दिल्ली मध्ये शेतकरी आंदोलकांच्यावतीने काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीच्या हौदोसा नंतर आणि गणराज्य दिनी झालेल्या तिरंग्याच्या अपमानानंतर भारतीय जनमानस क्षुब्ध झाले आहे. या नंतर बरेच वर्षांनी पुन्हा खलिस्थानी अतिरेकी चर्चेत आले आहेत.
ज्या लोकांचा जन्म १९८५-९० च्या काळात झाला आहे त्यांना पंजाब मधील अतिरेकी कारवाया फक्त ऐकून माहीत आहेत. मात्र त्याचे अंगावर काटा येणारे वृत्तांकन त्यांनी वाचलेले नाही. १९९० साली काश्मीर मध्ये जसे धार्मिक अत्याचार करत हिंदू परंगदा झाले होते तीच वेळ पंजाब मध्ये या खलिस्थानी अतिरेक्यांनी तेथील हिंदूंवर आणली होती. पण एक लक्षात घेणे महत्वाचे हे की हिंदू पंजाब मध्ये टिकून राहिले याचे कारण देशप्रेमी पंजाबी शीख समाजच आहे. ज्यांनी काँग्रेसने आपल्या राजकीय फायद्यापाई उभे केलेले भिंद्रावाले या खलिस्थानवादी भुताला त्याच्या विचारधारेला अजिबात थारा दिला नाही. तसे लक्षात घेतले तर या खलिस्थानी अतिरेक्यांना विरोध करणाऱ्या देशप्रेमी शीख समाजाला सगळ्यात जास्त भोग भोगावे लागले. त्यांना अतिरेक्यांनी पण मारले, खलिस्थानवाद्यांनी ज्या भागात दहशत होती त्या त्या भागात अक्षरशः या घरांना वाळीत टाकल्या गेले होते. खलिस्थानी चळवळीमुळे शीख समाजाबद्दल जो संशय तत्कालीन भारतीय समाजात तयार झाला होता त्याला पण तोंड द्यावे लागले, इतकेच नाही तर इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर भारतात शीख समाजाविरोधात जो जनक्षोभ उसळला त्याला तोंड पण याच भरतप्रेमी शीख समाजाला द्यावे लागले.
आधीच अविचारी पद्धतीने केलेल्या फाळणीमुळे शीख समाज आधीच दुखवलेला होता. खरे तर तत्कालीन सरकारने फाळणीच्या वेळेस शीख समाजाला गृहीत धरले होते का ? हा प्रश्न मनात येतो. कारण फाळणीच्या वेळेस असा विचार झाला असता तर शिखांचे सगळ्यात पवित्र असे नानकना साहेब गुरुद्वारा असलेले गाव करतारपूर भारतात असते ! (अर्थात हा माझा विचार आहे, तत्कालीन परिस्थिती काय होती आणि शिखांची त्या बाबतीत भूमिका काय होती हे वाचनात आले नाही.)
तर खलिस्थानी अतिरेकी कारवाया पंजाबमध्ये शिखरावर होत्या त्या काळात तेथील परिस्थिती भयावह तर होतीच पण राजधानी दिल्लीपण कमालीची असुरक्षित झाली होती. तेव्हा दिल्ली परिवहन निगमच्या बस मधील प्रवास पण जीव मुठीत धरून करावा लागत होता. दिल्लीकरांनी ट्राजिस्टर बॉंब आणि टॉय बॉंबचा धसका घेतला होता. खेळणायत आणि पॉकेट ट्राजिस्टर (रेडिओ) मध्ये बॉंब ठेऊन त्याला दिल्ली परिवहनच्या बस मध्ये किंवा अतिगर्दीच्या ठिकाणी ठेवायचे, लहान पोर खेळण्याकडे आणि मोठे लोक या रेडिओ कडे हमखास आकर्षित व्हायचे, ज्याने याची कळ दाबली त्याच्या सकट आजूबाजूचे नकळत स्वाहा..! दिल्लीतील प्रसिद्ध पालिका बाजार हा पण यांचा आवडते ठिकाण !
पंजाब मध्ये तर त्या काळात संध्याकाळी पाच नंतर सामसूम होत असल्याच्या बातम्या इकडे वृत्तपत्रात यायच्या. नागपुरातील दैनिक तरुण भारत, लोकमत, हितवाद यांनी आपले प्रतिनिधी पाठवत तेथील परिस्थितीचा आढावा घेत विशेष पुरवण्या पण काढल्या होत्या. त्यातील या अतिरेकी कारवायांमध्ये भरडलेल्या सामान्य शीख आणि हिंदू समाजाचे अनुभव अंगावर काटा आणील असेच होते.
आजचे अनेक तरुण गुलझार साहेबांचा "माचीस" चित्रपट बघून तत्कालीन काळात पंजाब पोलिसांनी केलेल्या अत्याचारा विषयी विचारतील. होय, काही प्रमाणात पोलीस अत्याचार झालेत पंजाबमध्ये ! हे नाकारण्यात अर्थ नाही, मात्र तो चित्रपट फक्त उत्तरार्ध दाखवतो पूर्वार्ध जो आजून भयानक होता तो दाखवत नाही, हे पण तितकेच सत्य आहे.
पंजाब मधून बाहेर निघत हा खलिस्थानी आतंकवाद हळूहळू संपूर्ण भारत कवेत घ्यायला बघत होता. ऑपरेशन ब्ल्यू स्टार नंतर कुंपणावरील अनेक पंजाबी नेमके सरकार विरोधात गेले होते, त्यातच इंदिरा गांधी हत्येनंतर देशभरात उसळलेल्या शीख विरोधी दंगलीनी तर या आगीत तेल ओतायचे काम केले होते. मधल्या काळात तर देशातील अनेक राज्यात मारुती जिप्सी चालवणाऱ्या शीख माणसाकडे संशयाने पाहिले जात असे, त्यात या जिप्सीत तिघे चौघे बसले असतील तर त्यांची परेड थेट जवळच्या पोलीस स्थानकात पोहचे, इतके वातावरण गढूळ झाले होते. या सगळ्यातून बाहेर निघालेला पंजाब आणि देश आज पुन्हा त्याच वळणावर जाणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी.
खरे तर पंजाब आणि देशात कोमात गेलेले हे खलिस्थानी दहशतवादाचे भूत पुन्हा जागे करण्यात आप म्हणजेच आम आदमी पार्टी आणि काँग्रेस तितकेच जवाबदार आहे. २०१७ च्या पंजाब विधानसभा निवडणुकीत आप आणि काँग्रेसवर खलिस्थान समर्थकांची मदत घेत असल्याचे आरोप झाले होते. ज्याला काँग्रेसने तर परतवून लावले पण आप पक्षाला त्याची काही प्रमाणात किंमत द्यावी लागली. मात्र आजची स्थिती बघता हे आरोप चुकीचे होते हे कोणीही म्हणू शकणार नाही.
तेव्हा सजग रहा, हे भूत मोठे होण्याआधी गाडून टाका, या खलिस्थानी भुताने देशाच्या अनेक पिढ्या या अगोदर बरबाद केल्या आहेत आता पुन्हा बरबाद करू देऊ नका.
(बाकी पंजाबमध्ये आतंकवाद कसा वाढला याची कथा खालील लेखात आहे. काँग्रेस जरी आज तोंड वर करत ऑपरेशन ब्लु स्टार आणि इंदिरा गांधी यांची हत्या यावर आपली राजकीय पोळी शेकत असली तरी, ही परिस्थिती यायला त्याच इंदिरा गांधी जवाबदार होत्या हे पण तितकेच सत्य आहे)
https://lavleledive.blogspot.com/2018/11/blog-post.html?m=1
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा