"मेट्रो रेल्वे" आणि आपण - ( भाग - ३ )

गेल्या दोन लेखात आपण मेट्रो रेल्वेची सुरवात बघितली आणि त्याला मिळणारा अमाप प्रतिसाद पण बघितला. तसेच १८९० पासून १९५५ पर्यंत जगातील वेगवेगळ्या शहरात सुरु झालेल्या मेट्रो रेल्वे बघितल्या. हळूहळू मेट्रो रेल्वे मध्ये पण आधुनिकता यायला लागली. तसेच प्रत्येक शहरातील मेट्रो रेल्वेचे जाळे सुद्धा मोठे व्हायला लागले. आज आपण जगातील मोठे मेट्रो रेल्वेचे जाळे कोणत्या कोणत्या शहरात पसरले आहे. 

न्यूयार्क सबवे

या सूचीतील पहिले नाव आहे अमेरिकेतील न्यूयार्क सबवे ! १९०४ साली सुरु झालेली हि मेट्रो रेल्वे सेवा आज जगातील सगळ्यात मोठे मेट्रो रेल्वे जाळे आहे. एकूण ३६ मार्ग, ४७२ स्थानक आणि ३९४ किलोमीटर इतका प्रचंड व्याप या जाळ्याचा आहे, जवळपास ६४१८ मेट्रो रेक या या जाळ्यात सेवा देत आहे आणि अंदाजे १.६ दशलक्ष  प्रवासी सरासरी वर्षाला या मेट्रो रेल्वेचा उपयोग करतात.  

शांघाय मेट्रो

या सूचीतील दुसरे नाव आहे चीन मधील शांघाय मेट्रो ! २८ मे १९९३ म्हणजे अवघ्या २७ वर्षांपूर्वी शांघाय मेट्रोची सेवा सुरु झाली. चीनच्या वाढणाऱ्या आर्थिक शकत सोबतच वाढणारे शहर आणि त्या मुळे शहरा अंतर्गत प्रवासाकरता मेट्रो रेल्वेचे जाळे पण वाढत गेले. आजच्या घडीला जगातील २ ऱ्या क्रमांकाचे हे जाळे आहे. एकूण १६ मार्गांवर ३४५ स्थानक आणि ६७६ किलोमीटर हीच विस्तार झाला आहे.जवळपास ६००० मेट्रो रेक सह सरासरी ३.७१० अब्ज प्रवाशांना हि मेट्रो आपली सेवा पुरवते. 

बीजिंग मेट्रो

या सूचित तिसऱ्या क्रमांकावर पुन्हा चीन मधीलच बीजिंग मेट्रो ! १ ऑक्टोबर १९६९ रोजी बीजिंग शहरात पहिली मेट्रो रेल्वे धावली होती. आज एकूण २३ मार्गांवरील ४०५ स्थानकांसह ६६९.४ किलोमीटर बीजिंग मेट्रोचे जाळे पसरले आहे. जवळपास ६१७८ मेट्रो रेक व्दारे सरासरी ३.८४८ अब्ज प्रवासी वर्षाला या बीजिंग मेट्रोच्या जाळ्याचा लाभ घेतात. 

 सेऊल मेट्रो

या सूचीतील चवथ्या क्रमांकावर आहे दक्षिण कोरियाची राजधानी असलेले सेऊल शहरातील सेऊल मेट्रो ! ४६ वर्षांपूर्वी म्हणजेच १५ ऑगस्ट १९७४ रोजी सेऊल मेट्रोने आपली सेवा शहरातील जनतेला द्यायला सुरवात केली. आज जवळपास २३ मार्गांवर ७२८ स्थानकांसह ३५३.२ किलोमीटर या सेऊल मेट्रोचा पसारा पसरला आहे. वर्षाला सरासरी १.१९ अब्ज प्रवासी या जाळ्याचा लाभ घेतात. 

 पॅरिस मेट्रो

या सूचित पाचव्या स्थानावर आहे पॅरिस मेट्रो ! १९ जुलै १९०० पासून पॅरिस मेट्रो रेल्वे आपली सेवा देत आहे म्हणजे तब्बल १०२ वर्ष ! १६ मार्ग आणि ३०२ स्थानकांसह ३०२ कीलोमीटर या पॅरिस मेट्रोचा व्याप पसरला आहे. जवळपास ७०० मेट्रो रेकच्या मदतीने वर्षाला सरासरी १.५२० अब्ज प्रवासी वाहतूक हि सेवा करते. 

माद्रिद मेट्रो

या सूचित सहाव्या स्थानावर स्पेन मधील माद्रिद मेट्रो ! १७ ऑक्टोबर १९१९ रोजी या मेट्रो रेल्वेने आपली सेवा सुरु केली. आज १३ मार्गांवर ३०२ स्थानकांसह २९३ किलोमीटर हि सेवा पसरली आहे. २४०० मेट्रो रेक सरासरी ६५७. २१ दशलक्षप्रवासी वर्षाला वहन करतात.    

लंडन अंडरग्राउंड

या सूचीतील सातव्या क्रमांकावर आहे लंडन मेट्रो ! "लंडन अंडरग्राउंड" प्रसिद्ध हि मेट्रो रेल्वे सेवा जगातील पहिली मेट्रो रेल्वे सेवा आहे हे आपण अगोदरच बघितले आहे. या सेवेला जरी "लंडन अंडरग्राउंड" जरी म्हणत असले तरी आजच्या घडीला हि मेट्रो रेल्वे सेवा फक्त ४५% टक्केच जमिनीखालून धावते. ११ मार्ग, २७० स्थानक, ४०२ किलोमीटर अंतर पार करत हि सेवा वर्षाला सरासरी  १.३५७ अब्ज प्रवासी वहन करते. 

गुंझाव मेट्रो

आठव्या क्रमांकावर आपल्याला पुन्हा चीन मध्ये वापस जावे लागेल, कारण या क्रमांकावर आहे चीन मधील गुंझाव मेट्रो ! आधुनिक चीन मधील हे एक महत्वाचे औद्योगिक शहर. अवघ्या २३ वर्षांपूर्वी म्हणजे २८ जून १९९७ रोजी गुंझाव मेट्रो रेल्वेसेवा सुरु झाली. आज १४ मार्गांवरून २७१ स्थानकांवर ५१४.८ किलोमीटर अंतर पार करत ४४४ मेट्रो रेकच्या मदतीने वर्षाला सरासरी ३.३१ अब्ज प्रवासी वाहतूक हि गुंझाव मेट्रो करते. 

मॉस्को मेट्रो

सोवियत काळाची आठवण करून देणारी मेट्रो रेल्वे 

राजेशाही स्थानक 


स्थानक किती खोल आहे याचा अंदाज येईल 

मॉस्को मेट्रोचे आधुनिक रेक

या सूचीतील नवव्या क्रमांकाची मेट्रो आहे रशियाची मॉस्को मेट्रो ! एकेकाळी तत्कालीन साम्यवादी सोवियत रशियाचा अभिमानाचा विषय असलेली हि मेट्रो रेल्वे  आजही तितकाच अभिमानाचा विषय आहे. या मेट्रो रेल्वेच्या जाळ्यातील सुंदर पुतळे आणि पेंटिंगने सजवलेली कलायुक्त स्थानक बघण्यासाठी या मेट्रोला भेट  देणारे पर्यटक आहेत. तत्कालीन सोवियत सरकारने अत्यंत राजेशाही स्थानके तर बांधलीच, पण जमिनीत खूप खोलवर जात हि मेट्रो बांधली कारण युद्धाच्या वेळेस या मार्गांचा उपयोग शरण घेण्यासाठी करण्यात येईल. जगातील सगळ्यात खोल बांधल्या गेलेले मेट्रो रेल्वे स्थानक पार्क पोबेडी याच मास्को मेट्रो रेल्वेच्या जाळ्यात आहे जे जमिनीपासून ८४ मीटर खोल आहे. ८५ वर्षांपूर्वी १५ मे १९३५ ला मॉस्को मेट्रो रेल्वेने आपली सेवा सुरु केली. एकूण १७ मार्गांवर २७५ स्थानकांसह ४६६.८ किलोमीटर पसरलेला पसारा सरासरी २.५ अब्ज प्रवासी वर्षाला वाहून नेते. 

दिल्ली मेट्रो

दहाव्या क्रमांकावर आहे आपल्या भारतातील दिल्ली मेट्रो ! खरे तर भारतात मेट्रो रेल्वे आली ती कलकत्ता शहरात १९८४ साली मात्र वाढली नाही ते का याचा आपण भारतातील मेट्रो रेल्वेच्या वाटचालीत बघूच. पण अवघ्या १७ वर्षांपूर्वी २४ डिसेंबर २००२ साली सुरु झालेल्या या मेट्रो सेवेने लवकरच जागतिक मेट्रो रेल्वे सेवे मध्ये आपला ठसा उमटवला आहे. हि आपल्याकरता नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. दिल्ली मेट्रो रेल्वे एकूण १२ मार्गांवर, २८५ स्थानकांव्दारे जवळपास ३८९ किलोमीटर अंतरावर आपली सेवा देते. ३१० मेट्रो रेकच्या मदतीने वर्षाला सरासरी १ अब्ज प्रवासी वाहतूक करते. 

वर दिलेल्या सूचित काही वर्षात बदल होऊ शकतो, कारण या सूची मध्ये असलेल्या आणि नसलेल्या पण अनेक मेट्रो रेल्वे सेवा सतत आपल्या सेवाक्षेत्राची वाढ करत आहेत. या सूचीतील सगळ्याच मेट्रो रेल्वे सेवेने अत्याधुनिक तंत्रज्ञानाने स्वतःला वेळोवेळी सुसज्जित करत आपल्या प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवास कसा करता येईल याची सोया केली आहे. उशिरा सेवेत येऊन पण लवकरच या जागतिक सूचित स्थान मिळवणाऱ्या आशियाई देशातील मेट्रो रेल्वे सेवेचे कौतुक करावे लागेलच. पुढील भागात आता आपण आपल्या देशातील मेट्रो रेल्वेची वाटचाल बघू. 


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा