"मेट्रो रेल्वे" आणि आपण - ( भाग - ४ )

गेल्या तीन भागात आपण जगातील मेट्रो रेल्वेची सुरवात आणि अल्पावधीत जगभरात मिळवलेली लोकप्रियता आपण बघितली. तसेच जागतिक स्तरावर कोणत्या मेट्रो सेवेचे मोठे जाळे कुठे कुठे आहे हे पण बघितले. पण या बरोबरच हॉंगकॉंग, टोकियो सकट अनेक मेट्रो रेल्वे त्यांच्या आधुनिकीकरणासाठी पण ओळखल्या जातात. जगातील सगळ्यात मोठ्या मेट्रो रेल्वे जाळ्यामध्ये दिल्ली मेट्रो असणे हे आपल्यासाठी आनंद आणि अभिमानाची गोष्ट असली, तरी आपल्या कडे फक्त एकच मेट्रो कशी याचाही मागोवा घेणे आवश्यक ठरेल.

भारतात मेट्रो रेल्वे असावी असा विचार प्रथम आला तो १९२१ मध्ये ! आश्चर्य वाटले ना...मला पण असेच वाटले होते. पण "द टेलिग्राफ" या दैनिकाने दिलेल्या २३ ऑगस्ट २०१४ च्या एका बातमीनुसार ११२१ साली लंडन ट्यूब रेल्वेच्या पीकॉडली सेक्शनच्या बांधकामात सक्रिय असणारे हर्ली डारीबल फे नावाचे अभियंता कलकत्ता येथे आले असता, त्यांनी "कलकत्ता ट्यूब" ची कल्पना मांडली. मार्गाचे सर्वेक्षण आणि खर्चाचा अहवाल पण देण्यात आला. कलकत्ता शहर तत्कालीन काळात भारतातील वेगाने वाढणारे आणि ब्रिटिशांसाठी महत्वाचे शहर होते. तेव्हा शहराचा विकास होईल अशी ही योजना मंजुरीकरता पाठवण्यात आली. प्रथम चरणात या योजनेला मंजुरीपण मिळाली. मात्र नंतर महायुद्धाच्या कारणामुळे निधी मंजूर झाला नाही. परिणामी १९२३ साली ही योजना पूर्णतः गुंडाळण्यात आली.


भारताला स्वातंत्र्य मिळाल्या नंतर १९६० - ६५ च्या दशकात पुन्हा कलकत्ता शहरातील वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आल्यावर मेट्रो रेल्वेचे विचार डोक्यात यायला लागले. ६० च्या दशकात कलकत्ता शहरात आता रस्ते मोठे करायला जागाच शिल्लक नाही तेव्हा शहराची वाहतुकीची समस्या अजून कठीण जाईल यावर सगळ्यांचे एकमत झाले. त्याच सोबत वेगवेगळ्या देशांच्या अभियंताना मेट्रो रेल्वेच्या सर्वेक्षणाच्या कामाकरता आमंत्रित पण केल्या गेले. या आमंत्रणाला सकारात्मक प्रतिसाद सर्वप्रथम दिल्या गेला फ्रांस कडून ! पहिले फ्रांस रेल्वेचे एक दल येऊन सर्वेक्षण करून गेले. मात्र यानंतर पुन्हा सगळे थंड बसत्यात गेले. शेवटी १९६९ साली मेट्रोपोलिटन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (MTP) भारतीय रेल्वेच्याच आखतीऱ्यात स्थापन केल्या गेले. १९७१ साली या MTP ने तत्कालीन सोवियत रशिया आणि पूर्व जर्मनीच्या अभियंत्यांच्या चमुच्या मदतीने कलकत्त्यात पुन्हा सर्वेक्षण सुरू केले. लवकरच या चमुच्या मदतीने MTP ने कलकत्ता शहरासाठी ५ मार्गिका असणाऱ्या जवळपास ९८ किलोमीटरच्या मार्गांचा एक अहवाल समोर ठेवला. पण तत्कालीन सरकारने यातील तीन मार्गांना पहिल्यांदा मंजुरी दिली. 

१) दमदम - टॉलीगंज मार्गिका

२) सॉल्टलेक सिटी - रामगंजताला (हावडा)

३) ठाकुरपुकुर - दक्षिणेश्वर
१९७२ साली भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी दमदम - टॉलीगंज मार्गाच्या कामाचे भूमिपूजन करत देशाला एका नवीन आणि आधुनिक शहरी प्रवासी युगाचा प्रारंभ केला.
मात्र काम सुरू झाले आणि कलकत्ता शहरातील लोकांना एका नवीन त्रासाला तोंड द्यावे लागले. तेव्हाच्या कामाच्या उपलब्द साधनानुसार जमिनीवरून खोदत खोलात जायचे आणि जमिनीखाली बांधकाम करून मग वरून पुन्हा भराव टाकायचा (कट अँड कव्हर पद्धती) या पद्धतीने काम सुरू झाले. शहरातील अत्यंत गजबजलेल्या आणि महत्वाच्या मार्गांखालून हा मेट्रो रेल मार्ग बनत असल्यामुळे सहाजिकच याचा परिणाम शहरातील वाहतुकीवर प्रचंड प्रमाणात होत होता. परिणामी कामाच्या वेळेत वाढ होत होती आणि खर्चात पण! हे काम भारतीय रेल्वेच्या हातात असल्यामुळे या मेट्रो रेल्वेच्या कामा करता वेगळ्या निधी दिल्या जात नव्हता, रेल्वेला सरकार जो एकूण निधी द्यायचे त्यातूनच या मेट्रो रेल्वे करता निधी अवंटीत केल्या जाई. परिणामी निधी टंचाईचा सामना पण या कामासाठी सतत व्हायला लागला. सोबतच अतिक्रमण आणि इतर समस्या या मेट्रो रेल्वेच्या कामात अडथळे आणत होत्याच.
सरते शेवटी २४ ऑक्टोबर १९८४ साली भारतातील पहिली मेट्रो रेल्वे धावली. एक्सप्लेनडेड ते भोवानीपूर म्हणजे आताचे नेताजी भवन स्थानक या दरम्यान धावली. अंतर होते ३.४० किलोमीटर. आज पर्यंत कलकत्ता शहरात अंतर्गत वाहतुकी करता भरतीय रेल्वेची उपनगरीय रेल्वे गाड्या, ट्राम्स, बसेस, टॅक्सी, कलकत्ता विशेष हातरीक्षा सोबत आता कलकत्ता वासीयांना मेट्रो रेल्वेचा पण प्रवास उपलब्ध झाला. हा प्रवास काहीसा सुखद असला तरी आता असतो तसा वातानुकूलित नव्हता बरे !
पण कलकत्ता मेट्रो रेल्वे सुरू होणे हा देशाच्या मानात भर टाकणारा नक्कीच होता. या कलकत्ता मेट्रोच्या कामातून आपल्या देशाला एक रत्न मिळाले, ज्याने पुढे भारतातील तमाम मेट्रो रेल्वे करता महामार्ग तयार केला त्यांचे नाव मेट्रो मॅन ई श्रीधरन ! पण कलकत्ता मेट्रो रेल्वे योजनेमुळे अजून बऱ्याच अभियांत्रिकी उपलब्धी भारताला मिळाल्या. मुख्य म्हणजे कलकत्ता मेट्रो रेल्वेला उपलब्ध रेक हे भारतात निर्मित रेक होते आणि आहेत. भारत हेवी इलेट्रीकलस लिमिटेड आणि इंटिग्रेल कोच फॅक्टरी, चेन्नई या सार्वजनिक उद्योगांनी कलकत्ता मेट्रोचे रेक बनवले आणि आजही वापरण्यात येत आहेत. आज त्यात वतानुकुलीत मेट्रो रेकची पण भर पडली आहे. एक मात्र प्रकर्षाने लक्षात घेण्यासारखे आहे की हे सगळे रेक आज भारतातील इतर ठिकाणी वापरात येणाऱ्या विदेशी रेक सारखे नाहीये. या रेक मध्ये अनेक तांत्रिक बिघाड वेळोवेळी दिसून आले, कधी दरवाजे वेळेवर उघडत नाही, कधी बंद होत नाही, कधी डब्यातील दिवे बंद होतात, तर कधी वातानुकूलित यंत्रेच बंद होतात, असे अनेक अडथळे सहन करत कलकत्ता वासी आपल्या मेट्रोची सफर करत आहेत.
१९८४ ला सुरू झालेली कलकत्ता मेट्रो रेल्वे या नंतर मात्र सरकारी अनास्थेचा बळी गेली. गेल्या ३६ वर्षात या मेट्रो रेल्वेच्या जाळ्यात फक्त २९.६२ किलोमीटरची भर टाकू शकली. आजच्या घडीला एकूण ३३.०२ किलोमीटर मार्गावर, २ मार्गिकेच्या आणि ३० स्थानकांच्या मदतीने, ४१ वातानुकूलित आणि बिगर वातानुकूलित मेट्रो रेक द्वारे रोज सकाळी ६ ते रात्री १० वाजे पर्यंत ही मेट्रो रेल सेवा कलकत्ता शहराला सेवा देत आहे. आजही कलकत्ता शहरात मोठ्या प्रमाणावर मेट्रो रेल्वेचे जाळे वाढवायचे काम सुरू आहे. एकूण जवळपास ११२ किलोमीटर मार्ग प्रस्तावित आहे. मात्र राज्य आणि केंद्र सरकारच्या अनास्थेची बळी ठरलेली कलकत्ता मेट्रो रेल्वे आपला भारतातील इतर मेट्रो रेल्वे सारखा कायापालट होईल या आशेवर आहे.
पण भारतातील इतर मेट्रो रेल्वे योजना आणि कलकत्ता मेट्रो रेल्वे योजना यात काही मूलभूत फरक आहे आणि भारताला मेट्रो रेल्वेची गरज का? याची माहिती घेऊ आपण पुढच्या लेखात.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा