शिनकानसेन - जिने जगात पुंन्हा रेल्वेला प्रतिष्ठा दिली !

१९६४ साली जपान मध्ये ऑलिंपिक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. दुसऱ्या महायुद्धा नंतर देशावर झालेल्या जखमा, झालेला अपमान या मधून देश अजून पुरेसा सावरला नव्हता. त्या मुळे हे टोकियो ऑलिंपिकच्या निमित्याने जगाला एक वेगळा जपान दाखवायच्या इर्षेने काम करत होता. जपानने आपल्या उच्च तंत्रज्ञानाचा उपयोग करत जगात आर्थिक साम्राज्य उभारत होता, त्यातून तो थेट अमेरिकन बाजाराला धडका देत होता. याच काळात १९६४ च्या एका दिवशी जवळपास सगळं जपान आपल्या दूरचित्रवाणीच्या संचाला चिकटले होते. जपानी वृत्तवाहिन्या हेलिकॉप्टरच्या साहाय्याने उंचा वरून एका रेल्वे मार्गावर थेट प्रक्षेपण करत होते, काही वेळातच त्या रेल्वे मार्गावर एक पांढऱ्या रंगाची, बंदुकीच्या गोळीचा समोरचा भाग जसा निमुळता होत जातो, त्या आकाराची एक रेल्वे गाडी वेगात समोर धावत निघाली, हेलिकॉप्टरला पण त्या वेगाशी जुवळून घ्यायला पहिले त्रास झाला हे येणाऱ्या चलचित्रावरून लक्षात येत होते. हे दृश्य बघून जपानी लोकांना पुन्हा एकदा आपल्या अभियंतांचा आणि शास्त्रज्ञानाचा अभिमान वाटला. कारण जगातील पहिली सगळ्यात जास्त वेगाने धावणारी रेल्वे जपानने अखेर बनविली होती, ती धावत होती, हीच ती जपानी बुलेट ट्रेन ! "शिनकानसेन" ! टोकियो ते ओसाका या जपान मधील दोन महत्त्वाच्या ओद्योगिक शहरांना जोडणारा हा नवीन रेल्वे मार्ग ! ज्यावर जगातील सगळ्यात जास्त वेगाने धावणारी रेल्वे गाडी धावत होती. वेग होता तब्बल २१० किलो मीटर प्रति तास. ही होती तोकईडो शिनकानसेन" !

खरे तर वेगवान रेल्वेचे जपानचे हे स्वप्न जुने होते. पण जपान वरील संकट आणि या योजनेचा आर्थिक आकार ही योजना कार्यान्वित करायला मोठा अडसर ठरत होते. शेवटी १९५० साली ही योजना पुन्हा समोर रेटण्यात आली. यावर बरेच विचारमंथन झाले. त्यातच १९५७ साली जपान मधील एक कंपनी ओडाक्यू इलेक्ट्रीक रेल्वे ने एका रेल्वे गाडीला प्रदर्शित केले. ३००० सिरीज एस इ रोमनसेकार नावाच्या या गाडीने प्रतितास १४५ किलोमीटरचा वेग पकडत नवीन विश्वाकीर्तीमान स्थापित केला. ही गाडी नारोगेज वर धावली होती. पण या मुळे वेगवान गाडी चालवण्याच्या योजनेने पुन्हा उचल खाल्ली. शेवटी १९५८ साली या योजनेला हिरवा कंदील दाखवल्या गेला आणि १९५९ साली याचे बांधकाम सुरू झाले. या योजनेचा तेव्हा अंदाजित खर्च २०० अब्ज जपानी येन असा सांगितल्या गेला. या करता ८० अब्ज अमेरिकन डॉलर्सचे कर्ज जागतिक बँकेकडून घेण्यात आले.

शिंजी सोगो

ही वेगवान रेल्वे योजना जपान मध्ये हिच्या घोषणे नंतरच चांगलीच गाजायला लागली होती. खरे तर दुसरे महायुद्ध संपल्यावर एक नवीन तंत्रज्ञान जगाला आकृष्ट करत होते, ते म्हणजे "जेट" ! जुनी प्रॉपलर वाली विमाने जात नवीन जेट लायनर विमाने आकाश व्यापायला लागली होती. या विमानांनी कमी वेळात जास्त अंतर कापायची सवय लावली होती, याही पुढे जात पश्चिमी संशोधक अभियंते आता प्रवासी विमानांना सुपर सोनिक वेगाने उडवायची स्वप्ने बघत होती. विमाने रेल्वे पेक्षा वेगवान होत होती, तंत्रज्ञानाच्या मदतीने विमान प्रवास अधिक सुरक्षित होत होता.

हिडीओ शिमा

त्यातच चांगले रस्ते, खिश्यात वाढणारे पैसे आणि वाढीव उत्पादना मुळे कार खिशाला परवडणाऱ्या झाल्या होत्या. पश्चिमी देशात कारने प्रवास करायला लोक प्राधान्य द्यायला लागले होते. हीच गत जगातील इतर भागातील आर्थिक दृष्ट्या प्रगत देशात पण होती. खुद्द जपान मध्ये पण हीच स्थिती तयार होत होती. अमेरिकेत तर काही रेल्वे मार्ग बंद करण्यात आले होते. डिजल किंवा अजूनही कोळशावर चालणारी इंजिनाच्या मदतीने युरोपात रेल्वे प्रवास हळू आणि कंटाळवाणा झाला होता. त्यातल्या त्यात रेल्वेचे चांगले जाळे असलेला आणि रेल्वेचे जन्मस्थान असलेल्या युरोप मध्येच रेल्वेचा विकास विमान आणि कार प्रवासाने काहीसा थांबवला होता.


या सगळ्या पार्श्वभूमीवर डोंगर आणि पहाड फोडत, कत्येक किलोमीटर लांबीचे नवीन बोगदे बनवत, जवळपास तीन हजार नवीन पुलाचे बांधकाम करत कोणी नवीन रेल्वे मार्ग बांधत असेल तर त्याला वेड्यातच काढले जाणार होते. पण हा साधासुधा रेल्वे मार्ग नव्हता. जपान स्वप्न बघत होता या मार्गावरून जगातील सगळ्यात वेगवान रेल्वे चालवण्याचा ! किती वेग असणार होता तर २२० किलोमीटर प्रति वेगाने ! जगात चालत असलेल्या तत्कालीन सगळ्यात वेगवान प्रवासी रेल्वेच्या दुप्पट वेगाने !

त्यातही हा रेल्वे मार्ग फक्त या वेगवान प्रवासी रेल्वे करता राखीव असणार होता. त्यावर दुसरी कोणतीही प्रवासी रेल्वे किंवा सामान वाहतूक करणारी रेल्वे धावणार नव्हती. या रेल्वे मार्गाने जपान मधील दोन मोठी ५१५ किलोमीटर अंतर असणारी शहरे जोडल्या जाणार होती, टोकियो आणि ओसाका !

हा नवीन रेल्वे मार्ग बनवतांना अनेक नवीन गोष्टींची भर पडत होती. पहिले तर जपान मध्ये नॅरो गेज मधील रेल्वे धावत होती. या रेल्वे मार्गावर गेज अजून मोठा झाला होता. सोबतच हा मार्ग बांधतांना साधारणतः मार्ग सरळ राहील याची काळजी घेतली जात होती, जिथे वळण घेणे आवश्यक आहे तिथे ते वळण जास्त लहान न घेता, मोठे घेण्यात येत होते. जपानच्या डोंगर दर्या भागातून असा घाट आणि वळण कमी घेत हा मार्ग बांधल्या जात असल्यामुळे या मार्गाच्या बांधकामाचा खर्च वाढत होता आणि नेमके हेच कारण जपान मध्ये या रेल्वे मार्गाच्या योजनेचा विरोध होण्याचे मोठे कारण होते.

तशी ही रेल्वे योजना अत्याधिक महाग आहे हा सूर जपान मध्ये लागलाच होता. त्यातही समजा ही योजना यशस्वी झाली नाही तर हा मार्गावर जपान मधील कोणतीही सेवेत असणारी रेल्वे धावू शकणार नव्हती कारण वर सांगितलेले "गेज" मधील फरक ! त्यातही या मार्गाचे बांधकाम आवश्यक मानके पूर्ण करत करतांना या मार्गाचे बांधकाम तब्बल पाच वर्षे चालले. याचा फटका अर्थातच आर्थिक होता. अंदाजित खर्चाच्या दुप्पट म्हणजे जवळपास ३८० अब्ज जपानी येन पर्यंत पोहचला होता. या सगळ्या गदारोळापाई या योजनेचे स्वप्न बघितलेले आणि या योजनेला प्रत्यक्षात कार्यरत करणाऱ्या जापनीज नॅशनल रेल्वेचे अध्यक्ष शिंजी सोगो आणि मुख्य अभियंता हिडीओ शिमा यांना योजना पूर्णत्वात यायच्या अगोदरच राजीनामा द्यावा लागला.
जपानी वृत्तपत्र तर या योजनेला जपानने बांधायला घेतलेली "चीनची भिंत" म्हणून टीका करायला लागले होते. सहाजिकच होते ते सामान्य जपानी माणसाच्या करातून हा अवाढव्य खर्च होत होता एका अश्या योजनेवर ज्याच्या यशस्वीपणा बद्दल काही लोक सोडले तर सगळ्यांच्या मनात शंका होत्याच. त्यातच वाढणारा खर्च तत्कालीन परिस्थितीत धडकी भरवणारा तर होताच. पण योजना कार्यान्वित झाल्यावर या रेल्वेचे भाडे सामान्य लोकांच्या खिशाला परवडणारे नसेल असे वाटायला लागले होते. ज्यांच्या जवळ पैसे आहेत ते मग विमान प्रवास करतील आणि या रेल्वेच्या कमी वेळेत टोकियो वरून ओसोका गाठतील हा यामागचा तर्क होता. हा तर्क चूक होता असे नाही. पण तरी शिंजी सोगो आणि हिडीओ शिमा या योजने करता कमालीचे आग्रही होते.

पण ही बुलेट ट्रेन म्हणा किंवा "शिनकानसेन" म्हणा रेल्वे मार्गावर चालवणे तेही इतक्या वेगात ही सोपी गोष्ट अजिबात नव्हती. पण हा महत्वाकांक्षी प्रकल्प आखणारे शिंजी सोगो आणि हिडीओ शिमा हे पण तितकेच दूरदर्शी आणि महत्त्वाकांक्षी होते. या दोघांनी या योजनेचा आणि या रेल्वेच्या नवीन तंत्रज्ञानाचा इतका बारीक विचार केला होता आणि ही योजना आखली होती की त्यांनी राजीनामा दिल्यावर पण योजनेमध्ये काहीही बदल न करता राबवता आली.

रेल्वेचा सुव्यवस्थित आकार, बाहेरील गुळगुळीत पृष्ठभाग, हवेचा प्रतिकार कमीत कमी करणे, अत्याधिक वेगात पण आवाज कमी करणारी अश्या असंख्य गोष्टी आधीच ध्यानात घेतल्या गेल्या होत्या. ही गाडी पारंपरिक "लोकोमोटिव्ह" नक्कीच नव्हती, या गाडीला शक्ती देत होत्या १८५ के व्ही च्या ट्रॅकशन मोटर्स ज्या प्रत्येक डब्याच्या खाली सम प्रमाणात लावलेल्या होत्या. त्या मुळे गाडीला अफाट वेग पकडता येत होता. विशेष म्हणजे या सगळ्याची जोडणी या पद्धतीने केली होती की गाडीचे वजन रुळावर समप्रमाणात राहील. या मुळे २२० किलोमीटर प्रति तासाच्या वेगात असतांना सुद्धा गाडीच्या आत त्याचे कंपन जाणवत नव्हते.
या गाडीच्या मार्गासाठी पारंपरिक लाकडी स्लीपर्स न वापरता विशेष काँक्रिटने बनवलेले उच्च दर्जाचे स्लीपर्स बनविले जे रुळांना घट्ट पकडून ठेवतील. साधारण रुळाची लांबी ८२ फिट असते, म्हणजे प्रत्येक ८२ फुटा नंतर दुसरा रूळ लावण्यात येतो, त्या मुळे दोन रूळ जिथे एकमेकांना जोडल्या जातात तिथे एक बारीक भेग आपल्याला दिसत असते. मात्र या मार्गावरील रूळ एकमेकांना अश्या पद्धतीने वेल्डिंग करत जोडल्या गेले की या रुळाचा पाच हजार फूट लांबीचा एक सेक्शन राहील. या द्वारे गाडीचे कंपन आणि आवाज कमी केल्या गेला.

या मार्गावर कुठलेही "लेव्हल क्रॉसिंग" ठेवण्यात आले नाही. जे रस्ते या मार्गाला छेद देत होते ते एकतर मार्गाच्या वर बांधलेल्या पुला वरून जात होते किंवा मार्गाच्या खालून. सोबतच संपूर्ण मार्गावर कुंपण घालून कोणत्याही अवांच्छित आगमनाला थांबवण्यात आले होते. गाडीच्या सुरक्षित परिवहनासाठी हे अत्यावश्यक होते.

