चिनी कोरोना विषाणू आणि राम मंदिर भूमीपूजनाच्या राजकारणाच्या वादात काँग्रेसने माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांना श्रद्धांजली अर्पण केली, इतकेच नाही तर कधी नव्हे ते काँग्रेसच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी यांच्या पासून राहुल गांधी, चितांबरम सारख्या काँग्रेसच्या नेत्यांनी कधी नव्हे ते स्व.पी व्ही नरसिंहराव यांना श्रद्धांजली अर्पण करत आश्चर्याचा धक्का दिला. या नंतर पी व्ही नरसिंहराव यांचे नातू यांनी पण, "काँग्रेसला १९ वर्षा नंतर पी व्ही नरसिंहराव यांची आठवण कशी आली?" असा प्रश्न विचारत काँग्रेस नेत्यांची दांडी उडवली.
काँग्रेसचे नेते आणि भारताचे माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू झाले आहे. २८ जून १९२१ या दिवशी आजच्या तेलंगणा मधील, वारंगल जिल्ह्यात असलेल्या लकनेपल्ली गावात यांचा जन्म झाला. स्व. राजीव गांधी यांच्या घातपाती मृत्यू नंतर आधील भारतीय काँग्रेस पक्षाला सांभाळत भारताचे ९ वे पंतप्रधान म्हणून पी. व्ही. नरसिंहराव यांनी कमान सांभाळली होती. मात्र सोनिया गांधी यांनी काँग्रेसची सूत्रे हातात घेतल्यावर मात्र काँग्रेसने पी व्ही नरसिंहराव यांच्या सोबत संबंध तोडून टाकले होते. पण हे एव्हड्यावर न थांबता पी व्ही नरसिंहराव यांच्या मृत्यू नंतर पण त्यांच्या पार्थिवाला काँग्रेस पक्षाच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी आणि काँग्रेस पक्षाने देशाच्या राजधानीत जागा दिली नाही. एका अर्थाने हा काँग्रेसने विशेषतः सोनिया गांधीने नरसिंहराव यांचा मृत्यू नंतर केलेला अपमानच होता. नरसिंहराव यांच्या मृत्यूनंतर इतक्या वर्षात काँग्रेसने किंवा काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याने नरसिंहराव यांना इतक्या आठवणीने श्रद्धांजली दिली नव्हती, की त्यांच्या विषयी कौतुकाचा एक शब्द पण काढला नव्हता.
भारताचे नववे पंतप्रधान इतकीच पी व्ही नरसिंहराव यांची ओळख नाही, तर भारताला आज जी आर्थिक शक्ती प्राप्त झाली आहे त्याचा रस्ता तयार करण्याचे कर्तृत्व हे पी व्ही नरसिंहराव यांच्या नावावर जमा आहे. पण काँग्रेसने भारतात आलेल्या आर्थिक उदारीकरणाचे श्रेय तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव यांना न देता, ते नेहमीच नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळातील अर्थमंत्री आणि नंतर सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेत तयार झालेल्या UPA सरकारमध्ये पंतप्रधान पद सांभाळलेले मनमोहन सिंग यांच्या गळ्यात टाकले. पण काँग्रेस पी व्ही नरसिंहराव यांच्या बाबतीत असे का वागत होती?
याचे महत्वाचे कारण म्हणजे पंतप्रधान म्हणून स्व. पी व्ही नरसिंहराव यांची कारकीर्द बरीच गाजली. यांच्याच काळात देश भरात "राम मंदिर" आंदोलन पेटले आणि त्याची परिणीती अयोध्येतील राम मंदिराच्या जागी उभा असलेला "विवादास्पद ढाचा" पाडण्यात झाली. भारतभर दंगली पेटल्या. काँग्रेसच्या अनेक नेते आणि खुद्द सोनिया गांधी यांच्या मान्यतेनुसार "विवादास्पद ढाचा" वाचवण्यात पी व्ही नरसिंहराव नापास झाले होते आणि भारतीय मुस्लिम काँग्रेस पासून दूर गेले. पी व्ही नरसिंहराव यांच्या हातून झालेला हा मोठा गुन्हा होता.
तसेच पंतप्रधान पदावर असतांना नरसिंहराव यांच्यावर थेट झालेले भ्रष्टाचाराचे आरोप पण काँग्रेस आणि सोनिया गांधी यांना खुपत होते असे कारण काँग्रेस देत असे, मात्र मनमोहनसिंग यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत या पेक्षा मोठे आरोप झाले असल्याने हे कारण लंगडे ठरते. त्या मुळे आयोध्येतील "विवादित ढाचा" पडणे हेच नरसिंहराव यांचा मोठा गुन्हा काँग्रेस साठी ठरला हे नक्की.
पण आज एकाएकी काँग्रेसला पी व्ही नरसिंहराव यांची आठवण का आली? वर सांगितल्या प्रमाणे हे वर्ष स्व. पी व्ही नरसिंहराव यांचे जन्म शताब्दी वर्ष आहे. या जन्म शताब्दी वर्षाचा उपयोग करत तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी स्व. नरसिंहराव यांना श्रद्धांजली देण्याच्या मोठ्या जाहिराती स्थानिक वृत्तपत्रात दिल्या. पी व्ही नरसिंहराव तेलंगणाच्या सुपुत्र त्यात त्यांच्यावर काँग्रेसने केलेल्या अन्यायामुळे तेलंगणात नरसिंहराव यांच्या विषयी कणव आहेच, त्याचाच फायदा घेत आपली राजनीती चमकवायचा चंद्रशेखर राव यांचा प्रयत्न. त्यातच भाजपने पण अगोदर पासूनच नरसिंहराव यांच्या वर झालेल्या अन्याया बाबत, त्यांनी देशाच्या अर्थव्यस्थेला चांगल्या स्तरावर नेण्यासाठी केलेल्या प्रयत्ना बाबत गौरव करण्यास सुरुवात केलेली आहे.
अगोदरच काँग्रेसने अश्याच पद्धतीने बाजूला टाकलेल्या स्व. वल्लभभाई पटेल यांचे अपहरण केल्या नंतर काँग्रेस या सगळ्या बाबत सजग झाली आहे. त्यातच आता सर्वोच्च न्यायालयात राम मंदिर विवादाचा निकाल लागत वादग्रस्त जागा हिंदूंच्या ताब्यात आल्या मुळे "विवादित ढाचा" चा मुद्दा फक्त राजकारणा पुरता आणि त्याचे खापर पण हिंदुत्ववादी संघटनांवर फोडणे सोपे आहे. देशात काँग्रेसचा कमी होणारा राजकीय पाया पक्का करतांना सोनिया गांधी यांना नरसिंहराव सारखे क्षेत्रीय नेते विरोधी पक्षाला आंदण देणे धोक्याचे राहील याची नक्कीच जाणीव आहे. त्याच मुळे नरसिंहराव यांच्या वरील काँग्रेसचे प्रेम उफाळून आले आहे.
म्हणजे एकूण काय ? तर आपल्या राजकीय फायद्या शिवाय काँग्रेस आपल्या नेत्याला पण लक्षात ठेवत नाही, तेव्हा UPA चे घटक पक्षांशी काँग्रेस फटकून वागली तर नवल काय?
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा