सामाजिक जाणिव



फालतू विषयावर मोठा गाजावाजा करणे हे आजकाल वृत्तवाहिन्यांचे नेहमीचे काम झाले आहे. आता वाशीमच्या एका युवकाने मुख्यमंत्र्यांना पोरगी पाहून माझे लग्न करून घ्या म्हणून पत्र लिहले. MPSC करता दोनवेळा प्रयत्न करून सुद्धा पास न होऊ शकलेला आणि सरकार जागा काढत नाही म्हणून बेरोजगार असलेल्या या युवकाची ही मागणी हास्यास्पद होती, जशी मागणी होती तशीच या मागणीला आपल्या बतमीपत्रात जागा देणाऱ्या वृत्तवाहिन्यापण हास्यास्पदच !


या सगळ्यात ज्याला खरेच गरज आहे, समाजाकडून आणि मुख्यमंत्र्यांकडून, सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे ती बातमी मात्र दुर्लक्षित केल्या गेली हे दुर्दैव आहे. बातमी आहे बुलढाणा जिल्ह्यातील.


बुलढाणा जिल्यातील, संग्रामपूर तालुक्यातील काकोडा हे छोटेसे गाव. वैभव बाबराम मानखेर नावाचा होतकरू विद्यार्थी. अल्पभूधारक शेतकऱ्यांचा मुलगा. १२ वि पास झाल्यावर त्याने मेहनतीने CET परीक्षा पास केली. त्या योगे शासकीय कोट्यातून बी फार्म करण्यासाठी धुळे येथील फार्मसी महाविद्यालयात प्रवेश मिळाला. मात्र अल्पभूधारक गरीब शेतकऱ्याकडे आपल्या मुलाच्या प्रवेशासाठी पैसे नव्हते. पण वैभवचा शिक्षणाचा ध्यास मोठा, त्याने सरकारी बँकेकडे शैक्षणिक कर्जासाठी अर्ज टाकला. मात्र सरकारी बँकेने या वैभवला कर्ज नाकारले कारण होते वडिलांचे शेतकर्ज ! या वर्षी आलेल्या आस्मानी संकटात सरकारने तर मदत केली नाहीच वर आपले शिक्षण पण या सुलतानी संकटाने थांबते की काय ? या प्रश्नाने वैभव निराश झाला. 



याच नैराश्येतून वैभवने थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहले. वैभवने त्यात मुख्यमंत्र्यांना शैक्षणिक कर्ज मिळवून देण्याचे साकडे घातले, पण सोबतच समजा कर्ज देऊ शकत नसाल तर आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी अशी विनंती पण केली. पण सरकारी अनास्थेच्या बळी बनलेल्या या युवकाने सरकारी व्यवस्थेवरील आणि सरकारी "लकीर के फकीर" कार्यपद्धतीवरील आपला रोष व्यक्त करतांना, आपल्या वरील दोन मागण्यांवर योग्य कारवाई न झाल्यास आपल्याला नाईलाजाने नक्षलवादी बनण्याशिवाय मार्ग नाही असा निराशेचा सूर पण त्या पत्रात उमटवला होता. 


वैभवचे हे नक्षलवादी बनण्याचे विचार या नैराश्येतून आले होते. मात्र या पत्राची दखल सरकारी पातळीवर तर घेतल्या गेली नाही, तर "माझे लग्न करून दया" सारखे भंपक पत्राची दखल घेणाऱ्या वृत्तवाहिन्यांनी पण या पत्राची दखल घेतली नाही. बाकी नक्षलवादी चळवळ बंदूक घ्यायला पैसे पुरवेल, मात्र शिक्षण घ्यायला तेही तळागाळातील युवकाला मदत करेल हे अशक्यच कारण याच तरुणाईच्या हातात पुस्तकांऐवजी बंदुका देत आपली क्रांती त्यांना सफल करायची आहे. 


मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराने प्रेरित खामगाव अर्बन बँक मात्र वैभवाच्या मदतीला धावली ! या वैभवच्या पत्राची बातमी स्थानीय वृत्तपत्रात आल्यावर, त्याचे नैराश्याने ग्रासलेले विचार आणि त्या विचारातून होणारा अनर्थ लक्षात घेता या युवकाला मदत देणे आवश्यक आहे ही भावना प्रबळ झाली. त्यातूनच वैभवला शैक्षणिक कर्जरूपी मदत करण्याचे बुलढाणा अर्बन बँकेने ठरवले आणि पूर्णत्वास नेले. 


बँकेच्या सदस्यांनी वैभवची आणि कुटुंबाची भेट घेतली. त्या वेळी झालेल्या चर्चेत वैभवने आपल्याला आर्थिक मदतीची गरज नसून कर्जाची गरज आहे हे निक्षून सांगितले, वैभवच्या स्वाभिमान बघता त्याला संवेदशील बनून मदत करायचीच हा विचार बँकेच्या सदस्यांनी पक्का केला. 


यातूनच मग सगळ्या अडथळ्यांवर मात करत बुलढाणा अर्बन बँकेने वैभवचे शैक्षणिक कर्ज स्वीकृत केले. बँकेच्या स्थानिय माधव सभागृहात छोटा कार्यक्रम करत वैभवला कर्जाचा धनादेश सुपूर्त करत त्याच्या शिक्षणाच्या वाटा मोकळ्या केल्यात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संचालक बाळासाहेब काळे, विभाग कार्यवाह प्रल्हादजी निमकर्डे, विभाग सहप्रचारक वैष्णव राऊत, जिल्हा कार्यवाह विजयजी पुंडे यांची या सगळ्या कामात मदत आणि मार्गदर्शन होते, या कार्यक्रमाला पण त्यांची उपस्थिती होती. तर बँकेचे संचालक सचिनजी पाटील, संचालिका फुलवंती कोरडे, राजेंद्रसिह राजपूत, बँकेचे प्रभारी प्रबंध संचालक पांडुरंग खिरोडकर ज्यांनी आपली सामाजिक जाणिव जागृत ठेवत वैभवच्या कठीण परीस्थितीतून मार्ग काढत त्याला त्याच्या उज्वल भविष्याचा मार्ग मोकळा करून दिला, उपस्थित होते. 


या सगळ्या घडामोडीमुळे आणि आपल्या हातात पडलेल्या कर्जरूपी मदतीमुळे वैभव मानखेर भारावून गेला. आपण नैराश्येतून नक्षलवादी बनण्याचे भाषा वापरणे ही आपली चूक होती हे मान्य करत आपला समाज आपल्याला मदत करतो ही भावना मनाला उभारी देते असे वक्तव्य त्याने केले. 


आपण वैभवला त्याच्या पुढील वाटचालीकरता शुभेच्छा तर देऊच शकतो !

टिप्पण्या