पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अयोध्या येथील पायाभरणी समारंभात सहभागी होऊ नका सांगणारे असादुदीन ओवैसी यांच्या पक्षाचे नाव काय आहे ? तर "ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन" ! आता जर पंथनिरपेक्ष भारतीय संविधानाच्या कोणत्या कायद्यात असे धार्मिक ठळकपणा असणारे नाव चालते हे मला समजवून सांगा ! त्यातही या पक्षाचा पूर्व इतिहास हा देशाला जोडण्यापेक्षा तोडण्यात अधिक स्वारस्य असलेला आहे, तत्कालीन हैद्राबाद राज्यात भारत विरोधी कारवाया आणि हिंदूंना प्रताडित करणारा सैय्यद कासीम रिजवी याच पक्षाचा ! याच कासीम रिजविच्या "रझाकार" नावाच्या सशस्त्र संघटनेने तेव्हा हैद्राबात राज्यात कोणावर आणि कसे अत्याचार केले हे इतिहासात नमूद आहे. AIMIM पक्षाला मोठा करणारा हाच रिजवी. समजा देशाच्या संविधानाची आणि देशाच्या पांथनिरपेक्षपणाची इतकी बूज असादुदीन ओवैसी यांना आहे तर त्यांनी सगळ्यात आधी आपल्या पक्षाचे नाव बदलावे. असादुदीन ओवैसी यांच्या भावाने "१५ मिनिटकरता पोलीस हटवा" सारखे वक्तव्य केले ते पण संवैधानिक होते का ? याचे पण उत्तर असादुदीन ओवैसी यांनी द्यावे.
आपल्या देशात संविधानाच्या कोणत्याही भागात देशाच्या पंतप्रधानाने कोणत्याही धर्माच्या समारंभाला जाऊ नये असे कुठेही लिहलेले नाहीये. खरे तर भारतीय संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला आपापल्या धर्माचे पालन करायचा अधिकार दिला आहे, मग त्याला पंतप्रधान कसे अपवाद असणार ? सोरटी सोमनाथ मंदिराच्या पुनर्रनिर्माण कार्यक्रमात तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू गेले नाही याचे उदाहरण अनेक जण देतात, पण तो त्यांचा वयक्तिक निर्णय होता, त्या निर्णयात कोणत्याही पद्धतीने संविधान अंतर्भूत नव्हते.
असादुदीन ओवैसी स्वतः वकील आहेत, आपल्या राजकीय अजेंड्यासाठी या वकिली ज्ञानाचा पुरेपूर वापर करतात. असादुदीन ओवैसी यांनी केलेल्या ज्या ट्विट मुळे हा वाद सुरु झाला त्याच ट्विट मध्ये पंतप्रधांना संविधानाचा हवाला देऊन नंतर खालच्या ओळीत ते पडलेल्या विवादित ढाच्याचा उल्लेख "बाबरी मशीद" म्हणून करतात. खरे तर राम मंदिराच्या प्रदीर्घ न्यायालयीन आणि न्यायालयाबाहेरील संघर्षात हा विवादित ढाचा "मशीद" नाही या महत्वाच्या मुद्द्यावर लढला गेला. न्यायालयाबाह्य लढ्याला तर ५०० वर्षाचा इतिहास आहे. आधुनिक न्यायालयीन लढा पण अगदी ब्रिटिश आमदनी पासून सुरु आहे, म्हणजेच न्यायालयीन लढा पण जवळपास २०० वर्षाचा इतिहास सामावून आहे. इतके वर्षाच्या या न्यायालयीन लढ्याचे फलित हेच निघाले कि "विवादित ढाचा" हि तथाकथित बाबरी मशीद नाही आणि हा विवादित ढाचा हिंदू मंदिर पाडून बांधण्यात आला. पण असादुदीन ओवैसी आणि त्यांच्या सारखे मनाला कुबड आलेले भारतीय वृत्तपत्रे अजूनही त्या "विवादित ढाच्याला" बाबरी मशीद संबोधित करत असतील तर तो भारतीय संविधानाच्या अधीन असलेल्या न्यायालयाच्या निर्णयाचा म्हणजेच भारतीय संविधानाचा अपमान करत नाही काय ?
असादुदीन ओवैसी आणि त्यांना साथ देणारे अजून एक गैरसमज पसरवत आहे, तो म्हणजे १९९२ साली विवादित ढाचा पडल्यागेल्या नंतर त्या ढाच्या खाली मिळालेल्या पुराव्यांमुळे राम मंदिर उभे राहिले. म्हणजे हे पुरावे मिळवण्यासाठी विवादित ढाचा पाडण्यात आला. पण हे पण एक मोठे असत्य कथन आहे. कारण भारतीय पुरातत्व विभागाचे निवृत्त निदेशक के के मुहम्मद यांनी दिलेल्या पुरातत्व पुराव्यांमुळे न्यायालयात राम मंदिर असल्याचे सिद्ध झाले. पण हे पुरावे १९७६ साली पुरातत्व विभागाच्या महानिदेशक बी बी लाल यांच्या नेतृत्वात केल्या गेलेल्या राम मंदिर परिसरातील उदखणनात मिळालेले आहेत, स्वतः के के मोहम्मद या उदखणन करणाऱ्या चमूत होते आणि हि बाब त्यांनी वेळोवेळी प्रसार माध्यमांसमोर आणली आहे.
आता पुन्हा संविधान काय म्हणते ? भारताचे संविधान असलेल्या ६ मौलिक अधिकारातील ४ थ्या अधिकारात धार्मिकतेचा अधिकार देते. अनुच्छेद २५ पासून २८ पर्यंत अनुच्छेदात या अधिकाराचा उल्लेख येतो. ज्या अनुच्छेद २५ चा उल्लेख असादुदीन ओवैसी प्रत्येक वेळेस आपल्या धार्मिक स्वातंत्र्यासाठी करत असतात, तेच अनुच्छेद २५ पंतप्रधाना पण धार्मिक स्वातंत्र्य देते याचा विसर तमाम संविधान अभ्यासकांना पडला आहे का ?
असो, मात्र महत्वाचे हे कि भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान सरकारी खर्चाने आपल्या सरकारी निवास्थानात इफ्तार पार्टी देतात, वेगवेगळ्या दर्ग्यांना भेटी देतात, वेगवेगळ्या धर्माच्या प्रार्थना स्थळाच्या उदघाटनाला, कार्यक्रमाला उपस्थिती लावतात तेव्हा कोणालाही ते संविधानाचे उल्लंघन वाटत नाही, पण राम मंदिराच्या पायाभरणी समारंभा बाबत तसे वाटते याचे कारण सरळ आहे, जे राम मंदिर होण्या सारखे नाही या भ्रमात हि लोक होती त्यांचा भ्रमाचा भोपळा आता फुटला आहे. आता कसेही करून या कार्यक्रमाला गालबोट लावायचे हा यांचा पहिला अजेंडा झाला आहे. हा प्रकार जो पर्यंत राम मंदिर पूर्ण बांधून तयार होत नाही तो पर्यंत सुरु राहणार हे नक्की.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा