संघाने राम मंदिर समर्पण निधी गोळा करणार म्हणून जाहीर केल्यावर इकडे महाराष्ट्रात हिंदुत्वाचा खोटा अंगरखा अंगावर चढवणाऱ्या लोकांच्या पोटात लगेच कालवाकालव झाली होती.
राम मंदिर बांधायला निधी गोळा करायची गरज का? त्यातही तो निधी संघ का जमा करणार असले प्रश्न त्यांना पडायला सुरुवात झाली होती. अर्थात हे प्रश्न पडायचे कारण तद्दन राजकीय होते. सत्तेच्या लालसेपाई केलेल्या राजकीय तडजोडीमुळे यांनी अंगावर चढवलेल्या खोट्या हिंदुत्वाच्या अंगरख्याच्या आता पार चिंधड्या उडाल्या आहेत. संघाने राम मंदिर समर्पण निधीच्या कामाला सुरुवात केल्यावर निधी संकलन करतांना संघाचा व्यापक जनसंपर्क होईल आणि त्याचा राजकीय फायदा आता फक्त भाजपला होईल ही भीती या सगळ्या विरोधामागे होती.
मुळातच ही भीती निराधार होती. देशातील फक्त हिंदू धर्मीयच नाही तर कोणत्याही धर्माच्या, राजकीय विचारांच्या प्रत्येक माणसाला जो देशाच्या पुरातन संस्कृतीवर प्रेम करतो त्याच्या करता अयोध्येत राम मंदिर निर्माण होणे हे ध्येय होते आणि आहे. त्या लोकांची मदत मिळवत अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामात आपले योगदान आहे हा विचारच त्यांच्या करता किती प्रेरणादायी असेल? होय, काही राजकीय विचारांचे लोक या समर्पण निधी संकलनात निधी देत त्याचा राजकीय फायदा पण बघतील, पण ते नक्की कोण ?
आता हेच बघा ना, राम मंदिर आंदोलनाला प्राणपणाने विरोध करणारे मध्य प्रदेशातील वरिष्ठ नेता म्हणजे दिग्विजय सिंग. हे महाशय या राज्याचे मुख्यमंत्री राहिले होते, काँग्रेसचे राजकुमार राहुल गांधी यांच्या राजकीय जीवनातील पदर्पणात त्यांना राजकीय मार्गदर्शन करणारे जेष्ठ ! राहुल गांधी यांना कपड्यावरून जाणवे घालण्याची युक्ती सांगणारे आणि काँग्रेसने आता सॉफ्ट हिंदुत्वाची कास धरावी असा विचार करणारे काँग्रेसी हेच ! देशात "भगवा आतंकवाद" ही संकल्पना आणि त्याचा प्रचार करणारे बिनीचे शिलेदार. त्याचा तथाकथित सर्वधर्मसमभाव आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघविरोधातील द्वेष इतका पराकोटीचा होता की मुंबईच्या २६/११ च्या पाकिस्थान पुरस्कृत इस्लामी आतंकवाद्यांनी केलेल्या दहशतवादी हल्ल्याचे सगळी पाळेमुळे यांच्याच सरकारने खोदून काढली असतांना आणि त्या विरोधात थातुरमातुर का होईना कारवाई केली असतांना पण, हे दिग्विजय सिंग मात्र हा हल्ला पाकिस्थानने नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने घडवून आणल्याचे राज्यातील काही बिनडोक संशोधकांनी लावलेल्या शोधाला आपला पाठींबा देत होते.
विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जेव्हा निधी संकलनाची घोषणा केली तेव्हा त्यावर प्रश्नचिन्ह उभे करणारे आणि या अगोदर जो निधी राम मंदिर निर्माण करता जमा झाला आहे त्याचा हिशोब द्या म्हणणारे पण हेच महाशय होते.
मात्र राजकारणातील या जुन्या खेळाडूने मात्र १,११,१११/- रुपयांचा समर्पण निधी राम मंदिरासाठी पाठवला आहे. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नावाने एक पत्र आणि निधीचा धनादेश श्री राम मंदिर निर्माण न्यास्याच्या नावाने त्यांनी दिला. हे पत्र आणि धनादेश पंतप्रधाना पाठवला आहे.
म्हणजे ज्या संघा विरोधात, ज्या संघ स्वयंसेवका विरोधात यांनी राजकीय धुरळा उठवला होता त्या संघ स्वयंसेवकाच्या हातात त्यांनी हा धनादेश पाठवला ! या पत्रात त्यांनी पंतप्रधानांना काय संदेश दिला आहे? तर दिग्विजय सिंग म्हणतात, "सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिर बांधायला परवानगी दिल्यानंतर अयोध्येत आता श्रीरामाचे भव्य मंदिर तयार व्हावे ही जशी देशवासीयांची इच्छा आहे तशी माझीही इच्छा आहे. त्याच करता मी हा समर्पण निधी देत आहे."
आता बघा या अगोदर जमा झालेल्या पैशाचा हिशोब मागणारे दिग्विजय सिंग, प्रभू श्रीराम यांच्या अस्तित्वावर शंका घेणारे दिग्विजय सिंग आता मात्र अयोध्येत भव्य राम मंदिर बनावे ही इच्छा जाहीर करत आहे. बरे या पत्रात त्यांनी कोणताही पैशाच्या हिशोब मागितला नाहीये, मात्र मी वेळोवेळी अश्या प्रकारे राम मंदिर निर्माण करता निधी दिला असल्याचे फक्त नमूद केले आहे. सोबत वेळोवेळी राम मंदिरा निर्माण करता निधी दिला कारण आमच्या घराण्यात गेल्या ४०० वर्षांपासून श्री रामाचे पूजन होत आहे हे सांगायला पण ते विसरले नाहीत.
सोबतच त्यांनी प्रभू श्री राम हा वयक्तिक आस्थाचे प्रतीक आहे आणि भाजपाने या आस्थेचे राजकीय करणं केले असा सूर या पत्रात लावला आहे. मात्र वयक्तिक आस्थेचे प्रतीक जो पर्यंत प्रभू श्री राम होते तो पर्यंत खुद्द यांचा पक्षच प्रभू श्रीरामाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभे करत हिंदूंच्या आस्थेला सुरुंग लावत होती हे मात्र महाशय साफ विसरत आहेत.
असो राजकारणातील फायद्यासाठी का होईना दिग्विज सिंग यांनी संघाच्या स्वयंसेवकाच्या सुपूर्द राम मंदिर निर्माण समर्पण निधी केला हे नसे थोडके. मुख्य म्हणजे कोणताही किंतु परंतु न ठेवता हा धनादेश हे संघ स्वयंसेवक म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी योग्य जागी पोहचवतील पण हे नक्की.
म्हणजे आता हिंदुत्वाचे, संघाचे कट्टर विरोधक पण राम मंदिर समर्पण निधीत आपले योगदान द्यायला सुरुवात झाली आहे. आता बघायचे की हिंदुत्वाचा खोटा अंगरखा घातलेले राज्यातील राजकीय महानुभाव या समर्पण निधीत आपले योगदान देतात की नुसतीच तोंडाची वाफ दडवत खरे हिंदुत्व आणि खोटे हिंदुत्व याची खोटी मीमांसा करत बसतात.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा