चीन आणि पाकिस्थान या देशां विरोधातील धोरणात आपल्या तत्कालीन सरकारने केलेल्या चुका आणि त्या पाई देशाच्या संरक्षण क्षमतेवर झालेला परिणाम आणि देशाच्या सीमेचे झालेले नुकसान, देशाच्या हातातून गेलेला भूभाग या वर आपण गेल्या दोन लेखात दृष्टिक्षेप टाकला. पण यात आपण काश्मीर प्रश्नाबाबत पंडित जवाहरलाल नेहरू यांचे आकलन आपण घेतले नाही. अर्थात त्याला कारण असे की या विषयावर अगोदर अनेकांनी वेगवेगळ्या संदर्भात लिहलेले आहे, त्या मुळे प्रत्येक भारतीयांना या प्रश्नाबद्दल बरीच माहिती आहे असे मी मानतो, पण मुख्य गोष्ट अशी की नेहरूंची काश्मीर बाबतची भूमिका भारताला मात्र आजतागायत छळत आहे. पण आश्चर्य म्हणजे कोणीही या प्रश्नावर योग्य तोडगा काढायचा प्रयत्न करत नाहीये. आता पाकिस्थानने घेतलेल्या "धार्मिक आतांकवादाच्या" दीक्षेमुळे हा प्रश्न अजून जटिल बनला आहे. पण पहिले नेहरूंना जगाचा "शांतिदुत" म्हणून प्रसिद्ध व्हायचे वेध लागले होते म्हणून त्यांनी नैतिकतेच्या नावाखाली काही आर्तक्य निर्णय घेतले. पण नेहरूं नंतर तर भारताचे नेतृत्व कणखर हातात होते मग असे काय झाले की युद्ध जिंकल्यानंतर पण भारताच्या हातात मानसिक समाधाना पेक्षा अधिक काही आले नाही?
२७ मे १९६४ रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मृत्यूमुळे भारतीय राजनैतिक इतिहासातील "नेहरू युगाचा" अंत झाला. १९६१ च्या चीन युद्धातील पराभव आणि चीनने भारताचा केलेला विश्वासघात याचा चांगलाच मानसिक धक्का नेहरूंना बसला आणि तेव्हा पासून त्यांची तब्येत ढासळत गेल्याचे बोलले जाते. पण चीनच्या विश्वासघाता पेक्षा पण ज्या देशाला आपण अजिबात थारा द्यायला तयार नव्हतो, ज्याला आपण आपला वैचारिक विरोधी मानत होतो त्या अमेरिकेने पुढाकार घेत भारताला तत्काळ मदत केली आणि परिस्थितीचे गांभीर्य बघून आपल्याला पण ती स्वीकारावी लागली हा पण पंडित नेहरूंसाठी मोठा मानसिक धक्काच असणार!
९ जून १९६४ रोजी लालबहादूर शास्त्री भारताचे पंतप्रधान झाले. आव्हानात्मक परिस्थितीत भारताचे पंतप्रधान पद शस्त्रीजींच्या हातात आले. देशात अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण नव्हता, १९६२ च्या पराजयाचे मळभ जनतेच्या आणि काही प्रमाणात भारतीय सेनेच्या पण मनावर होते. या परिस्थितीतून मार्ग काढत असतांना भारतावर अजून एक युद्ध लादल्या गेले.
६ सप्टेंबर १९६५ रोजी अधिकृत रित्या भारत आणि पाकिस्थान या देशामध्ये काश्मीर प्रश्ना वरून युद्ध सुरू झाले. पाकिस्थानने भारतावर आक्रमण केले कारण पाकिस्थानला वाटत होते की जवाहरलाल नेहरू गेल्यावर भारतात नेतृत्व क्षमता कमी झाली आहे. खरे तर जवाहरलाल नेहरू नंतर पंतप्रधानपदी कोणी बसायचे या करता बरीच रस्सीखेच देशात झाली होती. या सगळ्यात मृदुभाषी आणि कृश शरीर असणारे शास्त्रीजी पंतप्रधान झाले. नेमके त्यांच्या याच बाह्य अंगावर पाकिस्थान फसले.
पाकिस्थानचे तत्कालीन राष्ट्रपती आयुब खान यांनी आपला भारत दौरा याच कारणाने रद्द केला, त्यांच्या मता नुसार शास्त्रीजींकडे ती राजकीय ताकद नाही जी पाकिस्थानला हवी आहे. अर्थात आयुब खानचे शास्त्रीजीं बद्दलचे हे मत काही भारतीय राजकारण्यांनीच बनविले असणे शक्यच आहे. पण शास्त्रीजींनी ठरवले आयुब खान येऊ शकत नसतील तर आपण पाकिस्थानला भेट देऊ आणि त्यांनी त्यांच्या काहिरा दौरा संपवून देशात वापस येत असतांना आपला कराची दौरा अचानक ठरवला. कोणाला नरेंद्र मोदी यांचे रशिया दौरा आटपून येतांना अचानक रावळपिंडी दौरा आणि त्या निमित्याने भारतातील तथाकथित लिबरल्स आणि काँग्रेसने केलेला थयथयाट आठवत असेलच.
