आपण मागच्या लेखात जगातील पहिली "मेट्रो रेल्वे" आणि त्याची वाटचाल बघितली. या लंडन येथील मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू झाल्या बरोबरच ही कल्पना जगातील अनेक देशांनी आणि मोठ्या शहरांनी उचलून धरली. जगातील अनेक शहरात एक तर असे "मेट्रो रेल्वे प्रकल्पांचे" बांधकाम सुरू झाले किंवा या प्रकल्पाचे नियोजन सुरू झाले.
याचा परिणाम असा झाला की १८९० मध्ये लंडन शहरात पहिली मेट्रो रेल्वे धावल्या नंतर १९०० पर्यंत ४ मोठ्या शहरात "मेट्रो रेल्वे" सुरू झाली. अर्थात ही सगळी शहरे युरोप आणि अमेरिकेतीलच होती. लंडन नंतर दुसरी "मेट्रो रेल्वे" हंगेरीची राजधानी बुडापेस्ट शहरात २ मे १८९६ मध्ये एकूण ५ किलोमीटर अंतर ही "मेट्रो रेल्वे" चालायला लागली. आज बुडापेस्ट मेट्रो एकूण ४ मार्गावर, एकूण ३९.७ किलोमीटर आणि ५२ स्थानकांसह ही मेट्रो सेवा देत आहे.
इंग्लंड मधील दुसरे मोठे शहर ग्लासगो येथे याच वर्षात म्हणजे १४ डिसेंबर१८९६ मध्ये "मेट्रो रेल" सुरू झाली. ही जगातील ३ ऱ्या क्रमांकाची मेट्रो रेल्वे! या "मेट्रो रेल्वे" चे वैशिष्ट्य म्हणजे ही १०.५ किलोमीटर धावणारी वर्तुळाकार मेट्रो रेल्वे सेवा आहे. आजही ही मेट्रो तेवढ्याच मार्गावर सुरू आहे.
या नंतर अमेरिकेतील औद्योगिक शहर शिकागो येथे ६ जून १८९२ ला अमेरिकेतील पहिली आणि जगातील ४ थी मेट्रो रेल्वे सेवा सुरू झाली. ही सेवा ३९ स्ट्रीट स्थानक ते काँग्रेस स्ट्रीट टर्मिनल्स या स्थानका दरम्यान सुरू झाली. या मेट्रो रेल्वे सेवेला "L" या इंग्रजी अद्याक्षराने ओळखतात इंग्रजी शब्द "एलोव्हेटेड" या शब्दाचे पहिले अक्षर, ही मेट्रो पूर्णतः "उन्नत मार्गावर" धावते. साधारण ५.७ किलोमीटरचा हा मार्ग मेट्रो रेल्वेने १४ मिनिटात पार केला. आज शीकागो मेट्रो रेल्वे एकूण ८ मार्गांवर, १४५ स्थानकांसह, १६५.४ किलोमीटर अंतरावर आपली सेवा देत आहे.
या नंतर १९ जुलै १९०० रोजी फ्रांसची राजधानी पॅरिस येथे "मेट्रो रेल्वे" सुरू झाली. ही जगातील ५ वी मेट्रो रेल्वे सेवा आहे. पोर्ट मैलोट (Porte Maillot) ते पोर्ट दे विंन्सेंस (Porte de Vincennes) या दोन स्थानका दरम्यान जवळपास १०.१ किलोमीटर मार्गावर ही मेट्रो रेल्वे सेवा सुरू करण्यात आली. आज एकूण १६ मार्गांवर, ३०२ स्थानकांसह जवळपास २१४ किलोमीटर अंतरावर पॅरिस मेट्रो आपली सेवा देत आहे.
जगातील ६ वी मेट्रो रेल्वे सेवा म्हणून आपण बोस्टन मेट्रोचे नाव घेऊ शकतो. या सेवेला अधिकृत पणे १९०१ मध्ये "मेट्रो रेल्वे" म्हणून मान्यता मिळाली. पण ही सेवा १८९७ पासूनच बायलस्टोन ते पार्क स्ट्रीट या स्थानकां दरम्यान सुरू झाली होती. मात्र ही रेल्वे नव्हती, तर ट्राम सारखी बस सेवा होती. बोस्टन मेट्रो ही पहिली अशी सेवा आहे ज्यात लाईट मेट्रो, हेवी मेट्रो आणि बस मेट्रो या तिनही प्रकारच्या मेट्रो सेवा सुरू झाल्या, सोबतच ही भुयारी आणि उन्नत या दोन्ही मार्गांचा उपयोग करणारी आहे. आज बोस्टन मेट्रो ३ मार्ग हेवी मेट्रो रेल्वे, २ मार्ग लाईट मेट्रो रेल्वे आणि १ मार्ग BRT (बस मार्ग) अश्या एकूण ६ मार्गावर सेवा देत आहे. एकूण १२६ किलोमीटर अंतरावर, प्रस्तावित ६ स्थानकांसह १३३ स्थानकांवर ही बोस्टन मेट्रो आपली सेवा देत आहे.
या नंतर क्रमांक येतो तो जर्मनीची राजधानी बर्लिन मेट्रोचा. जगातील ही ७ वी मेट्रो रेल्वे सेवा! १५ फेब्रुवारी १९०२ मध्ये स्ट्रालॉएर टॉर आणि जूलोगिसेर गार्टन या स्थानकां दरम्यान ही सेवा सुरू झाली. आज एकूण १० मार्गांवर, १५७.७ किलोमीटर अंतरावर, एकूण १७३ स्थानकांवर ही मेट्रो रेल्वे प्रवासी सेवा देत आहे.८ व्या क्रमांकावर आहे ग्रीसची राजधानी अथेन्स शहरातील अथेन्स मेट्रो रेल्वे. तसे १८६९ मध्येच कोळशाच्या इंजिनव्दारे उपनगरीय रेल्वे गाड्या अथेन्स शहरात शहरा अंतर्गत वाहतुकीसाठी चालवायला सुरवात झाली. मात्र १९०४ मध्ये खऱ्या अर्थाने विजेवर चालणाऱ्या रेल्वे सोबत मेट्रो रेल्वे इथे चालायला लागली. पीरियस और थेइओ या जवळपास ७.९ किलोमीटर मार्गावर ही रेल्वे पहिले वाफेच्या इंजिनवर आणि नंतर विजेवर मेट्रो रेल्वे म्हणून चालवली गेली. नंतर हाच मार्ग १९५७ पर्यंत किफिशिया या स्थानका पर्यंत वाढवण्यात आला. गंमतीची गोष्ट अशी की २००० साला पर्यंत मेट्रो रेल्वेच्या मार्गांमध्ये कोणतीही वाढ झाली नाही. त्या नंतर आज पर्यंत अथेन्स मेट्रो आपल्या उपनगरीय वाहतूक मार्गा सोबत एकूण ३ मार्गांवर, ६ प्रस्तावित स्थानकासकट ६१ स्थानकांच्या साह्याने एकूण १९०.७ किलोमीटर मार्गावर आपली सेवा देत आहे.जगातील ९ वी मेट्रो रेल्वे सुरू झाली अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात. २७ ऑक्टोम्बर १९०४ या तारखेला १४.६ किलोमीटरची "मॅनहट्टन मेन लाईन" नावाने सिटी हॉल स्थानक ते ४२ अव्हेन्यू स्थानका पर्यंत सुरू झाली. या मेट्रो रेल्वेला "न्यूयॉर्क सबवे" म्हणून ओळखल्या जाते. आज न्यूयॉर्क मेट्रो रेल्वे एकूण ३६ मार्गांवर १४ प्रस्तावित स्थानकांसह ४७२ स्थानकांवर आणि ३९४ किलोमीटर मार्गावर आपली सेवा देत आहे. आज जगातील सगळ्यात मोठ्या मेट्रो सेवेत या मेट्रो रेल्वेचा समावेश होतो.जगातील १० वी मेट्रो रेल्वे धावली ती पण अमेरिकेतील फिलेडेलफिया या शहरात. फिलेडेलफिया मार्केट ते फ्रँकफोर्ट (MFL) या मार्गावर १९०७ साली सुरू झाली. आज २० किलोमीटर लांबीच्या २ मार्गांवर ही मेट्रो रेल्वे चालत आहे. मात्र या मेट्रो परिवहन मध्ये बस, ट्राम सोबत त्याचे संचलन केले जाते.
या आहेत जगातील पहिल्या १० मेट्रो रेल्वे सेवा आहेत. १८९० पासून १९०७ पर्यंत मेट्रो रेल्वे जगात चांगलीच लोकप्रिय झाली. त्या सोबत मेट्रो रेल्वे अजून जगातील वेगवेगळ्या शहरात मेट्रो रेल्वे सेवा सुरू झाल्या.
११) जर्मनीच्या हम्बर्ग या शहरात १९१२ साली,
१२) अर्जेंटिना देशाची राजधानी ब्रूनस आयस येथे १९१३ साली,
१३) स्पेनची राजधानी माद्रिद येथे १९१९ साली,
१४) स्पेन मध्येच बार्सलना या शहरात १९२४ साली,
१५) जपानची राजधानी टोकियो या शहरात १९२७ साली,
१६) जपानच्या ओसोका या शहरात १९३३ साली,
१७) रशियाची राजधानी मॉस्को येथे १९३५ साली,
१८) स्वीडनची राजधानी स्टोकहोम येथे १९५० साली,
१९) कॅनडाचे शहर टोरांटो येथे १९५४ साली,
२०) इटलीच्या रोम मध्ये १९५५ साली मेट्रो रेल्वे सेवा सुरू झाली.
पण असे नाही की प्रत्येक वेळेस मेट्रो रेल्वे शहराच्या उपयोगतेत भरच घालत होती. एका शहराला मेट्रो रेल्वे चालवण्याचा खर्च पण परवडेनासा झाला होता, या बाबत आपण पुढच्या लेखात बघूच सोबत जगातील मोठ्या मेट्रो जाळ्याची दहा शहरे पण बघू.
खूप छान माहिती
उत्तर द्याहटवा