आज भारतातील दिल्ली, कलकत्ता, मुंबई, चेन्नई सकट साधारण १३ शहरांमध्ये सार्वजनिक वाहतुकीच्या क्षेत्रात क्रांतिकारी आणि अत्याधुनिक व्यवस्था म्हणून आपण "मेट्रो रेल्वे" कडे बघतो. जागतिक शहरीकरणाच्या दर्जाच्या विचार करताना त्या त्या देशात किती किलोमीटर "मेट्रो रेल्वे"चे जाळे आहे ही आकडेवारी अत्यंत असणे अत्यंत गरजेचे असते. त्याच मुळे "मेट्रो रेल्वे" ही फक्त फॅड किंवा श्रीमंतांची मक्तेदारी नसून, शहरातील सर्वसामान्य चाकरमनींसाठी शहरांतर्गत प्रवास करण्यासाठी वेगवान आणि आरामदायी पर्याय आहे. त्याच मुळे मेट्रो रेल्वेची सुरवात आणि त्याची जागतिक व्याप्ती बघणे मनोरंजक ठरते. भारतात "मेट्रो रेल्वेचा" विकास जरी उशिरा सुरू झाला असला तरी भारताने जागतिक स्तरावर काही मापदंड नक्कीच तयार केले आहे, त्याचाही मागोवा आपण घेऊ.साधारण १८५० साला पर्यंत इंग्लंडच्या ईस्ट इंडिया कंपनीने संपूर्ण भारत आपल्या पंखाखाली घेतला होता. औद्योगिक क्रांती, उपनिवेशिक देशातून स्वस्तात उपलब्ध कच्चा माल आणि जागतिक राजकारणात वाढलेले वजन या सगळ्याचा परिणाम म्हणून इंग्लड देशाची भरभराट होत होती. परिणामी इंग्लंड मधील शहरे पण वाढत होती. देशाची राजधानी असलेले लंडन समोर आता आधुनिक युगाच्या समस्या यायला सुरुवात झाली.घोडा गाडी, बस, ट्राम, मोटर गाड्या या सोबतच शहरातील सार्वजनिक वाहतूक सुरळीत व्हावी आणि मुख्य म्हणजे ती सर्वसामान्य शहर वासीयांना परवडणारी असावी असा विचार सुरू झाला. तसे तर लंडन शहराच्या चारी बाजूंनी रेल्वे स्टेशन होते. पण उपनगरातून मुख्य शहराच्या मध्यापर्यंत पोहचणे जिकरीचे होत होते आणि मुख्य म्हणजे या वर आताच उपाय नाही शोधला तर भविष्यात वाहतुकीच्या गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागेल हे स्पष्ट दिसत होते.
शेवटी या समस्येचा सामधान शोधण्यासाठी १८५५ मध्ये एक समिती स्थापन करण्यात आली. अनेक उपाय अनेकांनी सुचवले आणि समितीने समीक्षा केली, पण शेवटी भूमिगत रेल्वे चालवून शहराच्या मध्य भागात प्रवासी वाहतूक करावी या प्रस्तावावर या समितीतील सगळ्यांचे एकमत झाले आणि या वर काम सुरू झाले. भारतात तेव्हा नुकतीच रेल्वे मुंबई ते ठाणे धावली होती, तर १९५७ च्या पहिल्या स्वातंत्र्य युद्धाने इंग्लंडला पहिला जोरदार तडाखा दिल्या गेला होता.१० जानेवारी १८६३ मध्ये लंडन मधील पैडींटन ते फैरीन्टन या दोन भागाला जोडणारी पहिली भूमिगत रेल्वे सुरू झाली आणि पहिल्याच दिवशी जवळपास चाळीस हजार लोकांनी या सेवेचा लाभ घेतला आणि लवकरच लोकप्रिय पण झाली. यालाच आपण आज लंडनची "लंडन अंडरग्राऊंड" किंवा "ट्यूब रेल्वे" म्हणून ओळखतो.ही जगभरातील मोठ्या शहरात सार्वजनिक वाहतुकीत मानाचे स्थान मिळवणाऱ्या "मेट्रो रेल्वेची" सुरवात! अर्थात आता जश्या विजेवर चालणाऱ्या, वातानुकूलित मेट्रो धावतांना दिसतात तशी परिस्थिती तेव्हा नव्हती. लंडन मधील पहिली मेट्रो किंवा ट्यूब रेल्वे धावली कोळशाच्या इंजिनवर!लवकरच लंडन मधील भूमिगत रेल्वे मार्गाचे जाळे वाढायला लागले, सोबतच गाड्यांची संख्या आणि प्रवासी भार पण. भूमिगत बोगद्यात कोळसा इंजिनाचा धूर साठू नये म्हणून व्हेटिलेटर्सची सोय केली असली तरी ती अपुरी होती. अशातच एका बोगद्यात दोन गाड्या आजूबाजूने जातांना इंजिनाचा धूर वाढला आणि उपलब्द व्हेंटिलेटर्स तो धूर बाहेर काढायला अपुरे पडले, त्या मुळे अनेक प्रवाश्यांचा गुदमरून मृत्यू झाला. या समस्येवर एक नवीन उपाय शोधला गेला, १९०५ पासून लंडनची "ट्यूब रेल्वे" विजेवर चालायला लागली आणि खऱ्या अर्थाने स्वच्छ, प्रदूषण विरहित, आधुनिक आणि स्वस्त सार्वजनिक वाहतुकीचा जन्म झाला. "लंडन मेट्रो" च्या जमिनी खालील स्थानकाचा उपयोग दुसऱ्या महायुद्धात जेव्हा लँडनवर जर्मन विमाने बॉब फेक करत होती तेव्हा लंडनकरांचे आश्रयस्थान म्हणून पण झाला. आज जगातील सगळ्यात आधुनिक मेट्रो म्हणून "लंडन ट्यूब" ओळखली जाते. आज एकूण ११ मार्ग , ४०२ किलोमीटर आणि २७० स्थानक या मेट्रो रेल्वेच्या जाळ्यात आहे आणि जवळ पास ५० लाख प्रवासी रोज प्रवास करतात."लंडन अंडरग्राऊंड" च्या यशा मुळे जगभरातील मोठ्या शहरात मेट्रो रेल्वे उभारण्याचे काम जोमात सुरू झाले या नंतर पॅरिस, न्यूयॉर्क, मस्को अनेक शहरांनी मेट्रोचे जाळे उभे केले. आधुनिक शहराची ओळख म्हणून "मेट्रो रेल्वे" कडे बघितले गेले आणि अनेक शहरात हे वाहतुकीचे साधन अत्यंत लोकप्रिय झाले. मेट्रोच्या लोकप्रियतेत अनेक वळणे पण आली. ती पण बघू "मेट्रो रेल्वे" च्या पुढील लेखात. या पुढे जगातील काही महत्वाच्या "मेट्रो रेल्वे" ची माहिती देईल सोबतच भारतातील "मेट्रो रेल्वे" ची सुरवात आणि आव्हाने याची पण माहिती घेऊ.
छान माहिती
उत्तर द्याहटवाधन्यवाद
उत्तर द्याहटवा