अपराध्याचे जातीयकरण, धर्मीकीकरण थांबवा

रामवृक्ष यादव "मथुरा कांड"

साधारण जून २०१७ मध्ये उत्तर प्रदेशातील मथुरा येथील जवाहर बाग या २८० एकर जमिनीवर दोन वर्षांपासून सत्याग्रहाच्या नावाखाली असलेले अतिक्रमण काढायचे न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अमलबजावणी करायला महानगर पालिकेचे अधिकारी आणि पोलीस दल पोहचले आणि संपूर्ण देशाला धक्का बसला. कारण या अतिक्रमण विरोधी दलावर अतिक्रमण करून बसलेल्या लोकांनी बंदुका, तलवारी, भाले, चाकु असल्या हत्यारांनी हल्ला केला. ज्यात दोन पोलीस अधिकाऱ्या सहित जवळपास २१ लोक मारल्या गेले. 

या नंतर भारतातील वृत्तपत्र वाहिन्या आणि वृत्तपत्र खडबडून जागे झाले, या सगळ्या प्रकरणा मागचा मास्टर माईंड असलेल्या रामवृक्ष यादवचे एक एक कारनामे बाहेर पडायला लागले. एका आश्रमाशी संबंधित असलेला आणि त्या आश्रमाचा उत्तराधिकारी म्हणून स्वतःला समोर आणणारा हा माणूस, त्या आश्रमातून हकालपट्टी झाल्यावर बाहेर पडला. राज्यातील अनेक नेते आणि गुंड यांच्या आशीर्वादाने स्वतःचे अस्तित्व पुन्हा बनवायला सुरवात केली आणि मथुरा येथील जवाहर बाग या २८० एकर जागेवर सत्याग्रहाच्या नावाखाली हक्काने विराजमान झाला. 

सत्याग्रहाच्या मागण्या काय होत्या ? तर भारताची प्रचिलीत चलन बंद करून आझाद हिंद सेनेच्या चलनाचे पुनर्जीवन करावे, डिझेल एक रुपयात ६० लिटर आणि पेट्रोल एक रुपयात ४० लिटर विकावे, भारताच्या निवडणूका रद्द कराव्या, नरेंद्र मोदी आणि प्रणव मुखर्जी यांना देशा बाहेर हकलावे, त्याचे नागरिकत्व रद्द करावे आणि या तथाकथित सत्याग्रहींना पेन्शन द्यावे आणि जवाहर बाग जिथे त्यांनी अतिक्रमण केले आहे ती जमीन त्यांना राहण्यासाठी देण्यात यावी. आहे की नाही हास्यास्पद मागण्या आणि या मागण्यांसाठी केलेला सत्याग्रहाला दोन वर्षात कोणी हात लावला नव्हता, जो पर्यंत न्यायालयाने आदेश दिला नाही. हे आहे उत्तर प्रदेशच्या राजकीय नेत्यांच्या राजकारणाचे, त्या राजकारणाचे झालेल्या अपराधीकरणाचे खरे चित्र!

नुकतेच उत्तर प्रदेशात अजून एक घाणेरडे राजकारण आणि जातीय मानसिकता बघायला मिळत आहे. कारण आहे विकास दुबे नामक एका अपराध्याने केलेले पोलिसांचे एनकाउंटर ! होय, या वेळेस पोलिसांनी नाही तर एका अपराध्याने पोलिसांचे एनकाउंटर केले आहे. या विकास दुबे ने त्याला पकडायला आलेल्या पोलिसांवर आरामात घेरून गोळीबार केला आणि ८ पोलिसांना कंठस्नान घातले. ज्या पद्धतीने याने पोलिसांना मारले त्या वरून पोलीस त्याला पकडायला येणार याची पक्की खबर त्याच्या कडे होती. त्याच मुळे विकास दुबेने आपल्या घराकडे येणाऱ्या रस्त्यावर अडथळे उभारून ठेवले होते. असाच एक अडथळा बाजूला करण्यासाठी काही पोलीस गाडीच्या बाहेर आल्यावर त्याने अत्याधुनिक बंदुकांनी गोळीबार तर केलाच, पण पोलिसांना मारल्यावर त्यांच्या जवळील शस्त्रे पण घेऊन पळाला. आता तपासात लक्षात येत आहे की त्याला पोलीस दलातूनच ही माहिती मिळाली, त्या करता एका अधिकाऱ्याला अटक पण करण्यात आली आहे. पोलीस दलातील अनेक मोठे अधिकारी आणि राजकीय नेते त्याच्या संपर्कात होते. 

साधारण १९९० मध्ये भाजपच्याच एका नेत्याच्या आशीर्वादाने विकास दुबेने अपराध जगतात आपले पाऊल पक्के केले, बसपा आणि सपा असे पक्ष बदलवत त्याने आपल्या कारकीर्दचा कळस चढवला. पण विचार करण्यासारखी गोष्ट अशी की अपराधी विकास दुबे मुळे उत्तर प्रदेशातील जातीच अस्मिता एका वेगळ्या वळणावर आली आहे. दुबे जातीने ब्राम्हण असल्याचा अभिमान उत्तर प्रदेशातील अनेक ब्राम्हणांना वाटायला लागला आहे जे काळजीत टाकण्यासारखे आहे. हा अभिमान समाज माध्यमातून अगदी ओसंडून वाहत आहे. अर्थात याला कारण देखील दुर्दैवाने ज्यांच्या हातात जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरण थांबवणे असते ते राजकारणी मंडळीच आहे. 

एकीकडे या विकास दुबेची आई, "माझ्या पोराला गोळ्या घालून मारायला हवे." म्हणत असतांना समाजातील एक वर्ग मात्र अपराधी आपल्या जातीचा आहे म्हणून त्याचा जयजयकार करत आहे ही लाज आणणारी प्रवृत्ती आहे. अर्थात आता विकास दुबेचे समर्थन करणारे ब्राम्हण आहे म्हणून त्या लोकांचा विरोध करण्याचा अधिकार इतरांना आहे असे नाही. कारण इतर जातीत आणि धर्मात पण असे अपराधी आहेत ज्यांना आपल्या जातीचा, धर्माचा आहे म्हणून समर्थन मिळतच आहे. इतकेच नाही तर देशद्रोही म्हणून फाशी जाणाऱ्या अपराधाच्या मयतीला पण हजारोंच्या संख्येने जमा होणारे पण त्यातच मोडतात हे पण चांगले लक्षात ठेवावे. त्यातही देशद्रोही अतिरेकी, दहशतवादी, माओवादी नक्षलवादी म्हणजे नक्की काय? त्यांची मानसिकता, त्यांना देशद्रोही का म्हणतात ? गल्लीतील गुंड, मवाली आणि असले जालीम अपराधी  म्हणजे नक्की कोण ? हे ज्यांच्या लक्षात येत नाही त्यांनी तर या बाबतीत अजिबात तोंड उघडू नये.

बाकी महाराष्ट्रातील लोकांनी हा प्रकार उत्तर प्रदेशातील आहे म्हणून नाके मुरडण्यात काही अर्थ नाही, कारण या सगळ्यांच्या किती तरी आधी आपल्या बाळासाहेब ठाकरे यांनी, "दाऊद तुमचा, तर अरुण गवळी आमचा" म्हणत अपराध्याच्या धर्मा वरून ध्रुवीकरणं करत हिंदू अपराध्या बद्दल समाजात ओलावा निर्माण करण्याचा प्रयत्न केलाच आहे. महाराष्ट्रातील राजकारणाचे अपराधीकरण तर केव्हाच झाले आहे. 

तेव्हा लवकर जागे व्हा, धर्मा वरून, जाती वरून अपराध्याचे, देशद्रोहाचे, अतिरेक्यांचे कोणत्याही प्रकारे समर्थन तुम्ही करू नका आणि दुसऱ्याला करू देऊ नका.

टिप्पण्या