जानेवारी २०१५ मध्ये फ्रान्सची राजधानी पॅरिस मध्ये एका मासिकाच्या कार्यालयावर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात या मासिकाच्या संपदकासह ९ पत्रकार आणि २ पोलीस पण ठार झाले होते. तर ६ जण जबर जखमी झाले होते. कश्या करता केला होता हा हल्ला ! कोणी केला होता हा हल्ला ! हा हल्ला केला होता इस्लामी दहशतवाद्यांनी ! कशाला तर एक व्यंगचित्र प्रकाशित केले म्हणून !
हल्ला ज्या कार्यालयावर झाला त्या मासिकाचे नाव "शार्ली हेब्दो" ! पैगंबर यांचे व्यंगचित्र छापले म्हणून हा हल्ला करण्यात आला होता. हा हल्ला होता अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर. स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या जगातील प्रत्येकाने या हल्ल्याचा निषेध केला होता.
सप्टेंबर २०२० मध्ये शार्ली हेब्दोने तेच व्यंगचित्र पुन्हा प्रकाशित केले. ज्या व्यंगचित्रा वरून आपल्या कार्यालयावर इतका मोठा हल्ला झाला, आपले सहकर्मचारी गमावले त्याच व्यंगचित्राला या मासिकाने पुन्हा छापले का असेल? तर या दहशतवादी कृत्यात सामील असलेल्या दहशतवाद्यां विरोधातील खटला न्यायालयात सुनावणीस आले होते. तेव्हा त्या दहशतवाद्यांना, "आपण तुमच्या दहशतीला घाबरत नाही आणि तुमच्या दहशतीपाई आम्ही आमचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य सोडणार नाही भलेही प्राण गेले तरी चालेल." हे लक्षात यायला हवे म्हणून या व्यंगचित्र आम्ही पुन्हा प्रकाशित करत आहोत अशी भावना या मासिकाच्या संपादकाने व्यक्त केली.
आता हे आठवण्याचे कारण म्हणजे नुकतेच मुंबईत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी समाज माध्यमातून पाठवलेल्या व्यंगचित्राचे कारण देत एका माजी वृद्ध नौसैनिकाला मारहाण केल्याचे वृत्त येत आहे. अर्थात हे काही नवीन नाही ! या अगोदर पण समाज मध्यमावर केलेली बोचरी टीका सहन न झाल्याने अपहरण आणि मारहाण झाली आहेच. खरे तर हा "अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा" संकोच आहे. या विरोधात आवाज उठवणे हा लोकशाही देशात जनतेचा हक्क आहे, जेणे करून "अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे" रक्षण होऊ शकेल.
मात्र फ्रांस आणि आपल्या राज्यात मूलभूत फरक हाच आहे. फ्रांस मध्ये या "शार्ली हेब्दो" मासिकाच्या मागे फ्रान्सचे सरकार भक्कम पणे उभे होते आणि तेथील कायद्याचे पूर्ण संरक्षण या मासिकाला प्राप्त होते. म्हणूनच या मासिकाने पुन्हा तेच व्यंगचित्र प्रकाशित करायची हिम्मत केली.
मात्र आपल्या राज्यात हल्ले करणारे आणि अपहरण, मारहाण करणारेच मुळी सत्ताधारी आहेत. आता "कुंपणच शेत खात आहे" म्हंटल्यावर आपण काय करू शकतो? आपण फक्त वरील व्यंगचित्रांच आपल्या लेखात छापू शकतो ! नाही का ?



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा