भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा आधार स्तंभ म्हणून आजकाल गांधी परिवाराकडे बघितल्या जाते. स्वातंत्र्या नंतर राष्ट्रीय काँग्रेसमध्ये झालेला हा सगळ्यात मोठा बदल म्हणजे काँग्रेस एका परिवाराची मक्तेदारी झाली. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची आभा इतकी मोठी झाली की ते कॉंग्रेसचे सर्वेसर्वाच झाले जणू.
पंडित नेहरू यांच्या मृत्यू नंतर काही काळाने काँग्रेसचे नेतृत्व केले त्यांच्या मुलीने इंदिरा फिरोज गांधी हिने. तेव्हा पासून काँग्रेस म्हणजे नेहरू - गांधी परिवार असे समीकरण झाले. मग या नेहरू - गांधी परिवाराच्या विरोधात अनेक अफवा पण पसरवल्या गेल्या. खास करून फिरोज गांधी यांच्या नावावरून ! फीरोज नाव मुस्लिम धर्मात पण वापरत असली तरी फिरोज हे नाव पर्शियन आहे आणि फिरोज गांधी हे धर्माने पारसी होते. त्याच पारसी धर्माचे जे भारतात दुधातल्या साखरे प्रमाणे विरघळले.
फिरोज गांधी यांचा जन्म आपल्या महाराष्ट्रात मुंबईत १२ सप्टेंबर १९१२ साली एका पारसी कुटुंबात झाला. त्यांचे वडीलांचे नाव जहागीर तर आईचे नाव रतीमाई असे होते आडनाव दारुवाला ! या दाम्पत्याच्या पाच मुलांमधील सगळ्यात लहान हे फिरोज ! मग या फिरोज यांना गांधी आडनाव कसे मिळाले ? तर या करता जवाबदार होत्या इंदिरा जवाहराला नेहरू यांचे संबंध ! कसे ?
हे समजून घ्यायला आपल्याला पारसी समुदायाच्या काही धार्मिक प्रथा समजून घेणे आवश्यक आहे. हा धर्म पर्शियातुन धार्मिक कारणाने भारतात कसा आला हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे, भारतात त्यांना त्यांचे धार्मिक स्वातंत्र्य देण्यात आले. त्या नुसार आपल्या धर्माचे रक्षण आणि आपले वेगळे धार्मिक आस्तित्व कायम राखण्यासाठी काही नियम बनविले. यातील एक नियम म्हणजे दुसऱ्या धर्मात विवाह न करण्याचा नियम ! पाहिले म्हणजे तुम्ही जन्माने पारसी हवे, तुम्हाला धर्म प्रवेशाची परवानगी नाही. तसेच एका पारसी स्त्री ने परधर्मात लग्न केले की तिला पारशी धर्म, पारशी धर्म स्थळात (अग्यरीत) तर जाता येते, मात्र एखाद्या पारसी पुरुषाने एखाद्या परधर्माच्या स्त्री सोबत लग्न केले तर मात्र त्याला धार्मिक कायमची ओळख विसरावी लागते, त्याला धर्मस्थळात पण यायला बंदी घातली जाते. कारण सरळ आहे "धर्म" सांभाळण्याची जवाबदारी स्त्री पेक्षा पुरुषावर अधिक असते. ही एक "पुरुषसत्ताक" धर्म प्रभुत्व दर्शवणारी प्रथा आहे. कदाचित कालानुरूप आता त्यात थोडा बदल झाला असेल, पण फिरोजजींनी इंदिरा नेहरू सोबत प्रेम विवाह केला तेव्हा अधिक कडक पद्धतीने आमलात आणत असतील. मग फिरोज यांना "गांधी" आडनाव कसे मिळाले? या करता आपल्याला इंदिरा गांधी आणि फिरोज गांधी यांच्या लग्नाची कहाणी ऐकावी लागेल.
साधारण १९२० साली फिरोजजींच्या वडिलांचा मृत्यू झाला. तेव्हा त्यांची आई आश्रयासाठी अलाहाबाद येथील आपली बहीण शिरीन कामासारिट यांच्या कडे आश्रयाला आली. फिरोजजींची ही मावशी त्या काळी अलाहाबाद शहरातील लेडी दफरीन इस्पितळात सर्जन म्हणून कामाला होती. त्या अविवाहित होत्या, त्या मुळे आपल्या बहिणीची आणि भाच्यांची जवाबदारी त्यांनी आनंदाने स्वीकारली. याच शहरात फिरोज यांचे पदवी पर्यँयचे शिक्षण पूर्ण झाले.
१९३० साली तत्कालीन स्वातंत्र्य लढ्याकडे आणि महात्मा गांधी यांच्या विचारांकडे फिरोजजींचे आकर्षण वाढले. अश्याच एका ब्रिटिश विरोधी धरणे आंदोलनात इंदिरा नेहरु यांची आई कमला नेहरू यांच्या सोबत फिरोजजींची ओळख झाली. या आंदोलनात कमला नेहरू बेशुद्ध पडल्या तेव्हा त्यांना तेथून सहीसलामत घरी आणणे आणि नंतर त्यांची सेवा फिरोजजींनी केली. यानंतर फिरोजजींचे अलाहाबाद मधील नेहरूंच्या घरी आनंद भवन येथे येणे जाणे वाढले.
या काळात कमला नेहरू यांची तब्येत ढासळती होती. त्या मुळे इंदिरा नेहरू यांच्या सोबत फिरोजजींनी पण कमला नेहरू यांची सेवा पुत्र भावनेतून केली. याच काळात इंदिराजी आणि फिरोजजीं मध्ये प्रेम निर्माण झाले. असे म्हणतात की पहिले फिरोजजींच्या प्रेमाचा प्रस्ताव इंदिराजींनी नाकारला होता. मात्र कमला नेहरू यांच्या निधना नंतर एकट्या पडलेल्या इंदिराजींना फिरोजजींनी जो आश्वासक मानसिक आधार दिला त्या मुळे नंतर इंदिराजींनी फिरोजजींच्या प्रेमाचा स्वीकार केला.
फिरोजजी स्वतंत्र्य पत्रकार होते. त्यांच्या निर्भीड पत्रकारितेमुळे अनेकदा काँग्रेस समोर अडचणी पण तयार झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पंडित नेहरूंना आपल्या पोरीने एका पत्रकाराच्या प्रेमात पडावे याचा राग होता. ते या प्रेमाच्या आणि यांच्या विवाहाच्या विरोधात होते. शेवटी १९४२ मध्ये महात्मा गांधी यांच्या मध्यस्थीने हा विवाह वैदिक पद्धतीने संपन्न झाला. वर सांगितल्या प्रमाणे या परधर्मातील स्त्री सोबत विवाह केल्या मुळे फिरोजजींच्या पारसी धर्म ओळखीवर गंडांतर आले. यातून मार्ग काढायला म्हणून महात्मा गांधी यांनी फिरोजजींना स्वतःचे आडनाव बहाल केले आणि त्याचे नाव झाले फिरोज गांधी ! तर इंदिरा नेहरू झाल्या इंदिरा फिरोज गांधी ! १९४२ च्या "चले जावं" आंदोलनात या नवं दांपत्याने हिरिरीने भाग घेतला आणि दोघे कारागृत पण जाऊन आले.
या काळात इंदिरा गांधी आणि फिरोज गांधी यांच्यात सगळे चांगलेच होते असे नाही. त्यांना दोन मुले झाली संजय आणि राजीव ! १९४९ साली इंदिरा गांधी आपल्या दोन मुलांना घेऊन दिल्ली येथे आपल्या वडिलांकडे आल्या. काही अभ्यासक या भांडणाचे निमित्य फिरोज गांधी यांच्या कडे आकर्षित होणाऱ्या महिला हे देतात, मात्र या विषयी पुरावा मात्र कोणाकडे नाही. मात्र फिरोज गांधी अलाहाबाद येथेच राहिले. त्यांनी तेथे नेहरूंचे वृत्तपत्र नॅशनल होराल्डचे काम पाहायला सुरवात केली. पुढे १९५२ साली त्यांनी रायबरेली येथून कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि खासदार म्हणून संसदेत पोहचले. स्वतंत्र विचार आणि पत्रकाराचा पिंड या मुळे संसदेत सुद्धा सत्ताधारी पक्षात असून त्यांचे वर्तन आणि प्रश्न बरेचदा पंडित नेहरू यांना अडचणीत आणणारे ठरत. आधीच फिरोज गांधी यांच्या विषयी प्रतिकूल मत असलेल्या नेहरूंच्या आणि जावई फिरोज गांधी यांच्या मधील दरी अजून वाढली. त्यातच १९५५ साली काँग्रेस वर्किंग कमिटी आणि केंद्रीय निवडणूक समितीची सदस्य इंदिरा गांधी बनल्या होत्या. याच काळात फिरोज गांधी यांनी पक्षांतर्गत भ्रष्टाचाराचा मुद्दा उचलला आणि लावून धरला. इंदिरा गांधी यांना हा आपल्या विरोधात केलेला आवाज वाटला, या मुळे पण इंदिरा गांधी आणि फिरोज गांधी यांच्या संबंधत दुरत्व आले.
एक किस्सा असा सांगितला जातो की कितीही वैचारिक वितुष्ट असले तरी इंदिरा गांधी आणि फिरोज गांधी एकमेकांना भेटत, कधी सकाळी एकत्र न्याहारी घेत, कधी दुपारी किंवा रात्री जेवण पण ! कधी कधी पंडित नेहरू पण त्यांच्यात सामील असत. असेच १९५९ साली इंदिरा गांधी तेव्हा काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या आणि सरकार मध्ये पण त्यांच्या विचारांना मान होता. त्या काळात केरळ मध्ये डाव्या विचारधारेच्या पक्षाचे सरकार होते. त्या सरकारला बरखास्त करायचा विचार इंदिरा गांधी यांच्या मनात सुरू होता. एका सकाळी इंदिरा गांधी, फिरोज गांधी आणि पंडित नेहरु सकाळचा नाश्ता एकत्र करत असतांना हा केरळचा विषय चर्चेत आला, जेव्हा इंदिरा गांधी यांनी केरळ सरकारला बरखास्त करायचा विचार बोलून दाखवला तेव्हा फिरोज गांधी यांनी संविधानाचा हवाला देत याला विरोध तर केलाच. पण इंदिरा गांधी यांना नेहरूंच्या समोरच बोलले की, "अश्याच विचारांनी तुम्ही राजकारण करणार आणि सरकार राबवणार असाल तर तुम्ही "हुकूमशहा प्रवृत्ती" कडे वेगाने वाटचाल कराल आणि लवकरच "हुकूमशहा" बनाल." तोंडावर इतके खरे बोलणारे ना नेहरूंना चालायचे, ना इंदिरा गांधी यांना !
पण फिरोज गांधी यांनी संसदेत चमकदार कामगिरी करत होते. आज आपण आपल्या घरी बसून दूरचित्रवाणीवर संसदेच्या दोन्ही सभागृहाचे जे कामकाज बघतो त्याचे प्रणेते हे फिरोज गांधी आहेत. आपल्याला आश्चर्य वाटेल पण संसदेचा वृत्तांत वृत्तपत्रात छापणे हा एकेकाळी गुन्हा होता. या विरोधात संविधानात असलेल्या वृत्तपत्र आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हवाला देत, संसदीय वृत्त सार्वजनिक करणे लोकशाहीसाठी किती आवश्यक आहे असे सांगत त्यांनी एक खाजगी विधेयक संसदेत ठेवले १९५६ साली हे विधेयक पास झाले ‘द पार्लमेंटरी प्रोसिडिंग्ज (प्रोटेक्शन ऑफ पब्लिकेशन) अॅक्ट’, १९५६ या कायद्यान्वये संसदेच्या कोठल्याही सभागृहाचा वृतांत वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केल्यास त्यांची दिवाणी व फौजदारी कारवाईपासून मुक्तता केली. विशेष म्हणजे फिरोज गांधी यांनी केलेली भविष्यवाणी खरी करतांना इंदिरा गांधी यांनी आणीबाणी आणतांना हाच कायदा रद्द केला होता. आणीबाणी नंतर जनता पार्टी सरकारने पुन्हा या कायद्याचे पुनर्वसन केले. फिरोज गांधी यांच्या मते संसदेचे वृत्त जितक्या पारदर्शक पद्धयीने देशाच्या जनतेपुढे जाईल तितकेच सत्ताधारी आणि विरोधक योग्य काम करतील. पण फिरोज गांधी खाजगिकरणाच्या पूर्ण विरोधात होते. एकेकाळी टेल्कोला सरकारने ताब्यात घेत सार्वजनिक उद्यमात तिचे रूपांतर करावे या करता त्यांनी जोरदार आघाडी पण उघडली होती. तत्कालीन पारसी समुदाय आणि भारतीय उद्योगपतींचा रोष पण त्यांनी ओढवून घेतला होता.
पण फिरोज गांधी यांना आठवल्या जाते ते १९५५ साली विमा कंपनीच्या भ्रष्टाचाराचे "मुंदडा - दालमिया प्रकरण" बाहेर काढत देशाचा पहिला आर्थिक भ्रष्टाचारा विरोधात आवाज उठवल्या बद्दल. या प्रकरणात पंडित नेहरू यांची बरीच दमछाक झाली होती.
तर असे पत्रकार आणि खासदार फिरोज गांधी यांचा मृत्यू ८ सप्टेंबर १९६० साली हृदय विकाराने दिल्लीत झाला, साधारण १९५८ साला पासून त्यांना हृदय विकार होता. या संपूर्ण काळात इंदिरा गांधी यांनी त्यांच्या तब्येतीची काळजी घेतली होती. ९ सप्टेंबर १९६० रोजी निगमबोध घाट येथे त्यांचा हिंदू पद्धतीने अंतेष्टी केल्या गेली. राजीव गांधी यांनी त्यांच्या चितेला अग्नी दिला.
संदर्भ :
biography of indira gandhi by pupul jayakar








एका व्यक्तीमत्वाचा खुप छान इतिहास आणि माहिती तुम्ही सांगितलीत. पण सोबत ही महिती कशी आणि कुठुन घेतली याचे संदर्भ दिलेत तर विश्वासार्हता वाढण्यास मदत होईल.
उत्तर द्याहटवा- प्रविण
धन्यवाद...नक्की टाकायचा प्रयत्न करतो
उत्तर द्याहटवा