टूल किट करता रडारड कशाला ?



थोर पर्यावरण आंदोलक ग्रेटा थॉनबर्ग यांच्या मिटवलेल्या ट्विटने बराच गदारोळ उडाला आहे. तिने चुकून त्या ट्विटमध्ये स्वतः कडे आलेले ट्विट करायचे दिशा निर्देश "8 GB Tool Kit" नावाचे दस्तावेज सार्वत्रिक केले आणि भारतीयांनी त्यावर बरेच आक्षेप घेतले. विशेषतः राष्ट्रवादी विचारांच्या नागरिकांनी तर या सगळ्या विषयावर चांगलाच आवाज उठवला. या एका मिटवलेल्या ट्विट मुळे ग्रेटा या मध्ये सगळ्यात मोठी खलनायिका ठरली आणि तिच्या विरोधात दिल्ली पोलीस कायदेशीर कारवाईचा विचार करत आहेत. 



मात्र माझा विचार दुसऱ्या बाजूचा आहे. काय विशेष होते त्या "टूल किट" मध्ये ? तर ती "टूल किट" वाचल्या नंतर लक्षात येते की त्या मधील नियोजन ! 


खरे तर हिटलरच्या गोबेल्स नंतर जगात आपला विचार आणि तत्वे समोर आणण्यासाठी ज्या कोणी सगळ्यात जास्त प्रपोगंडा केला असेल तर तो केला डाव्यांनी ! डाव्यांनी स्वतःची या बाबती तील व्यवस्था तयार केली. जिथे आपली सत्ता आहे तिथे आपल्या सत्तेची भालमण करायची आणि जिथे सत्ता नाही तिथे सत्ते विरोधात, तेथील व्यवस्थे विरोधात पद्धतशीर वातावरण तयार करायचे. या सगळ्याकरता डाव्यांचे सगळ्यात मोठे शस्त्र होते ते प्रपोगंडाच ! तत्कालीन उपलब्ध वर्तमानपत्र, दूरचित्रवाणी, चित्रपट यांचा चांगला वापर करायचे तंत्र त्यांनी विकसित केले होते आणि आजही त्यांची त्यावर हुकूमत आहे हे वेगळे सांगायला नको. कधी समाजसुधारक, कधी पर्यावरणवादी, कधी अर्थशास्त्री, कधी कोणत्या विषयातील तज्ञ, तर कधी सर्व विषयातील योगेंद्र यादव सारखे सर्वज्ञ तज्ञ अशी एक फळी, तर यांचे नाव आणि यांच्या कार्याला अनुमोदन देण्यासाठी निर्भीड संपादक, झुंझार पत्रकार, सत्याला प्रकाशात आणणारे चित्रपट, नाटक लेखक, दिगदर्शक आणि त्या नाटक चित्रपटाचे समीक्षण करणारे समीक्षक अशी संपूर्ण फळी उभारल्या गेली आहे. 



मग या डाव्या विचारांच्या लोकांना समस्या तयार करायला वेळ लागत नाही किंवा एखादी अतिशय छोटी असलेली समस्या मोठी करायला पण वेळ लागत नाही. वर सांगितलेली अगडबंब व्यवस्था त्यांच्या साठी राबायला सुरवात करते. पहिले हे तज्ञ नसलेली समस्या मोठी असल्याची भूमिका घेतात. मग पत्रकार त्यावर बातम्या बनवतात, संपादक त्यावर अग्रलेख लिहतात, सरकारवर ताशेरे ओढतात. मग सुरू होतो खेळ ! सरकार विरोधातील लोक तो मुद्दा उचलून धरतात, मग आंदोलन सुरू होते, त्या आंदोलनाला हे तज्ञ मार्गदर्शन करत असतात, पत्रकार लिहीत असतात, संपादक छापत असतात, आपल्या मताची पिंक टाकत असतात. छायाचित्रकार मग भेगळलेल्या जमिनी, रक्ताललेले पाय दाखवतात आणि एका नवीन समस्येला जन्म देतात. समस्या मोठी केली जाते. 



प्रत्येक वेळेस असे होईल असे नाही. अनेक आंदोलने फसतात, हरवतात मात्र त्या मुळे आंदोलनकर्त्या सामान्य माणसाचे नुकसान होते. मोठे होतात हे तथाकथित तज्ञ ! यांना अश्या अनेक फसलेल्या आंदोलनामुळे मान्यता आणि प्रसिद्धी मिळते मग ते दुसऱ्या कोणत्याही मुद्यात लुडबुड करायला मोकळे होतात. 


तर आंदोलन करायचे तर त्याचे पण नियोजन केले जाते. अर्थात ही आंदोलन किंवा मोर्चाच्या नियोजनाची पद्धत जुनी झाली आहे आणि जवळपास सगळ्या पक्षांच्या विचारधारेच्या आंगवळणी पडली आहे. आंदोलन कुठे करायचे? घोषणा काय द्यायच्या? आंदोलनाच्या सुरवातीला कोण राहणार? आंदोलनाचे आयोजक आंदोलनाच्या कुठल्या भागातून आंदोलन संचालित करणार? आंदोलन ठिकाणी जमाव कसा आणि कुठून येणार? पोलिसांनी आंदोलन अडवले तर काय करायचे? अश्रूधुर सोडला तर त्या पासून बचाव करायला कापडाचे ओले बोळे कुठून घ्यायचे? लाठीमार केला तर कुठून पळायचे? कुठे पुन्हा जमायचे? साधारण कुठल्या भागात लाठीमार आपल्यावर व्हायला हवा, जेणे करून आपल्याला पळता येईल, त्या नुसार आंदोलन किंवा मोर्चाची जागा बघायची आणि त्याच जागी हिंसक व्हायचे. विरोधकांनी हल्ला केला तर ? त्याचा फायदा कसा उचलायचा? असे अनेक अंगी नियोजन आंदोलनाचे आणि मोर्चाचे करायचे असते. मुख्य म्हणजे आपण सगळे करून नामानिराळे कसे होता येईल याचे नियोजन खूप महत्वाचे असते. त्यात या डाव्या आंदोलकांचा हात कोणीही धरू शकत नाही. 


पण या सगळ्या जुन्या गोष्टी झाल्या ! आधुनिक काळात आता आंदोलनाने आधुनिक रूप घ्यायला नको काय? मग आता इंटरनेट, समाज माध्यमांचा उपयोग करायची सोय उपलब्ध असतांना त्याचा उपयोग या आंदोलनाच्या नियोजनात केला तर बिघडले कुठे? आणि म्हणूनच म्हणतोय काय चुकीचे होते त्या ग्रेटाच्या "टूल किट" मध्ये? 


तर समाज माध्यमांवर आंदोलन कसे उभारायचे, काय लिहायचे, हॅशटॅग कोणता वापरायचा, केव्हा वापरायचा, कोणी केव्हा कोणत्या समाज माध्यमांवर व्यक्त व्हायचे याचे दिशानिर्देश होते. रिहना असो की ग्रेटा यांनी त्यांचे पालन केले. हे निर्देश इतका विचार करून नियोजित केले होते की २६ जानेवारीला लाठीमार झाला तर काय लिहायचे?, हॅशटॅग काय वापरायचा? गोळीबार झाला तर सरकारचा बाजार कसा उठवायचा याचेही नियोजन यथासांग त्यात होते. यात त्या "टूल किट" ला दूषणे देण्यासारखे नक्की काय होते? हे मला खरेच कळले नाही. कोणत्याही आंदोलनाचे नियोजन आवश्यक असते. आताच्या काळात आंदोलन जमिनीवर आणि वृत्तपत्रात जितके नियोजित केले जाते तितकेच आंतरजालावर आणि समाज माध्यमांवर नियोजित करणे आवश्यक आहे आणि हे महत्व या डाव्यांनी ओळखले आहे. 


CNN मधील दोन पत्रकारांनी खरे आंदोलन कशावर आहे यावर २०% लेख लिहला, बाकी ६०% लेख हा सरकार करत असलेल्या तथाकथित दडपशाहिवर, इंटरनेट बंद केला त्यावर आणि सरकार आंदोलकांना पुरवीत नसलेल्या सुखसुविधांवर (?) लिहला. म्हणजे लेखाचा मथळा वेगळा आणि आतील मजकूर वेगळा. मग या झुंजार पत्रकारांनी लिहलेला लेख निर्भीड संपादकांनी प्रकाशित केला. त्या लेखाचा दुवा घेत रिहानाने समाज माध्यमांवर आपल्या विचारांची पिंक निर्देशित केलेल्या हॅशटॅगने टाकली. मग ग्रेटा, हॅरीस, मिया सारख्या जगमान्य लोकांनी, तथाकथित तज्ञानी, राजकारण्यांनी त्या ट्विटला री ट्विट केले अर्थात त्याच्या जवळ पण ती टूल किट होती. या सगळ्या लोकांनी फक्त दिशा निर्देशाचे पालन केले इतकेच. 


या सगळ्या प्रकरणात दुःख इतकेच आहे की जगातील सगळ्यात जास्त इंटरनेटचा वापर करणाऱ्या देशाच्या, समाज माध्यमांवर देशात सगळ्यात आधी आपले वर्चस्व स्थापन करण्याचा दावा करणाऱ्या पक्षाला मात्र असे नियोजन करता आले नाही आणि येतही नाही. CAA असो, तीन तलाक असो, ३७० चा वाद असो किंवा आताचे शेतकरी कायदे असो सरकारने, सत्तेत असलेल्या पक्षाने असो, या पक्षाला समर्थन करणाऱ्या संघटनांने असो किंवा त्यांच्या समर्थकांनी असो, हे कायदे बनविण्या आधी किंवा नंतर या कायद्यांकरता वातावरण निर्मिती केलीच नाही. हे सगळे जागे झाले जेव्हा या विरोधात आंदोलने आणि हिंसा झाली तेव्हा, तो पर्यंत या आंदोलनांनी सगळीकडे आघाडी घेतली होती आणि तुम्ही स्वयंसंरक्षणाच्या भूमिकेत पोहचले होते. 


३७०, तीन तलाक प्रकरण शांत झाले कारण त्या मागे धार्मिक आयाम आले होते. मात्र CAA तुमच्या गळ्यातील हड्डी बनले होते, त्या चीनचे आभार माना त्याने करोना पाठवला, नाहीतर शाहीनबाग अंगावर आले असते. त्याच मुळे आता शेतकरी आंदोलन तुम्हाला संभाळता येत नाहीये. त्यांच्या टूल किटवर आकांततांडव करण्यापेक्षा तुमची टूल किट कुठे आहे? याचा शोध घ्या. 


असल्या टूल किट असणे आता नवीन नाहीये, खूप वर्षांपूर्वी आखातात आलेल्या "अरब स्प्रिंग" पसरण्यामागे अश्याच बाल्यावस्थेत असलेल्या "टूल किट" चा हात होता. आता ती कोणी बनवली होती? हा संशोधनाचा विषय राहील. अश्याच बाल्यावस्थेतील एका "टूल किट" आपण स्वतः वापरली आहे "अण्णा आंदोलनात" ! पण नुकत्याच अमेरिकेत झालेल्या "ब्लॅक लाईज मॅटर" आंदोलनात उघडपणे जमिनीवरील आंदोलन आणि समाज माध्यमांवरील आंदोलनाची "टूल किट" वितरित केल्या गेली होती. हे आंदोलन खऱ्या अर्थाने व्हरचुल नेत्याने नियोजित केलेले आंदोलन होते. अर्थात अश्याच टूल किट हॉंगकॉंग मधील चीन विरोधी लोकशाही आंदोलनात पण वापरण्यात येत आहेत. 


आता सांगा तुम्ही जगाच्या, डाव्यांच्या किती मागे आहात? तुम्ही अशी वातावरण निर्मिती करू शकला नाहीत हे मान्य करा. त्यांच्या टूल किट आणि नियोजनावर रडण्यापेक्षा स्वतःचे नियोजन पक्के करा !

टिप्पण्या