हीच का तथाकथित गंगा जमूनी तहजीब ?



आताच महाराष्ट्राचे किंवा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती राज्यात काय तर देशात धुमधडाक्यात साजरी झाली. एकीकडे महाराजांचे दैवतीकर होत आहे अशी ओरड करत महाराजांनी निर्माण केलेल्या हिंदवी स्वराज्याचा विचारांशी प्रतारणा करत छत्रपती शिवाजी महाराज कसे धर्मनिरपेक्ष होते याचे खोटे दाखले देण्याची स्पर्धाच राज्यात लागली आहे. मग महाराजांच्या सैन्यात किती टक्के मुस्लिम होते,  सैन्यात किती मुस्लिम मुख्य पदावर होते किंवा महाराजांच्या अंगरक्षकात मुस्लिमानांचा कसा वरचष्मा होता हे पटवायचा, त्या करता खोटे संदर्भ देण्याचा प्रयत्न केला जात आहे. अनेक इतिहासकार या सगळ्याचा विरोध करत खरा संदर्भ सहित इतिहास सांगत आहेत लिहीत आहेत. 


एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी इतिहास पुनर्लेखन करण्याचे सूतोवाचन करत असतांना, संघाचे स्वयंसेवक मुस्लिम विचार मंचच्या माध्यमातून थिल्लर "गंगा - जमूनी तहजीब" च्या नावाखाली काहीपण मान्य करत असतील तर काय करावे? मुळातच "गंगा-जमुनी तहजीब" म्हणजे "हिंदू - मुस्लीम" मिलन नसून हिंदू आणि मुस्लीम यांनी जास्त संघर्ष न करता एकमेकांसोबत वागतांना पाळायचे अलिखित समज्यस्य पद्धत आहे, यात अर्थातच "मुस्लीम शासक" म्हणून त्यांना दिलेला जास्त मान, त्यांच्या मताला दिलेली जास्त किंमत आणि त्याच्या भाषेत केलेला व्यवहार हा प्रथम अधोरेकीत होतो. यात समानता, सहिष्णुता वगैरे भानगड नसून जिथे हिंदू संघर्ष जास्त आहे तो न लढता कमी कसा करता येईल हा विचार तिकडून, तर न मिळणारा मान मरतब न लढता मिळतोय हा इकडून असा विचार होता आणि याच "गंगा जमूनी तहजीब" मधून प्रभू श्रीरामा करता उपाधी आली "इमाम ए हिंद" !

कवी इकबाल या कवीने लिहलेल्या 

इस देस में हुए हैं हजारों मलक-सरिश्

मशहूर जिनके दम से है दुनिया में नाम-ए-हिंद

है राम के वजूद पे हिन्दोस्ताँ को नाज़

अहले-नज़र समझते हैं इसको इमाम-ए-हिंद 

या छंदा मधून घेतलेला हा शब्द प्रयोग आहे. इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की एकेकाळी याच "गंगा जमूनी तहजीब" चे गुण गाणारा प्रभू श्रीरामाला इमाम ए हिंद उपाधी देणारा, भारतासाठी "सारे जहा से अच्छा, हिंदोस्ता हमरा" लिहणारा कवी इकबाल मात्र एकाएकी पाकिस्थान निर्मितीत महत्वाची भूमिका बजावणारा झाला. याचे कारण काय असेल? सरळ आहे स्वातंत्र्या नंतर भारतात पुन्हा इस्लामी राजवट पुनर्जीवित करता येणार नाही, लोकशाही येईल आणि हिंदुबहुल भाग असल्यामुळे तिथे हिंदू वर्चस्व राहील हे त्याच्या लक्षात आले होते. हिंदू कितीही सर्वधर्मसमभाव वाला असला, त्या राज्यकर्त्यांनी कितीही प्रमाणात मुस्लिमांना स्वातंत्र्य दिले तरी, आपल्याला हिंदू राज्यकर्यांच्या पंखाखाली दिवस काढावे लागेल हे काही त्याच्या तथाकथित "गंगा जमुनीं तहजीब" मध्ये बसत नव्हते हे सत्य आहे. मोहम्मद जिना यांची पाकिस्थान निर्मितीमागे राजकीय महत्वाकांक्षा होती, तर कवी इकबाल यांची नक्की कोणती मानसिकता होती? याचा विचार कोणी केला आहे काय?


आता इमाम म्हणजे पुजारी, हा पुजारी कोणाचा असतो तर "अल्लाह" चा ! प्रेषित (अल्लाह म्हणजेच देवाच्या दूताने) ने आणलेल्या देवाच्या आदेशाचे अर्थ सांगणे आणि त्या करता देवाची आणि प्रेषितांची प्रार्थना करणे आणि अनुयायांकडून करवून घेणे हे या ईमामांचे काम. 


मग प्रभू श्री राम हे "इमाम" कसे? प्रभू श्रीराम हे आपल्या करता प्रत्यक्ष देव आहेत, विष्णूचा अवतार, देवाचा अंश ! ना ते देवदूत आहे, ना देवाचे पुजारी ! तर प्रत्यक्ष देव आहेत. या छदम "गंगा जमूनी तहजीब" च्या दृष्टीकोनातुन कोणी त्यांना "इमाम ए हिंद" म्हणत असतील तर त्याचा विरोध व्हायला हवा. मात्र तसा विरोध न करता आपणच त्यावर ते "ईमाम ए हिंद" कसे ? या वर निरूपण देणार असू तर परिस्थिती हिंदूंसाठी खरेच कठीण आहे. 


महात्मा गांधी जगाकरता महान नेते होते, हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केले. वेळ प्रसंगी या करता हिंदू लोकांचा बुद्धीभेद पण केला.  "अहिंसा परमो धर्मः धर्म हिंसा तथैव च" या पूर्ण श्लोका ऐवजी फक्त  "अहिंसा परमो धर्मः" इतकाच श्लोक हिंदूंना शिकवत अहिंसेच्या या पुजाऱ्याने हिंदूंचा बुद्धिभेदच केला. 


तेव्हा धर्म रक्षणाचे आणि सांस्कृतिक संघटनेचे काम करतांना अजून एक श्लोक नक्कीच लक्षात ठेवावा 

"धर्म एव हतो हन्ति धर्मो रक्षति रक्षितः।

तस्माद्धर्मो न हन्तव्यो मा नो धर्मो हतोऽवधीत्।।"


अर्थात "धर्माला नष्ट करण्याचा प्रयत्न केला तर "धर्म" नष्ट करण्याऱ्याचे अस्तित्व नष्ट करतो. जो "धर्माचे" रक्षण करतो "धर्म" त्याचे रक्षण करतो, म्हणूनच धर्माचे हनन कधीही करू नका." 


तेव्हा लक्षात घ्या प्रभू श्री राम हे आमच्या करता "इमाम ए हिंद" नाहीत, तर आमच्या करता देव आहेत आणि राहणार.

टिप्पण्या