आंदोलनातील परिपूर्ण आहार व्यवस्थापन

बऱ्याच वर्षा पूर्वी नागपुरात युवक काँग्रेसचे अधिवेशन झाले होते. जुन्या नागपूरकरांना त्या अधिवेशनाच्या आठवणी आज पण असतील. ते अधिवेशन गाजले होते अव्यवस्था आणि हुल्लडबाजीमुळे ! आहार व्यवस्थेत कमतरता राहिल्या मुळे चिडलेल्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जेवणाची भरलेली ताटे फेकली होती आणि त्या नंतर शहरात हुल्लडबाजी पण केली होती. नागपूरकरांना तो अनुभव भयावह होता. त्यातही नागपुरात जन्मलेल्या कडक शिस्तीच्या आणि सुगम व्यवस्थापनात होणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाची सवय असलेल्या नागपूरकरांसाठी हे अधिवेशन मोठा धक्का होता. 


नेपोलियनने म्हंटले होते की, "सैन्य पोटावर चालते." ! आजच्या युगात राजकीय पक्षाचे-संघटनेचे सैन्य म्हणजे त्यांचे कार्यकर्ते. पक्षाच्या-संघटनेच्या मोर्चा, आंदोलने किंवा समाज उपयोगी कार्यात त्यांनी काम करावे अशी इच्छा असेल तर त्यांच्या त्या काळातील पोटापाण्याची व्यवस्था करणे हे त्या पक्षाचे-संघटनेचे काम असते. त्यात काही अव्यवस्था झाली की मग त्या कार्यक्रमाचा वर उदाहरण दिल्या प्रमाणे अवस्था होते. मग त्यामुळे पक्षाची-संघटनेची तर बदनामी होतेच, पण जनतेमध्ये विरोधी वातावरण तयार होते ते वेगळे. 


राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आज पर्यंत अश्या कार्यक्रमाच्या व्यवस्थापना करता अतिशय प्रसिद्ध होता. आपल्या कार्यक्रमाला आलेल्या स्वयंसेवकाच्या आहाराची योग्य काळजी संघ घेतो. संघ का वाढला? या प्रश्नाचे उत्तर अनेक विद्वान शोधत असतात, मात्र योग्य उत्तर हे आहे की संघ आपल्या स्वयंसेवकांना उपाशी ठेवत नाही, साधे पण सकस असा आहार त्यांना उपलब्ध करून देतो. मग अगदी नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनात सेवा कार्य करणारा स्वयंसेवकाला पण तत्कालीन परिस्थितीत जितके योग्य जेवण देता येईल तितके योग्य जेवण उपलब्ध करून देतो. म्हणूनच कोरोना काळात पण संघाने देशभरात वेगवेगळ्या उपक्रमातून जनतेच्या आहाराची जितकी जास्त जमेल तितकी काळजी घेतली. तर आहार व्यवस्थापनात आणि त्याच्या शिस्तीत आजपर्यंत तरी संघाला देशात अव्वल स्थान प्राप्त होते. मात्र आता त्याचे हे स्थान चांगलेच डळमळीत होतांना दिसत आहे. 


चिनी कोरोना काळा अगोदर दिल्लीतील शाहीनबाग येथे सरकारने CAA कायद्यात केलेल्या बदलाच्या विरोधात धरणे आंदोलन केले होते. त्या आंदोलनातील डोळ्यात भरलेली पहिली गोष्ट होती तेथील आहार नियोजन ! इतक्या मोठ्या संख्येने जमलेल्या माता-भगिनी आणि त्यांची लहान चिल्ली पिल्ली यांच्या आहाराची केलेली चोख व्यवस्था ! लहान पोरांसाठी दूध तर त्यांच्या आयांसाठी रोटी भाजी, पण महत्वाचे म्हणजे मुस्लिम धर्मीय मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्याची योग्य दखल घेत उपलब्ध करून दिलेली सामिष बिर्याणी ! असे जोरकस आहार व्यवस्थापन तर संघाला पण कधी जमले नाही. 

आता पुन्हा राजधानी दिल्लीत शेतकरी आंदोलनाच्या निमित्याने आंदोलने किती शाही पद्धतीने आहार नियोजन करतात याची प्रचिती येत आहे. महत्वाचे म्हणजे "संघ का वाढला?" या प्रश्नाचे वर दिलेले उत्तर किती समर्पक होते आणि त्या उत्तराचे मर्म या शेतकरी आंदोलनाच्या आयोजकांना कसे बरोबर कळले हे बघण्या सारखे आहे. 

या आंदोलकांची सकाळ होते तेव्हा त्यांच्या हातात शुद्ध दुधाचा चहा आणि पकौडे येतात. बरे हे मर्यादित वगैरे नाही बरे का ? तर अमर्याद कापातून प्या, मोठ्या मग मधून प्या किंवा जग मधून मागा काही हरकत नाही, त्याच प्रमाणे पकौडे पण तुम्हाला हवे तितके खा, या नंतर वेळ येते दुपारच्या जेवणाची ! यात अगदी वेगवेगळ्या भाज्या सोबत पनीर आणि सामिष आहाराची रेलचेल आहे. आधीच हे शेतकरी आले आहेत मुख्यतः पंजाब आणि हरियाणा राज्यातून तिथे लोणी, तूप, दूध, दही सोबत तंदुरी रोटी, नान या साठी प्रसिद्ध ! मग आंदोलनात सहभागी आंदोलकांना त्यांच्या घरच्या सारखे जेवण मिळाले पाहिजे म्हणून जीवाचा आटापिटा करत या आंदोलनाच्या आयोजकांनी विशेष तंदुर भट्ट्या आणि त्यावर रोटी आणि नान बनवणाऱ्या विशेष प्रशिक्षित आचाऱ्यांची विशेष व्यवस्था केली आहे. या जेवणा नंतर पुन्हा घरी मिळते तशी लस्सी यांना मिळावी म्हणून खास सिटेक्सच्या टाक्या भरून गोड आणि खारी लस्सीची व्यवस्था आहे, तुम्हाला जाऊन फक्त टाकीची तोटी उघडायची आहे बस ! 

आता जेवण झाल्यावर थोड्या वेळाने पुन्हा चहा किंवा दूध लागले तर त्या करता पुन्हा सकाळची व्यवस्था आहेच, पण दुपारची भूक भागवण्यासाठी पुन्हा तुम्हाला घरच्या पकोड्या पासून थेट सोनिया मावशीच्या घरच्या पिझ्झा पर्यंत सगळे खाद्य पदार्थ उपलब्ध आहेत आणि ते पण अमर्याद ! भारतीय लोक जगातील सगळ्यात जास्त गोड खाणाऱ्या लोकसंख्येत मोडतात. मग इतके दिवस घरच्यापासून दूर राहणाऱ्या लोकांना घरी मिळते तसे गोडधोड पण मिळाले पाहिजे की नको ? म्हणून त्या करता खीर, इमारती, जिलेबीची विशेष व्यवस्था केली आहे. आता खीर सुक्यामेव्या शिवाय योग्य चव देत नाही. त्या मुळे आयोजकांनी ढिगाने काजू, किसमिस, बदाम, पिस्ते आणून ठेवले आहेत. खिरीत, गोड पदार्थात सुकामेवा टाकला असतोच, तुम्हाला तसाही खायला हवा असेल तर मूठ मूठ भर उचलता येतोच. पुन्हा रात्रीचे जेवण, त्यात पुलाव, बिर्याणी, रोटी भाजी याची रेलचेल आहेच. सोबत रात्री जेवण झाल्यावर किंवा दुपारी पण वाटले तर देशातील सगळी उत्तम प्रकारचे फळ खायला उपलब्ध करून दिली आहेत आयोजकांनी. रात्री उशिरा चुली थंड झाल्यावर काही लोकांना नेमकी भूक लागते किंवा काही खायची इच्छा होते. तेव्हा ते मग स्वयंपाकघरात जाऊन डबे हुडकतात आणि घरातील बिस्किटे, नमकीन, खारी, चॉकलेट यावर डल्ला मारतात. अश्या लोकांना आंदोलन करतांना घरची आठवण यायला नको आणि ती सवय तुटायला नको म्हणून या वस्तू पण रात्री बेरात्री, दुपारी विनायास मिळण्याची व्यवस्था आयोजकांनी केली आहे आणि ते पण विनामूल्य. 

आता इतकी बडदास्त फक्त जेवणासाठी केली आहे असे नाही. इकडे आपल्याला दुःख होत आहे की बिचारे शेतकरी तिथे दिल्लीतील थंडीत कसे रात्र काढत असतील म्हणून. संघात तर आपले अंथरून पांघरून सोबत आणावे लागते. शाहीनबाग मध्ये काहिशी चांगली व्यवस्था आपण बघितली होती. मात्र या शेतकरी आंदोलनाच्या आयोजकांनी तर त्याच्या पेक्षा खूप चांगली व्यवस्था केली आहे. जाड गादी, जाड ब्लॅंकेट, चादर हे सामान्य कार्यकर्त्यांसाठी तर आहेच, मात्र आपल्या श्रीमंत कार्यकर्ते आणि नेत्यांकरता वातानुकूलित शयन व्यवस्था पण उभारली आहे. 

आजकाल भ्रमणध्वनी म्हणजेच मोबाईल फोन शिवाय आयुष्य बेकार आहे. त्या मोबाईलला गरज असते ते त्याची बॅटरी चार्ज करण्याची ! आता या आंदोलनाच्या धामधुमीत ती कशी करणार ? मग आयोजकांनी दोन तीन ट्रक त्यावर जनरेटर चढवून आणले आणि त्या ट्रकच्या खूप सारे इलेट्रिक सॉकेट लावत मोबाईल, टॅब, लॅपटॉप चार्ज करण्याची सोय करून दिली आहे. मोबाईल चार्ज करा आणि समाज माध्यमांवर आपल्या आंदोलनाची माहिती टाका, आहे की नाही व्यवस्थापन !

आता मला सांगा इतकी सुखसुविधा असल्यावर कोण कार्यकर्ता आंदोलनाची जागा सोडून घरी परतेल, कोण कार्यकर्ता आपल्या आयोजकांना बदनाम करणार आहे ? अगदी खरं सांगतो पहिले संघाच्या शिबिराला, सेवा कार्याला जायचो तर साधे वरण-भात, भाजी-पोळीचे जेवण मिळायचे, त्यातही बाजारात स्वस्त मिळणाऱ्या बटाटा आणि वांग्यावर भर जास्त..! पण त्याचे पण कौतुक वाटायचे, सकाळी नाश्ता म्हणून दिलेला पाणी जास्त असलेला चहा आणि पार्ले जी चा छोटा पुडा किंवा एक आलूबंडा किंवा एक प्लेट कमी तेलाचा पोहा म्हणजे मेजवानी वाटायची, दुपारी मिळणारा कुरमुर्यात तिखट-मीठ आणि कांदा घालून दिलेला कच्चा चिवड्याचे अप्रूप वाटायचे, पण आता शाहीनबाग आणि हे शेतकरी आंदोलनाचे आयोजन, आहार व्यवस्थापन बघितले आणि संघ आजपर्यंत आपल्याला काहीच देत नव्हता याचे दुःख होत आहे. 

फक्त एकच गोष्ट मला कळली नाही जी संघाच्या बाबतीत मला माहित आहे, ती म्हणजे संघ जेव्हा कोणता कार्यक्रम आयोजित करते त्याचे शुल्क आमच्या खिशातून काढतो ! शाहीनबाग किंवा या शेतकरी आंदोलनाचे आयोजक इतका मोठा खर्च कोणाच्या खिशातून काढत असतील हो ? 

टिप्पण्या