पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७ जानेवारी २०२१ ला देशाच्या बहुचर्चित आणि महत्वाकांक्षी डेडीकेटेड फ्रेट कॅरिडॉर मधील वेस्टर्न डेडीकेटेड फ्रेट कॅरिडॉर या दिल्ली ते मुंबई मार्गाच्या रेवडी ते मदार या खंडाचे उदघाटन केले.
भारतात प्रवासी आणि मालवाहतूक एकाच मार्गांवरून होते. या मुळे होते असे की वेळोवेळी प्राथमिकता देण्याच्या नादान प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्या आणि मालवाहतुक करणाऱ्या गाड्यांच्या वेळेचे नियोजन चुकते. याचा सगळ्यात मोठा फटका हा माल वाहतुकीला बसतो, प्रवासी वाहतुकीला प्राधान्य दिल्या गेल्यामुळे माल वाहतुकीचा प्रवासाचा वेळ वाढतो. सोबतच पारंपरिक रेल्वे मार्गांवर या दोन्ही वाहतुकीचा ताण वाढला होता. परिणामी मार्गाच्या रखरखावाची समस्या तयार व्हायची शक्यता सोबतच प्रवासी वेग कमी व्हायची शक्यता तयार झाली होती.
या सगळ्या समस्येवर उपाय शोधला गेला तो डेडीकेटेड फ्रेट कॅरिडॉरचा ! या डेडीकेटेड फ्रेट कॅरिडॉरचे ईस्टर्न आणि वेस्टर्न अशे दोन मुख्य भाग आहेत. यात ईस्टर्न डेडीकेटेड फ्रेट कॅरिडॉर हा लुधियाना ते दनकुनी पर्यंत आहे. हा एकूण १८५६ किलोमीटरचा मार्ग होतो. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यातून हा मार्ग जाणार आहे. तर वेस्टर्न डेडीकेटेड फ्रेट कॅरिडॉर हा राजधानी दिल्ली ते नवी मुंबई असा राहणार आहे. हा मार्ग दिल्ली, हरियाणा, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र या राज्यातून जाणार आहे. या मार्गाची एकूण लांबी १४८३ किलोमीटर इतकी राहणार आहे. देशातील सगळ्यात जास्त माल वाहतूक ज्या ज्या मार्गांवरून होते त्या वाहतुकीचा विचार करत हा मार्ग आखल्या गेला आहे. मात्र पूर्व आणि पश्चिम इतकाच याचा आवाका नाही. तर देशातील विविध मार्गखंडात पण मालवाहतुकीचा आणि प्रवासी वाहतुकीचा दबाव जास्त आहे त्याचा पण विचार केला गेला आहे. उदाहरण द्यायचे झाले तर महाराष्ट्रातील नागपूर हे रेल्वे करता महत्वाचे ठिकाण आहे. उत्तर ते दक्षिण आणि पूर्व ते पश्चिम देशाला जोडणाऱ्या भारतातील सगळ्यात जुना रेल्वे मार्ग. सोबतच नागपूर ते कलकत्ता आणि नागपूर ते चंद्रपूर या मार्गावर देशातील खनिजे मिळण्याची ठिकाणे मोठ्या प्रमाणावर आहेत. त्या मुळे या मार्गांवर मोठ्या प्रमाणावर खनिज वाहतूक होत असते. देशाच्या औद्योगिक विकासासाठी या खनिजांची वाहतूक आणि प्रक्रिया तितकीच महत्वाची आहे. याचाच विचार करत मध्य प्रदेशातील इटारसी ते नागपूर, महाराष्ट्रातील चंद्रपूर ते नागपूर, झारखंड मधील जगदलपूर ते छत्तीसगड मधील रायपूर आणि रायपूर ते नागपूर या मार्गावर वाहतुकीचा बोजा जास्त आहे. तसेच देशाच्या मध्य पश्चिम भागातील महत्वाचा मार्ग म्हणजे भुसावळ ते मनमाड ! या मार्गामुळे देशाचा उत्तर भाग पश्चिम किनारपट्टी आणि दक्षिण भारताला भेटतो. सोबतच मध्य भारतातून गुजरात आणि राजस्थान कडे जाणारा मार्ग मिळवून देतो. त्या मुळे या सगळ्या मार्गांवर आवश्यकते नुसार एक किंवा दोन रेल्वे ट्रॅक टाकण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. जेणे करून या मार्गांवर पण प्रवासी वाहतूक आणि माल वाहतुकीलास वेगवेगळा मार्ग मिळेल. अर्थात हे फक्त वरील भागात नाही तर देशाच्या विविध भागात ही कामे सुरू आहेत. कारण फक्त एकच की माल वाहतूक आणि प्रवासी वाहतुकीचा वेग वाढवा, जास्ती जास्त गाड्या सुरू करत प्रवासी आणि व्यापारी दोघांना पण लाभ व्हावा हाच या मागील मुख्य उद्देश.
