राज्यात वाढती गुन्हेगारी हि एक गंभीर समस्या आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना राज्यातील सगळी माध्यमे नागपुरातील वाढत्या गुन्हेगारी कडे बोट दाखवत ओरडत होती. विरोधी पक्षात बसलेले राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत सत्तेतील शिवसेना पण या शहर आणि जिल्यातील वाढत्या गुन्हेगारीचे खापर भाजप आणि देवेंद्र फडणीस यांच्यावर टाकत होते. मुळातच राज्यातील वाढती गुंडागर्दी आणि गुन्हे यात सगळ्याच पक्षांचा समान वाटा आहे. पण त्यातही रोज होणाऱ्या मारामाऱ्या, खून आणि बलात्कार या सगळ्यात पोलिसांचा, न्यायपालिकांचा धाक उरला नाही हे खरे कारण आहे.
आज राज्याचे गृहमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातात आहे, त्यातही नागपूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार आणि पालकमंत्री असलेले श्री अनिल देशमुख यांच्या कडे हे पद आहे. तरी नागपूर शहरात आणि जिल्ह्यात गुन्हेगारीचा आलेख वाढत चालला आहे. जे गृहमंत्री आपल्या पालक जिल्ह्याचे गुन्हेगारीकरण थांबवू शकत नाही ते राज्याची धुरा कशी सांभाळणार ?
राज्यातील "लॉक डाऊन" जसा जसा शिथिल झाला,तसा तसा नागपूर शहर आणि जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आलेख वाढायला लागला. नागपूर शहरातच मार्च महिन्यात ५ खून, ८ खुनाचे प्रयत्न, १ दरोडा, ५२ घरफोड्या आणि १६ बलात्कार नोंदले गेले, एप्रिल महिन्यात ४ खून, ३ खुनाचे प्रयत्न, २२ घरफोड्या आणि ३ बलात्कार तर मे महिन्यात ७ खून, ७ खुनाचे प्रयत्न, ३ दरोडा, ३२ घरफोड्या आणि ८ बलात्कार नोंदल्या गेले. जून महिन्यात तर एकच दिवशी नागपूर शहरातील दोन टोकांना दिवसाढवळ्या लोकांदेखत भररस्त्यावर खुनाचे गुन्हे गुन्हेगारांनी केले, आता तर कुठे जून महिना सुरु झाला आहे तेव्हाच शहरातील खुनाची संख्या ५ वर पोहचली आहे. हे सगळे कमी म्हणून कि काय शहरातील बलात्कारा सारख्या गुन्ह्याची क्रूरता पण वाढत आहे, नागपुरातील एका परिसरात ४ महिन्याच्या गर्भवतींवर शस्त्राचा धाक दाखवत सामूहिक बलात्कार केल्या गेला. ज्यांनी गुन्हा केला ते त्या भागातील गुंड आहेत. या गुंडांना मोठे करणारे कोण ? हेच राजकारणीच ना ? नागपूरकरांनी पुन्हा एखाद्याचा "अक्कू यादव" केलेल्या शिवाय गृहमंत्री जागे होणार नाहीत.
हे सगळे कमी कि काय म्हणून आता नवीन प्रकरण खुद्द गृहमंत्र्यांच्या गावातून नरखेड मधून बाहेर येत आहे. २७ मी रोजी थडीपवनी येथील अरविंद बनसोडे नावाचा तरुणाने तेथील एच पी गॅस एजेन्सी समोर कीटकनाशक घेऊन आत्महत्या केली. मात्र या मागे त्या गॅस एजेन्सीचे मालक मिथिलेश उमरकर असल्याचा आरोप आता स्थानीय संघटनांकडून होत आहे. विशेष म्हणजे हे मिथिलेश उमरकर राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानीय पदाधिकारी असल्याचे समोर येत आहे. अरविंद बनसोडे यांची आत्महत्या म्हणून प्रशासन दाखवत असले तरी हि आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप स्थानीय संघटना करत आहे. तसेच स्थानीय पोलीस प्रशासनावर प्रकरण दाबण्यासाठी राजकीय दबाव असल्याचा पण आरोप होत आहे. विशेष म्हणजे या सगळ्या प्रकरणात जातीय रंग भरण्याचे काही संघटनांचे प्रयत्न जोरात सुरु झाले आहे. या पेक्षा वरताण म्हणजे राष्ट्रवादी पक्षाचे नवनिर्वाचित आमदार अमोल मिटकरी या प्रकरणावर प्रश्न विचारले म्हणून धमक्या देत असल्याचे फेसबुक लाईव्हचे व्हिडीओ समाज माध्यमांवर पसरत आहे. शाहू - फुले - आंबेडकरांचे नाव घेत सत्तेत येणाऱ्या पक्षावर जातीयतेचे आरोप होणे आणि पक्षाच्या आमदाराने धमक्या देणे काही शोभत नाही, सोबत गृहमंत्री पद हातात असतांना कायदा तोडण्याचा प्रकार होत असेल तर गृहमंत्री स्वतःच्या पक्षाच्या आमदारांवर पण कायद्याचा वचक ठेऊ शकत नाही हेच अधोरेखित होते. .

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा