आज ABP माझाच्या चर्चेत प्रसन्न जोशी यांनी एकूण कंगना राणावत प्रकरणाचा उहापोह करतांना निष्कर्ष हा काढला की महाराष्ट्रात असलेले ठाकरे घराण्याचे "ठाकरे पण" संपवण्यासाठी कुणीतरी कंगणाला सुपारी दिली आहे....आता हे "कुणीतरी" म्हणजे भाजप हा रोख त्या मागे होता....समीर खडस, पत्रकार अकोलकर वगैरे लगेच माना डोलवायला लागले.
पण हे "ठाकरे पण" कधी संपायला लागले ? आठवते जो शिवसेनेशी बंडखोरी करायचा त्याला काय शिक्षा व्हायची? जीवनातून उठायचा तो ! एक तर त्याची जीवनाची दोरी तुटायची किंवा राजकारणाची ! आठवते ती ठाकरी दहशत ! ही दहशत संपवली नागपूर अधिवेशनात ! कोणी ? शरद पवार यांनी... कोणाला बंडखोरी करायला लावली शरद पवार यांनी ? छगन भुजबळ यांना ! जे बाळासाहेब ठाकरे यांचे खास म्हणून ओळखले जात. अर्थात खास असल्याशिवाय आमदारकी तेव्हा पण मिळायची नाही आणि आज पण शिवसेनेत मिळत नाही. तर छगन भुजबळ यांनी शिवसेनेला "जय महाराष्ट्र" केला आणि शरद पवार यांच्या सोबत निघून गेले.
तेव्हा महाराष्ट्राचा अख्खा मिडिया म्हणत होता छगन भुजबळ संपले. पण शिवसेना छगन भजबळांच्या केसांनाही धक्का लावू शकले नाही, ना त्यांच्या राजकीय कारर्किदीला ! मग स्वतः बाळासाहेब ठाकरे चरफडले आपली चरफड भाषण देतांना छगन भुजबळ यांचा उल्लेख छगन्या, छगन, छगु म्हणून करायचे. त्याचे बघून शिवसेनेचे इतर नेते पण तोच कित्ता गिरवायचे.
पण काय बिघडले छगन भुजबळ यांचे? शिवसेनेने काय उखडले छगन भुजबळ यांचे? हेच छगन भुजबळ गृहमंत्री झाले तेव्हा श्रीकृष्ण कमिशनचा आधार घेत थेट बाळासाहेब ठाकरे यांनाच अटक करायचा घाट घातला. नशिबाने जामीन मिळाला म्हणून, नसता मिळाला तर ! याच सगळ्या प्रकरणात ते "ठाकरे पण" हळूहळू कमी होत गेले. याच छगन भुजबळांनी अब्रुनुकसानीचा दावा ठोकला होता "सामना" वर ! म्हणजे सामनाच्या संपादकावर, कोण होते संपादक ? बाळासाहेब ठाकरे ! पण नंतर त्यांच्या वया कडे बघत भुजबळांनी हा खटला मागे घेतला.
या नंतर शिवसेनेत पक्षाला "जय महाराष्ट्र" करणे खूप सोपे झाले. खुद्द राज ठाकरे पासून नारायणराव राणे पर्यंत बाळासाहेबांच्या हयातीत उडून गेलेले कावळे झाले. इथे "ठाकरे पण" कमी झालं !
निवडणुकीच्या प्रचार सभेत जेव्हा "तेलकट वडे" आणि "चिकन सूप" ची घरगुती भांडण चव्हाट्यावर आली, तेव्हा कमी झाले ते "ठाकरे पण" !
आणि जेव्हा सत्तेच्या, खुर्चीच्या मागे लागत शिवसेना नेते जेव्हा मिंधेपणाने त्याच शरद पवार यांच्या मागे गेले, ज्यांना बाळासाहेब ठाकरे बिअर प्यायला तर बोलवायचे पण राजकारणात कधीच भरवसा ठेवला नाही. त्याच छगन भुजबळ आणि त्याच शरद पवार यांच्या सोबत बसत आहे ज्यांनी याच "ठाकरे पणा" वर पहिला घाव केला होता. तेव्हाच संपले यांचे महाराष्ट्रातील "ठाकरे पण" ! आता शिवसेना नावाचा रंग उडालेला वाडा आहे उरलेला आणि ठाकरे फक्त आडनाव ..…...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा