"शेतकऱ्यांना "वर्क फ्रॉम होम" करता येईल असे संशोधन करा" या मुळायमंत्र्यांच्या वक्तव्या वरून प्रचंड गदारोळ सुरू आहे. अनेक मुख्यमंत्री समर्थकांना एका एकी असे काही आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने होऊ शकते यावर प्रचंड विश्वास आहे. तर अनेकांना भारतीय लोक आधुनिक तंत्रज्ञानाशी फटकून वागतात याचा साक्षात्कार झाला आहे. गंमत म्हणजे आज मुख्यमंत्र्यांच्या शेतीविषयक तंत्रज्ञानावर त्यांची पाठ थोपटणारे बहुसंख्य मात्र पंतप्रधानांच्या गटाराच्या पाण्यापासून गॅस, हवेतून ऑक्सिजन आणि वातावरणाच्या आद्रतेतुन पाणी मिळवण्याच्या जगभरात आधीच यशस्वी झालेल्या तंत्रज्ञानाला मात्र हास्यास्पद मानत होते.
अनेकांना या मुख्यमंत्र्यांना झालेल्या ट्रोलिंगमुळे भारतीय आधुनिक तंत्रज्ञानाकडे कशी पाठ फिरवतात वगैरे वगैरे गोष्टी आठवायला लागल्या आहेत. तर काही जणांना १९५७ साली आलेला तद्दन बिनडोक समाजवादी कथानक असलेला "नया दौर" वगैरे चित्रपटाचे कथानक आठवायला लागले आहे. मात्र "नया दौर" चित्रपटात फक्त खलनायकाने आणलेल्या मोटार बसला विरोध होता असा त्यांचा समज असेल तर खरेच कठीण आहे. त्या कथानकातील खरा मुद्दा गावात बस परीचालीत केल्यावर किती टांगेवाले एका फटक्यात बेरोजगार होतील हा होता. अर्थात ही बेरोजगारी हाच बस उभी करणारा खलनायक कारखाना काढून कमी करू शकत होता. मात्र मग भांडवलशाहीचा झालेला विजय कसे दाखवू शकणार होते भारतीय चित्रपटवाले?
असो, तर मुद्दा हा आहे की भारतीय आधुनिकी करण आणि तंत्रज्ञाना कडे पाठ फिरवतात हा पण खूप मोठा गैरसमज आहे. अर्थात नवीन तंत्रज्ञान आल्यावर त्या कडे शाशंकपणे बघणे ही फक्त भारतीय मानसिकता नाही तर जागतिक मानसिकता आहे आणि ती मानवीमना करता स्वाभाविक आहे. हे खरे आहे की "नया दौर" सारखे कथानक सुचणाऱ्या काही विचारवंतांच्या विचारांनी आधुनिकता आणि तंत्रज्ञाना विषयी काही काळ भारतातील मोठी जनता भारलेली होती, पण हा काळ पण मागे सरला आहे. आज भारतीय जनता आधुनिक तंत्रज्ञान हाताळण्यास पुढाकार घेणाऱ्या काही देशातील नागरिकांच्या पंक्तीत बसले आहे. जगातील अनेक कंपन्या नवीन आधुनिक तंत्रज्ञान जगात किती लोकप्रिय होईल याचा अंदाज काढायला ते भारतीय जनतेच्या अभिप्रायावर ठरवतात हे पण आपण विसरू नये. पण असे आधुनिक तंत्रज्ञान आणल्यामुळे शेती घरी बसून करता येईल?
सगळ्यात आधी तर आपण हे लक्षात घेतले पाहिजे की आधुनिकरण केल्याने, संगणकीयकरण केल्याने जगातील प्रत्येक काम १००% घरी बसून करता येईल हे म्हणणे हास्यास्पद आहे. त्यातल्या त्यात शेती घरी बसून करता येते म्हणणे म्हणणारे थोर आहेत. होय शेतीची काही कामे घरी बसून करणे आजही शक्य आहे. उदाहरणार्थ शेतीला पाणी देणे, शेतीतील पंप सुरू करणे आणि बंद करणे इतकेच काम असेल तर ते नक्कीच घरी बसून तंत्रज्ञानाच्या साहाय्याने करता येते. मात्र शेताला आज किती पाण्याची गरज आहे, पंप किती वेळ चालवावा लागेल याची शहानिशा करायला तुम्हाला वावरवर चक्कर तर मरावीच लागेल. अर्थात हे खूप प्राथमिक उदाहरण दिले.
काही वर्षांपूर्वी आपल्या मुख्यमंत्र्यांचे चुलत बंधू आणि आज राजकीय प्रतिस्पर्धी असलेले राज ठाकरे यांनी गाजावाजा करत त्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्राची कल्पना राज्यातील जनतेसमोर ठेवली होती, "महाराष्ट्रातील शेतकरी जीन्स पँट घालून ट्रॅक्टरवर बसून शेतात जाईल असे स्वप्न मी बघत आहे." असे म्हणाले होते. अर्थात यातील ट्रॅक्टर हा आधुनिकतेचे प्रतीक, तर जीन्स घातलेला शेतकरी हा संपन्नतेचे प्रतीक म्हणून होता. मात्र हे सगळे करणार कसे? याचे उत्तर मात्र कोणाकडे नाही. ज्या राज्यात अनेक शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोई उपब्ध नाही. वेळेवर वीजपुरवठा व्हावा, योग्य दाबात व्हावा, बी बियाणे योग्य प्रमाणात आणि मुख्य म्हणजे योग्य पद्धतीने प्रमाणित असलेले उपलब्ध व्हावे, योग्य वेळी युरिया, खते, कीटकनाशके उपलब्ध व्हावे या शेतीच्या मूलभूत गरजा जेव्हा शासन व्यवस्थितपणे भागवू शकत नाही. आजही बेभरवशी मान्सूनवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना आपण योग्य आणि विश्वासहर्त्त हवामानाचा अंदाज देऊ शकत नाही तेव्हा त्याच शेतकऱ्यांसाठी एकदम "वर्क फ्रॉम होम" चे स्वप्न बघणे म्हणजे हास्यास्पद पण ठरणारे आहे. अगदी वर जे शेतीला पाणी घालण्याचे प्राथमिक उदाहरण दिले होते, त्यात संगणकीय प्रणालीची जोड देत शेतावर न जाता पण शेतकरी पाणी देऊ शकतो. मात्र त्या करता त्या संगणकीय प्रणालीला जी हवामानाची माहिती लागेल तीच योग्य मिळाली नाही तर काय? हा प्रश्न आहेच. कारण आज हे सगळे आपला शेतकरी शेतावर उभा राहून आपल्या पारंपरिक आखडे, अंदाज आणि अनुभवाने ठरवतो हे सत्य आहे. बाकी कीड लागली आहे का? तण वाढले आहे का? अजून बरीच शेतीची कामे शेतावर जाऊनच करावी लागणार आहे. होय आधुनिक तंत्रज्ञानाने ती कामे सोपी करता येतील, कमी मजूर लावून करता येतील, मात्र घरात बसून शक्य नाही.
दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे या वरील खर्चाचा ! आधुनिक तंत्रज्ञान वापरावे असे मनात आणले तर त्याचा प्रचंड खर्च आपला गरीब, अल्पभूधारक, कोरडवाहू शेतकरी कसा करणार? आज उपलब्ध तंत्रज्ञान मोठा शेतकरी पण पूर्णतः आमलात आणू शकत नाही ते त्याच्या प्रचंड खर्चामुळे ! मुळातच भारतीय शेती उद्योगाचा सगळ्यात मोठा प्रश्न हा शेतीतील कमी गुंतवणूक हेच आहे. कारण आहे "बेभरवशी उत्पन्न" आणि हे उत्पन्न बेभरशी आहे कारण वर दिल्या प्रमाणे आस्मानी आणि सुलतानी संकट ! बेभरशी मान्सूनचा अंदाज काढता न येणे आणि बी बियानातील फसवणूक थांबवणे, वेळेवर खते आणि कीटकनाशके उपलब्द करून देण्या सारख्या प्राथमिक गरजा पण सरकार पूर्ण करू शकत नाही हे आहे.
आज जगात अमेरिकेत शेती सगळ्यात जास्त आधुनिकीकरण झालेली आहे, याचे कारण तेथील सरकार देत असलेली प्रचंड सबसिडी ! पण अमेरिकेत शेतीवर जगणाऱ्या लोकांची संख्या फक्त १ टक्का आहे. पुन्हा तेथे सतत आधुनिक संशोधनातून एकरी उत्पन्न वाढवायचे यशस्वी प्रयत्न सरकारी आणि खाजगी स्तरावर सुरू असतात. या उलट परिस्थिती भारताची आहे, अजूनही शेतीवर प्रचंड मोठी लोकसंख्या अवलंबून आहे. एकरी उत्पन्न वाढवायच्या बाबतीत आपण चीन, अमेरिका, रशियाच्या जवळपास पण नाही. त्या मुळे गरज आहे ती भारतीय संशोधन करून एकरी उत्पन्न वाढवायची. कार्पोरेट शेतीला प्रोत्साहन देत अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये गुंतवणूक वाढवायची. संशोधन करायची गरज आहे हवामान खात्याच्या मॉडेलवर जेणे करून हवामान खाते जेव्हा पाऊस पडेल म्हणेल तेव्हा ते भाकीत निदान ९९% वेळा तरी खरे निघायला हवे. तेव्हा "वर्क फ्रॉम होम" सारखे विनोदी आणि हास्यास्पद वक्तव्य करण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी त्या पेक्षा शेतकऱ्यांच्या प्राथमिक गरजा दूर करण्यासाठी पावले उचलली तरी बरे.
नाही तर राज्यातील जनता मुंबईचे शांघाय आणि शेतकरी जीन्स घालून वगैरे स्वप्नात मश्गुल आहे असे तुम्हाला वाटत असेल तर आनंद आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा