साल १९६९ तेच जे मेट्रोपोलिटन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (MTP) स्थापन केले होते, तेच या दिल्ली मेट्रो रेल्वेच्या कामाकरता जवाबदार आहे. या MTP ची स्थापनाच मुळी भारतीय रेल्वेच्या अंतर्गत, भारतातील वाढत्या शहरातील वाहतूक व्यवस्था रेल्वेच्या माध्यमातून कशी सुधारता येईल या करता करण्यात आली होती. त्या नुसार भारतातील १० मोठ्या शहरात आणि इतर महत्वाच्या शहरात या MTP ने आपले सर्व्हे सुरू केले होते. अर्थात राजकीय इच्छाशक्ती, भारतीय बाबूगिरी आणि आर्थिक ओढाताण यात काही योजना पुढे सरकल्या तर काहींचा जन्मतः च मृत्यू झाला.
दिल्ली करता पण या MTP ने उपनगरीय वाहतुकी करता काही उपाययोजना केल्या होत्या. पण ८० चे दशक येता येता दिल्लीतील लोकसंख्या वाढायला सुरवात झाली आणि MTP ने योजलेल्या उपाययोजना पुन्हा अपुऱ्या पडायला लागल्या. तेव्हा केंद्र सरकारने दिल्लीतील व्यवस्था सुधरवण्यासाठी उपाययोजना शोधायला एक कमिशन नेमले. १९८४ साली या कमिशनने कलकत्ता मेट्रो रेल्वेच्या धर्तीवर एक भूमिगत रेल्वे दिल्लीत सुरू करण्याची योजना काही नियोजित मार्गांसकट सरकार समोर ठेवली. सोबतच भारतीय रेल्वेच्या उपनगरीय गाड्या वाढवणे आणि दिल्लीतील बस सेवा सुधारणे यावर पण या अहवालात भर दिला गेला. पण प्रश्न असा होता हे सगळे करायचे कसे? कलकत्ता मेट्रो रेल्वे योजनेचा अनुभव गाठीशी होताच. त्याला होत असलेला विलंब दिल्लीत झाला तर देशाच्या राजधानीचे शहर जगभर बदनाम होईल हा पण विचार काहींना सतावत होता. मुख्य म्हणजे या अहवालात जे नियोजित मार्ग सुचवले होते त्यातील काही दिल्ली शहरातील जगभर प्रसिद्ध असलेल्या ऐतिहासिक वास्तूंच्या खालून जात होते, म्हणजे पुन्हा बांधकाम कसे करायचे हा पण प्रश्न होताच !
दिवसेंदिवस दिल्लीतील वाहतूक व्यवस्था अधिक बिकट व्हायला लागली, वाहनांची संख्या वाढल्यामुळे ट्राफिक जाम पण ! सोबत ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण मोफत अशी दिल्लीकरांची अवस्था झाली. पण या वेळेस सरकारने दोन महत्वाची पाऊले उचलली पहिले म्हणजे दिल्लीतील ही योजना भारतीय रेल्वेला न देता या योजने करता कोकण रेल्वेच्या धर्तीवर वेगळी कंपनी स्थापन केली. दिल्ली राज्य सरकार आणि महानगर पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (DMRC) स्थापन केल्या गेली. याच्या संचालक पदी नियुक्त केले गेले मेट्रोमॅन ई. श्रीधरन !
राजकीय हस्तक्षेप, सरकारी दिरंगाई आणि आर्थिक हेडसाळ टाळण्यासाठी स्वायत्त DMRC ची स्थापना अत्यंत उपयुक्त अशी होती. दुसरा महत्वाचा निर्णय म्हणजे DMRC ने आपले तांत्रिक सल्लागार म्हणून भारतीय रेल्वेला पसंती न देता मेट्रो रेल्वे मध्ये अनुभवी अश्या हॉंगकॉंग स्थित MTRC ला नियुक्त केले. या करता थोडे नाराजी नाट्य झाले. पण शेवटी मेट्रो रेल्वे बांधकाम आणि सुरक्षा नियमन भारतीय रेल्वेच्याच हातात होते. शेवटी भारतीय रेल्वेने ब्रॉड गेज मेट्रो रेल्वेच्या अटीवर MTRC ने केलेल्या तांत्रिक सल्ला मंजूर केला आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर, जागतिक तांत्रिक सल्लागार यांच्या मदतीने काम वेगात सुरू झाले. दिल्लीती ऐतिहासिक वास्तूंना धक्का न लावता हे सगळे काम झाले.
शेवटी २४ नोव्हेंबर २००२ रोजी शहदरा ते तीस हजारी या दरम्यान रेड लाईन मार्गावर दिल्ली मेट्रो रेल्वेने आपली सेवा सुरू केली. या नंतर २५ डिसेंबर २००४ रोजी विश्वविद्यालय ते काश्मिरी गेट या येल्लो लाईन मार्गावरील दुसरा मार्ग सुरू करत दिल्ली मेट्रो रेल्वेने वेग पकडला. या दोन्ही मार्गांवरील आरामदायक प्रवास करून बघायला दिल्लीकर गर्दी करायला लागले. विश्वसनीय फेऱ्या, वातानुकूलित प्रवास, आधुनिक तिकीटिंग मुळे अल्पावधीतच दिल्ली मेट्रो रेल्वे जनतेला प्रिय झालीच, पण दिल्ली उपनगरात पण दिल्ली मेट्रोची सेवा सुरू करण्याची मागणी व्हायला लागली. अर्थात सरकार याला अनुकूल होतेच. दिल्ली आणि उपनगरात वाढ होतच होती, पण दिल्ली राज्याला लागून असलेल्या इतर राज्यातील सीमा भागातून पण रोज कामासाठी दिल्लीत येणाऱ्यांची संख्या प्रचंड होती. या प्रवाशांचा प्रवास सुकर व्हावा म्हणून मग DMRC ला लवकरच NCR म्हणजे नॅशनल कॅपिटल रीजन भागात आपली सेवा उपलब्ध करून देण्याचे सांगितले गेले.
या नुसार मग DMRC ने आपले पुढील नियोजन सुरू केले. हरियाणा मधील गुडगाव पासून उत्तर प्रदेशातील नोएडा पर्यंत दिल्ली मेट्रो रेल्वेचा विस्तार झाला. अर्थात या सगळ्यात राजकीय इच्छाशक्ती जबरदस्त होती. दिल्ली राज्य सरकार, केंद्र सरकार आणि दिल्ली महानगर पालिका यांच्या सत्ताकरणात या काळात अनेकदा बदल होऊन सुद्धा कोणत्याही सरकारने DMRC च्या कामात जास्त ढवळाढवळ केली नाही. या मेट्रो रेल्वे करता मेट्रो रेक पण अंतराष्ट्रीय कंपन्यांकडून जागतिक निविदा काढत घेण्यात आले.
भारतात पहिल्यांदाच विमानतळा करता वेगळा मेट्रो मार्ग DMRC ने सुरू केला. भारतात पहिल्यांदाच खाजगी कंपनीने भारतात मेट्रो रेल्वे सेवा सुरू केली गुडगाव सायबर सिटी ते गुडगाव सेक्टर ५५-५६ पर्यंत ! मात्र आता हा मार्ग पण DMRC ला हस्तांतरित करण्यात आला आहे.
२०१० साली दिल्लीमध्ये कॉमनवेल्थ गेम आयोजित केले होते. या करता संपूर्ण दिल्ली शहर चकाचक करण्यात येत होते. या आयोजनाच्या निमित्याने जगाला भारताचा नवीन आर्थिक उत्कर्ष दाखवायची संधी भारताला मिळाली होती. म्हणूनच DMRC ने आपल्या पहिल्या फेजचे काम वेळेपूर्वी पूर्ण करत दिल्ली मेट्रो सेवा या कार्यक्रमात पूर्ण क्षमतेने द्यावी असा दबाव केंद्र सरकार आणि राज्य सरकार कडून DMRC वर आला. DMRC आणि ई श्रीधरन यांनी हे आव्हान यशस्वीपणे पेलले. सोबतच या आयोजनाचा फायदा दिल्ली मेट्रो रेल्वेला हा झाला की दिल्ली मेट्रो रेल्वे जगभरात नावाजली गेली. विदेशी लोकांकरता भारतात तेही दिल्लीत जागतिक दर्जाची सेवा मीळणे हा आश्चर्याचा सुखद धक्का होता. जगभरात दिल्लीची प्रतिमा बदलणारा हा काळ होता.
या नंतर आज दिल्ली मेट्रो रेल्वे जाळे जागतिक पहिल्या १० मोठ्या जाळ्यामध्ये १० व्या क्रमांकावर आहे. मात्र आगामी काही दिवसात ते अजून मोठे होणार आहे. इतकेच नाही तर आपल्या अनुभवाचा फायदा आता देशातील अनेक राज्यांना शहरांना देत DMRC देशातील अनेक शहरात मेट्रो रेल्वे उभारणी करण्याला साथ देत आहे. दिल्ली मेट्रो रेल्वेने खऱ्या अर्थाने भारतातील उपनगरीय वाहतुकीला एक आधुनिक चेहरा दिला आणि देशाला एक नवीन वाट दाखवली. दिल्ली मेट्रो रेल्वे मुळे देशातील मेट्रो विषयीची मानसिकता बदलली, देशातील अनेक राज्यात, शहरात मेट्रो रेल्वेचे प्रकल्प हाती घेण्यात आले. त्यातील काहींनी नवीन जागतिक मापदंड पण तयार केले या विषयी पुढच्या लेखात.
मेट्रो रेल्वेबद्दल खूप माहिती मिळते तुमचे ब्लॉग वाचून
उत्तर द्याहटवा