संजय गांधी - असे गांधी ज्यांची आठवण आज काँग्रेसला नकोशी आहे !

भारतात आणीबाणीची घोषणा झाली तेव्हा वॉशिंग्टन पोस्टचे पुलित्झर पुरस्कार विजेते पत्रकार लुईस एम सीमंस हे देशाच्या राजधानीत होते. त्याच काळात अमेरिकेतील या प्रतिष्ठित आणि अधिक खपच्या वृत्तपत्रात पत्रकार लुईस एम सीमंस यांच्या नावाने एक बातमी छापल्या गेली आणि जगात, त्याही पेक्षा भारतात मोठी खळबळ उडाली. बातमी होती देशाच्या शक्तिमान महिला पंतप्रधान इंदिरा गांधी आणि त्यांचा धाकटे सुपुत्र संजय गांधी यांच्या बद्दल. या बातमी नुसार आणीबाणी जाहीर व्हायच्या अगोदर एका खाजगी रात्रभोज आयोजित केल्या गेला होता. ज्यात इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांच्या सोबत काँग्रेसचे आणि राजधानीतले अनेक गणमान्य व्यक्ती हजर होते. या रात्रीभोज मध्ये राजकीय चर्चा सुरू असतांना वातावरण तंग झाले आणि संजय गांधी यांनी श्रीमती गांधी यांना थप्पड मारली !

वॉशिंग्टन पोस्ट मध्ये आलेली ही बातमी जगात आणि देशात वनव्यासारखी पसरली. मात्र भारतात तेव्हाच आणीबाणी लागू झाल्याने आणि त्या आधारे वृत्तपत्र सेन्सॉर लागू झाल्यामुळे स्थानिक वृत्तपत्रांना ही बातमी प्रत्यक्ष छापता आली नाही, मात्र तत्कालीन काळात माता आणि पुत्र यांच्या वयक्तिक संबंधांवर चर्चा मात्र सुरू झाल्या. यानंतर लुईस एम सीमंस यांना अटक करून अमेरिकेत वापस पाठवण्यात आले. पण या बातमी मुळे संजय गांधी पुन्हा जगाच्या नजरेत आले आणि आणीबाणीच्या काळखंडात सतत वेगवेगळ्या कारणांनी गाजत राहिले.

संजय गांधी यांचा जन्म १४ डिसेंबर १९४६ साली नवी दिल्ली येथे झाला. हे फिरोज गांधी आणि इंदिरा गांधी यांचे दुसरे अपत्य. नेहरू परिवाराची आभा, इंदिरा गांधी यांची हुकूमशाही वृत्ती आणि आपले वडील फिरोज गांधी यांची निर्भडता या सगळ्या गोष्टी या व्यक्तित्वात एकत्र आल्या असल्याचा अनुभव देशवासीयांना येणार होता. संजय गांधी यांचे शिक्षण दिल्ली मध्ये आणि नंतर डेहराडून येथील प्रसिद्ध डुन स्कुल मध्ये झाले. या नंतर उच्चशिक्षण त्यांनी घेतले स्वीझरलँड मध्ये. त्यांनी वाहन अभियंता म्हणून पदवी प्राप्त केली आणि रोल्स रॉईस सारख्या वाहान निर्मिती उद्योगात उमेदवारी पण! कार आणि विमाने ही त्याचे आवडते उद्योग. १९७६ मध्ये संजय गांधी यांना विमान उडवण्याचा परवाना पण मिळाला. त्याचे मोठे भाऊ राजीव गांधी तेव्हा वाणज्यीक पायलट म्हणून आपली कारकीर्द सुरू केली होती.

अर्थात इतके सारे संजय गांधी बद्दल चांगले सांगितल्या जात असले तरी यातील काही सगळेच काही खरे नाही. मुळातच संजय गांधी यांचा स्वभाव कमालीचा हट्टी होता. त्याच पाई त्यांनी आपले डुनस्कुल मधील शिक्षण अर्थवट सोडल्याचे काही अभ्यासक सांगतात. मात्र ते विदेशात गेले आणि रोल्स रॉईस मध्ये काही वर्षे घालवली हे नक्की. त्यांना मोटारगाड्यांची आणि वेगात मोटार हाकायची आवड होतीच पण स्वप्न होते भारतीय मोटर बनवायचे आणि तेही स्पोर्ट्स कार ! नेहरूंचा नातू आणि इंदिरा गांधी यांचा मुलगा असल्याने त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे देशाने मनावर घेतले. होय, देशानेच कारण १९७१ साली संजय गांधी यांनी सरकारला एक स्वस्त मोटरगाडी बनवायचे स्वप्न दाखवले. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी तसा प्रस्ताव कॅबिनेट बैठकीत ठेवला. या प्रस्तावाला पारित केल्या गेले आणि वेगाने पुढील पावले उचलली गेली. या उद्योगाचे नाव ठेवल्या गेले "मारोती मोटर्स लिमिटेड" या उद्योगाचे संचालक आणि व्यवस्थापक दोन्ही संजय गांधी होते. जेव्हा त्यांच्या पदवी विषयी पण शंका होती आणि त्यांच्या या उद्योगाच्या अनुभवविषयी पण ! पण इंदिरा गांधी यांचा मुलगा देशाची इतकी सेवा करत आहे दूरदृष्टी ठेवत आहे तेव्हा त्याला मदत करणे आपले कर्तव्य आहे हे अनेक देशवासियांना लक्षात आले. त्यात हरियाणा राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री बन्सीलाल हे पहिले होते. त्यांनी कायद्याकडे कानाडोळा करत या मारुती मोटर्स लिमिटेड साठी गुडगाव जवळ शेकडो एकर जमीन दिली. मात्र हे एकाएकी झाले नव्हते बरे का ! सरकारकडे प्रस्ताव ठेवायच्या अगोदर संजय गांधी यांनी आपले स्वप्न देशवासियांना स्वस्त मोटारगाडी उपलब्ध करून घ्यायचे असल्याचे म्हंटले होते. त्या क्षणा पासूनच सरकारने आपल्या मोटर उद्योगाच्या बाबतीत असलेल्या आपल्या धोरणात कमालीचा बदल आणायला सुरवात केली. पुढे तत्कालीन उद्योग मंत्र्यांनी १३ नोव्हेंबर १९६३ साली संसदेत सरकार स्वस्त मोटर गाड्या निर्माण करायचा विचार करत असल्याचा आणि तसा प्रस्ताव सरकार समोर आल्याची घोषणा पण केली होती. पुढे जर्मन मोटर गाड्या निर्माण करणारा उद्योग वॅक्स वेगन सोबत मारुती लिमिटेडने करार पण केला. मात्र पुढे सगळे थंड बसत्यात राहिले.

याच दरम्यान १९७१ शीख परिवारातील एक मुलगी मेनका हिच्या संपर्कात आले. तेव्हा या मुलीला मॉडेल व्हायचे होते. तत्कालीन काळातील बाँबे डाइंग सारख्या मातब्बर उद्योगाने आपल्या जाहिरातीत तिला स्थान दिले होते. संजय गांधी यांचा मित्र विनू कपूर यांनी १९७३ साली एका लग्नात संजय गांधी यांची ओळख मेनका सोबत करून दिली. त्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले, आणि संजय गांधी यांनी लग्नाचा प्रस्ताव समोर ठेवला. परिणामी २३ सप्टेंबर १९७४ ला दोघांचे लग्न झाले. लग्ना नंतर सहा वर्षांनी वरून गांधी यांचा जन्म झाला.

या निर्णयाला विरोधी पक्षा कडून बराच विरोध झाला. जॉर्ज फर्नाडिस, अटल बिहारी वाजपेयी, मधु लिमये यांनी या विरोधात बरेच आकाशपाताळ एक केले. मात्र सरकारवर याचा काहीच असर झाला नाही. या बाबतीत देशात उठणारे इतर आवाज पण दाबण्यात सरकारला यश आले. पुढे देशात आणीबाणी लागल्या मुळे देशातून हा मुद्दा थंड बसत्यात पडला. आणीबाणी नंतर आलेल्या जनता पार्टी सरकारने या मारुती लिमिटेडच्या योजनेची चौकशी करण्यासाठी न्यायमूर्ती ए. पी. गुप्ता यांचा एक सदस्यीय समिती स्थापन केली. या समितीने या उद्योगातील अनेक निर्णय आणि एकूण कार्यपद्धतीवर बरेच ताशेरे ओढले.

संजय गांधी साधारण १९७४ पासून सक्रिय राजकारणात आपले अस्तित्व दाखवायला सुरवात केली होती. हा काळ इंदिरा गांधी यांचा कठीण काळ होता. देशाची आर्थिक परिस्थिती खालावत होती, उद्योग धंदे थंड पडले होते, भ्रष्टाचाराचा आरोप तर सरकारवर लागत होते, काही प्रकरण उघड होत होती, देशात इंदिरा गांधी आणि काँग्रेस विरोधात जनमानस तयार होत होते, जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वात नवनिर्माण आंदोलन सुरू झाले होते, हळूहळू ते बिहार, गुजरात नंतर देशात पसरायला सुरवात झाली होती. अश्या कठीण प्रसंगात इंदिरा गांधी यांना आधार द्यायला संजय गांधी आपल्या आईच्या सोबतीला आले. आपल्या आईची हुकूमशाही प्रवृत्ती अंगात ठासून भरली होतीच, सोबतच हट्टी आणि दुसऱ्याला तुच्छ लेखण्याची मनोवृत्तीने आता संजय गांधी काँग्रेस मध्ये आपले अस्तित्व दाखवायला सुरवात केली. अर्थात इंदिरा सुपुत्र म्हणजे राजपुत्रच त्या मुळे लवकरच काँग्रेस मध्ये वेगळी "संजय ब्रिगेड" तयार झाली. अंबिका सोनी, कमलनाथ, बन्सीलाल सारखे काँग्रेसी नेते संजय गांधी यांचे समर्थक म्हणून समोर आले.

पण संजय गांधी आणि ब्रिगेडला खरी प्रसिद्धी मिळाली ती देशात आणीबाणी लागल्या नंतर ! इंदिरा गांधी यांचे राजकीय आणि वयक्तिक सल्लागार म्हणून त्यांनी काम करायला सुरुवात केली आणि हळूच संपूर्ण पंतप्रधान कार्यालय आपल्या तालावर नाचवायला सुरवात केली. खरे तर देशात आणीबाणी लावायची या विचारांची प्रेरणाच संजय गांधी यांची होती अशी वदंता आहे. अर्थात आणीबाणीत संजय गांधी ज्या प्रमाणे निर्णय घेत होते, त्याची अमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाला वेठीला धरत होते त्या वरून ही वदंता खरीच असेल. मग "युथ काँग्रेसच्या" एका कार्यक्रमात गायला नकार दिला म्हणून सुप्रसिद्ध गायक किशोर कुमार यांच्या गाण्यावर "ऑल इंडिया रेडिओ" वरती प्रसारित करायला बंदी घातल्या गेली. अमृता नाहाटा दिगदर्शीत "किस्सा खुर्सी का" नामक चित्रपटात तत्कालीन राजकीय पतिस्थितीवर भाष्य करत इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांच्यावर टीका असल्याच्या कारणावरून सेन्सॉर बोर्ड मध्ये अडकली. याला पारित करायला सरकार कडे पाठवण्यात आले, तत्कालीन "माहिती प्रसारण मंत्रालयाने" या चित्रपटात तब्बल ५१ दृश्य आणि संवाद कापायला सांगितले. आणीबाणीचा उपयोग करत या चित्रपटाची रिळे सेन्सॉर बोर्ड मधून गायब करण्यात आली. असे म्हणतात की मारुती उद्योगाच्या गुडगाव फॅक्टरी मध्ये ही रिळे जाळण्यात आली. पुढे या प्रकरणात संजय गांधी आणि तत्कालीन माहिती प्रसारण मंत्री विद्याचरण शुक्ल यांच्यावर खटला दाखल करण्यात आला, न्यायालयाने यांना ११ महिन्यांची शिक्षा पण जाहीर केली आणि नंतर माफ पण केली.

संजय गांधी यांच्या हुकूमशाही कार्यप्रणालीचा फटका जसा जनतेला बसत होता, तसाच काँग्रेसच्या काही नेत्यांना आणि मंत्र्यांना पण बसत होताच. आणीबाणी लागली तेव्हा माहिती आणि प्रसारण खात्याचे मंत्री होते इंद्र कुमार गुजराल ! एक दिवस गुजराल यांच्या भेटीला जात यांना आदेश दिल्या गेले की, या पुढे आकाशवाणीवर प्रसारित होणाऱ्या सगळ्या बातम्या अगोदर संजय गांधी यांना दाखवायला हव्या. गुजराल यांनी तसे करण्यास असमर्थता व्यक्त केली. इंदिरा गांधी तेव्हा तिथेच होत्या पण त्या काहीही बोलल्या नाही. दुसऱ्या दिवशी संजय गांधी पुन्हा गुजराल यांना भेटले आणि त्यांनी गुजराल मंत्रालय योग्य पद्धतीने हाताळता येत नसल्याचे सांगत लवकरात लवकर सुधारणा करण्याचे सांगितले. संजय गांधी यांची ही पद्धत गुजराल यांना रुचली नाही. गुजराल यांनी स्पष्ट पणे आपले वय आणि आपला काँग्रेस मधील अनुभव ध्यानात देत संजय गांधी यांच्या समोर आपली स्पष्ट शब्दात नाराजी जाहीर केली.

या सगळ्या नंतर पुन्हा एक दिवस संजय गांधी यांचे खास मित्र मोहम्मद युनूस यांनी गुजराल यांना फोन करून आंतराष्ट्रीय वृत्त एजन्सी बी बी सी चे दिल्ली कार्यालय बंद करण्याची आणि बी बी सीचे भारताचे मुख्य संपादक मार्क टुली यांना अटक करण्याचे निर्देश दिले, आरोप होता त्यांनी तथाकथीतपणे खोट्या बातम्या प्रसारित केल्याचा ! गुजराल यांनी पुन्हा तसे करण्यास नकार दिला. या संपूर्ण प्रकरणाचा एक अहवाल बनवत पंतप्रधान कार्यालयात इंदिरा गांधी यांना पाठविला. मात्र त्याच संध्याकाळी इंदिरा गांधी यांनी गुजराल यांना फोन केला आणि राष्ट्राच्या अश्या कठीण प्रसंगी माहिती आणि प्रसारण खाते अधिक कडक हातात हवे असे आपणाला वाटते असे सांगत हे खाते आपण आपल्या हातात घेत असल्याचे सांगितले. पुढे हे खाते संजय गांधी यांचे मित्र आणि समर्थक विद्याचरण शुक्ल यांच्या हातात सुपूर्त करण्यात आले.

पण संजय गांधी गाजले ते त्यांनी आणीबाणीत बनवलेल्या पाच सूत्री कार्यक्रम आणि त्याच्या अमलबजावणीच्या पद्धतीमुळे ! या कार्यक्रमात शिक्षण, नसबंदी, वृक्षारोपण, जातीवाद विरोध आणि हुंडा विरोध असे कार्यक्रम ठेवल्या गेले. यातील सगळ्यात गाजला तो "नसबंदी" कार्यक्रम ! देशात मोठ्या प्रमाणावर या नसबंदी कार्यक्रमावर भर दिला गेला आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस आणि प्रशासन कामाला जुंपल्या गेले. काही ठिकाणी तर विवाह न झालेल्या तरुणांची पण नसबंदी करत कार्यक्रम कमालीचा यशस्वी केला. या कार्यक्रमाला मुस्लिम समाजाने चांगलाच विरोध केला त्याचे कारण धार्मिक होते आणि बाकीच्यांनी या कार्यक्रमाच्या जबरदस्ती अमलबजावणीचा विरोध केला. असाच एक कार्यक्रम दिल्लीचे सौदर्यकरणाचा पण गाजला, दिल्लीच्या जामा मशीद जवळील अनधिकृत झोपड्या हटवून तिथे त्या भागाचे केलेले सौदर्यकरण असेच वादात सापडले.

या काळात संजय गांधी यांच्यावरील अजून एक आरोप म्हणजे भष्टाचाराचा ! या काळात संजय गांधी हेच सर्वेसर्वा असल्याने आणि पंतप्रधान कार्यालय पण त्यांच्याच हातात असल्यामुळे सहाजिकच आपली सरकार दरबारी अडकलेली कामे पूर्ण करण्यासाठी उद्योजक आणि सगळे त्यांच्या दरबारात हाजरी देऊ लागले. यातून अनेक उद्योजगांना अक्षरशः लॉटरी लागली. न मिळणारा परवाना, परवानग्या तिथे चुटकीसरशी मिळायला लागल्या, भोपाळ मधील कुप्रसिद्ध वायू दुर्घटनेवाली युनियन कार्बाईड या कारखान्याची परवानगी पण याच काळातील.

अनेकांचे मत असे आहे की यात संजय गांधी यांचे नाव पुढे करत स्वतःच्या तुंबड्या भरायचे हे उद्योग संजय गांधी समर्थक म्हणून समोर येणारे, त्यांच्या सोबत आपला दिवस व्यतीत करणारे त्यांचे खास मित्रच करत होते. अर्थात यातील खरे खोटे देवच जाणे मात्र तेव्हा काही नवीन समर्थक मात्र संजय गांधी यांना मिळाले होते. त्यातील एक नाव होते अभिनेत्री अमृतसिंग यांची आई रुखसाना सुल्तान ! या बाई संजय गांधी यांच्या खास मैत्रीण आहे अशी वदंता होती, त्या मुळे आपसूकच संजय गांधी यांची शक्ती या बाईंच्या मागे उभी होती आणि या बाईंनी त्याचा पुरेपूर वापर पण केला.
एकूण संजय गांधी आणीबाणी काळात भरपूर बदनाम झाले. पण काँग्रेस मधील त्यांची पत वाढत राहिली. आणीबाणी उठल्यावर १९७७ साली संजय गांधी पहिल्यांदा अमेठी मधून निवडणुकीला उभे राहिले आणि आणीबाणी विरोधी आंदोलन आणि जनता पार्टी याच्या परिणामाने पडले ! पण या काळात संजय गांधी यांनी सक्रिय राजकारणात चांगला जोर मारला. आपली आई इंदिरा गांधी यांची जणमाणसात ढासळलेली प्रतिमा पुन्हा उजळून काढायला सूरवात केली. तत्कालीन काळात इंदिरा गांधी यांनी घेतलेले निर्णय आणि जनतेच्या मनात निर्माण केलेली जागा याचे सूत्रधार संजय गांधीच होते असे म्हणतात. अर्थात इंदिरा गांधी यांची स्वतःची प्रतिमा बघितली तरी यावर विश्वास ठेवणे काहीसे कठीण आहे.

१९८० साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळाले. यात संजय गांधी यांचा वाटा किती, इंदिरा गांधी यांचा वाटा किती किंवा हरलेल्या जनता पक्षाच्या आपसातील मतभेदांचा वाटा किती हा संशोधनाचा विषय आहे. मात्र या निवडणुकीत संजय गांधी अमेठीचे खासदार बनून संसदेत पोहचले. जानेवारी १९८० पासून त्यांची ही नवीन खेळी सुरू झाली. काँग्रेसमधील मोठे प्रस्थ आणि देशाचे भावी पंतप्रधान म्हणूनच त्याच्या कडे बघितल्या जायला लागले. पण या नंतर सहा महिन्यातच हे स्वप्न भंगले.

२३ जून १९८० या तारखेला संजय गांधी सकाळी आपण विमान उडवायला जात आहोत म्हणून निघाले. संजय गांधी जितक्या वेगाने निघाले तितक्याच वेगाने इंदिरा गांधी त्यांना विमान उडवतांना "स्टंट" करू नको असे बजावायला बाहेर पडल्या. पण हे ऐकायच्या आधीच संजय गांधी मोटार गाडी मध्ये बसून निघून गेले होते. खरे तर असे म्हणतात त्या दिवशी संजय गांधी विमान उडवायला माधवराव शिंदीया सोबत जाणार होते, मात्र त्याना उशीर होत आहे बघत संजय गांधीच सफदरजंग विमानतळावर गेले आणि तेथील कॅप्टन सुभाष सक्सेना यांना सोबत घेत विमान उडवले. आता विमानाचा अपघात कसा झाला या बद्दल लोकांमध्ये एकमत नाहीये. काहींच्या मते नियम न पळणे आणि अनावश्यक "स्टंट" करणे संजय गांधी यांना भोवले. एक तर निमानुसार बूट घालायच्या ऐवजी संजय गांधी कोल्हापुरी चपला घालून विमान उडवत होते, जे धोकादायक होते, त्यातून त्यांनी कमी उंचीवर असतांना "स्टंट" करायच्या प्रयत्न केला जो त्यांच्या जीवावर बेतला. पण अजून एक कहाणी अशी की संजय गांधी यांनी विमानातून दोन फेऱ्या पूर्ण करून तिसरी फेरी करत असतांना त्याच्या विमानाच्या इंजन मध्ये खराबी आली आणि ते बंद झाले, मात्र काही करण्याच्या अगोदर विमान पडले आणि संजय गांधी प्राणास मुकले. अनेकांना हा विमान अपघात, अपघात न वाटता घातपात पण वाटतो आणि रोख श्रीमती इंदिरा गांधी यांच्या कडे जातो. काय असेल ते असो मात्र या अपघातात संजय गांधी यांचे निधन झाले. संजय गांधी यांची जीवनी "द संजय स्टोरी" लिहणारे पत्रकार विनोद मेहता यांनी आपल्या पुस्तकाच्या नवीन आवृत्तीत संजय गांधी यांच्यावर लिहण्याची प्रेरणा याची कारणी मीमांसा करतांना लिहले, " मी प्रयत्न केला की एका अश्या व्यक्तीच्या जीवनावर प्रकाश टाकू जो एक दिवस राजा होणार होता. तो व्यक्ती ज्याने जवळपास सिंहासनावर आपला कब्जा केलाच होता, समजा त्याने विमान उडवतांना कोल्हापुरी चप्पल घातली नसती तर !" लेखकाचा इशारा कुठे आहे हे आपल्याला समजले असेलच.

