नैतिक - अनैतिक



खरे तर धनंजय मुंडे प्रकरणावर लिहणार नव्हतो. मात्र या प्रकरणामुळे राज्यातील नैतिकता पार ढवळून निघत आहे असे दिसते. "दो बॉटल व्होडका काम मेरा रोज का" आणि "पता नही जी कौन सा नशा करता है" सारखे गाणे जेव्हा आवडीने ऐकल्या जातात तेव्हा आपण धनुभाऊच्या विषयात अजून किती खोल जाणार? 


मात्र अनेकांना या प्रकरणाने अमेरिकेतील प्रसिद्ध मोनिका लेवेन्स्की आणि बिल क्लिंटन प्रकरण आठवत आहे. तर काही अगदी मनापासून धनुभाऊंना साथ देण्याची गोष्ट करत आहे. त्या करता धनुभाऊंनी आपल्या फेसबुक पेज वर केलेल्या "परस्पर सहमती" चा आधार घेत आहेत. पण लक्षात घ्या की या प्रकरणात "परस्पर सहमतीने" असलेल्या संबंधाचा काहीही संबंध नाहीये, तर या "परस्पर सहमती" व्यतिरिक्त केलेल्या बळजबरी संबंधांची चर्चा होणे आवश्यक आहे, जी होत नाहीये किंवा मुद्दाम होऊ दिली जात नाहीये, मुद्दा "बलात्काराचा" आहे. 



असो, मात्र ज्यांना अमेरिकन बिल क्लिंटन आणि मोनिका प्रकरण आठवत आहे, सोबत अमेरिकन नागरिकांनी बिल क्लिंटन यांना माफ करत पुन्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनवले असे वाटत आहे त्यांनी लक्षता घ्यावे की, बिल क्लिंटन यांच्यावर या प्रकरणात महाअभियोग चालवल्या गेला होता. ते खोटे बोलले, मोनिका सोबत असलेले संबंध नाकारले याचा राग होताच, पण अमेरिकन राष्ट्रपतींची परंपरा आणि संकेत मोडून काढले याचा जास्त राग अमेरिकन नागरिकांना आला होता. या सगळ्यातून क्लिंटन सुटले ते त्यांच्या पत्नी मुळे, जिने डोळ्यात पाणी आणून "माझा नवरा चुकला, पण मी त्याला माफ केले, तुम्ही त्याला पदरात घ्या, माफ करा." अशी साद घातली तेव्हा ! 



पण त्या नंतर अमेरिकन राजकारणात बिल क्लिंटन पेक्षा हिलरी क्लिंटनचे नाणे खणखणीत वाजले. गंभीर कौटुंबिक संकटाला खंबीर पणे परतवून लावणारी आणि तरी आपल्या कुटुंबाला एकत्र ठेवण्यासाठी नवऱ्याचे अपराध पोटात घेणारी स्त्री म्हणून तिची लोकप्रियता वाढली. परिणामी ती अमेरिकन राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत धावली. याचा अर्थ इतकाच की अमेरिकन नागरिक त्याच्या आयुष्यात कितीही बाहेरख्याली करणारा असला तरी त्याला त्याचा राष्ट्रपती मात्र एकपत्नीव्रता आणि कुटुंबवत्सल लागतो. उगाच नाही अमेरिकन राष्ट्रपतीचा उमेदवार आपल्या प्रचारसभेत आपल्या बायको मुलांसोबत प्रचार करत असतो. लक्षात घ्या याच अमेरिकेने कोण्या एकेकाळी राष्ट्रपती केनेडी यांच्या मर्लिन मँरो या अभिनेत्री सोबत असलेल्या संबंधाचे खापर केनेडीच्या बायकोवर जॅकलिन केनेडीच्या वागणुकीवर फोडले होते. इतकेच नाही तर अमेरिकेचे विद्यमान म्हणा की माजी म्हणा असे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर शरसंधान करतांना सतत त्यांचे आणि त्यांच्या बायकोचे कसे पटत नाही तरी राष्ट्रपती पदा साठी त्यांची बायको कसे मन मारून त्यांच्या सोबत उभी राहते हे अमेरिकन नागरिकांवर ठसवण्याचा प्रयत्न अनेक वेळा केल्या गेला. ट्रम्पची बायको असे का वागते ? तर ट्रम्प तीच्याशी एकनिष्ठ नाही म्हणून ! हे अमेरिकन नागरिकांवर ठसवणे हा मुख्य उद्देश !



या सगळ्या प्रकरणात भारतीय नागरिकांची मानसिकता काय? तर परंपरावादी, अमेरिकेपेक्षा प्रतिगामी अश्या भारतीय नागरिकांनी मात्र आपल्या नेत्यांच्या अश्या वागणुकीला दुय्यम स्थान देत नेहमीच दुर्लक्ष केले हा इतिहास आहे. अगदी काँग्रेसी आणि इतर महात्मा गांधींच्या भक्तांना आवडणार नाही मात्र महात्मा गांधींच्या ब्रम्हचार्याच्या प्रयोगांकडे भारतीय नागरिकांनी काणाडोळाच केला. उलट माझ्या सारख्या काहींनी हे अनैतिक वागणे होते म्हणत या प्रकारावर काही लिहले तर महात्मा गांधी यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत असल्याचा आरोप झाला. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि तत्कालीन भारताचे व्हाइसरॉय माउंट बॅटन यांची पत्नी एडविना माऊंटबॅटन यांचे प्रेम संबंध तर जगजाहीर होते, तरी जवाहरलाल नेहरू यांची राजकीय कारकीर्द धोक्यात आली नाही. उलट या विषयी बोलणे हे जवाहरलाल नेहरू यांची अकारण बदनामी असे ठसवण्यात येते. खुद्द धनुभाऊ यांचे काका स्व. गोपीनाथ मुंडे हे स्वतः पण "बरखा" प्रकरणात अडकले होतेच. तत्कालीन काळात सध्या सत्तेत असलेल्या पण तेव्हा विरोधात बसलेल्या पक्षांनी पण "बरखा बहार आई" म्हणत गोपीनाथ मुंडे यांच्यावर शरसंधान केले होते. मात्र त्या मुळे गोपीनाथ मुंडे यांच्या लोकप्रियतेत काहीही कमी आली नाही. ही यादी अजून वाढवता येईल. यात काँग्रेस पासून अनेक राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांची नावे लिहता येतील. अगदी काही नेत्यांच्या चलचित्रफीत्या पण समाज माध्यमांवर फिरल्याचे आपल्याला आठवेल. पण सगळ्यांचीच राजकीय कारकीर्द काही धोक्यात आली नाही. कारण त्यांची राजकीय ताकद किंवा जनतेमध्ये असलेली त्यांची पकड हेच कारण होते. महत्वाचे म्हणजे भारतीय जनतेची, पुन्हा एकदा लक्षपूर्वक वाचा "भारतीय जनतेची" सरंजामशाही विचारधारा हेच असेल. नेत्याने आणि नेता बनल्यावर तो जमीनदार होतो आणि जमीनदाराने अंगवस्त्र ठेवणे काही विशेष नाही ही ती सरंजामशाही मानसिकता हेच कारण आहे. 














होय, भारतीय राजकारणात काही नेते आहेत ज्यांची प्रकरणे बाहेर आल्यावर त्यांची राजकीय कारकीर्द थांबली, पण त्याची कारणे खरे तर अंतर्गत पक्षीय राजकारणात काढलेला काटा आणि त्या नेत्यांमागे नसलेला जनाधार हेच खरे कारण होते. 



बाकी नैतिक-अनैतिकतेच्या भारतीय जनतेच्या आणि अमेरिकन जनतेच्या भावना वेगळ्या आहेत हे नक्की, भारतीय समाज या प्रकरणात जास्त सहिष्णू आहे हे पण नक्की. मात्र इतर वेळेस स्त्रीवादा वर शिरा ताणून भाषण देणाऱ्या धनुभाऊंच्या प्रकरणावर शांत का ? हा प्रश्न आहेच, कारण धनुभाऊंचे प्रकरण फक्त नैतिक-अनैतिक संबंधाचे नाही तर "बलात्काराचे" आहे.

टिप्पण्या