राम मंदिर निर्माण समर्पण निधीचा विरोध का?



राम मंदिर उभारणीकरता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याच्या इतर संस्था समर्पण निधी गोळा करण्याची तयारी करत आहे. जवळपास ५०० वर्षाच्या प्रदीर्घ संघर्षानंतर तयार होणाऱ्या भव्य राममंदिराच्या उभारणीसाठी निधी कमी पडणार नाहीच. अनेक श्रीमंत हिंदू या कामी सधळहस्ते मदत करत आहेतच. मात्र सर्वसामान्य हिंदूंना पण "फुल ना फुलाची पाकळी" या अर्थाने मदत करावीशी वाटते आहे त्या करता ही सोय. 


ज्यांना या निधी संकलनात राजकारण दिसत आहे त्यांना सामान्य लोकांच्या "पाकळी" च्या दानाने नक्की काय होते हे माहित नाही. 


प्रभू श्रीराम यांनी जेव्हा भारतातून लंके पर्यंत सेतू निर्माण करण्यास आपल्या सेनेला आदेश दिले तेव्हा, समस्त बलाढ्य वीर या सेतूच्या बांधकामात आपली शक्ती लावत होते. त्या समस्त बलाढ्य वीरांपुढे एकदम छोटी असलेली एक खार पण मेहनत करत होती. ती जरी मोठ्या शिळा उचलू शकत नसली तरी, आपल्या ओल्या अंगाला किनार्यावरील रेती लावून सेतू बांधकामाच्या ठिकाणी जात ती रेती झटकत आपले योगदान त्या सेतू बांधकामात देत होती. 


परिणामी तिची मेहनत प्रभू श्रीरामाच्या नजरेत भरली. प्रभू श्रीरामांनी प्रेमाने तिच्या अंगावरून हात फिरवला. या घटनेची आठवण म्हणून आजही खारेच्या अंगावर असलेल्या रेषा आपल्याला देत असतात. 


अर्थात प्रत्येकाला या महान कार्यात स्वतःच्या कर्तृत्वाचा "खारीचा वाटा" द्यावा वाटणे हा स्वाभाविक आहे. या उप्पर ही राम मंदिर बांधकामाचा संघर्ष हा सर्वव्यापी होता. तेव्हा राम मंदिराचे बांधकाम पण सर्वव्यापी होणे तितकेच गरजेचे आहे. त्या करता आपण राममंदिराच्या निर्माणात आपले योगदान आहे ही भावना निर्माण होणे गरजेचे आहे. 



या बाबतीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एकनाथजी रानडे यांनी तामिळनाडू मधील कन्याकुमारी येथे पैशाने बलाढ्य अश्या चर्चला नामोहरम करत विवेकानंद शिळा स्मारक निर्माण केले. ते पण प्रत्येक भरतीयांकडून फक्त १/- रुपया जमा करत. या निधी संकलनाची विशेषता अशी की संघाच्या विरोधकांकडून सुद्धा त्यांनी हा एक रुपया या कामासाठी जमा केला होता. याचा फायदा काय? तर आज प्रत्येक हिंदूत्ववादी विचारांच्या माणसाला एकदा तरी या स्मारकाला भेट द्यायची अंतरीची इच्छा जागृत झाली आहे. या भागातील हिंदू राबता वाढला, आता कोणी पुन्हा या भागावर आपला अधिकार सांगू शकणार नाही. 


नेमके हेच कारण या राम मंदिर निर्माणाच्या कार्यात निधी संकलन करण्यासाठी आहे. मात्र ज्यांची हयात स्वतःचे खिसे भरण्यात आणि वर्गणी किंवा निधी संकलन करण्यापेक्षा खंडणी जमवण्यात गेली आहे त्यांना या निधी संकलनात राजकारणाशिवाय दुसरे काय दिसणार?

टिप्पण्या