भारत चीन संबंध हे नेहरू युग सोडले तर नेहमीच तणावपूर्ण राहिले आहेत हे आपल्याला माहीत आहे. १९६२ चे युद्ध हरल्यानंतर आपले सत्ताधारी राजकारणी आपल्या स्वप्नील जगातून जागे होत वास्तव जगात आले. पण विरोधी पक्षांना अजून एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली ती म्हणजे फक्त संसदेत विरोध करून, भाषणे देत सत्ताधाऱ्यावर दबाव येत नाही. त्या करता देशातील जनतेमध्ये या प्रश्नांविषयी जागृती करावी लागते. त्या करता रस्त्यावर उतरून जनतेच्या मनात आपल्या सीमांबद्दल आपल्या देशाच्या आत्मसन्माना बद्दल जागृती करू लागले.
आपल्या सगळ्यांना माहीत आहे की १९६२ नंतर १९६७ ला भारत आणि चीन मध्ये नथु-ला आणि चो-ला येथे रक्तरंजित संघर्ष झाला. हा संघर्ष तब्बल १० दिवस चालला. या संघर्षात आपण चीनला जबरदस्त मार दिला आणि चीनची नथु-ला भागात असलेली किल्लेबंदी पार उध्वस्त करून टाकली. पण हा संघर्ष एकाएकी उभा राहिला का? चीन सोबतचा संघर्ष हा नेहमी मनोवैज्ञानिक संघर्ष राहिला आहे. चीन जेव्हा या संघर्षात माघारतो तेव्हा मग हत्यार उचलतो हा इतिहास आहे. त्या नुसार या १९६७ च्या संघर्षाची बीजे १९६५ मध्ये पेरल्या गेली.
झाले असे की १९६५ मध्ये चीन सैनिकांनी भारतीय सैनिकांवर आरोप केला की, भारतीयांनी आमच्या ८०० शेळ्या आणि ५९ याक (हिमालयातील गाय) अनधिकृत पणे ताब्यात घेतल्या आणि फक्त या एका आरोपावरून भारतीयांवर दबाव बनवायला सुरवात केली. पण या घटनेत रंग भरला तो तत्कालीन जनसंघाचे नेते आणि संसद सदस्य अटलबिहारी वाजपेयी यांनी! चीन या घटनेला अवास्तव रंग देत आहे ते बघत २४ सप्टेंनबर १९६५ ला अटलबिहारी वाजपेयी यांनी दिल्ली स्थित चिनी दूतावासा समोर एक मोर्चा नेला. बरे ते फक्त मोर्चा नेला नाही, तर सोबत जवळपास ८०० शेळ्या पण जमवून त्या मोर्चासोबत नेल्या आणि सोबत जी बॅनर लिहली त्यात "८०० शेळ्यांसाठी शक्तिशाली चीन तिसऱ्या महायुद्धाच्या तयारीत" असे लिहले. त्यातील एक बॅनर चिनी सरकारला खूप अपमानजनक वाटला त्यात लिहले होते, "वाटले तर मला खा, पण जगाला वाचवा" ! चीन चांगलाच चवताळला. त्याने भारत सरकारला या मोर्चा विरोधात आणि आपल्या जप्त केलेल्या तथाकथित शेळ्या आणि याक संदर्भात खरमरीत पत्र दिले. यात दिल्लीतील या मोर्चा विरोधात नाराजी व्यक्त करत, आपला उपहास करायला भारत सरकारने मुद्दाम हा मोर्चा आयोजित केला असा आरोप केला. तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी हे आरोप धुडकावून लावले. भारत सरकारने या पत्राला उत्तर देतांना सांगितले की, "दिल्लीतील मोर्चा हा भारतीय लोकशाहीत जगणाऱ्या भारतीय जनतेची अभिव्यक्ती होती, या मोर्चा मागे भारत सरकारचा कोणताही हात नव्हता. सोबतच सीमे वर जी जनावर भारतीय सेनेने जप्त केली आहे, त्या बाबत आम्ही तपास केला आम्हाला असे आढळून आले की, ही जनावरे चिनी सेनेची नसून भारतीय हद्दीत अनधिकृतपणे घुसखोरी करणाऱ्या किंवा शरणार्थी म्हणून येणाऱ्या दोन तिब्बेती नागरिकांची आहेत. भारतीय सेनेच्या अहवाला वरून असे लक्षात येत आहे की जनावरे भारतीय सीमा ओलांडू शकले पण तिब्बेती नागरिक गायब आहेत. ते एक तर भारतीय हद्दीत असतील किंवा तुमच्या ताब्यात. तेव्हा ही जनावरे ज्यांची आहे त्यांना वापस करण्यास कटीबद्ध आहे. या नागरिकांचा आमच्या हद्दीत तपास सुरू आहे, जर ते तुमच्या ताब्यात असतील तर त्यांना भारतीयांच्या ताब्यात द्या. हे तिब्बेती नागरिक जेव्हा समोर येतील तेव्हा जनावरे वापस होतील." आता चीन यात फसला, मान्य करावे तरी पंचाईत आणि नाही म्हणावे तरी पंचाईत. चीनने आपला दावा सोडून दिला, मात्र राग कायम ठेवला. अर्थात दिल्लीतील हा मोर्चा जरी अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात निघाला असला, त्यातील कल्पकता जरी त्यांची असली तरी या मोर्चात मोठ्या प्रमाणात तत्कालीन कॉंग्रेस कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते हे उघड सत्य आहे. आता यातून तुम्ही काय विचार करायचा ते करा! मात्र चीन सरकार मात्र समजून चुकली आता अधिक वरचा खेळ खेळवा लागणार.या शेळी प्रकरणात आपलीच शेळी झाली ही बाब चिनी सरकारला बरीच लागली होती. तरी चीनने त्यावर कोणतीही कारवाई केली नाही, नाही म्हणायला सीमेवर काही पेल्यातील वादळ येत होती. मात्र त्यात दिल्ली आणि बीजिंग लक्ष घालत नाहीये निदान असे जगाला दाखवत तरी होते. मात्र ४ जून १९६७ रोजी पेकिंग वरून बातमी आली की दोन भारतीय दूतावासातील कर्मचारी राजनैतिक संरक्षण आहे त्यांना चिनी गुप्तचर विभागाने हेरगिरीच्या आरोपात अटक केली !कृष्णन रघुनाथ आणि पी विजय हे दोन अधिकारी पेकिंग जवळील वेस्टन हिल्स भागातील प्रसिद्ध स्लीपिंग बुद्ध दर्शनाला गेले होते. वाटेत त्यांना एक जुने बुद्ध मंदिर दिसले म्हणून त्याचा फोटो काढायला त्यांनी कॅमेरा सेट केला, पण फोटो काढायच्या आधीच त्यांना अडवण्यात आले आणि चिनी सेनेच्या ताब्यात असलेल्या संवेदशील भागाचा फोटो काढण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली, त्यांच्यावर हेरगिरी करण्याचा आरोप ठेवण्यात आला. यात पी विजय हे एकदम नवखे होते. बीजिंगला पोहचून त्यांनी अजून पदग्रहण पण केले नव्हते. चिनी सरकारने रघुनाथ कृष्णन यांचा राजदूताचा दर्जा समाप्त केला, तर पी विजय याना "परसोना नॉट ग्रांटा" नुसार राजदूत म्हणून नाकारण्यात आले. दुसऱ्या दिवशी या दोघांना न्यायालयात उभे करण्यात आले. न्यायालयाने दोघांना देश सोडण्याचे आदेश दिला गेला. रघुनाथ कृष्णन यांना एक दिवसात, तर पी विजय यांनी तीन दिवसात देश सोडावा असे आदेशात म्हंटले होते. पण चिनी पोलिसांनी दुसऱ्याच दिवशी दोघांना ताब्यात घेत पेकिंग विमानतळावर पोहचवले. पण विमानतळावर वेगळेच नाट्य सुरू होते. विमानतळावर नागरिकांची गर्दी झाली होती, हे नागरिक भारत विरोधी घोषणा देत होते, या दोघांना या नागरिकांच्या झुंडीतून नेण्यात आले, नागरिकांनी रघुनाथ कृष्णन आणि पी विजय यांना मारायचा प्रयत्न केला, या झटापटीत त्यांना मार पण बसला, पायातील बूट निघून गेले, कपडे फाटले. भारतीय दूतावासाच्या काही कर्मचारी यांच्या भोवती कडे करून वाचवायचा प्रयत्न करू लागले तर चिनी पोलिसांनी त्यांना पण दूर केले. ही मानहानी इथेच थांबली नाही तर पुढे चिनी सैन्याची तुकडी उभी होती, सोबत देशी - विदेशी वृत्तपत्राचे वार्ताहर पण ! जेव्हा या चिनी सैन्य तुकडी समोरून यांना नेले तेव्हा विमानतळा बाहेर नागरिक जसे वागले तशीच वागणूक विमानतळाच्या आत या तुकडीने केली, या दोघांवर थुकल्या गेले, हातपाय चालवल्या गेले. गंभीरबाब म्हणजे जगभरातील वार्ताहरांनी याचे फोटो काढले आणि वर्तमानपत्रात छापले गेले. भारतासाठी हा प्रकार प्रचंड मानहानी करणारा होता. चीन मधील सगळा प्रकार भारतात पोहचत होता. याला प्रतिउत्तर कसे द्यायचे याचा विचार सुरू झाला होता. पण भारत सरकारने या मानहानीचे प्रतिउत्तर द्यावे म्हणून दबाव टाकणे गरजेचे आहे असे विरोधी पक्षांना वाटत होते. पुन्हा अटलबिहारी वाजपेयी यांनी यात पुढाकार घेतला. रघुनाथकृष्णन आणि पी विजय यांचे दिल्ली विमानतळावर आगमन झाले तेव्हा जनसंघ पक्षाने प्रचंड गर्दी करत त्यांचे स्वागत केले, भारतीय नायक म्हणून त्यांना समोर आणण्यात आले. या स्वागतामुळे भारतीय जनतेला या प्रकरणात औसूक्य निर्माण झाले. सोबतच भारत सरकारने या प्रकरणावर योग्य कारवाई करावी हा दबाव पण !भारतात झालेले रघुनाथ कृष्णन आणि पी विजय यांचे जंगी स्वागत आणि त्यांना भारतीय नायक म्हणून जसे भारतातील विरोधी पक्ष समोर आणत होते त्या वरून आता भारत पण आपल्या लोकांवर कारवाई करणार हे चीन समजून होता. मात्र आपण भारतीयांची जी अहवेलना केली तशी आपल्या लोकांची होऊ नये या साठी जागृत झाला होता. एकूण परिस्थिती नुसार भारत सरकारने पण चीनच्या दोन राजनायिक कर्मचाऱ्यांवर कारवाई केली. चेन लु चीह वर हेरगिरीचा आरोप लावण्यात आला, त्यांना मिळालेला राजदूताचा दर्जा खारीज केल्या गेला, तर दुसरे सी चेंग हावोवर तोच "परसोना नॉट ग्रांटा" चा शिक्का मारल्या गेला. अर्थात भारताने त्यांना न्यायालयासमोर उभे करण्याचे नाटक वगैरे केले नाही, मात्र त्यांना देश सोडून जाण्याचे आदेश दिले.
मात्र या कथेने इथे गंभीर वळण घेतले. या चिनी कर्मचाऱ्यांना ७२ तासात देश सोडण्याचा आदेश दिल्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळपासून चिनी दुतावासासमोर भारतीय जमाव जमा व्हायला लागला. आपल्या लोकांचा चीन मधील अपमानाचा बदला आता त्यांना घ्यायचा होता. तश्या घोषणा व्हायला लागल्या, हळूहळू जमावाच्या रागाने उग्र रूप धारण केले. जमाव दुतावासाचे फाटक तोडत आत दाखल झाला, तिथे तोडफोड करायला लागला, कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली. चिनी राष्ट्रध्वज उतरवण्यात आला आणि जाळण्यात आला. पोलिसांनी ताकदीचा उपयोग करत जमाव पंगवला. ७ चिनी कर्मचारी यात गंभीर जखमी झाले, त्यांना तत्काळ आताच्या राम मनोहर लोहिया तेव्हाचे नाव "वेलिंग्टन" मध्ये भरती करण्यात आले.
पण या घटनेने प्रकरणाला गंभीर वळण लागले. या हल्ल्यानंतर चीनने बीजिंग मधील भारतीय दूतावासाला आम्ही तुमच्या संरक्षणाची जवाबदारी नाही घेऊ शकत असे कळवले. त्या नंतर लगेच भारतीय दूतावासासमोर चिनी नागरिकांची गर्दी व्हायला सुरुवात झाली. त्यांची भारतीय दूतावासाची नाकेबंदी सुरू केली, किरकोळ दगडफेक पण झाली. या वेळी आत ६३ पुरुषांसोबत महिला आणि मूल पण अडकले. दूतावासात दूध, अन्न आणि इतर महत्वाच्या सामानाचा सप्लाय पण थांबवण्यात आला. जेव्हा या परिस्थितीची गंभीर जाणीव बीजिंग मधील अमेरिका, कॅनडा आणि युरोपियन देशांच्या दूतावासांना झाली तेव्हा त्यांनी काही अन्न पदार्थ आणि दूध भारतीय दूतावासात पोहचवण्याचे प्रयत्न सुरू केले. पण या सगळ्यावर लक्ष ठेऊन असलेल्या चिनी सैन्याच्या तुकडीने हे प्रयत्न हाणून पाडले. इतकेच नाही तर दूतावासात काम करणाऱ्या चिनी कर्मचाऱ्यांना पण आत जाऊ दिले नाही.
या प्रकाराची भारत सरकारने लगेच गंभीर दखल घेत चिनी सरकारला निरोप पाठवला की २४ तासात बीजिंगच्या भारतीय दूतावासाची सुटका झाली नाही तर, दिल्लीतील चिनी दूतावासाला त्याच दिव्यातून जावे लागेल ज्यातून भारतीय जात आहे. इतके करून भारत सरकार थांबले नाही तर चिनी दूतावासात काम करणाऱ्या भारतीय कर्मचाऱ्यांना आत जाण्यास अडवण्यात आले, इतकेच नाही तर चिनी दूतावासावर भारतीय सैन्याने पहारा सुरू केला, चिनी कर्मचाऱ्यांना बाहेर पडण्यास मज्जाव केला. या व्दारे भारतीय सरकारने चिनी सरकारला आपला पक्का इरादा स्पष्ट केला की भारत कोणत्याही दबावा समोर झुकणार नाही, परिस्थिती कितीही चिघळली तरी! हा चीन सरकार करता मोठा झटका होता, चीनने भारताच्या या उत्तराची अपेक्षा केली नव्हती, एकूणच भारतीय जनता, विरोधी पक्ष आणि भारत सरकार अश्या पध्द्तीने वागेल असे चीन सरकारला वाटलेच नव्हते असे समजायला हरकत नाही.
या नंतर चीन सरकारने प्रकरण थंड करण्याच्या उद्देशाने काही पावले मागे घेतली. बीजिंग मधील भारतीय दूतावासाची नाकेबंदी काढल्या गेली. इकडे भारताने पण तसेच केले. मग चीन सरकारने प्रस्ताव समोर ठेवला की चीन सरकार एक विशेष विमान आपल्या दुत्वासातील निष्कशीत कर्मचाऱ्यांना घ्यायला पाठवेल, भारताने प्रस्ताव मान्य करत आमचे पण एक विमान आमच्या काही कर्मचाऱ्यांना घ्यायला येईल असे सांगितले. पण चीनने भारताला तसे करण्याची परवानगी नाकारली. मात्र भारतीयांना मात्र चिनी विमान येत असल्याची सूचना दिली. पण भारतीय विदेश अधिकाऱ्यांनी चिनी विमानाला परवानगी नाकारली, पुन्हा संरक्षण खात्याला या विमानाची माहिती देत या विमानाला भारतीय हद्दीत घुसू न देण्याची सक्त ताकीद दिली. मात्र हा अधिकाऱ्यांनी घेतलेला निर्णय तत्कालीन संरक्षणमंत्री सुवर्णसिंग यांना मानवाला नाही.(लक्षात घ्या हा निर्णय घेतांना अधिकाऱ्यांजवळ या निर्णयाची खलबत करण्यास अजिबात वेळ नसल्यामुळे परस्पर निर्णय घ्यावा लागला) पण विमान आले नाही आणि पुढील संघर्ष टळला.
पण दोन दिवसांनी भारतीय गुप्तचर विभागाने माहिती दिली की हाकलल्या गेलेले दोन्ही चिनी अधिकारी उद्या सकाळी एअर नेपाळच्या विमानाने काठमांडुला जाणार आहेत. भारतीय अधिकारी आणि पोलीस सकाळ पासून विमानतळावर दबा धरून बसले. हे दोन्ही चिनी अधिकारी जेव्हा विमानतळावर आले तेव्हा सी चेंग हावो याला ज्याच्यावर "परसोना नॉट ग्रांटा" खाली कारवाई करण्यात आली होती त्याला विमानात जाऊ देण्यात आले. मात्र ज्या चेन लु चीह या चिनी अधिकाऱ्यावर हेरगिरीचा आरोप करण्यात आला त्याला थांबवून ठेवण्यात आले. जेव्हा विमानात सगळे प्रवासी बसले आणि राहिलेल्या प्रवाशांसाठी शेवटची उद्घोषणा करण्यात आली तेव्हा दोन उंचपुरे पोलीसांनी त्या चेन लु चीह ला मानगुटीला पकडले (तसेच जसे चिनी पोलिसांनी भारतीय अधिकाऱ्यांना पकडले होते) आणि चालत विमानतळाच्या इमारतीतून, धावपट्टीवर आणि धावपट्टीवरून चालत नेत थेट त्याच्या विमानातील खुर्ची पर्यंत तसेच नेण्यात आले आणि खुर्चीवर बसवण्यात आले. विशेष म्हणजे या सगळ्या घटनाक्रमाचे फोटो काढण्याची आणि त्याला राष्ट्रीय आंतराष्ट्रीय वृत्तपत्रात छापून आणायची सगळी व्यवस्था भारतीय अधिकाऱ्यांनी यथासांग पार पडली आणि प्रकरण आपला आत्मसन्मात कायम ठेवत संपवले.
मात्र चीन सरकारला झाल्या प्रकारचा, झालेल्या अनपेक्षित अपमानाचा प्रचंड धक्का बसला. भारत सरकार कडून इतक्या प्रखर कारवाईची चीनला अपेक्षा नव्हती. चीन चवताळला आणि मग त्यातून १४ सप्टेंबर १९६७ ला चीनी सैन्याने नथु-ला येथे कुंपण घालायच्या मुद्यावरून भारतीय सैनिकांवर गोळीबार केला. त्यातून जो संघर्ष उभा राहिला तो १० दिवस चालला या संघर्षात पण अपमानजनक मार खाल्यानंतरच चीन शांत झाला.
खूप छान लिहिलं आहे,सगळं डोळ्यासमोर एखाद्या चित्रफितीप्रमाणे येत होतं. आपल्या देशातील नेते,त्यांची निर्णयक्षमता,धैर्य,एकजूट,देशप्रेम,देशनिष्ठा या सर्वांपुढे नतमस्तक!
उत्तर द्याहटवाचित्रफीतच दाखवली आपण छोटीशी
उत्तर द्याहटवापण लाल बहादूर शास्त्री काय होते हे या घटनाक्रमातून ठसठशीत पणे अधोरेखित केले 🙏🙏🙏🙏🙏