राणी सिंह नावाच्या अजून एक लेखिका आहेत ज्यांनी "सोनिया गांधी : एन एक्साऑर्डनरी लाईफ" नावाचे पुस्तक लिहले आहे. त्यात संजय गांधी यांच्या अपघातानंतरचा घटनाक्रम लिहतांना सांगतात की इंदिरा गांधी यांना अपघाताची बातमी मिळाल्यावर त्या लवकरात लवकर घटनास्थळी पोहचल्या, तो पर्यंत अग्निशमन दलाने आपले काम करत संजय गांधी आणि सुभाष सक्सेना यांचे शव अपघाती विमानाच्या मलब्यातून बाहेर काढले होते आणि शव न्यायला रुग्णवाहिका तेथे उभी होती. स्वतः इंदिरा गांधी रुग्णवाहिकेत बसून राम मनोहर लोहिया इस्पितळात पोहचल्या. जिथे डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. तेव्हा इंदिरा गांधी यांनी आपल्या भावना लपवायला डोळ्यावर गॉगल चढवला.

तर इंदिरा गांधी यांचे चरित्र लिहणार्या पुपुल जयकर यांनी आठवण लिहली आहे की, संजय गांधी यांचा मृत्यू घोषित झाल्यावर सगळ्यात पहिले जे नेते इस्पितळात पोहचले ते अटल बिहारी वाजपेयी होते. त्या मागोमाग चंद्रशेखर पण पोहचले. वाजपेयी एकट्याच असलेल्या इंदिरा गांधी यांना म्हणाले,"अश्या कठीण प्रसंगी आपल्याला धैर्याने राहायला हवे." हे वाक्य पूर्ण होण्याआधीच इंदिरा गांधी यांनी वाजपेयींनकडे अश्या नजरेने बघितले की, वाजपेयींना वाटले की आपण काही चुकीचे बोललो. दुसऱ्याच क्षणी इंदिरा गांधी यांनी आपला मोर्चा चंद्रशेखर यांच्या कडे वळवत, त्यांना एका बाजूला नेत म्हणाल्या की, "आपल्या सोबत आसामच्या विषयावर बोलायचे आहे. तिथे खूप गंभीर स्थिती आहे." यावर चंद्रशेखर म्हणाले की आता यावर चर्चा करण्याची स्थिती नाही आणि आता तो मुद्दा महत्वाचा पण नाही. तेव्हा इंदिरा गांधी यांनी चंद्रशेखर यांना म्हंटले की नाही आसामचा मुद्दा गंभीर पण आहे आणि महत्वपूर्ण पण !

त्याच वेळेस इस्पितळात पोहचलेल्या व्ही.पी.सिंग यांना पण आपण आता इथे नाही तर लखनऊ येथे असायला हवे होते, तिथे इथल्या पेक्षा अधिक गंभीर गोष्टी आहेत असे म्हणून वापस पाठवले होते.

एकूणच संजय गांधी यांची जी काही कारकीर्द झाली ती अत्यंत विवादास्पद झाली, हुकूमशाही प्रवृत्ती, संवैधानिक संस्थांची केलेली अहवेलना आणि भ्रष्टचार या मुळे संजय गांधी हे इंदिरा गांधी यांच्या करता ताकद होते की कमजोरी हे कळणे कठीण आहे. मात्र लेखाच्या सुरवातीला सांगितलेला किस्सा आणि त्यांच्या निधनानंतर इंदिरा गांधी यांचे वर्तन यामुळे त्यांच्यात नक्की कसे संबंध होते या बद्दल गूढ निर्माण करते हे नक्की. एक मात्र खरे की संजय गांधी यांच्या मृत्यू नंतर काही वर्षातच काँग्रेस संजय गांधी यांची आठवण विसरली तरी किंवा तेव्हढ्या मोठ्या प्रमाणावर त्यांची आठवण नक्कीच काढत नाही जेव्हड्या मोठ्या प्रमाणात जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांची काढल्या जाते. तत्कालीन "संजय गांधी ब्रिगेड" मधील काही तरुण चर्चित चेहरे आजही राजकारणात आहेत आणि मोठ्या पदावर आहे, मात्र त्यांच्या जीवनात पण दिवाणखान्यात संजय गांधी यांचे मोठे छायाचित्र लावण्यापलीकडे मोठे स्थान नाही.

टिप्पण्या