"गृहमंत्री जोमदार कामगिरी दमदार" राज्यात कोरोना काळात एकाहून एक मोठे कांड घडत असतांना राज्याचे गृहमंत्री आणि नागपूरचे (सु) पुत्र अनिलजी देशमुख मात्र आपली जाहिरात आपल्या समर्थकांतर्फे करत होते.
मग ते ठाण्यातील आमदाराने मारहाण करण्याचे करमुसे प्रकरण असो, वांद्रे स्थानकावर जमलेली अनियंत्रित गर्दी असो, आर्थिक गुन्हेगार असणाऱ्या वाधवान कुटुंबियांना मुंबई बाहेर जाण्याची मुभा असो किंवा पालघर मध्ये झालेली साधूंची हत्या असो, या सगळ्या प्रकरणात तर आपल्या गृमंत्र्यांची दमदार कामगिरी आपण बघितली होतीच. पण लॉक डाऊन सारख्या सरकारी आदेशाला मुंब्रा, मालेगाव, भिवंडी सारख्या भागात आपल्या धार्मिक दृष्टिकोनातून धतुरा दाखवणाऱ्या समाजकंटकांवर पण कारवाई करण्याची हिंमत हे सरकार दाखवू शकले नव्हते.
आज "रात गयी, बात गयी" सारखे हे सगळी प्रकरणे नागरिकांच्या आणि दुर्दैवाने राज्यातील विरोधी पक्षाच्या डोक्यातूनपण निघून गेली आहेत. मात्र आपले गृहमंत्री अजूनही आपली "जोमदार कामगिरी" दाखवण्याच्या मानसिकतेत आहेत.
याच कामगिरी दाखवण्याच्या प्रयत्नात नाना वक्तव्य देणे हा आपल्या नागपुरी गृहमंत्र्यांचा आवडता छंद ! याच छंदातून त्यांनी दोन दिवसांपूर्वी त्यांनी नागपूर शहर भाजपच्या काळात "गुन्हेगारांची राजधानी" असल्याचे वक्तव्य केले होते. अर्थात नागपुरातील वाढती गुन्हेगारी भाजप सरकारमध्ये मुख्यमंत्री आणि गृहमंत्री दोन्ही पद भूषवणारे देवेंद्र फडणवीस थांबवू शकले नव्हते हे निर्विवाद सत्य होते. मात्र पोलिसांच्या नाकर्तेपणा मुळे नागरिकांना कायदा हातात घ्यायची नामुष्की मात्र भाजपच्या काळात आली नव्हती हे पण तितकेच खरे !
आता एकीकडे गृहमंत्री राज्यातील नामवंत सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांनी देशाच्या सार्वभौमत्व, संविधान आणि लोकशाहीचे गोडवे गाणारे ट्विट करत याच सगळ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या विदेशी व्यक्तींना जागा दाखवणाऱ्या संदेशांची चौकशी करणार असल्याची घोषणा केली आहे. बरे ही साधीसुधी चौकशी नाही तर राज्य पोलीस यंत्रणेतील गुप्तवार्ता विभाग ही चौकशी करणार आहे, कारण राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ही चौकशी आवश्यक आहे असे त्यांचे मत आहे. आता त्यांचे मत आहे तर खरे असेल, आपल्याला काय कळते आपण तर सामान्य नागरिक !
मात्र याच गृहमंत्र्यांच्या शहरात, इतकेच नव्हे तर राज्याचे उपमुख्यमंत्री शहरात हजर असतांना, गृहमंत्री हजर असतांना, तेही ज्या भागात या मान्यवरांचा कार्यक्रम सुरू होता त्या भागापासून फक्त १० ते १५ मिनिटे दूर असणाऱ्या शहरातील शांती नगर भागात नागरिकांना कायदा हातात घेत एका गुंडाचा खून करावा लागला हे मात्र अतिशय दुर्दैवी नाही काय?
१३ ऑगस्ट २००४ रोजी आक्कु यादव या गुंडाचा त्याला न्यायालयाने जामीन मंजूर केल्यावर भर न्यायालयात नागपूरकर नागरिकांनी खून केला होता. हे प्रकरण संपूर्ण देशात चांगलेच गाजले होते. मात्र कोणाला असे वाटत असेल की नागपूरकरांनी गुंडाला मारण्याचे हे पहिले प्रकरण असेल तर असे नाही. या अगोदर बबलू फ्रान्सिस नावाच्या गुंडाला पण असेच मारल्या गेले होते, या नंतर आक्कु यादवचा भाचा अमन यादवला तर २०१२ मध्ये असेच मारल्या गेले होते. इतकेच नाही तर नागपूरच्या पत्रकार कॉलनी नजीकच्या झपाडपट्टीतील भाईचा खून सुद्धा नागपूरकर नागरिकांनी केला होता. आता हे सगळे होतांना सरकार कोणाचे होते आणि गृहमंत्री कोण होते याचे संशोधन करायची खरेच गरज आहे. कारण वाढत्या शहरीकरणात गुन्हेगारीत वाढ होते त्यावर आपण टीका जरूर करू शकतो, मात्र गुन्हेगाराला शासन करायला पोलीस आणि प्रशासन कमी पडले की नागरिकांना कायदा हातात घ्यावा लागतो, फडणीस सरकार जरी गुन्हेगारी थांबवण्यात अपयशी ठरले असले तरी नागरिकांना त्यांच्या काळात कायदा हातात घ्यावा लागला नाही आणि राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री शहरात उपस्थित असतांना, आपला पक्ष वाढवण्यासाठी एका नेत्यांच्या पक्ष प्रवेशासाठी कार्यक्रम करत असतांना तेथून हाकेच्या अंतरावर नागरिकांना कायदा हातात घ्यावा लागत असेल तर गृहमंत्री नक्की जोमदार काम करत आहे असे वाटते का?
नागपूर मधील शांती नगर परिसरातील नारायण पेठ भागातील विजय वाघमारे या गुंडाच्या अतिरेकला नागरिक चांगलेच वैतागले होते. नागरिकांनी याच्या विरोधात केलेल्या पोलीस तक्रारी नंतर पण त्याच्यावर योग्य कारवाई होत नव्हती, त्याचा स्फोट काल झाला असल्याचे लक्षात येत आहे. तेव्हा गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री नागपूरात याच भागात आभा पांडे यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमासाठी अवघ्या २० मिनिटं अंतरावर उपस्थित होते हे येथे उल्लेखनीय आहे.
तेव्हा दमदार गृहमंत्र्यांची जोमदार कामे अशीच बघत रहा....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा