लढाई नागोर्नो - काराबाखची

आशिया - पूर्व युरोपचा भाग सध्या जागतिक विवादाचे केंद्र बनत आहे. काही देश आपले जुने विवाद बाजूला सारत नवीन परस्पर सहकार्याची सुरवात करत असतांनाच, काही देशांचे जुने विवाद नव्याने तयार होत आहे. एकीकडे भारत - चीन सीमा विवाद गंभीर वळण घेत असतांना आणि दक्षिण चीन समुद्रात असलेले देश चिनी दादागिरी विरोधात एकत्र येत आहेत. तर दुसरीकडे चीन-इराण-पाकिस्थान-तुर्कीस्थान यांची वेगळी युती समोर येत आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की आशिया खंडाच्या एका बाजूने चीन आक्रमक धोरण घेत असतांनाच, खंडाच्या दुसऱ्या बाजूला युरोप पर्यंत पसरलेला तुर्कस्थान सुद्धा तितकेच आक्रमक धोरण अवलंबत आहे. तुर्कस्थानला पुन्हा जुने आपले ऑटोमन साम्राज्य उभे करण्याचे स्वप्न पडत आहे. या मुळे त्याने आता आजूबाजूच्या प्रदेशात आपली उपस्थिती वाढवायला सुरवात केली आहे. एकेकाळी अमेरिकन नाटोचा सदस्य असलेला हा देश आता फ्रांस आणि अमेरिकेला डोळे दाखवत आहे. याचा दबाव तुर्कस्थानच्या शेजारी असलेले युरोपियन देशांवर जसा पडत आहे, तसाच अरब राष्ट्रांवर पडत आहे. 



याच सगळ्याचा परिणाम म्हणून एकेकाळी प्रचंड अश्या सोवियत साम्राज्याचे भाग असलेले आणि आज स्वतंत्र राष्ट्र म्हणून ओळख असलेले दोन देश आर्मेनिया आणि  अझरबैजान एकमेकां विरोधात उभे राहिले आहेत. या दोन देशात नागोर्नो - काराबाख या प्रांतावरून भांडण आहे. अगदी हे दोन्ही देश सोवियत रशियाचे भाग होते तेव्हा पासून. याला धार्मिक किनार पण आहेच. अर्मेनिया हा ख्रिश्चन बहुल देश आहे तर अझरबैजान मुस्लिम बहुल, त्यातही ह्या देशात तुर्की वंशीय मुस्लिमांची वस्ती जास्त आहे. त्याच मुळे या देशाचे तुर्कस्थान सोबत अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहे. इतके की तुर्कस्थानचे विद्यमान राष्ट्रपती एर्दोआन यांनी तर या दोन देशांच्या संबंधा बद्दल बोलतांना "दोन देश एक राष्ट्र" अशी ओळख दिली आहे. १९९१ मध्ये स्वातंत्र्य मिळवल्यावर अझरबैजानला मान्यता देणारा तुर्कस्थान हा पहिला देश होता. 



यांचा विवाद आहे तो नागोर्नो - काराबाख या भागावरून. दक्षिण-पूर्व युरोपमध्ये येणारी कोकेशस पर्वतराजी या भागात आहे. ही पर्वतराजी सामरिक दृष्ट्या महत्वाची आहेत. याचमुळे या कोकेशस पर्वतराजीवर अधिकार गाजवायचा संघर्ष हा खूप जुना आहे आणि तत्कालीन ख्रिश्चन आणि मुस्लिम दोन्ही गट या भागावर आपले वर्सस्व प्रस्थापित करण्यास तेव्हा पासून प्रयत्नरत आहेत. सोबतच या भागातून खनिज तेल आणि वायू वाहून नेणाऱ्या पाईपलाईन जातात त्या मुळे या प्रदेशाला चांगलेच महत्व आहे. पण महाशक्ती असलेले देश कशी पाचर मारून ठेवतात याचेही हा भाग चांगले उदाहरण आहे. 



१९२० साली जेव्हा सोवियत युनियन निर्माण झाला तेव्हा अर्मेनिया आणि अझरबैजान हे दोन्ही देश या सोवियत युनियनमध्ये सामील झाले. या देशांना सोवियत युनियन अंतर्गत गणराज्याचा दर्जा होता. नागोर्नो - काराबाखमध्ये बहुसंख्येने अर्मेनियन मूळचे लोक राहतात. साहजिकच त्यांचा कल हा अर्मेनियाकडे जास्त होता. मात्र तत्कालीन सोवियत युनियनच्या अधिकाऱ्यांनी या भागाला प्रशासकीय सोई साठी अझरबैजान सोबत जोडले. नागोर्नो - काराबाख मधील नागरिकांनी तेव्हा पण आपला विरोध तत्कालीन सोवियत रशिया कडे नोंदवला होता. मात्र सोवियत युनियनने त्यांच्या मागणी कडे कधी लक्ष दिले नाही. मात्र ८० च्या दशकात जेव्हा सोवियत युनियन कमकुवत व्हायला सुरुवात झाली तेव्हा नागोर्नो - काराबाखचा वाद पुन्हा उफाळून आला. अर्मेनिया - अझरबैजान मध्ये या भागावरून संघर्ष सुरू झाला. या धामधुमीत नागोर्नो - काराबाख मधील अर्मेनियन समर्थकांनी काही भागावर नियंत्रण प्राप्त केले. दरम्यानच्या काळात सोवियत युनियन १९९० मध्ये कोसळले. अर्मेनिया - अझरबैजान हे दोन्ही देशांना स्वातंत्र्य मिळाले आणि हा संघर्ष अधिक घातक झाला. साधारण १९९४ पर्यंत हा संघर्ष सुरू होता. १९९४ साली दोन्ही देश युद्धबंदी करायला राजी झाले आणि युद्ध संपले. मात्र तो पर्यंत अर्मेनिया समर्थकांनी नागोर्नो - काराबाखच्या बहुतांश भागावर नियंत्रण प्राप्त केले होते. त्यांनी स्वतःला स्वायत्त प्रांत घोषित केले. पण अर्मेनियन बहुसंख्य असल्यामुळे नागोर्नो - काराबाख स्वायत्त सरकारवर नेहमीच अर्मेनियन लोकांचे वर्चस्व राहिले आणि त्यांचा कल अर्मेनियाकडे असल्यामुळे या भागावर नेहमीच अर्मेनियन प्रभाव कायम राहिला, म्हणजे अप्रत्यक्षपणे या भागावर अर्मेनिया देशाचे नियंत्रण राहिले. हीच गोष्ट अझरबैजानच्या सरकारच्या आणि जनतेच्या पण डोळ्यात सतत खुपत होती. त्यातून याच कारणाने दोन देशातील या भागाच्या नियंत्रणाच्या भांडणातुन सुरू असलेले युद्ध थांबले असले तरी नागोर्नो - काराबाख  मध्ये धार्मिक दंगली अधून मधून होतच होत्या. यातूनच २०१६ साली पुन्हा दोन्ही देश एकमेकांसमोर उभे ठाकले होते. तेव्हा एक छोटी मात्र भीषण लढाई झाली होती. मात्र रशियाने मध्यस्थी करत हा संघर्ष थांबवला. 



मात्र जुलै २०२० मध्ये या दोन देशात पुन्हा संघर्ष उफाळून आला होता. यात अझरबैजानच्या सैन्याला मनुष्यहानी सहन करावी लागली होती. या संघर्षानंतर अझरबैजानमध्ये जनतेने जागोजागी धरणे देत सरकारला नागोर्नो - काराबाखवर आक्रमण करून हा भाग देशाला जोडून घ्यायचा दबाव बनवायला सुरू केले होते. हा संघर्ष इतक्या टोकाचा आहे की समजा तुम्ही पर्यटक म्हणून अर्मेनिया देशात गेलात आणि त्या देशाचा भाग म्हणून नागोर्नो - काराबाख मध्ये पण फिरून आलात तर तुम्हाला आझरबैजान मध्ये प्रवेश नाकारल्या जातो आणि तुम्ही या भागातील आपला प्रवेश लपवून अझरबैजान मध्ये गेलात, नंतर त्या देशाच्या अधिकाऱ्यांना तुमच्या नागोर्नो - काराबाखच्या पर्यटना विषयी कळले तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई करत कारागृहात टाकल्या जाऊ शकतोच पण आजन्म तुमच्यावर देशात प्रवेश करायची बंदी पण लावली जाते. 



तर आता पुन्हा या नागोर्नो - काराबाखवरून दोन्ही देश एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. पण या वेळेस या संघर्षात या दोन देशांसोबत तुर्कस्थानपण अझरबैजान कडून उतरला आहे. अर्मेनियाने तर तुर्कस्थान थेट लढाईत सहभागी असल्याचा आरोप केला आहे. मात्र तुर्कस्थानने हा आरोप फेटाळून लावला आहे. मात्र त्याने अझरबैजानला शस्त्र आणि दारूगोळ्याची संपूर्ण मदत पुरवली आहे. याच मूळे या संघर्षात आता रशिया आणि इराण पण उतरतील अशी भीती अभ्यासक वर्तवत आहे. तसे झाले तर हा संघर्ष उग्ररूप तर घेईलच पण युद्ध अजून चिघळेल. येत असलेल्या बातमी नुसार पाकिस्थान आणि तुर्कस्थाची युती या युद्धात मोठ्या प्रमाणावर इस्लामी अतिरेकी, ISIS चे अतिरेकी अझरबैजानच्या बाजूने उतरवण्याचा प्रयत्न करत आहेत. असे झाले तर याची झळ रशिया आणि इराणला पण बसेल. आपले वर्चस्व असलेल्या भागात असले उद्योग रशिया नक्कीच खपवून घेणार नाही. आयसिस सारखी कट्टर सुन्नी इस्लामी अतिरेकी संघटनेची झळ शिया इराणला पण बसणार यात काही शंका नाही. मात्र त्याच बरोबर पूर्व सोवियत युनियन मधील इस्लाम बहुल देश जे सध्या तरी काहीसे मवाळ आहेत, त्या देशात आता कट्टरतावाद फोफावेल ही पण भीती तयार झाली आहे.



यात अर्मेनिया सोबत आपल्या देशाचे चांगले संबंध आहेत. तसेच हा देश आपल्या लष्करी उत्पादनाचा ग्राहक पण आहे. भारताने विकसित केलेले "स्वाती वेपण लोकेटेड रडार सिस्टीम" ने अर्मेनियाला चांगलाच फायदा होत असल्याचा दावा त्या देशाने केला आहे. या "स्वाती" मुळेच अझरबैजानला आपल्या चार हेलिकॉप्टर, ड्रोन, १० रणगाडे आणि सैनिकांची हानी सोसावी लागल्याचा दावा केला जात आहे. अर्थातच सध्या तरी अझरबैजानने हा दावा फेटाळून लावला आहे. मात्र भारतीय "स्वाती" रणांगणावर चांगले काम करत असल्याची ही पावती आहे. पण या संघर्षाने रशिया, तुर्कस्थान मुळे व्यापक रूप घेतले तर जगासाठी पण गंभीर स्थिती तयार होऊ शकते हे नक्की !

टिप्पण्या