दोन दिवसांपूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जखमी झाल्या. या वरून राजकीय आरोपप्रत्यारोप पण झाले. तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी या घटनेला भाजप जवाबदार असून त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप केला, भाजपने या आरोपा बाबत हात झटकत हा घातपात नसून अपघात आहे असा दावा केला.
आता दोन दिवस दवाखान्यात राहिल्यावर ममता बॅनर्जी यांना सुट्टी मिळाली आहे, सोबतच त्यांनी व्हील चेअर वरून आपण आपला प्रचार सुरूच ठेवणार असा मानस बोलून दाखवला आहे.
ममता बॅनर्जी यांच्या व्हील चेअर निवडणूक प्रचाराच्या निर्णयामुळे देशातील तमाम तथाकथित पुरोगामी लोकांना मात्र आनंद झाला आहे. खरे तर भाजप ही निवडणूक हरायला हवा या साठी देवावर आणि हिंदू धर्मावर विश्वास नसलेली ही पुरोगामी जमात एकदम धार्मिक हिंदूंसारखे "देव पाण्यात" टाकून बसले आहेत. त्या मुळे पश्चिम बंगाल निवडणुकीत होणारी तृणमूल विरुद्ध काँग्रेस आणि डावे विरुद्ध भाजपा अशी लढत त्यांच्या कपाळावर चिंतेच्या जाळ्या पसरवत आहे. त्यातच फुरफुरा शरीफवाले मौलाना अब्बास सिद्दीकी यांनी नवीन राजकीय पक्ष स्थापन करत काँग्रेस-डाव्या आघाडी सोबत हातमिळवणी केली. या घडामोडीमुळे पश्चिम बंगाल मधील मुस्लिम व्होटबँक जी आजपर्यंत ममता बॅनर्जी यांच्या मागे एकवटलेली दिसत होती त्यात फूट पडेल आणि त्याचा फायदा भाजपला होईल या मुळे चिंता अजून वाढत होती.
मात्र ममता बॅनर्जी यांच्या जखमी होण्याने आणि त्यांनी व्हील चेअर वरून प्रचार करण्याच्या निर्णयाने मात्र या पुरोगाम्यांना नवीन ऊर्जा संचारली आहे. कारण अश्या जखमी अवस्थेत प्रचार केल्यामुळे ममता बॅनर्जी यांच्या कडे सहानभूतीची लाट येईल आणि त्या मुळे भाजपाचे नुकसान होईल या आनंदात आहे.
मात्र पश्चिम बंगाल मध्ये वर्षानुवर्षे चाललेला मसलपॉवरचा राजकीय खेळ बघत असाल तर उलट या सगळ्या सहानुभूतीचा राजकीय खेळ ममता बॅनर्जी यांच्यावरच उलटू शकतो. डाव्यांचे राज्य उलथवून ममता बॅनर्जी सत्तेत आल्यावर पण पश्चिम बंगालच्या जनतेच्या जीवनात काहीही फरक पडला नाही. कारण राज्यातील सत्तेत असलेला पक्ष बदलला असला तरी व्यवस्था मात्र तीच राहिली होती. ती व्यवस्था डाव्यांच्या हातून तृणमूलने खेचून घेतली ती मसलपॉवरच्या जोरावर. तेव्हा पासून आणि आज पर्यंत पश्चिम बंगाल मधील रक्तरंजित राजकीय पद्धतीवर तृणमूल काँग्रेसचे राज्य होते.
अनेक सर्वसामान्य संघ कार्यकर्त्यांना, भाजपा कार्यकर्त्यांना मात्र भाजपा अश्या पद्धतीने रक्तरंजीत राजकारण करू शकणार नाही आणि त्या मुळे जवळच्या भविष्यात सत्तेत येणार नाही हे मत होते. जी मानसिकता या भाजप कार्यकर्त्यांची होती, तीच मानसिकता पश्चिम बंगाल मध्ये बदल आवश्यक मानणाऱ्या मात्र तृणमूल काँग्रेसच्या गुंडागर्दीला घाबरणाऱ्या सामान्य नागरिकाची पण होती, तृणमूल काँग्रेसला शह द्यायचा असेल तर त्याच्या पेक्षा मोठा गुंड तिथे उभा राहायला हवा ही ती मानसिकता.
आता ममता बॅनर्जींच आपल्यावर भाजपने हल्ला केला, जखमी केले असे म्हणत छाती पिटत आपला प्रचार करणार असेल तर या सामान्य जनतेत नक्की काय संदेश जाईल ! तो म्हणजे भाजपा आता मसल पॉवर मध्ये पण तृणमूल काँग्रेसला टक्कर देत आहे, सोबतच जी तृणमूल काँग्रेस मुख्यमंत्री असलेल्या आपल्या सर्वोच्च नेत्याला, ज्या झेंड सिक्युरिटी मध्ये वावरतात त्यांना अश्या हल्ल्यातून वाचवू शकत नसेल तर इतरांना काय वाचवू शकणार? मग तृणमूलला मतदान करण्याऐवजी बलवान भाजपला मतदान केले तर जास्त फायद्याचे नाही काय?
तर एकूण अश्या पद्धतीने सहानुभूतीचे राजकारण उलटले तर मग पुरोगामी नक्की काय करणार? अजूनही भाजपा पश्चिम बंगाल मध्ये निर्विवाद बहुमत मिळवेल याची शक्यता कमी आहे. मात्र या राज्यातील मोठा पक्ष म्हणून नक्कीच समोर येईल, मात्र तरीही भाजपा येथे सत्तेत आला तर आश्चर्य वाटायला नको.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा