला दिल्ली मध्ये हर्षद मेहता आणि त्याचे वकील राम जेठमलानी यांनी एक पत्रकार परिषद घेत आपण तत्कालीन पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांना एक करोड रुपये लाच दिल्याचा आरोप केला. त्याच्या दाव्यानुसार ४ नोव्हेंबर १९९१ रोजी त्याने आणि त्याच्या भावाने मिळून पंतप्रधानांना, सरकारी निवस्थानावर जाऊन ही एक करोड रोकड असलेली बॅग सुपूर्द केली. ती सुटकेस पंतप्रधानांचे तत्कालीन खाजगी सचिव आर के खांडेकर यांच्या सुपूर्द केली होती.


बरे इतका आरोप करून थांबला नाही तर त्याने त्या पत्रकार परिषदेत ५०० रुपयांच्या नोटांच्या रुपात पंधरा लाख आणि बाकी रक्कम ५० आणि १०० रुपयांच्या नोटांच्या रुपात भरून पण दाखवली.

या पत्रकार परिषदेनंतर देशात राजकीय खळबळ माजली. पहिल्यांदाच कोणी तरी थेट पंतप्रधानांला लाच दिल्याचा आरोप करत होते. काय झाले पुढे या आरोपाचे? काहीही नाही ! ना नरसिंहराव यांच्यावर काही कारवाई केल्या गेली, ना नरसिंहराव यांनी हर्षद मेहतावर खोटे आरोप केले म्हणून कारवाई झाली. हळू हळू हे विसरल्या पण गेले.

आज राज्याच्या गृहमंत्र्यांवर पोलीस अधिकाऱ्याने १०० करोड खंडणी वसुलीचा आरोप केला. राज्याच्या गृहमंत्र्यांवर थेटपणे असा आरोप पहिल्यांदाच होत आहे. या आरोपामुळे राज्याचा अपमान झाल्याची भावना तयार होत असल्याचे बोलले जात आहे. पुन्हा एकदा राजकीय धुरळा उडाला आहे. त्याच बरोबर ज्यांनी आरोप केला ते मुंबईचे माजी पोलीस कमिश्नर आणि विद्यमान होमगार्डचे डिजी परमविरसिंग आता एकाएकी सत्ताधारी समर्थकांना विरोधी पक्ष नेत्यांच्या हातचे बाहुले वाटायला लागले आहे. पण हेच परमवीरसिंग आता गेल्या आठवड्या पर्यंत याच समर्थकांच्या डोळ्यातील तारा होते.



या परमवीर सिंहानी विदर्भ पाटबंधारे विभागातील कथित भ्रष्टाचार प्रकरणातील बारा प्रकरणात तत्कालीन काळातील पाटबंधारे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना क्लीनचिट दिली होती. तेही डिसेंबर २०१९ मध्ये ! तेव्हा परविरसिंग हे अँटी करप्शन ब्युरोचे मुख्य अधिकारी होते. त्या वेळेस ते देवेंद्र फडणवीसांचे हस्तक नव्हते. याच परमवीर सिंह यांची नियुक्ती आघाडी सरकार आल्यावर फेब्रुवारी २०२० ला लगेच मुंबईचे कमिश्नर म्हणून केल्या गेली. तेव्हा कोणाला ते कोणाचे समर्थक आहेत हा प्रश्न पडला नाही. त्या नंतर सचिन वाझे यांची पुन्हा पोलीस दलात नियुक्ती झाली, लगेच त्यांना महत्वाची पोस्ट देण्यात आली, त्या नंतर सचिन वाझे यांचे नाव सतत वेगवेगळ्या कारणाने गाजत राहिले, आरोप होत राहिले, तेव्हा पण परमवीरसिंग शांत होते. तेव्हा पण ते कोणाचे समर्थक आहे हा प्रश्न पडला नव्हता. पण आज पडला कारण त्यांनी आरोप केले.

का केले आरोप? वर नरसिंहराव यांच्यावर झालेल्या आरोपाचे काय झाले ते सांगितले. का ते आरोप थंड बसत्यात गेले? कारण नरसिंहराव शांत बसले, त्यांनी ना कारवाई केली, ना प्रतिउत्तर दिले, आरोपा मुळे उडलेला धुरळा काही दिवसात शांत झाला. पण इथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सारख्या कसलेल्या निगरगट्ट राजकारण्यासोबत एक स्वमग्न आणि तोंडाळ कलाकार सोबत होता शिवसेने सारखा ! त्या मुळे सगळे फसले !



खरे तर शरद पवार सारखे कसलेले नेतृत्व सोबत असतांना, ज्यांना असे अनेक आरोप अंगावर घेऊन जगायची सवय आहे. भूखंडाचे श्रीखंड असो, की तेलगी घोटाळा, महाराष्ट्र सदन असो की गुन्हेगारांसोबत केलेला सरकारी विमानातून केलेला प्रवास इतक्या मोठ्या आरोपातून शरद पवार सहीसलामत बाहेर आले, याचे कारण एकच शांत बसणे आणि आपली चूक दुसऱ्यावर टाकतांना नाव न घेता वापरलेली मोघम भाषा.



