आरोग्य व्यवस्थेची दुरवस्था जवाबदार कोण?

 


भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात झालेल्या अग्निकांडात नवजात बालकांचा होरपोळून होणारा मृत्यू हा तथाकथित पणे विकसित आणि पुरोगामी राज्यासाठी अत्यंत क्लेशकारक आहे. 


आरोग्य व्यवस्था हा भारतीय संविधानानुसार राज्याच्या सुचिचा विषय आहे. त्या मुळे राज्य कोणत्याही पक्षाचे असो आरोग्य व्यवस्थेकडे होणारे दुर्लक्ष हा सर्व पक्षीय विषय व्हायला हवा. आज आघाडी सरकारच्या राज्यात अशी घटना घडली म्हणून विद्यमान सरकारवर ताशेरे ओढण्यात काहीही हशील नाही असे मला मना पासून वाटते. 


तसेही जगभरात आलेल्या चिनी कोरोना विषाणूने आपण आरोग्य सेवा देण्यात किती पाण्यात आहोत याची खरी तर जाणीव आपल्याला करून दिली होती. ही गोष्ट वेगळी की हे सरकार या समस्येबाबत तितकी संवेदनशीलता दाखवू शकले नाही जितकी दाखवायला हवी होती. 


आज राज्यातील कोरोना खरेच अटोक्यात आहे की आकड्यांचे खेळ आहे हे काही कळायला सामान्य माणसाला मार्ग नाही. आज २१ दिवसांच्या कॉरंटाईन नंतर RTPCR टेस्ट मध्ये सकारात्मक रिपोर्ट येणाऱ्या कोविड रुग्णाला अँटीएजंट टेस्ट करून नकारात्मक रिपोर्ट आणल्या जात आहे. पण असे का ? याचे उत्तर कोणीही देत नाही. अर्थात याला जवाबदार स्थानीय महानगर पालिका आहेत की राज्य सरकारच्या आरोग्य विभागा कडून अश्या पद्धतीचे आदेश आहेत हे कळण्याचा काहीही मार्ग नाही. 


भंडारा येथील दुर्दैवी जळीत कांडाचे खापर आता तेथील डॉक्टर वर फोडण्यात येईल. मात्र खरे तर डॉक्टरचे काम या रुग्णालयाच्या अधिकार क्षेत्रातील आरोग्य समस्या दूर करण्याचे आणि त्या क्षेत्रात आरोग्य समस्यांनी विक्राळ रूप घ्यायला नको म्हणून लक्ष ठेवायचे असायला हवे. रुग्णालयातील वीज वाहिन्या व्यवस्थित काम करत आहेत का? रुग्णालयाला प्राणवायूचा पुरवठा योग्य प्रमाणात होतो की नाही बघणे हे काही डॉक्टरचे काम नाही, त्या करता त्यांना जवाबदार धरणे काही योग्य होणार नाही. 


बाकी रात्री कर्तव्यावर असतांना झोपणारे कर्मचारी, त्यातही सरकारी कर्मचारी हा काही आजचा विषय नाही. रात्रपाळी करतांना निसर्गनियमानुसार डोक्यावर झोपेचा अंमल येणे हे काही विशेष नाही. मात्र तो अंमल झुगारून सजगपणे आपले कर्तव्य निभावणार्या कर्मचाऱ्याची खरी गरज असते ही शिकवण सरकारी कर्मचाऱ्याना देण्याची गरज आहे. 


बाकी उत्तर प्रदेश, राजस्थान राज्यात प्राणवायू पुरवठा बाधित झाल्यामुळे झालेले बालक मृत्यू जितके क्लेशकारक होते, राज्य सरकारची असंवेदनशीलता दाखवणारे होते, तितकेच महाराष्ट्रात झालेले मृत्यू पण क्लेशकारक आणि राज्य सरकारची असंवेदनशीलता दाखवणारे आहेत हे मुख्यमंत्र्यांनी ध्यानात घेतलेले दिसत नाही, नाही तर रुग्णालयाला भेट द्यायला येणाऱ्या मंत्री मोहदयांसाठी पायघड्या टाकायची आणि नवीन पडदे लावण्याची असंवेदनशीलता दाखवली नसती. 


बाकी मुख्यमंत्र्यांच्या भंडारा दौऱ्यावर असतांना झालेल्या भीषण घटनेवरून मुख्यमंत्र्यांच्या पायगुणबद्दल समाज माध्यमांवर व्यक्त होणारे महाभाग पण या घटनेकडे तद्दन राजकीय आणि तितक्याच असंवेदनशील पणे बघत आहेत हे नक्की. 


अर्थात या सगळ्या देशभरात घडणाऱ्या घटना बघता देशाच्या आरोग्य विभागाकरता पण एक टास्क फोर्स तयार करून मार्गदर्शक तत्वे केंद्र सरकारने लागू करण्याची निकड भासत आहे, तेव्हा केंद्र सरकारने पण त्वरित अश्या घटनांचे सग्यान घ्यावे हेच उत्तम. 


आज सुपात नसलेल्यांनी पण या घटनेवर राजकारण न करता सुपात असलेल्यांना अश्या घटना घडणार नाही या करता मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. 


त्या दुर्दैवी नवजात बालकांकरता श्रद्धांजली हीच राहील की राज्यात आणि देशात पुन्हा असे दुर्दैवी मृत्यू न होवो.

टिप्पण्या