काल अमूल्या आज दिशा !



फेब्रुवरी २०२० आठवतो का कुणाला? या काळात देशात CAA विरोधी आंदोलन पेटले होते. दिल्लीतील शाहीनबाग वरून प्रेरणा घेत, देशातील वेगवेगळ्या शहरात प्रतिशाहीनबाग तयार होत होते. सरकार विरोधक वेगवेगळ्या शहरात सभा आयोजित करत सरकार विरोधात आग ओकत होते. त्यातच दिल्लीतील शाहीनबाग येथे वेगवेगळे "आंदोलनजीवी" येत भाषणे देत होते, मग त्यात शरजिल इमाम सारखे तथाकथित "ऍक्टिव्हिस्ट" पूर्वोत्तर भारत उर्वरित भारता पासून कसा तोडायचा याचे ज्ञान देत होता, तर काँग्रेसकडून कोणे एकेकाळी "राजीव गांधी सद्भावना पुरस्काराचे" मानकरी असलेले हर्ष मंदर नावाचे विदुषी तर सरळ सरळ सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या आणि काश्मीर प्रश्नी तथाकथित धर्मनिरपेक्षता दाखविली नाही म्हणून रस्त्यावर उतरून लढाई करा असा सद्भावना ठासून भरलेला संदेश देत होता. 

तर, फेब्रुवारी २०२० म्हणजे जवळपास एक वर्षा पूर्वी २० तारखेला असुवद्दीन ओवेसी यांनी एक सभा याच CAA कायद्याला विरोध करायला म्हणून बंगलोर येथे आयोजित केली होती. या सभेत भाषण द्यायला बंगलोर मधील काही विद्यार्थी चळवळीतील "ऍक्टिव्हिस्ट" पण आमंत्रित होते. त्या सभेत अश्याच एका "ऍक्टिव्हिस्ट" भाषण करतांना असे काही केले की ओवेसी यांच्या पाया खालची जमीन हादरली ! तर या विद्यर्थिनी असलेल्या "ऍक्टिव्हिस्ट" ने आपल्या भाषणात "पाकिस्थान जिंदाबाद" अश्या घोषणा द्यायला सुरुवात केली. आता ओवेसीच्या मनात जरी या घोषणा द्याव्या असे कितीही असले तरी उघडपणे अश्या घोषणा आपल्या उपस्थितीत आपल्या मंचावरून लागू नये ही त्यांची राजकीय मजबुरी आहे. त्या मुळे या "ऍक्टिव्हिस्ट" मुलीचे भाषण लगेच थांबवायचा प्रयत्न सुरू झाला, तिचा माईक हिसकावून घेण्यात आला. तिला बोलण्यास प्रतिबंध करण्यात आला. तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला, तिला अटक करण्यात आली. 



कोण होती ही मुलगी? ही होती बंगलोर मधील विद्यार्थी चळवळी मधील एक लोकप्रिय "आंदोलनजीवी", कोणत्याही विद्यार्थी आंदोलनाचा चेहरा ! हिचे नाव होते अमूल्या लियोना ! आता आठवत नाही ना आपल्याला ही मुलगी ! तेव्हा पण लगेच ही पण अफवा पसरवण्यात आली की भाजपाने या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी या मुलीला मुद्दाम भाषण द्यायला पाठवले होते आणि ही मुलगी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची कार्यकर्ती आहे !

मात्र खरे काय होते? कोण होती ही अमूल्या ? तर ही मुलगी बंगलोर मधील एन एम के आर व्ही महिला कॉलेजची विद्यार्थिनी होती. संपूर्ण पणे डाव्या वैचारिक चळवळीमध्ये काम करणारी, डावे विचार विविध समाज माध्यमातून जगाला वाटणारी, फेसबुक पेज चालवणारी, ब्लॉग लिहणारी अशी ही मुलगी ! बंगलोर परिसरात विद्यार्थी चळवळी मधील लोकप्रिय "ऍक्टिव्हिस्ट" होती अमूल्या ! 

या ओवेसीच्या सभेच्या आधी पण हिला एकदा प्रसिद्धी मिळाली होती. याच CAA विरोधी आंदोलनाच्या काळात विनोदवीर म्हणून प्रसिद्ध असलेल्या कुमार कामराने अर्णव गोस्वामीला विमानात त्रास दिला होता, हे आठवत का? मात्र CAA कायद्याचे समर्थन करतात किंवा राष्ट्रवादी विचार मांडतात म्हणून अजून एका पत्रकाराला असाच त्रास बंगलोर विमानतळावर दिल्या गेला होता, ते होते पोस्टकार्ड न्युजचे सह संस्थापक महेश विक्रम हेगडे ! यांना बंगलोर विमानतळावर स्थानीय काँग्रेस पदाधिकारी कविता रेड्डी आणि तिच्या सोबत असलेल्या महिला युवा कार्यकर्त्यांनी हेगडे यांना "वंदे मातरम" म्हणून दाखवा आणि देशभक्ती सिद्ध करा असे आवाहन करत त्रास दिला होता. या मध्ये जी मुलगी सगळ्यात समोर होती, ती होती अमूल्या सिमोन ! 



तर ओवेसीच्या सभेत तिने केलेल्या करनाम्यानंतर कर्नाटक पोलिसांनी तत्काळ तिला ताब्यात घेत तिच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला. पहिले तर ही पोरगी अभावीप ची कार्यकर्ती असल्याचा दावा विरोधकांनी केला, मात्र अगोदरचा कविता रेड्डी या काँग्रेस पदाधिकार्या सोबत केलेल्या कृत्याचा व्हिडीओ समोर आल्यावर मात्र काँग्रेसने पण लगेच हात खेचून घेतला. मग डाव्या लोकांनी पण ही आपली कार्यकर्ती नाहीच असा पवित्रा घ्यायला सुरुवात केली. कारण सरळ होते "पाकिस्थान जिंदाबाद" या घोषणा तिनेच दिल्या हे सिद्ध करणारे स्पष्ट पुरावे होते, या प्रकरणात जे एन यु प्रकरणा सारखी पळवाट नव्हती, असला प्रकार झालाच नाही म्हणायला, कारण खुद्द ओवेसीने तिला अडवले होते. 

मात्र तेव्हाच या अमूल्या सीमोनचा अजून एक व्हिडिओ समोर आला. कोणत्या तरी स्थानीय पत्रकाराला मुलाखत देतांना, "मी जे करते, जे लिहते, जी भाषण करते या मागे फक्त मी नाहीये, तर आमच्या विद्यार्थी चळवळीमधील अनेकांचे योगदान आहे, आम्हाला मार्गदर्शन करणाऱ्या आमच्या नेत्यांचे योगदान आहे. कोणत्याही आंदोलना आधी भाषण काय द्यायचे, कोणत्या मुद्यांवर भर द्यायचा, घोषणा कोणत्या द्यायच्या, इत्यादी ठरवायकरता एक समिती आहे. अगदी समाज माध्यमांवर काय लिहायचे हे पण आम्हला सांगितल्या जाते आणि आम्ही त्याची अमलबजावणी करतो." असे सांगितले होते. या वरून बंगलोर पोलिसांनी बराच तपास केला होता. 

या अमूल्या सीमोनला अटक केल्यावर, तिच्यावर लावण्यात आलेल्या कलमांवरून डाव्यांनी, काँग्रेसने बराच गदारोळ केला होता. यात मुख्य रोख तिचे कमी असलेले वय हाच होता. त्या प्रकरणाच्या वेळी तिचे वय होते फक्त १९ वर्षे आणि ती पत्रकारितेचे शिक्षण घेणारी मुलगी होती, तथाकथित विद्यार्थी "ऍक्टिव्हिस्ट" होती. 

अमूल्याला जामीन मिळायला हवा म्हणून प्रयत्न सुरू झाले. पहिले न्यायालयाने जामीन नाकारला, पण शेवटी जून २०२० ला अखेर बंगलोर येथील न्यायालयाने तिचा जामीन मंजूर केला. या जामीनासाठी अमूल्याच्या वकिलाने, "याचिकर्ता वयाने लहान आहे, तिचे वय फक्त १९ आहे आणि ती एक स्त्री आहे. ती बंगलोर मधील एका खाजगी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. होय तिने "पाकिस्थान जिंदाबाद" च्या घोषणा दिल्यात, जे चुकीचे आहे. मात्र तिने कधीही पाकिस्थानला आपला देश म्हंटले नाहीये. तेव्हा तिच्या वयाचा आणि या सगळ्या प्रकरणाचा तिच्या भावी आयुष्यावर पडणारा प्रभाव लक्षात घेऊन न्यायालयाने तिचा जामीन मंजूर करावा." असा युक्तिवाद केला आणि न्यायालयाने मान्य करत तिचा जामीन मंजूर केला. आज अमूल्या बाहेर आहे, प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. 

आता हे का आठवले? काही नाही हो, हा महिना पण फेब्रुवारीच आहे, पुन्हा नवीन आंदोलन, नवीन महिला विद्यार्थी ऍक्टिव्हिस्ट आहे, पुन्हा शहर तेच बंगलोर शहर आहे, पुन्हा गुन्हा देशद्रोहाचाच आहे, पुन्हा ती महिला आहे, पुन्हा वय कमी आहे, गेल्या वेळेस अमूल्या होती, या वेळेस दिशा आहे इतकेच ! 


आपण दर वर्षी आता हेच बघायचे ! कधी सरकारने परिस्थिती कशी संयमाने हाताळली म्हणून कौतुक करायचे, तर कधी हिंसाचार झाला म्हणून यांचे चेहरे बाहेर आले म्हणून सरकारची पाठ थोपटायची, तर त्यांची टूल किट बघून राग व्यक्त करायचा आणि डाव्यांच्या इको सिस्टीम विरोधात बोट मोडायची, बस बाकी काही करायचे नाही आपण, फक्त बदलणारी नावे वाचायची कधी अमूल्या सिमोन, तर कधी दिशा रवी !

टिप्पण्या