दिल्लीत आता जे काही चित्र दिसत आहे ते अपेक्षित असेच आहे. सरकारने कायदे स्थगतीची केलेली भाषा केल्यानंतर आणि २६ जानेवारीच्या गणराज्यदिनाचे पावित्र्य कायम ठेवण्यासाठी म्हणून शेतकरी आंदोलकांच्या ट्रॅक्टर रॅलीला परवानगी दिली होती. त्यात मार्ग निश्चती सोबतच गणराज्य दिनाच्या दिल्लीतील संचलनानंतर म्हणजेच दुपारी १२ वाजे नंतर ही परवानगी देण्यात आली होती. सध्या शेतकरी आंदोलनाचा चेहरा असलेले राजेश टिकेत यांनी पण ही ट्रॅक्टर रॅली शांततापूर्ण पद्धतीने, ठरवलेल्या मार्गावर आणि वेळेत होईल असे लिखित आश्वासन दिले होते.
मात्र आज १२ वाजायच्या आधीच आणि ठरवलेल्या मार्गा व्यतिरिक्त मार्गावर शेतकऱ्यांनी आपले ट्रॅक्टर घुसवायचा प्रयत्न केला आहे. राजधानीत काही ठिकाणी या मुळे पोलीस आणि आंदोलक एकमेकांसमोर उभे झाले आहेत. आता सार्वजनिक संपत्तीची नासधूस, पोलिसांवर दगडफेक, पोलिसांनी उभारलेले अडथळे तोडणे, पोलीस वाहतुकीकरता आलेल्या वाहनांची मोडतोड, त्या वाहनांवर ट्रॅक्टर चालवणे, पोलिसांवर तलवारी उगारणे या गोष्टी सुरू झाल्या आहेत. हे आंदोलनकारी आता राकेश टिकेत सारख्या नेत्याला पण जुमानत नाहीये. स्वतः राकेश टिकेत ठरवल्या नुसार वागा हे सांगून थकले आहेत. आपल्या नियोजित मार्ग आणि नियोजित वेळ तुम्ही का पाळत नाहीये? असा उग्विन सवाल ते आता आंदोलकांना विचारत आहेत.
या अगोदर पण लिहले आहे की योगेंद्र यादव यांच्याशी चर्चा करणार नाही हे सरकारने घोषित केल्यावर आंदोलक शेतकरी नेत्यांची एक समिती बनवल्या गेली होती. त्या समितीचा मुख्य चेहरा म्हणून राकेश टिकेत यांना समोर केल्या गेले. यांना सरकारच्या प्रतिनिधींशी चर्चेत भाग घेता येत होता, मात्र निर्णय घेणे यांच्या हातात नव्हते. थोडक्यात राकेश टिकेत यांच्या खांद्यावर बंदूक ठेवल्या गेली होती आणि आपल्याला सन्मान मिळत आहे, आपण आपल्या वडिल महिद्रसिंग टिकेत सारखे शेतकऱ्यांचे सर्वोच्य नेते बनलो आहोत या भावनेने कृतकृत्य झालेले राकेश टिकेत योगेंद्र यादव आणि त्यांच्या डाव्या आजारकवादी कंपूने सांगितलेली अडवणुकीची भाषा बोलत होते, त्या प्रमाणे वागत होते. सरकार सोबत कायद्यातील बदलावर बोलायच्या ऐवजी कायदे रद्द करा या मागणीवर अडून बसले होते. जेव्हा सरकारला ट्रॅक्टर रॅली शांततेत होईल हे लिहून देण्याची पाळी आली तेव्हा पण राकेश टिकेत यांनाच पुढे केल्या गेले. ट्रॅकटर रॅलीच्या मार्गांचे नियोजन, वेळेचे नियोजन हे राकेश टिकेत यांनी ठरवले आणि रॅली शांततेत होईल याचे लिखित आश्वासन पण त्यांनीच दिले.
मात्र आज काय दिसत आहे? रोज दूरचित्रवाणीच्या कॅमेरा समोर येत सरकारच्या नावाने गळे काढणारे हे तथाकथित डाव्या विचारांचे नेते रॅलीतून गायब आहेत. राकेश टिकेत यांचे आवाहन कोणीही मनावर घेत नाहीये, दिल्ली शहराची नासधूस होत आहे, रॅलीचे नियोजन पूर्णतः कोडमडले आहे आणि या सगळ्याचे खापर फुटणार आहे ते राकेश टिकेत यांच्या डोक्यावर.
CAA/NRC आंदोलन हाताळतांना झालेल्या चुका या वेळेस सरकारने पूर्णपणे टाळल्या आहेत. सोबतच आपल्या सहनशीलतेचे उदाहरण दिले आहे.
राकेश टिकेत हे या आंदोलनात आता बळीचा बकरा बनेल असे वाटते. आठवा महाराष्ट्रात शनिवार वाड्यासमोर एल्गार परिषद झाली. तिथे चिथावणीखोर भाषणे आणि त्यातून दुसऱ्या दिवशी उडालेली दंगल ही डाव्यांनी नियोजित केली होती. चेहरा मात्र आंबेडकर वाद्ययांचा वापरला. जे आंबेडकरवादी तेव्हा एल्गार परिषदेला नक्षलवादाशी जोडल्यामुळे चिडत होते. "आता आंबेडकरवाद्यांना नक्षल ठरवत आहे." असा आरोप करत होते तेच आंबेडकरवादी आज आपल्या लोकांना एल्गार परिषदे सोबत संबंध ठेऊ नका म्हणून सांगत आहे. तत्कालीन काळात राकेश टिकेतची भूमिका प्रकाश आंबेडकर हिरिरीने निभावत होते. आता पुन्हा एल्गार परिषद होणार आहे किती आंबेडकरवादी त्या परिषदेत सहभागी होणार आहेत. तेव्हा संविधान हातात घेत संविधान रक्षणाचे नाटक करत या डाव्यांनी आजारकता पसरवली, तेच डावे आज तिरंगा हातात घेत शेतकऱ्यांच्या नावाखाली आजारकता पसरवत आहेत.
तुम्हाला सरकारवर भरवसा नाही हे समजू शकतो, कारण आजवर सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा तुमचा अनुभव आहे. मात्र निदान सर्वोच्च न्यायल्यावर तरी विश्वास ठेवा. न्यायालयाने स्थापन केलेल्या समिती समोर आपले आक्षेप मांडा, समितीची कायद्यांबद्दल असलेली भूमिका समजून घ्या, चर्चा करा आणि शेतकऱ्यांच्या उज्वल भवितव्याची तजवीज करा. येणाऱ्या अनुभवा वरून, बदलत्या परिस्थिती नुसार पुढील काळात कायद्यात तसे शेतकरी हिताचे बदल होत राहतील याची व्यवस्था बनवा. पण या आजारकवादी डाव्यांच्या नादी लागून स्वतःला बदनाम करून घेऊ नका.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा