पत्रकार आहेत की गावगुंड

 


"रस्त्यावर दोघांच्या बाचाबाचीचे पर्यावसन मारामारीत झाले." आपल्या घरी येणाऱ्या वृत्तपत्रात अशी बातमी जवळपास दर दोन - तीन दिवसाआड येत असते. रस्त्यावरचे गर्दुल्ले, दारुडे यांची अशी भांडणे होतच असतात, पण पत्रकारच असे रस्त्यावर मारामारी करायला लागले तर !
५ सप्टेंबर २०१७ रोजी भारतातील लोकशाही धोक्यात आली होती. कारण होते बंगलोर येथे लोकशाहीचा "चवथा खांब" म्हणून ज्यांच्या कामाचे कौतुक केल्या जाते अश्या एका महिला पत्रकारांची हत्या झाली होती. बरोबर, हत्या झाली होती भारतातील तमाम लिब्रांडू जमातीच्या गळ्यातील ताईत असलेल्या महिला पत्रकार गौरी लंकेश यांची. भारतातील तमाम तथाकथित स्वतंत्र्य वृत्तीच्या पत्रकारांनी छाती बडवायला सुरवात केली. देशाच्या राजधानीतील प्रसिद्ध प्रेस क्लब येथे तडकाफडकी सगळे तथाकथित पुरोगामी, स्वतंत्र्य वृत्ती असलेले पत्रकार जमा झाले. या निमित्याने पुन्हा केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपावर, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर, राष्ट्रवादी विचारधारेवर, हिंदुत्ववादिंवर येथेच्छ तोंडसुख घेतल्या गेले. भारतातील पत्रकारांचा आवाज कसा दाबल्या जात आहे या वर भाषण झाली. देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची कशी गळचेपी होत आहे यावर गळे काढून झाले. 

पण २० सप्टेंबर २०१७ रोजी त्रिपुरा येथे एका पत्रकारांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्रिपुरा राज्यातील इंडियन पीपल्स फ्रंट ऑफ इंडिया (IPFT) आणि त्रिपुरा राजेर उपजाती गणमुक्ती परिषद या (TRUGP) या दोन संघटनांच्या राजकीय संघर्ष टिपत असतांना स्थानीय वृत्तवाहिनीचा पत्रकार शंतनू भौमिक याची हत्या आपल्या विरोधात वृत्तांकन करतो म्हणून TRUGP च्या गुंडांनी आपल्या पायाखाली तुडवत केली. पोलीस समोर असूनपण त्यांना फक्त बघ्याची भूमिका घेता आली. या प्रकरणात पोलिसांची हतबलता इतकी होती की जवळपास दोन तास त्यांना रस्त्यावर पडलेले शंतनू भौमिक यांचे शव ताब्यात घ्यायला लागले.
पण आश्चर्य म्हणजे पत्रकार गौरी लंकेश यांच्या नंतर फक्त २० दिवसांनी झालेली शंतनू भौमिक यांची हत्या झाल्याने भारतातील लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे धोक्यात आल्याचे भारतातील कोणत्याही पत्रकार बंधूंना वाटले नाही. त्या मुळे दिल्लीच्या प्रेस क्लब वर एकत्र येत भाषणबाजी तर झालीच नाही, पण कोण्या पत्रकाराने साधा निषेध पण व्यक्त केला नाही. काय कारण होते याचे ? शंतनू भौमिक ना तथाकथित राष्ट्रवादी विचारांचे होते, ना हिंदुत्ववादी ते होते स्वतंत्र्य वृत्तीचे पत्रकार, कोणत्याही वैचारिक पर्शवभूमीचा विचार न करता योग्य माहिती आपल्या दर्शकांपर्यंत पोहचवण्याचे काम ते करत होते. नेमका याचाच राग तत्कालीन सत्ताधारी CPM या डाव्या राजकीय पक्षाच्या आशीर्वादावर आणि विचारधारेवर पोसलेल्या TRUGP च्या गुंडांना होता आणि त्यांनी ही हत्या केली. नेमके हेच कारण होते की भारतातील कोणत्याही लिंब्रांडूने किंवा पत्रकाराने या हत्येच्या विरोधात आपले उर बडवले नाही. 



पण आपले व्यवसाय बंधू आपल्या मागे उभे नाहीत हे फक्त शंतनू भौमिक यांच्याच बाबतीत घडले असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चूक आहात. १९९८ ते २०१८ या काळात भारतात जवळपास १९ पत्रकार मारल्या गेले. यात शंतनू भौमिक यांच्या नंतर काश्मीर मध्ये इस्लामी अतिरेक्यांनी मारलेल्या शुजात बुखारी यांचे पण नाव आहेच. पण यांच्या करता पण भारतातील कोण्या पत्रकारांनी दोन अश्रू ढाळले नाही ही वस्तुस्थिती आहे. मग लासा कौल, पी एन हांडू, मोहम्मद शबान वकील, अली मोहम्मद महाजन, सय्यद गुलाम नबी, मोहम्मद शफी बट, गुलाम मोहम्मद लोन, मुश्ताक अली, गुलाम रसूल शेख, अल्ताफ अहमद फकतूर, सैदान शफी, तारिक अहमद, प्रदीप भाटीया, पर्वाज मोहम्मद सुलतान, अब्दुल माजित भट, आसिया जिलानी, अशोक सोडी, जावेद अहमद मीर वगैरे नावे तर कोणाच्या खिजगणतीत नसतील. 

६ जानेवारी १८३२ या दिवशी मराठीत वृत्तपत्राची सुरवात केली. तेव्हा पासून आज पर्यंत महाराष्ट्राला १८८ वर्षाची पत्रकारितेची उज्वल परंपरा लाभली आहे. राज्यातील अनेक पत्रकार - संपादक यांनी जनतेला प्रगल्भ करायचे काम केले. महाराष्ट्र हे देशात “वृत्तपत्र” सुरू करणाऱ्या अग्रगण्य राज्यापैकी एक राज्य. देशाला लोकमान्य टिळक, खाडिलकर, आचार्य अत्रे, माडखोलकर सारखे दीग्गज पत्रकार दिलेला महाराष्ट्र हाच का? असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एकेकाळी राज्यातील वृत्तपत्रात दोन भिन्न वैचारिक बांधिलकी जपणारे पत्रकार पण गुण्यागोविंदाने एकत्र काम करतांना या राज्याने बघितले आहेत. म्हणूनच उजव्या विचाराच्या नागपूर तरुण भारतात काम करण्याचा अनुभव सांगतांना कट्टर संघ विरोधक आणि डाव्या विचारांकडे झुकलेले ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बदरापूरकर कट्टर संघ विचारक माजी संपादक मा. गो. वैद्य यांच्या विषयी गौरोउद्गार काढतात हे त्याच मुळे. 

असे नाही की राज्यात पत्रकारांवर हल्लेच झाले नाही, त्यांना राजकीय त्रास झाला नाही. पत्रकार निखिल वागळे यांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केलीच होती. वृत्तपत्र सृष्टीतपण व्यवसायिक राजकारणातून रुसवे फुगवे, शहा कटशहा झालेच नाही असे नाही. मात्र हे सगळे वृत्त सृष्टीच्या आतच राहिले. 



मात्र आज पत्रकार कॅमेरा समोर एकमेकांशी भिडले हे मात्र राज्याच्या वृत्तसृष्टीला नक्कीच काळिमा फासणारी गोष्ट आहे. मुख्य म्हणजे या गुंडागर्दीचे फक्त आपल्या वैचारिक राजकीय बैठकी पाई कौतुक करणारे बघून यांच्या वैचारिक बांधिलकीची किळस येत आहे. मुख्य म्हणजे ज्यांनी मारले ते पत्रकार नंतर विजय मिळवल्याचा आनंद चहा बिस्कीट खाऊन साजरा करत आहेत असे फोटो मोठ्या अभिमानांनी टाकत आहे हा प्रकार तर खऱ्या पत्रकारांनी लाजेने मान खाली घालण्यासारखा आहे. आज ज्यांनी मार खाल्ला ते आता अंगरक्षक घेऊन फिरत असल्याचे छायाचित्र पसरत आहे. उद्या या अंगरक्षक पैलवणाने एक दोघा पत्रकारांना बुकलून काढले तर आज समर्थन करणारे तेव्हा पण असेच समर्थन करणार का ? हा खरा प्रश्न आहे.

मात्र एक नक्की सांगतो आज झालेली मारामारी ही फक्त वैचारिक विरोधातून झालेली मारामारी नसून त्याच्या मागे वृत्तवाहिन्या मधील TRP ची जीवघेणी स्पर्धा पण तितकीच कारणीभूत आहे. रस्त्यावर हाडाच्या तुकड्यासाठी भिडणारे कुत्रे जसे एकमेकांवर जातात तेच चित्र आजच्या या भांडणात दिसत होते.
बाकी "I do not agree with a word that you say, but I will defend to the death your right to say it."-व्होल्टेअर याचे हे वाक्य दुसऱ्यावर फेकणे खूप सोपे असते, मात्र या वाक्याचा अंगीकार करणे कठीण हेच आजच्या पत्रकारांच्या रस्त्यावरील मारामारीतून दिसून येते.

टिप्पण्या