मात्र या प्रकरणात असे काही झाले नाही. सचिन वाझे बद्दल शिवसेना विशेष आक्रमक झाली होती. हीच शिवसेना जेव्हा भाजपा सोबत राहून विरोधकांची भाषा बोलत होती तेव्हा मजा घेणाऱ्या या नेत्यांना मात्र शिवसिनेचा वाचाळपणा थांबवता तर आला नाहीच, मात्र ती वाईट सवय स्वतःला पण लावून घेतली. एका चुकीच्या वक्तव्यासाठी अनेक चुकीची वक्तव्ये फक्त काही तासात आली आणि जिलेटिनच्या कांडयाना लावलेला डिटोनेटर ट्रीक झाला.

खरे तर विधान भवनात जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी पुरावे समोर ठेवत सरकारवर ताशेरे ओढले तेव्हाच गृहमंत्र्यांनी आणि शरद पवार यांनी त्याची गंभीर दखल घ्यायला हवी होती. शिवसेनेला चूप बसवत सचिन वाझे यांना तत्काळ घरी बसवायला हवे होते. मात्र नशीब फिरले की घराचे वासे पण फिरतात अशी म्हण आहे इथे तर वाझे फिरला होता वाटेल तसा फिरला होता. पण ते लक्षात न घेता शिवसेनेला साथ देत राष्ट्रवादी त्यांच्या मागे फरफटत गेली. अगदी वाझेला NIA ने अटक केल्यावर पण हेच सुरू होते.

जेव्हा वाझेने वापरलेल्या गाड्या मुंबई पोलीस दलातील आहे हे समोर आले तेव्हा मात्र गृहमंत्री गळपटले ! नंतर तडकफडकी वाझेंचे निलंबन आणि कमिश्नरची बदली करण्यात आली. आता बघा तो पर्यंत या सगळ्या प्रकरणाचा रोख, आरोप खरे तर शिवसेनेवर होता. राष्ट्रवादी काँग्रेस अलगत बाजूला झाली होती. गृहमंत्रीपद हातात असून गृहमंत्र्यांवर थेट आरोप नव्हते. तेव्हा शांत राहणे आणि कारवाई केली आहे, पुढील तपास झाल्यावर बघू इतके म्हणून गृहमंत्री सुटले असते. परमवीर सिह पण शांतपणे आपल्या नवीन कामावर रुजू झाले होते. शिवसेना ओरडत होती, विरोधी पक्षाच्या आरोपाला उत्तर देत होती देऊ द्यायचे.

मात्र गृहमंत्र्यांना आपण निष्कलंक आहोत हे जगाला दाखवायची खुमखुमी आली आणि आपल्या चाय बिस्कुट पत्रकारांना हाताशी धरून त्यांनी ही खुमखुमी बाहेर काढली. खरे तर त्याच दिवशी पत्रकारांनी शरद पवार यांना पण दुपारी वाझे प्रकरणा बद्दल छेडले होते, तेव्हा त्यांनी, "स्थानिक प्रश्नावर आता विचार करत नाही." असे उत्तर देत पत्रकारांना उडवून लावले होते. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी "तपास योग्य दिशेने सुरू आहे, जो कोणी आरोपी असेल त्याच्यावर योग्य कायदेशीर कारवाई करू, काही पाऊले सरकारने उचलली आहे आणि तपासात NIA ला सहकार्य करू." असे मोघम उत्तर दिले होते.

मात्र या सगळ्याकडे दुर्लक्ष करत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शिवसेना पद्धतीने आपला स्वच्छ पांढरा सदरा दाखवायची हौस भागवली, सरळ परमवीर सिंग यांच्यावर थेट आरोप करत त्यांना खलनायक ठरवले आणि चाय बिस्कुट पत्रकारांनी त्यांची पत्रकारिता पूर्ण केली. मात्र हाच खरा ट्रिगर होता ज्याने परमवीर सिंग यांना लेटर बॉंब फोडायला लावायला कारणीभूत होता.



कारण सरळ आहे सरकार म्हणून तुमचे आदेश पाळणे हेच काम त्यांनी इमाने इतबारे केले होते. मात्र तुम्ही त्यांचाच बळी द्यायला निघाले. आता परमविरसिंग यांच्या पत्रामुळे शिवसेना राहिली बाजूला सगळा रोख राष्ट्रवादी कडे सरकला. शिवसेनेने आता हुश केले असणार. काही काळ का असेना शिवसेनेला मोकळा श्वास मिळाला, आपोआप....मात्र जास्त वेळ नाही. कारण परमवीर सिहांनी पत्रात स्पष्ट लिहले आहे की गृहमंत्र्यांची तक्रार त्यांनी शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांना आधीही केली होती पण त्यांनी लक्ष दिले नाही....तेव्हा काही शिंतोडे तर उडणारच...तेव्हा कोण कोणाचा माणूस आहे? हे सोडा पहिले चूप राहायला आणि आपल्या सोबत्यांना चूप बसवायला शिका.

टिप्पण्या