या वेगाचा अजून एक धोका असा होता की मार्गावरील रेल्वे संकेत वेगात असणाऱ्या गाडीच्या चालकाकडून सुटू शकत होता. यावर उपाय म्हणून नवीन अत्याधुनिक संकेत प्रणाली विकसित केल्या गेली, जी पूर्णतः स्वयंचलित अशी होती. प्रत्येक काही अंतरावर असलेले संकेत सरळ रेल्वे चालकाला संदेश पाठवतील अशी व्यवस्था करण्यात आली. त्या योगे चालक गाडीचा वेग नियंत्रित करू शकेल. इतकेच नाही तर या संपूर्ण मार्गावर लक्ष ठेण्यासाठी आणि मार्ग नियंत्रित करण्यासाठी राजधानी टोकियो येथे एक केंद्रीकृत देखरेख केंद्र उभारण्यात आले जेणे करून या मार्गावरील सगळ्या गाड्यांचे परिचालन सुरक्षितपणे करता येईल. विशेष म्हणजे आपल्या देशात होणारे भूकंप लक्षात घेत, एक अशी विशेष व्यवस्था उभारल्या गेली जी भूकंपाचा प्राथमिक अंदाज आला तरी गाडीला मिळणारी विद्युत आपुर्ती क्षणात बंद करत रेल्वेचे आपात्कालीन ब्रेक स्वयंचलित पद्धतीने प्रयोगात आणत गाडी जागच्या जागी थांबवेल.
सोबतच रेल्वे मार्ग आणि "overhead wire" च्या देखभाल करण्यासाठी एक विशेष गाडी बनवण्यात आली जिला "येल्लो डॉक्टर" नाव दिल्या गेले. ही गाडी वेगवेगळ्या तांत्रिक परिष्कृत साधनांनी परिपूर्ण होती.
शेवटी १ ऑक्टोबर १९६४ शिनकानसेनची पहिली सेवा जपानी प्रवाश्यांनी अनुभवली. वर सांगितलेला प्रचंड खर्च, मेहनत, तांत्रिक अंगे यांचा परिणाम असा झाला अत्यंत वेगवान, सुरक्षित आणि आरामदायी रेल्वेचा अनुभव देशवासियांना या गाडीत बसल्यावर यायला लागला. या रेल्वेची सेवा टोकियो ऑलिंपिकच्या वेळेस सुरू झाल्याचा फायदा असा झाला की संपूर्ण जगात या "बुलेट ट्रेन" चा बोलबाला झाला. वेगवान आणि सुरक्षित प्रवासाचा फायदा जपानी नागरिकांसोबत अनेक विदेशी नागरिकांनी अनुभवला. टोकियो ते ओसाका हा साडे सहा तासांचा प्रवास ही गाडी फक्त चार तासात पूर्ण करत होती. परिणामी जो मार्ग रोज एका बाजूने ६० फेऱ्या रेल्वे करेल या अंदाजाने आखल्या गेला होता, त्या मार्गावर रोज १०० फेऱ्या कराव्या लागल्या. म्हणजे जाणाऱ्या आणि येणाऱ्या मिळून जवळपास २०० फेऱ्या एका दिवसात कराव्या लागल्या. या मुळे सुरवातीला उठलेला आर्थिक गणिताचा प्रश्न पूर्णतः विसरल्या गेला. हा रेल्वे मार्ग सुरू झाल्याच्या तीनच वर्षात या रेल्वेने जवळपास १० लाख लोकांनी यात्रा केली होती. जपान मधील ही सर्वोच्च यात्रीसंख्या होती.

या शिनकानसेनची लोकप्रियता इतकी वाढली की लवकरच या मार्गाचा विस्तार करावा लागला. आज जपानच्या जवळपास प्रत्येक भागात शिनकानसेनचे जाळे पसरले आहे. या रेल्वे मार्गाने न केवळ जपानची प्रतिमा बदलली, तर जगाचा रेल्वेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. जगातील इतर देशांना पण स्वतःची वेगवान रेल्वे बनविण्याची प्रेरणा मिळाली. यातूनच १९८० साली फ्रांस मध्ये TGV ने आपले वेगवान रेल्वे जाळे पसरवले.
आज ५६ वर्षांनी जपानची शिनकानसेनने जरी वेळोवेळी आपला वेग वाढवत नेला असला तरी आज ती जगातील सगळ्यात वेगवान रेल्वे राहिली नाही, तरी या रेल्वेने आपल्या जाळ्यात आणि रेक मध्ये सगळे अत्याधुनिक बदल घडवले आहेत आणि आजही या रेल्वेला परिपूर्ण, अजून वेगवान करण्यासाठी सतत नवे प्रयोग करणे सुरू आहे. आजही शिनकानसेनची सुरक्षित सेवा संपूर्ण जगात नावाजली जाते. आज शिनकानसेन दररोज किमान एक दशलक्ष प्रवासी वाहतूक करते, टोकियो शहरातून दर तिसऱ्या मिनिटाला एक शिनकानसेन स्थानकातून बाहेर पडते. आजही शिनकानसेनचा सुरक्षित प्रवासाचा विक्रम जगातील कोणतीही रेल्वे सेवा मोडू शकली नाही हे विशेष.

आपल्याला ही महत्वाकांक्षी शिनकानसेन रेल्वे योजना तयार करणारे आणि प्रत्यक्षात आणण्यासाठी आपले सर्वस्व वाचणारे तत्कालीन जापनीज नॅशनल रेल्वेचे अध्यक्ष शिंजी सोगो आणि मुख्य अभियंता हिडीओ शिमा याचे आभार तर मानावेच लागतील.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा