अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पोकळ काळजी

माजिद मजीदी नावाचा एक आंतराष्ट्रीयस्तराचा दिगदर्शक आहे. इस्लामिक क्रांती करून सत्तेत आलेल्या आणि आपल्या क्रांतीने जागतिक दादागिरी करणाऱ्या महाशक्ती असलेल्या अमेरिकेच्या तोंडाला फेस आणणाऱ्या आयतुल्ला खोमोनी यांच्या इराण देशातला. भारतात इराणी चित्रपटांचे खूप प्रशंसक आहेत. इस्लामी देश असून, इस्लामिक देश असून, धार्मिक कायदे असून पण मानवी भाव भावनांना सुंदरतेने आणि अत्यंत प्रभावीपणे पडद्यावर दाखवायची एक वेगळी पद्धत या इराणी दिगदर्शकांनी सुरू केली म्हणून!

असो तर याच माजिद मजीदी यांचा २०१५ मध्ये एक चित्रपट प्रदर्शित झाला "मोहम्मद : द मेसेंजर ऑफ गॉड" इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद यांच्या वरील चरित्रपट! आता एका कर्मठ इस्लामी देशातील माणसाने बनवलेल्या या पुरस्कार प्राप्त चित्रपटावर वाद होण्याचा प्रश्नच निर्माण व्हायला नको होता.

मात्र भारतात या चित्रपटावर वाद झालाच, भारतात २०१५ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित करायला बंदी घालण्यात आली. तेव्हा पण भारतीय मुस्लिम या चित्रपट बंदीच्या मुद्द्यावर वाटल्या गेले होते. इतकेच नाही तर भारताचे सुप्रसिद्ध संगीतकार ए आर रहमान यांनी संगीत दिले होते. त्यांच्या विरोधात पण रझा अकादमीने फतवा काढला होता, कारण त्यांनी या चित्रपटाला संगीत दिले होते. काही काळ या फतव्यामुळे आपले भारतातील जाहीर कार्यक्रम पण रद्द करावे लागले होते.

आता या चित्रपटाला विरोधाचे कारण काय? तर सरळ आहे इस्लाम मध्ये चित्र काढणे, चित्रपट बनवणे निषिद्ध आहे, इथे तर मोहम्मद पैगंबरवर चित्रपट काढण्यात आला होता! त्यातही शिया - सुन्नी वादाची किनार होती, चित्रपट बनला होता शिया बहुल इराण मध्ये, शिया इस्लामी दिगदर्शकाने त्या मुळे भारतातील सुन्नी इस्लामी संस्थांनी या चित्रपटावर बंदी घालायची मागणी केली आणि सरकारने मान्यही केली.

इतर वेळेस अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सिनेमॅटिक लिबर्टी वगैरेंच्या नावाखाली मोठमोठ्या गप्पा ठोकणारे तथाकथित स्वातंत्र्यवादी तथाकथित पुरोगामी कंपूपैकी कोणीही या चित्रपटाच्या बंदी बाबत तोंड उघडले नव्हते, ना कोणत्या वृत्तपत्राने किंवा वृत्तवाहिनीने या वर कथा किंवा लेख लिहले, सगळे या बंदी बाबत शांत होते. हे तेच होते जे पद्मावत आणि बाजीराव मस्तानी सारख्या चित्रपटातील ऐतिहासिक चुका दाखवत असलेल्या लोकांना असहिष्णू म्हणत होते हे विशेष! अर्थात आंधी, किस्सा कुर्सी का, इंदू सरकार या चित्रपटांच्या वेळेस याच लोकांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे प्रेम जनतेला माहित झाले होते. 


आज पुन्हा या "मोहम्मद : द मेसेंजर ऑफ गॉड" हा विषय वरती आला आहे. कारण OTT प्लॅटफॉर्म वर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. भारतात सध्यातरी OTT वर दाखवण्यात येणाऱ्या कन्टेन्ट वर कोणतेही नियंत्रण नाहीये. पण रझा अकादमी ही कुप्रसिद्ध संस्था जीचे नाव अगोदर मुंबईत दंगल करण्यासाठीच नाही, तर महिला पोलिसांवर हात टाकण्यात पण गुंतले आहे तिने या चित्रपट प्रदर्शनावर बंदी घालायची मागणी आता सत्तेत असलेल्या पुरोगामी, सहिष्णू, अभिव्यक्ती स्वातंत्र्या करता सजग असणाऱ्या आघाडी सरकार कडे केली आहे.

इतकेच नाही तर भारतीय संविधानाचे खरे संरक्षक असल्याचा दावा करणारे, त्या पाई भारतीय संविधानातील अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराचे रक्षण करण्यासाठी देशविरोधी घोषणा देणाऱ्यांच्या मागे उभे राहणारे, भारतातील देश विरोधी नक्षली समूहाला पण पाठींबा देणारे, वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर पण "जय भीम, जय मिम" च्या प्रेमात आकंठ बुडत आपल्याच अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दलच्या विचारांच्या विरोधात जात या चित्रपटावर बंदी टाकायची मागणी सरकारकडे करते तेव्हा मात्र यांच्या तथाकथित वैचारिक बैठकीवर प्रश्न उभा राहतो. 


आता आपल्याला बघावे लागेल आता हे पुरोगामी, सहिष्णू, अभिव्यक्ती स्वातंत्र्याला मान्य करणारे आघाडी सरकार या बंदी बाबत काय निर्णय घेते.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा