"मेट्रो रेल्वे" आणि आपण - ( भाग - ५ )

तर १९८४ साली देशातील कलकत्ता महानगरीतुन मेट्रो रेल्वे सुरू झाली आणि भारत जगातील मेट्रो रेल्वे जाळे असलेल्या देशात सामील झाला. पण देशात मेट्रो रेल्वे विषयी नक्की काय विचार होते?
कदाचित शहरांतर्गत प्रवासाकरता प्रचंड पैसे खर्च करत यंत्रणा उभारणे म्हणजे पैशाचा अपव्यय वाटत असेल. असे नाही की भारतात अजिबातच शहरातर्गत प्रवासी वाहतुकीच्या सोइ नव्हत्या. मुंबई, दिल्ली, कलकत्ता, चेन्नई या शहरात तर ब्रिटिशांनीच भारतीय रेल्वे अंतर्गतच उपनगरीय रेल्वे सेवा सुरू केल्या होत्या. स्वातंत्र्यानंतर भारतीय रेल्वेने आपल्या उपनरीय रेल्वे सेवेचा विस्तार अजून काही शहरात केला होता. पण यात महत्वाची गोची ही होती की उपनगरीय सेवा चालवायला रेल्वेने कोणतीही स्वतंत्र्य व्यवस्था केली नव्हती, तर रेल्वेचे ज्या मार्गांवरून आंतरराज्यीय प्रवासी आणि माल वाहतूक होते त्याच मार्गावर या उपनगरीय सेवा चालवण्यात येत होती. त्या मुळे स्थानक खूप दूर, तर काही भगत अडचणीच्या ठिकाणी असायचे. स्थानकावर उतरल्यावर प्रवाशाला पुन्हा घरापर्यंत जायला वेगळी प्रवासी व्यवस्था करावी लागत होती. सोबतच रेल्वेच्या बाकी वाहतुकीला सांभाळत या उपनगरीय सेवा चालवायला पुन्हा रेल्वेवर वेगळा ताण पडे.
बरे काळानुसार शहरे वाढत होती तशी तशी ही उपनगरीय वाहतूक सेवा अपुरी पडायला लागली. मुंबईची भौगोलिक स्थिती नुसार मुंबईत उपनगरीय वाहतूक व्यवस्था उत्तम वाटत असली तरी दिल्ली, कलकत्ता, चेन्नई सारख्या शहरात ती त्रासदायक होत होती. पण पुन्हा शहरातील काही लोकांसाठी इतका खर्च करायचा हे आपल्या समाजवादी विचारसरणीत बसत नव्हते. अर्थात या वर उपाय शोधायचा प्रयत्न झालाच नाही असे नाही.
या वर उत्तर होते मद्रास म्हणजे आताचे चेन्नई एम.आर.टी.एस. एका अर्थी भारतात मेट्रो रेल्वे सेवा मिळालेले चेन्नई दुसरे शहर आहे. फक्त फरक इतकाच ही पूर्णतः भारतीय पद्धतीचा जुगाडू कार्यक्रम होता. पण भारतीय रेल्वेच्या सदर्न रेल्वेने त्याच मेट्रोपोलिटीन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट्स (MTP) मार्फत ही व्यवस्था पूर्ण केली. ही व्यवस्था मेट्रो रेल्वे पेक्षा कमी आणि इतर शहरातील उपनगरीय रेल्वे पेक्षा जास्त अशी आहे.
चेन्नईमध्ये उपनगरीय रेल्वे १९३१ पासून सुरू होती. मात्र वाढणार शहर लक्षात घेता ते अपुरे पडायला लागले. तेव्हा शहराकरता एक वेगळी मास रॅपिड ट्रांझिस्ट सिस्टिम असावी असा विचार जोर धरू लागला. तेव्हाच भारतीय रेल्वे अंतर्गत स्थापन केलेल्या MTP ला याचे काम सोपवण्यात आले. १९७० साली याचा सर्व्हे अहवाल सादर करण्यात आला. पुन्हा भारतातील बाबूशाही दिरंगाई आणि आर्थिक टंचाई या सारख्या प्रश्नात या योजनेला विलंब व्हायला लागला. या योजने अंतर्गत एकूण ५९.३८ किलोमीटरचे जाळे चेन्नई शहरात उभारण्यात येणार होते. पुन्हा खर्च कमी करण्याच्या उद्देशाने आणि कलकत्ता येथील अनुभव लक्षात घेता हा पूर्ण मार्ग उन्नत (एलोव्हेटेड) राहील असे ठरवण्यात आले.
शेवटी १९७० साली योजलेल्या या योजनेचे काम १९८० साली सुरू झाले. पहिले चेन्नई बीच ते चेपोक या ५.१ किलोमीटर अंतराचा हा मार्ग १ नोव्हेंबर १९९५ ला प्रवाश्यांच्या सेवेत रुजू झाला. लक्षात घ्या हा तोच काळ आहे जेव्हा मुंबई उपनगरीय रेल्वे मध्ये गर्दी वाढायला लागली होती. सोबतच नवी मुंबईत तयार झालेल्या वेगळ्या उपनगरीय रेल्वे सेवेचा पहिला मार्ग मानखुर्द ते मानसरोवर सुरू झाला होता. तेथील वेगळी उपनगरीय व्यवस्था ही मुंबई उपनगरीय व्यवस्थेपेक्षा अधिक नियोजित वाटत होती. त्याच धर्तीवर मुंबईत पण उन्नत मार्गा वरून उपनगरीय रेल्वे चालवण्याची योजना मुंबईकरांसमोर ठेवण्यात आली होती. ही योजना सादर करण्यामागे पण वरील MTP च होती. मात्र आर्थिक टंचाई आणि मुंबईतील जागेची कमतरता या मुळे योजना प्रत्यक्षात आज पर्यंत येऊ शकली नाही.


मात्र चेन्नई मधील MTRS यशस्वी रित्या धावायला तर लागलीच, त्याच्या जाळ्यात वाढपण झाली. अगोदरच्या ५.१ किलोमीटरमध्ये अजून १४.२४ किलोमीटरची भर पडून चेपोक ते वेलाचेरी हा मार्ग वाढवण्यात आला. एकूण १९.३४ किलोमीटरचा हा मार्ग आज चेन्नईत सेवा देत आहे. या मार्गावर भारतीय रेल्वे तेच EMU रेक चालवते जे उपनगरीय रेल्वे म्हणून वापरले जातात. आता त्यात काही इंटिग्रेटेड कोच फॅक्टरी, चेन्नईने तयार केलेले वातानुकूलित "मेधा" रेकची जोड देत चेन्नईकरांना मेट्रो रेल्वेचे काहीसे सुख द्यायचा प्रयत्न केला जात आहे.
आह चेन्नईमध्ये वेगळी मेट्रो रेल्वे सेवा पण सुरू झाली आहे. लवकरच भारतीय रेल्वेच्या ताब्यातील ही MRTS चेन्नई मेट्रोला हस्तांतरित करण्याचे नियोजन होत आहे. तसे झाले तर चेन्नई मेट्रोचे १९.३४ किलोमीटरचे जाळे आपसूक वाढेल आणि चेन्नईकरांना या मार्गावर पण जागतिक प्रतीचा प्रवास करता येईल.
पुढच्या भागात आपण भारतातील सगळ्या मेट्रो रेल्वे करता आदर्श अश्या दिल्ली मेट्रोची कहाणी बघू. कारण भारतीय मानसिकता बदलावणारी आणि भारताच्या आर्थिकशक्तीचा, इच्छाशक्तीचा आविष्कार दाखवणारी ही मेट्रो सेवा आहे. 

टिप्पण्या