पुरोगामी लोचटांची भंपकगिरी


तुम्हाला आठवत असेल तर २५ मे २०१७ ला राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला लातूर येथे अपघात झाला होता. मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात होणे हा गंभीर प्रसंग होता. दैव बलवत्तर म्हणून या अपघातातून मुख्यमंत्री त्याच्या सोबत असलेले प्रधान सचिव, तसेच मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक या अपघातातून सुखरूप बचावले. पण या अपघाताचे वृत्त देतांना एका वृत्तपत्राच्या पत्रकाराने मात्र लोचटपणा करायची हुक्की आली आणि त्याने या वृत्ता सोबतच अजून एक हातची घटना मोठ्या नजाकतीने चिटकवली, "माझा राजा संकटात आहे." या मथळ्याखाली! 
"माझा राजा संकटात आहे!" या मथळ्या खालील वृत्ताचा तपशील साधारण असा होता, "अपघात झाल्यावर अपघात स्थळावर धावपळ माजली, ५० फुटावरून अनियंत्रित हेलिकॉप्टर खाली पडत आहे बघून जमिनीवर उपस्थित जमाव आपला जीव वाचवायला सैरावैरा धावायला लागला, अगदी बंदोबस्तासाठी असलेले पोलीस पण अपघात स्थळापासून दूर जायला लागले, मात्र एक जण या सगळ्यात वेगळा निघाला, तो जमाव आणि पोलीस पळत होते त्यांच्या विरुद्ध दिशेला पडणाऱ्या हेलिकॉप्टर कडे पळाला, सोबत ओरडत होता,"माझा राजा संकटात आहे" आणि त्याने आपला जीव धोक्यात घालत मुख्यमंत्र्यांचा जीव वाचवला." आठवते का ही कहाणी ! या कहाणीचा नायक एक मुस्लिम समाजातील आहे अशी मखलाशी पण केली होती. अर्थ सरळ होता की हिंदुत्ववादी विचारांच्या नेत्याला वाचवायला राज्यातील एक मुस्लिम व्यक्ती धावतो, सोबतच तो त्या नेत्याला "माझा राजा" म्हणून संबोधतो ! थोडक्यात या सगळ्याचा अर्थ असा की,  बघा एक मुस्लिम तुम्ही हिंदुत्ववादी असून जीवाची बाजी लावतो आणि तुम्ही हिंदुत्वाच्या राजकारणाने त्यांचा दुस्वास करता. अर्थात पत्रकाराने ही कहाणी बनविली होती, लातूर पोलिसांनी या वृत्ताचे खंडन केले आणि पोलिसांनी आपला जीव धोक्यात घालत मुख्यमंत्र्यांना सगळ्यात पहिले मदतीचा हात दिल्याचे सांगितले. मग हे वृत्त देणाऱ्या राज्याच्या प्रसिद्ध वृत्तपत्राने हळूच ही कहाणी आपल्या ऑनलाईन अडिशन मधून गायब केली आणि इतर वृत्तपत्र पण "तेरी भी चूप, मेरी भी चूप" या उक्तीला जागत चूप बसले. 
कथा सांगण्याचे कारण म्हणजे राज्यातीलच नाही तर देशाच्या तथाकथित पुरोगामी नेत्यांना, पत्रकारांना आणि स्वयंघोषित समाजसेवकांना असल्या बातम्या तयार करण्याची सवय झाली आहे. बातमी खोटी असेल तर रंगवली जाते की खरी वाटावी आणि खरी असेल तर अजून भरती येते. 
आता चिनी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या निमित्याने दरवर्षी नेमाने होणारी पंढरपूर यात्रा रद्द झाली, पण परंपरा मोडायला नको म्हणून या यात्रेत दरवर्षी वाजत गाजत भक्तिभावाने पायी चालत जाणाऱ्या पालख्या राज्य परिवहनने नेण्याचे सरकारने  घोषित केले. अर्थात या पण कामात या सरकारने कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही याचे उत्तम उदाहरण नाशिकहून पंढरपूरला जाणाऱ्या पालखीला ७१ हजार रुपयांचे तिकीट खर्च वसूल करून नेले. नंतर पुन्हा परिवहन मंत्री सारवासावर करायला हजर झाले. 
तर या परिवहन मंडळाच्या एका बसचा चालक हा मुस्लिम होता आरिफ शेख नावाचा. काय आनंद झाला याचा या तथाकथित पुरोगामी लोकांना! काय सांगू आणि किती सांगू असे झाले यांना. म्हणे चिठ्ठ्या टाकून ज्याचे नाव आले तो गेला चालक म्हणून, आणि नाव निघाले या मुस्लिम चालकाचे. आता त्या आरिफ शेखच्या आनंदा पेक्षा यांनाच जास्त आनंद. समाज माध्यमांवर गोडवे गायला सुरवात केली यांनी, मुस्लिम असून बस चालवली पालखीची! म्हणजे महामंडळाचा चालक आहे, बस चालवणे कामच आहे त्याचे, ती बस पंढरपूरला जात असेल तर चालवणार नाही आणि इस्लामपूरला जात असेल तर चालवेल किंवा बस मध्ये ताजिया असेल तर मी चालवेल आणि पालखी असेल तर चालवणार नाही असे म्हणण्याचा त्याचा अधिकारच नाहीये. तर त्याने बस चालवली किंवा चिठ्ठीत त्याचे नाव आले हे विशेष नाहीये. साहेब विशेष हे आहे की त्याच्या नावाची चिठ्ठी बाकीच्या हिंदू चालकांनी बनू दिली आणि त्याचे नाव आल्यावर कोणताही धार्मिक आवेश न आणता आरिफ शेख वर विश्वास ठेवत त्याला बस चालवू दिली. आरिफ शेख यांचे कौतुक या करता की परिवहन मंडळात काम करतांना आपल्यावर आलेली जवाबदारी प्रामाणिकपणे पूर्ण केली असे लिहायची खूप इच्छा होती पण........

पण मित्रांनो दुर्दैवाने ही पण बातमी तितकीच खोटी निघाली जितकी वरची "माझा राजा संकटात आहे." ची बातमी खोटी होती. बसचे चालक आरिफ शेख नसून तुषार काशीद होते. आता या तथाकथित पुरोगाम्यांचे सर्वधर्मसमभावाचे खरे स्वरूप तुमच्या डोळ्यासमोर नक्कीच येईल. खोट्या बातम्या आणि खोट्या घटना अश्या प्रकारे सांगत उगाच लोकांना फसवण्यात कसे येते ते लक्षात घ्या! आपली समरणशक्ती खूप कमी असते म्हणून दोन वर्षा पूर्वी या तथाकथित पुरोगाम्यांनी केलेला थापेबाज पणा समोर आणला, तेव्हा जागे व्हा! जागे रहा!


टिप्पण्या