पण यातील मुख्य भाग पूर्व आणि पश्चिम डेडीकेटेड फ्रेट कॅरिडॉर. या करता वेगळी कंपनी डेडीकेटेड फ्रेट कॅरिडॉर कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड नावाची वेगळी कंपनी स्थापन करत २००६ मध्ये या प्रकल्पाची मुहूर्तमेढ केल्या गेली.
हा प्रकल्प जितका महत्वाकांक्षी आहे तितकाच अभियांत्रिकी क्षेत्रात देशाची मान उंचवणारा पण आहे. अनेक अंगाने या प्रकल्पाची तयारी केल्या गेली. विशेष म्हणजे या प्रकल्पातील रेल्वे मार्गाची लोड कॅपसीटी ही ३२.५ टन आहे, जी देशातील उपलब्ध मार्गांवर फक्त २५ टन इतकीच आहे. या करता रेल्वे रुळ टाकण्याची वेगळी पद्धत आमलात आणल्या गेली, रुळाला लागणारे काँक्रीट स्लीपर्स पुन्हा नव्याने डीजाईन केल्या गेले. रेल्वे रूळ जवळपास ४० किलोमीटर खंडावर एकत्र वेल्ड केल्या गेले, जेने करून गाडीचे व्हायब्रेशन कमी होत, वेग वाढेल. सोबतच अत्याधुनिक सिग्नल व्यवस्था आणि संचार व्यवस्था पण उभारल्या गेली आहे. रूळ जरी पारंपरिक टाकले असतील तरी त्याला लागणाऱ्या अनेक बोल्ट, फिश प्लेट या वेगळ्या आणि अधिक भार पेलणाऱ्या बनवण्यात आल्या असे अनेक छोटे मोठे आणि महत्वाचे अभियांत्रिकी महत्वाचे बदल या डेडीकेटेड फ्रेट कॅरिडॉर साठी आमलात आणल्या गेले. या बदलामुळेच डेडीकेटेड फ्रेट कॅरिडॉरवर माल वाहतूक जादा भरा सोबतच १३० किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने होऊ शकणार आहे. भारतीय रेल्वेच्या इतिहासात हा महत्वाचा टप्पा आहे. आता हेच बदल हळू हळू पारंपरिक जुन्या मुख्य रेल्वे मार्गावर करत त्या मार्गांची पण वेग आणि भार क्षमता वाढवण्याचे प्रयत्न केले जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेस्टर्न डेडीकेटेड फ्रेट कॅरिडॉर वर ज्या मालवाहतूक करणाऱ्या गाडीला झेंडी दाखवत औपचारिक उदघाटन केले ती रेल्वे गाडी जवळपास १.५ किलोमीटर लांबीची होती. विशेष म्हणजे कंटेनर वाहून नेणारी डबलडेकर गाडी होती, आता इतका वजनी भार, वेगाने ओढायचा तर त्या करता रेल्वे इंजिन पण तितक्याच ताकदीचे नको काय? त्या वरचा उपाय भारतीय रेल्वेने अलस्टोम या विदेशी कंपनीच्या मदतीने तयार केलेल्या WAG 12 B या नवीन विद्युत इंजिनाद्वारे शोधला. १२ हजार अश्व शक्ती इतक्या प्रचंड ताकद या इंजिनातून मिळत आहे. हे रेल्वे इंजिन "इंजिन सेट" पद्धतीचे आहे. मुळात दोन वेगवेगळे इंजिन एकत्र जोडल्या पद्धतीने दिसत असलेले ही इंजिने गाडीच्या सुरवातीला आणि गाडीच्या शेवटी लावल्या जाऊ शकते, जेणेकरून गाडीला पुश पूल मेथडने अधिक वेग देता येऊ शकेल. हे इंजिन पण देशाच्या रेल्वे इतिहासात महत्वाचा दगड ठरणार आहे. महत्वाचे म्हणजे या इंजिन फक्त शक्तिशाली आहे असे नव्हे तर यात देशाच्या धुळयुक्त पर्यावरणात उत्तम काम करणारी अभियांत्रिकी आहे. सोबतच देशाच्या वेगवेगळ्या भागातील वातावरणीय तापमानात उत्तम काम करेल असे हे इंजिन आहे. आपल्या देशात -५० डिग्री ते ५० डिग्री अश्या वेगळ्या आणि प्रतिकूल तापमानात पण काम करणार आहे. बरे अश्या वेगवेगळ्या पर्यावर्णीय भागात काम करतांना ते इंजिन हाकणाऱ्या इंजिन चालकाची पण योग्य काळजी घेण्यात आली आहे. या इंजिनात चालकाची केबिन पारंपरिक इंजिनापेक्षा मोठी आहे, वातानुकूलित आहे आणि मुख्य म्हणजे दूरचा प्रवास न थांबता करतांना चालकांना भेडसावणारा शरीरधर्माची समस्या दूर करत चालकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी या इंजिनमध्ये प्रसाधनगृह पण आहे.
विशेष म्हणजे डेडीकेटेड फ्रेट कॅरिडॉर आणि या WAG 12 B रेल्वे इंजिन बनवण्याचा विचार आणि नियोजन २००६ साली तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या नितृत्वात असलेल्या UPA सरकारने सुरू केले होते. पण काँग्रेसच्या नेहमीच्या योजना सादर करा आणि थंड बसत्यात टाका या नेहमीच्या कार्यशैली मुळे हे एकमेकापूरक महत्वाचे प्रकल्प रखडल्या गेले होते. २०१४ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात या प्रकल्पांना वेग देण्यात आला. रेल्वे इंजिन बनवतांना वेगवेगळ्या समस्या, अभियांत्रिकी बदल, चालकांच्या आरोग्यासाठी सुचवलेले बदल सगळे २०१४ नंतर झालेले आहेत हे महत्वाचे.
खरे तर नियोजना प्रमाणे २०२१ मध्ये संपूर्ण डेडीकेटेड फ्रेट कॅरिडॉर पूर्ण होत कार्यान्वित व्हायला हवा होता. मात्र २००६ ते २०१४ या काळात गेलेला वेळ अंगावर येणार आहे. तरी या सरकारने अजून हा प्रकल्प २०२१ च्या अखेर पर्यंत पूर्ण करण्याची महत्वाकांक्षा ठेवली आहे. उशीर झाला तरी लवकरात लवकर हा प्रकल्प आता पूर्ण होईल अशी खात्री पंतप्रधान यांनी दाखवलेल्या झेंडी नंतर तयार झाली आहे. या प्रकल्पामुळे देशाच्या मालवाहतुकीत क्रांतिकारी बदल होईलच, पण प्रवासी वाहतूक अजून अत्याधुनिक करायला अवकाश प्राप्त होईल.





टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा