हुनुज, दिल्ली दूर अस्त।



१३२० मध्ये दिल्लीत तुघलक घराणे राज्य करत होते. गयासुद्दीन तुघलक बादशाह होता दिल्लीचा. प्रसिद्ध उर्दू कवी, गायक आणि संगीतकार अमीर खुसरो हे या तुघलकचे राज कवी ! या अमीर खुसरो यांची सुफी संत हजरत निजामुद्दीन औलियावर विशेष श्रद्धा होती. मात्र अमीर खुसरो या निजामुद्दीन औलिया वर जितकी श्रद्धा करायचे तितकाच बादशहा गयासुद्दीन तुघलक या सुफी संतांचा द्वेष करायचा. 


एकदा बादशाह काही कामा निमित्य दिल्लीच्या बाहेर गेला. तेथून त्याने निजामुद्दीन औलियाला निरोप पाठवला की मी दिल्लीत यायच्या आधी तू दिल्ली सोड. असा दिल्ली सोडायचा आदेश बादशाहने आपल्या आध्यत्मिक गुरूला दिला आहे हे अमीर खुसरोला कळले, तो दुःखी झाला, पण गुरूला दिल्लीच्या बाहेर बस्तान बसवून द्यायला मदत करावी या अपेक्षेने अमीर खुसरो निजामुद्दीन कडे पोहचला. 


मात्र त्याला मोठे आश्चर्य वाटले की आपला गुरू आरामात आपले दैनिक व्यवहार करत आहे. दिल्ली सोडायची कोणतीही तयारी त्यांनी केलेली नाहीये. इकडे तर बादशाह दिल्लीच्या जवळ येत असल्याचा बातम्या येत होत्या. तेव्हा अमीर खुसरो यांनी आपली चिंता गुरू जवळ व्यक्त केली, तेव्हा निजामुद्दीन औलियाने अमीर खुसरो याला उत्तर दिले, " हुनुज, दिल्ली दूर अस्त।" 


अर्थात "बेटा, अजून दिल्ली दूर आहे." कोणासाठी? तर बादशहा साठी ! आणि घडले पण तसेच दिल्लीच्या बाहेर गेलेल्या बादशहाला दिल्लीला पोहचताच आले नाही. दिल्ली जवळ रस्त्यात त्याचा अपघात झाला आणि त्याचा मृत्यू झाला.


तेव्हा पासून "दिल्ली अजून दूर आहे." हा वाक्यप्रचार वापरायला सुरवात झाली. कोणी भविष्यातील मोठ्या योजना मांडायला लागले की, भविष्याच्या पोकळीत नक्की काय आहे हे माहीत नसतांना अगदी आत्मविश्वासाने हे होणारच असे म्हणणारे समोर येतात तेव्हा तेव्हा या वाक्यप्रचाराचा उपयोग केला जातो. 



माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडविस यांनी जेव्हा "मी पुन्हा येईन" सारखी घोषणा निवडणूक प्रचारात दिली तेव्हा पण कोणी तरी त्यांना "दिल्ली अजून दूर आहे." असे सांगितले असेलच. मात्र मानवी स्वभाव असा आहे की तो नेहमीच अतिआत्मविश्वासाने असे वक्तव्य करत असतो.


देवेंद्र फडणवीस यांच्या "मी पुन्हा येईन." या वक्तव्याला हास्यास्पद किंवा अतिआत्मविश्वासी वाक्य म्हणून अहवेलना करणारे आज मात्र २०५० साली आपणच मुख्यमंत्री राहू असे अतिआत्मविश्वास पूर्वक सांगत असतील तर वरील कथा लक्षात ठेवावी विशेष म्हणजे ते वाक्य, " हुनुज, दिल्ली दूर अस्त।"

टिप्पण्या