पण शास्त्रीजींचा हा दौरा फळाला आला नाही आणि युद्ध सुरू झाले फक्त २२ दिवस चाललेल्या या युद्धात देशाला निर्णायक विजय मिळाला नसला तरी, आपण पाकिस्थान वर चांगला दबाव टाकू शकू या अवस्थेत नक्कीच होतो. या युद्धात शस्त्रीजींच्या मृदू स्वभावामागे असलेला कणखर नेतृत्व प्रकर्षाने समोर आले, त्यांच्या मितभाषी वक्तव्याला नवीन धार आली. २६ सप्टेंबर १९६४ ला रामलीला मैदानावर मोठ्या जनसमुदयाला संबोधित करतांना शास्त्रीजींनी आयुब खान आणि पाकीस्थानी लष्करावर अनेक व्यंग केले जे पाकिस्थानला चांगलेच झोंबले, शास्त्रीजी म्हणाले, " राष्ट्रपती आयुब खान यांनी जाहीर केले होते की, आपण दिल्ली पर्यंत आरामात पाई चालत पोहचू, पण ते खूप मोठे माणूस आहे, वजनदार पण आहेत. मी असा विचार केला की आयुब खान यांना दिल्ली पर्यंत चालायचा त्रास का द्यावा ? म्हणून त्याचे स्वागत करायला मी लाहोर पर्यंत पोहचलो आहे." या एका भाषणात त्याने भारतीय लष्कर लाहोर पर्यंत पोहचले असल्याची जाणीव त्यांनी पाकिस्थानला करून तर दिलीच, पण आयुब खान यांनी रद्द केलेल्या भारत दौऱ्या नंतर कमी पणा घेत केलेल्या पाकिस्थान दौऱ्याचा वचपा पण काढला. लक्षात घ्या नरेंद्र मोदी यांच्या पाकिस्थान दौऱ्या नंतर घडलेले पठाणकोट हल्ला आणि त्या नंतर झालेला "सर्जिकल स्ट्राईक"! पाकिस्थानच्या बदलेल्या पद्धतीवर भारताने आपली पद्धत बदलवत अद्दल घडवली होती.
शास्त्रीजींनी याच लढाईच्या वेळेस अमेरिकेने टाकलेला दबाव झिडकारून टाकला होता. पाकिस्थानला नुकसान होत आहे बघत अमेरिकेने भारताला लढाई थांबवण्याची मागणी केली आणि लढाई थांबवणार नसाल तर अमेरिका भारताला मदत म्हणून पाठवत असलेला "लाल गहू" पाठवणे बंद करू असा इशारा दिला. या वर शास्त्रिजींनी देशाच्या जनतेला विश्वासात घेत "एक वेळ उपास" करण्याचे आवाहन केले, जेणे करून अन्नधान्याचा तुटवडा भासणार नाही, "जय जवान, जय किसान" घोषणा त्यातूनच समोर आली, जनतेने शस्त्रीजींच्या या आवाहनाला भरभरून प्रतिसाद दिला.
एकूण २२ दिवसाने हे युद्ध थांबले. २२ सप्टेंबर १९६४ रोजी हे यद्ध थांबले आणि ४ ते १० जानेवारी १९६६ पर्यंत भारत व पाकिस्तान यांच्यात रशियाचे पंतप्रधान कोसिजिन यांच्या उपस्थितीमध्ये चर्चा होऊन ‘ताश्कंद करार’ करण्यात आला. या कराराच्या वेळेस संयुक्त राष्ट्र संघाचे आणि अमेरिकेचे प्रतिनिधी पण उपस्थित होते. भारताच्या अनपेक्षित लष्करी वरचष्म्यामुळे हे सगळे आश्चर्यात होतेच पण भारतावर दबाव बनवण्याच्या तयारीत होते.
आंतरराष्ट्रीय राजकारण कसे खेळले जात होते ते पहा. अमेरिकेसाठी पाकिस्थान दक्षिण आशियातील एक अत्यंत महत्वाचा देश बनला होता. सोबतच पाकिस्थान आणि चीनचे मंत्रीपूर्ण संबंध तयार झाले होते, त्या पाई पाकिस्थानने पाकव्याप्त काश्मीरचा काही भाग परस्पर चीनला भेट दिला होता, युद्ध सुरू असताना चीन पण भारताला धमक्या द्यायला लागला होता. पण सोवियत रशिया करता पण वैचारिक दृष्ट्या महत्वाचा देश होता. त्या मुळे भारताला सोडून कोणतेही देश एकमेकांना दुखवायला तयार नव्हते, याचा दबाव भारतावर म्हणजेच पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या वर नक्कीच आला असणार, सोबतच देशांतर्गत राजकारणात त्याचे वाढत असलेले वजन पण भारतातील अनेकांच्या डोळ्यात खुपत असणारच. या सगळ्याचा परिणाम 'ताश्कंद करारावर" होणे क्रमप्राप्त होते. त्याचा परिणाम म्हणून भारताने जिंकलेला पाकिस्थानचा प्रदेश वापस करावा लागला, हा करारातुन भारताच्या हातात ठोस काहीच लागले नाही. युद्धात वरचढ ठरलेला भारत वाटाघाटीत मात्र पाकिस्थान समोर हरला किंवा राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय राजकारणाचा बळी गेला.
पण यातील खरे काय हे मात्र कोणालाच कळले नाही. १० जानेवारी १९६६ ला ताश्कंद येथे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचा मृत्यू झाला. हा मृत्यू हृदय विकाराने झाला असे सांगत असले तरी अनेकांचा शस्त्रीजींच्या मृत्यू पूर्वी आणि मृत्यू नंतर घडलेल्या घडामोडी बघून त्या वर विश्वास बसत नाही. तत्कालीन भारत सरकारने पण या संशयस्पद मृत्यूची कोणतीही चौकशी मागणी होऊनसुद्धा केली नाहीच. ‘ताश्कंद कराराची अमलबजावणी लवकरात लवकर केली. २१ फेब्रुवारी १९६६ रोजी भारतीय लोकसभेत ‘ताश्कंद करार’ मान्य करण्यात आला. २५ फेब्रुवारीपर्यंत भारत व पाकिस्तान यांनी आपापले सैन्य युद्धपूर्व स्थानापर्यंत मागे घेतले.
म्हणजेच आपण शत्रूच्या डोळ्यात डोळे घालून भारताला सक्षम नेतृत्व देणारा लालबहादूर शास्त्री सारखा पंतप्रधानाला आपण मुकलो आणि अनेकांनी या अकस्मात मृत्यू बद्दल शंका घेतल्यावर पण सरकारने त्या वर कोणतीही कारवाई केली नाही त्या मुळे हे सगळे प्रकरण भारताच्या संरक्षणात असलेल्या कमी उजागर करते. या सगळ्या युद्ध काळात आणि युद्धा नंतर पण तत्कालीन भारतीय परराष्ट्र मंत्रालयावर भारताची बाजू अंतराष्ट्रीय समुदाया समोर योग्य रीतीने न मंडल्याचा आरोप झाला होता, परिणामी भारताची बाजू योग्य असून सुद्धा भारताला योग्य पाठींबा या समुदाया कडून मिळाला नव्हता. या सगळ्याचा परिणाम अंतिमतः भारत पाकिस्थान करारावर झाला. पण भारताची संकट इथेच संपले नाही. पुढे पण सुरू राहिले, शास्त्रीजींना दुबळे राजकारणी म्हणून समोर आणणाऱ्या देशाच्या कणखर नेतृत्वात कडून पण भविष्यात ज्या चुका झाल्या त्याचे परिणाम भारतावर अजूनही होत आहेत. पण त्या चुका कोणत्या हे पुढील भागात.
उत्तर द्याहटवाअगदी व्यवस्थित मांडणी केली आहे. शास्त्रीजी पंतप्रधान का आणि कसे झाले हे जेवढे गूढ आहे, तेवढाच त्यांचा म्रुत्यू पण.
"संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण त्यांच्याबरोबर ताश्कंदमध्ये होते पण त्यांच्या रहाण्याच्या रुम एकामेकापासून खूप दूर होत्या. शास्त्रीजींच्या रुमच्या आसपास कोणाचीही रुम नव्हती, ह्रदयविकाराचा झटका येण्यापूर्वी त्यांना प्रचंड अस्वस्थ वाटत होते पण त्यांना मदत मागण्यांसाठी कॉरीडॉरमध्ये यावे लागले. जवळपास साधा डॉक्टर पण ठेवलेला नव्हता" असे यशवंतरावांनी लिहून ठेवले आहे, हे खरे आहे का? जर असेल तर भारतातील दोन प्रमुख नेत्यांची रहाण्याची व्यवस्था एवढ्या लांंबलांब का होती? भारताचा पंतप्रधान जेथे रहातो तेथे डॉक्टरची व्यवस्था का नव्हती? पोस्टमार्टेम पण केले नाही, याचे कारण काय? मग ह्रदयविकारात म्रुत्यु झाला हे कसे ठरवले?
अनेक प्रश्न, उत्तरे मिळतील? कारण आता बराच काळ उलटून गेलाय.
माझी मांडणी त्याच करता आहे पंडित नेहरू नंतर खरेतर इंदिरा गांधी पंतप्रधान व्हायच्या, नेहरूंनी आणलेली "कामराज योजना" त्याचाच भाग होती, मात्र अंतर्गत राजकारणात कामराज योजनेचा उपयोग झाला नाही. इंदिरा गांधी यांना पंतप्रधान होण्यासाठी संघर्ष करावा लागला, काँग्रेस वर पकड कायम राखण्यासाठी पण, पण त्या नंतर देशाच्या सुरक्षेत हलगर्जी पणाचा वेगळा खेळ सुरू झाला तो कसा ? पुढच्या भागात
हटवा